Source :- BBC INDIA NEWS
“जा रही हूं, सब जन अपना खयाल रखना. कोई रोना नही, मेरे जाने के बाद” असा व्हिडिओ स्टेटसला ठेवून, लग्नाच्या वाढदिवशीच लग्नाचे कपडे घालून एका दाम्पत्यानं त्यांचं आयुष्य संपवल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
नागपूर शहरातील मार्टिन नगरमध्ये राहणाऱ्या जेरील आणि ॲनी या दाम्पत्यानं गळफास लावून आत्महत्या केली. हाती काम नाही आणि पदरी मूल नाही त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
प्रकरण काय?
जेरील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि ॲनी जेरील मॉनक्रिप या दाम्पत्याचा 6 जानेवारीला लग्नाचा 26 वाढदिवस होता. लग्नाचे कपडे घालून 54 वर्षीय जेरील आणि 45 वर्षीय ॲनी या दोघांनी तो साजरा देखील केला.
त्यानंतर 7 जानेवारीला पहाटे पावणे सहाच्या सुमारास त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी एक व्हीडिओ बनवला आणि तो व्हीडिओ त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला. त्यानंतर दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली.
त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी सकाळी तो व्हीडिओ पाहिल्यानंतर जेरील आणि ॲनी यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
अशाप्रकारे 7 जानेवारीला सकाळी साडेसातच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेरील यांचा मृतदेह स्वयंपाक घरात लटकलेल्या अवस्थेत होता तर त्यांच्या पत्नी ॲनी यांचा मृतदेह हा घरातील एका बेडवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळेला होता तसेच त्यांच्या मृतदेहावर फुलंदेखील ठेवली होती.
त्यामुळे जेरिल यांनी स्वतः गळफास घेण्यापूर्वी, पत्नी ॲनीला आधी गळफास लावून आत्महत्या करायला लावली. त्यानंतर त्यांचा लटकलेला मृतदेह काढून तो पांढऱ्या कपड्यानं गुंडाळून फुलांसोबत बेडवर ठेवला आणि त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली.
सुसाईड नोटसह पोलिसांना स्टॅम्प पेपर आणि 75 हजार रुपये त्यांच्या घरात सापडले आहेत. स्वतःच्या अंत्यविधीसाठी हे 75 हजार रुपये ठेवले असल्याचं त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.
आपलं राहतं घर कुणाला द्यावं हे सुद्धा त्यांनी स्टॅम्पपेपर वर लिहून ठेवलं आहे
लग्नाच्या वाढदिवशीच या दाम्पत्यानी आत्महत्या केल्यानं परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आत्महत्येचं कारण काय?
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, “जेरील आणि ॲनी यांच्या घरात त्यांना एक सुसाईड नोट मिळाली. ज्यामध्ये त्यांनी आत्महत्या करण्यामागचं कोणतंही कारण स्पष्ट लिहिलेलं नाही. कोणत्याही दबावाशिवाय, त्यांच्या मर्जीनं आत्महत्या करत असल्याचं त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.”
परंतु लग्नाला एवढी वर्ष होऊनही अपत्यप्राप्ती होत नसल्यामुळे जेरील आणि ॲनी हे दोघे नैराश्यात असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
ॲनी यांना एक आजार होता. त्यामुळे दीड वर्षापूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचं गर्भाशय काढण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती.
त्यामुळे खचलेल्या जेरील आणि ॲनी यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा अशी माहिती पोलिसांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
तसेच जेरील हे काही वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये काम करायचे तर त्यांची पत्नी ॲनी या घरकाम करायच्या. परंतु मागच्या काही वर्षांपासून जेरील यांच्या हातात कोणतही काम नव्हतं, ते बेरोजगार होते अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लोकांच्या मनात आत्महत्येचा विचार का येतो?
एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणं, याला मानसोपचारतज्ज्ञ ‘सुसाइड आयडिएशन’ म्हणतात.
मनात आत्महत्येची कल्पना येण्यास एकच कारणं कारणीभूत नसतं. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याआधी घडलेली घटना निमित्तमात्र असू शकते. त्याक्षणी, जीवन संपवणं हा एकच मार्ग त्या व्यक्तीला दिसतो, असं तज्ज्ञ म्हणतात.
दिलशाद खुराना Mpower या मानसिक आरोग्याशी संबंधित हेल्पलाईनच्या प्रमुख मानसशास्त्रज्ञ आहेत. त्या म्हणतात, “माझ्या जीवनात काहीच उरलेलं नाही. आयुष्य संपवणं हा एकच मार्ग आहे. लोकांच्या मनात येणाऱ्या या विचारांना ‘सुसाइड आयडिएशन’ म्हणतात.”
नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या असा सर्वसाधारण समज आहे. याचं कारण डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. मग आत्महत्येचा विचार नैसर्गिक असतो? का यामागे वैद्यकीय कारणं आहेत?
मनोविकारतज्ज्ञ डॉ. अंबरीश धर्माधिकारी सांगतात, “आत्महत्येचा विचार नैसर्गिक नसतो. मेंदूतील बायो-न्यूरॉलॉजीकल बदलामुळे लोकांना जीवन व्यर्थ वाटू लागतं. त्यामुळे, आत्महत्येचे विचार येतात. आत्महत्येच्या 90 टक्के प्रकरणात मानसिक आजार प्रमुख कारण आहे.”
डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मक नजरेने पहातात. जणू त्यांनी नकारात्मक विचारांचा चष्मा घातलेला असतो.
मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीत काय बदल होतात?
तज्ज्ञांच्या मते, नेहमी हसमुख किंवा लोकांमध्ये मिसळणारा व्यक्ती अचानक एकटा राहू लागला, अबोल झाला. सिगरेट किंवा मद्यपान अधिक प्रमाणात सुरू होणं. हे व्यक्तीत होणारे बदल आहेत. सतत निराशावादी बोलणं, मृत्यूची भाषा करणं, ही काही आजाराची लक्षणं आहेत. एखाद्याच्या आयुष्यातल्या या बदलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
डॉ. धर्माधिकारी पुढे सांगतात, “आत्महत्येचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत वॉर्निंग साईन (धोक्याची सूचना) असतातच असं नाही. पण बऱ्याचदा लोक त्यांच्या भाषेतून किंवा कृतीतून अशा साईन्स देत असतात.”
एखादा व्यक्ती ज्या गोष्टी सामान्यत: बोलत नाही. अशा गोष्टी वारंवार होत असतील तर त्या वॉर्निंग साईन असू शकतात.
मनात आत्महत्येचा विचार आला तर काय करावं?
नकारात्मक विचार प्रत्येकाच्या डोक्यात येतात. काहीवेळा मनात येणारा विचार काही क्षणांचा असतो. तर, काही लोकांमध्ये हळूहळू नकारात्मकता वाढत जाऊन हे विचार वाढतात.
मानसिक आजारांबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे लोक मोकळेपणाने बोलणं टाळतात. अशावेळी मानसिक आरोग्याबाबत समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईन महत्त्वाची भूमिका बजावतात.
मुंबईच्या केईएम रुग्णालयातर्फे मानसिक आरोग्यावर समुपदेशनासाठी ‘हितगुज’ हेल्पलाईन कार्यरत आहे. याचं महत्त्व सांगताना विभागप्रमुख डॉ. अजिता नायक म्हणतात, “सुसाईड प्रतिबंध हेल्पलाईन रुग्णांशी संपर्काचा पहिला टप्पा असतो. आत्महत्येचा विचार मनात आल्यानंतर, थेट मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणं शक्य नाही. अशावेळी या हेल्पलाईनवर संपर्क केल्यामुळे मदत मिळू शकते.”
तज्ज्ञ सांगतात मनात आत्महत्येचा विचार आल्यास मानसिक आरोग्यासंबंधी समुपदेशन करणाऱ्या हेल्पलाईनला संपर्क करा किंवा शक्य असेल तर समुपदेशक किंवा डॉक्टरांना भेटा.
आत्महत्येचा विचार का येतो, हा किती गंभीर आहे याचं निदान महत्त्वाचं आहे.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC