Source :- BBC INDIA NEWS
“प्लीज, माझ्या शहरात या!”
जगभरातले सगळेच संगीतप्रेमी आपल्या आवडत्या कलाकारांना अशी विनवणी करत असतात. पण भारतातल्या चाहत्यांची ही इच्छा फार क्चचितच पूर्ण होते.
साबरीना कार्पेन्टर, ग्रेसी ॲबराम्स आणि आर्क्टिक मंकीज यासारख्या कलाकारांचं नाव स्पॉटिफायच्या ‘वीकली अल्बम चार्ट’ या आठवड्यातील सर्वाधिक पसंती मिळालेल्या गाण्यांच्या यादीत नेहमी झळकताना दिसतं.
मागे एड शेरीनचा “÷ (डिव्हाईड)” हा अल्बम तर या यादीत सलग 217 आठवडे होता. याचाच अर्थ, अनेक भारतीय या कलाकारांना ऐकायला आतूर असतात.
आत्तापर्यंत हे जगप्रसिद्ध कलाकार भारतात येणं फार दुर्मिळ होतं.
पण आता परिस्थिती बदलताना दिसत आहे.
दुआ लिपा या गायिकेचा नुकताच मुंबईत दणक्यात कार्यक्रम झाला. तसंच, कोल्ड प्ले हा बँडही लवकरच भारत दौरा करणार आहे. जवळपास नऊ वर्षांनी कोल्डप्ले भारतात पाऊल ठेवेल.
अहमदाबादमध्ये त्यांचे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. दोन्ही कार्यक्रमांना प्रत्येकी 1 लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
“आपल्याच देशात हा अनुभव घेणं ही भारी गोष्ट आहे. त्यांचे कार्यक्रम भारतात वाढतायत ही किती कूल गोष्ट आहे!” असं अनुष्का म्हस्के या संगीतप्रेमी आणि गीतकार तरुणीने बीबीसी न्यूजबीटला सांगितलं.
भारताचं आकर्षण
लाईव्ह कॉन्सर्टची मागणी भारतात वाढत असल्याचं दिसतंय. या कार्यक्रमांच्या तिकीटाच्या विक्रीत 2024 मध्ये 18 टक्के वाढ झाल्याचं ‘बुकमायशो’ या प्लॅटफॉर्मने नोंदवलंय.
यंदा एड शेरीन भारतातला आत्तापर्यंतचा सर्वात लांबलचक दौरा करणार आहेत. शिवाय, शॉन मेन्डस आणि लुईस टॉम्लिन्सनही मार्चमध्ये होऊ घातलेल्या ‘लोलापालोझा फेस्टिव्हल’मध्ये येणार आहेत.
भारताच्या 14 कोटी लोकसंख्येत तरुण जास्त असणं हा या कलाकारांना खेचणारा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असल्याचं इंग्लडमधल्या लीड्स विद्यापीठातील बिझनेस स्कूलमधले मार्केटिंगचे प्राध्यापक डॉ. सौरींदर बॅनर्जी सांगतात.
“जगातल्या तरुणांपैकी बहुसंख्य तरुण भारतात राहतात,” बॅनर्जी बीबीसीशी बोलताना सांगत होते.
“त्यामुळे मी संगीत व्यवसायात असलो असतो तर मी याच भागावर लक्ष्य केंद्रीत केलं असतं. लोकसंख्येच्या तारुण्याचा पुरेपूर फायदा घेतला असता,” ते पुढे म्हणाले.
स्टॅटिस्टा या जागतिक बाजार संशोधक कंपनीनुसार, भारतातल्या संगीत क्षेत्रात 2021 मध्ये 1900 कोटी रुपयांची उलाढाल झाली.
2026 पर्यंत हा आकडा 3700 कोटी रुपयांपर्यंत जाईल असा आकडा आहे.
के-पॉप या कोरियन लोकप्रिय संगीताचा प्रभाव वाढल्याने भारतातल्या चाहत्यांमधली क्षमता पाश्चिमात्य कलाकारांनाही दिसतेय, असं डॉ. बॅनर्जी सांगतात.
मोठ्या संगीत कंपन्यांकडे संशोधन करणारे गट असतात. के-पॉप सारखे इतक संगीत प्रकार आणि कलाकार या मोठ्या बाजारावर प्रभाव टाकू शकतात हे या संशोधन करणाऱ्या गटांना समजलं आहे.
भारतातल्या लोकांच्या जीवनशैलीत होणारी सुधारणा आणि जगाशी असलेले संबंध यामुळे या मातीत पाय रोवणं आणि स्थानिक कलाकारांशी हातमिळवणी करणं महत्त्वाचं असल्याचं कलाकारांच्या लक्षात येतंय, असं बॅनर्जी यांना वाटतं.
“फक्त भारतातलाच बाजार नाही तर देशाबाहेर मोठ्या संख्येनं राहणाऱ्या भारतीय लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,” ते म्हणतात.
भारतीय कलाकारांसाठी वाढलेली संधी
स्थानिक भारतीय कलाकारांसाठी हा आशेचा किरण आहे. मोठ्या आंतरराष्ट्रीय संगीत कंपन्या मोठी संधी त्यांना उपलब्ध करून देत आहेत.
पॉप किंवा लोकसंगीत गाणाऱ्या अनुष्का 2020 पासून गीतकार म्हणून काम करतात. आंतरराष्ट्रीय कलाकारांमुळे स्थानिक कलाकारांना जास्त प्रसिद्धी मिळते, असं त्या सांगतात.
ब्रिट पुरस्कार विजेत्या बेन हॉवर्ड यांच्या कार्यक्रमात त्यांना ओपनिंगची संधी मिळाल्यानंतर त्यांना हा अनुभव आला होता. “अशी संधी मला माझ्याच देशात मिळेल असं मला कधीही वाटलं नव्हतं,” त्या म्हणतात.
मोठ्या कलाकारांसोबत काम करणं तुम्हाला प्रकाशझोतात आणून ठेवतं, असं अनुमिता नादेसन या हिंदीत स्वतंत्रपणे काम करणाऱ्या गायिका आणि गीतकार म्हणतात.
“त्याने प्रेरणाही मिळते. नाहीतर पुर्वी या मोठ्या कलाकारांना ऐकायचं असेल तर दुसऱ्या देशात प्रवास करायला लागायचा. आता स्वतःच्यात देशात या कलाकारांच्या कॉन्सर्ट्सला जाता येत असल्यानं त्यांच्याकडून शिकणं आणखी सोपं होतं,” त्या म्हणतात.
परदेशातले अगदी हालाखीच्या परिस्थितीतून वर आलेले हे कलाकार पाहिले की आपणही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतो असा संदेश भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, असं पॉप कलाकार फ्रिझेल डिसुझा यांना वाटतं.
एड शेरीन हे त्यांचे आवडते गीतकार असल्याचं त्या सांगतात. एकेकाळी रस्त्यावर गाणी गाणारा हा कलाकार हळूहळू छोट्या गावांत, कार्यक्रमात गाऊ लागला. त्याचा हा प्रवास फार जवळचा वाटत असल्याचं डिसुझा सांगतात.
“त्यांच्यासारख्या कुणाला पाहिल्याने स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढतो. आत्ता ते मोठे सूपरस्टार असले तरी एकेकाली मी होते तिथेच तेही होते,” त्या म्हणाल्या.
फ्रिझेल यांच्यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठीही ही मोठी संधी आहे. अशावेळी पाश्चिमात्य संगीतकारांना भारतीय संगीतातले अनोखे आवाज ऐकवता येऊ शकतात.
केरळच्या हनुमनकाईंड या रॅप गायकाचं त्या उदाहरण देतात. त्यांचं ‘बिग डॉग्स’ हे गाणं जगभरात गाजलं आणि अमेरिकेच्या एसॅप रॉकी या गायकासोबत हातमिळवणी करून हे गाणं नव्या स्वरूपात आणलं गेलं.
“आंतरराष्ट्रीय भारतात आल्याने भारतीय कलाकारांना जागतिक विश्वात पदार्पण करायचा हा असा फायदा मिळतो,” त्या म्हणतात.
यासोबतच जागतिक गायक भारतात येण्याचे काही तोटेही स्थानिक कलाकार अधोरेखित करतात.
सगळ्यात मोठा तोटा म्हणजे अर्थातच, पैसा. या आंतरराष्ट्रीय कलाकारांवर प्रेक्षक भरपूर पैसे उधळतात, असं फ्रिझेल सांगतात.
“प्रेक्षक नवोदित, तरूण कलाकारांपेक्षा मोठ्या कलाकारांना प्राधान्य देतात. माझं हे म्हणणं चुकीचं ठरावं असंच मला खरंतर वाटतं,” त्या म्हणाल्या.
शिवाय, छोट्या कलाकारांच्या हक्काचं कौतुक हे मोठे कलाकार मारून नेण्याचीही शक्यता असते, असं अनुमिता पुढे जोडतात.
“पण कदाचित त्यामुळेच पठडीपेक्षा वेगळं करण्याची प्रेरणा छोट्या कलाकारांना मिळते,” त्या म्हणाल्या.
भारताला काय सुधारण्याची गरज आहे?
मोठ्या कलाकारांच्या झगमगाटात छोटे स्थानिक कलाकार झाकून जायची शक्यता तशी कमीत असते, असं रोलिंग स्टोन इंडिया या वेबपोर्टलवर संगीत पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पेओनी हिरवानी यांना वाटतं. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कंपन्या बहुतेक वेळा त्यांना पुरेसा न्याय देतात.
त्या ‘जी-ईएझ’च्या 2024 मध्ये झालेल्या दौऱ्याचं उदाहरण देतात. त्यांनी सोबत फक्त भारतीय कलाकारांना गाण्याची संधी दिलेली. त्यातून अनेकांच्या करिअरला चालना मिळाली.
त्यावर भर देण्याऐवजी टेलर स्विफ्ट आणि बियॉन्स अशा मोठ्यातल्या मोठ्या कलाकारांच्या कार्यक्रमाचं नियोजन करता येईल अशी सोय करायला हवी, असं त्या बीबीसीशी बोलताना सुचवतात. या दोन्ही कलाकारांचा भारतात एकदाही कार्यक्रम झालेला नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
या कॉन्सर्ट्सला येणारे चहाते तिथल्या सोयींबद्दल नेहमी तक्रार करत असतात. हे कार्यक्रम बहुतेकवेळा क्रिकेटच्या स्टेडियमवर घेतले जातात. भारतातलं क्रिकेटचं वेड पाहता ही स्टेडियम्स नेहमीच उपलब्ध असतात असं नाही.
“त्यामुळे आपल्याला कार्यक्रमासाठी मोठ्या जागांची आणि चांगल्या व्यवस्थेची गरज आहे,” पिओनी म्हणतात.
लोलापालोझा फेस्टिव्हल तर चक्क मुंबईतल्या घोड्यांच्या शर्यती होतात त्या रेसकोर्सवर होणार आहे. एवढ्या लोकांना सामावू शकणारी तेवढी एकच जागा आहे.
“आपल्याला माहीत असलेल्या मोठ्या स्टेडियम्समध्येही हा प्रश्न उद्भवतो. अशा कार्यक्रमासाठी कशाची गरज असते आणि उपलब्ध सोयी आणि जागा चांगल्या करता येतील यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल चर्चा होण्याची गरज आहे,” पिओनी सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC