Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
कोल्हापूरच्या देवस्थान व्यवस्थापन समितीकडून अंबाबाई मंदिरात येताना पारंपरिक वेशभुषा करावी असं आवाहन नुकतंच करण्यात आलं होतं.
मंगळवारी 13 मेला हे आवाहन जाहीर केल्यानंतर गेल्या दोन दिवसांत मंदिरात दर्शनासाठी बर्मुडा, शॉर्ट पँट किंवा स्लिव्हलेस टॉप घालून आलेल्या भाविकांना अंग झाकण्यासाठी मंदिर व्यवस्थापकांकडून धोतर किंवा उपरण्यासारखं एक कापड देण्यात आलं.
या नव्या वेशभुषेबद्दल लोकांना माहिती होत नाही तोपर्यंतची ही सोय असल्याचंही देवस्थान समितीकडून स्पष्ट करण्यात आलं.
मंदिर व्यवस्थापकांकडून करण्यात आलेल्या या आवाहनावर समाजातून मिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
काही भाविक अशा आवाहनाचं स्वागत करतायत. तर ही विनंती असताना कपड्यांची इतकी सक्ती कशासाठी असाही प्रश्न काही नागरिक आणि अभ्यासक विचारत आहेत.
व्यवस्थापन समितीचं आवाहन काय?
कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं 13 मे रोजी मंदिरातल्या वेशभुषेबाबतचं एक निवेदन प्रसिद्ध केलं.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि रत्नागिरीमधील केदारलिंग म्हणजे ज्योतिबा मंदिरात काही भाविक दर्शनासाठी तोकडे कपडे घालून येत असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यात लिहिलं होतं.
“करवीर निवासिनी देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून, या मंदिराचे महत्त्व फार आहे. मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनास तसेच धार्मिक विधीसाठी येताना तोकडे कपडे न घालता, पारंपरिक पध्दतीने कपडे परिधान करावे,” असं त्यात लिहिलं आहे.
मंदिरातल्या धार्मिकतेचा आदर करणारे कपडे असावेत, असं नम्र आवाहन प्रेस नोटमध्ये देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी केलं आहे.
“भाविकांनी सदर सूचनांचे पालन करून देवस्थान व्यवस्थापन समितीस सहकार्य करावे ही विनंती,” असंही निवेदनात म्हटलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीअंतर्गत येणाऱ्या सगळ्या मंदिरांसाठी हे ड्रेस कोडबाबत (वस्त्रसंहिता) आवाहन करण्यात आल्याचं शिवराज नायकवडे माध्यमांशी बोलताना म्हणाले. धार्मिकतेच्या आणि मंदिरातील पावित्र्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
“यात आपण जास्त बंधनं न घालता पूर्ण कपडे असावेत आणि पारंपरिक वेशभुषा असावी, असं म्हटलं आहे. परंतु अपेक्षा अशी आहे की स्कर्ट, थ्री फोर्थ, बर्मुडा या प्रकारचे अंगप्रदर्शन करणारे कपडे मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीने आवारात घालू नये,” असं नायकवडे यांनी सांगितलं.
आपण मंदिरात दर्शनासाठी येत असतो. त्यामुळे धार्मिकतेच्या दृष्टीनं मंदिराचं महत्त्व ओळखून ज्याप्रकारे घरातल्या देवळात आपण जातो त्याचपद्धतीनं मंदिरात यावं, असं नायकवडे पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
आपण इतर ठिकाणी फिरायला जाताना जो पोशाख करतो तो मंदिरात असू नये, यासाठी हे आवाहन केल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय, हे आवाहन असून त्याला भाविक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एखाद्या भाविकाने तसे कपडे घातले नसतील तर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एका दुकानात सोवळ्याची व्यवस्था केली असल्याचंही नायकवडे सांगत होते.
मात्र, एखाद्या भाविकानं याला नकार दिला तर काय करायचं? याबाबत काही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं.
याआधीही, 2018 मध्ये नवरात्र उत्सवादरम्यान व्यवस्थापन समितीकडून महालक्ष्मी मंदिरात कपडे परिधान करण्याचा नियम केला होता. तरी पुन्हा असं आवाहन का केलं गेलं? याबद्दल मंदिर समितीने कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे देवस्थान व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक आहेत. यासंदर्भात बीबीसीने अमोल येडगे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
ड्रेसकोडचा नियम करता येतो का?
दरम्यान, हे आवाहन म्हणजे झुंडशाहीची सुरुवात असल्याचं मत उच्च न्यायालयातील वकील राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केलं.
जयसिंगूपर कॉलेजचे माजी प्राचार्य म्हणून प्रसिद्ध कुंभार यांचा सणवार, मंदिर स्थापत्य आणि मंदिर संस्कृती यावर अभ्यास आहे. त्यांची ‘शोध अंबाबाईचा’ ही व्याख्यानमालाही प्रसिद्ध आहे.
अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी उभारलेल्या 2016 च्या आंदोलनातही त्यांची महत्त्वाची भुमिका होती. या वस्त्रसंहितेला आवाहन म्हटलं जात असलं तरी ही सक्तीची फक्त सुरुवात असते, असं बीबीसीशी बोलताना ते सांगत होते.
“एकीकडे आवाहन करायचं आणि तरीही ती विनंती कुणी मान्य केली नाही तर मंदिरात झुंडीनं त्याची मानहानी केली जाते. चार चौघांसमोर लाज काढली जाते,” असं ते म्हणाले.
कोणताही नागरी, गुन्हेगारी कायदा किंवा संविधान अशा प्रकारच्या वस्त्रसंहितेच्या नियमाला मान्यता देत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
“सरकारचं नियंत्रण असणारं, देवस्थान समितीकडून चालवलं जाणारं मंदिर हे सार्वजनिक ठिकाण आहे. त्यात प्रवेश करण्याचा हक्क सगळ्यांना आहे आणि उलट तो नाकारणं हा गुन्हा आहे,” असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण अशा बेकायदेशीर गोष्टी राजकीय दबावानं वाढवल्या जातात हे मंदिरांच्या बाबतीत अलिकडच्या काळात आपल्याला सातत्यानं दिसून येत आहे, असं ते सांगतात.
मुळात मंदिरात जाताना कोणी कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत याबाबत धर्मशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात कसलाही उल्लेख नाही. कोणत्याही वेदांत, उपनिषदांमध्ये असा उल्लेख असेल तर तो दाखवण्याचं आव्हान राजेंद्र कुंभार करतात.
“हे धर्मशास्त्राचे कायदे म्हणजे देवांचे कायदे असतील आणि त्यातच असं लिहिलं नसेल, तर वस्त्रसंहितेचा नियम नेमका कोणत्या हेतूने केला जातोय?” असं ते विचारतात.
तरीही नियम करायचाच असेल, तर सगळ्यात आधी पुजाऱ्यांसाठी करायला हवा अशी मागणी ते करतात.
“एका देवीच्या देवळात तोकडे कपडे घालून ढेरी दाखवत ओंगळवाणे पुजारी आत बाहेर करतात. त्यावेळेला संस्कृतीचं काय होतं?” असा परखड प्रश्न ते विचारतात.
पारंपरिक किंवा तोकड्या कपड्यांची कोणतीही व्याख्या करता येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
“भारताच्या विविधतेत पारंपरिक कपडेही अनेक प्रकारचे आहेत. मग पारंपरिक कपडे घालायचे म्हणजे नेमके कोणते कपडे घालायचे? महाराष्ट्राचे पारंपरिक, पंजाबचे की काश्मिरचे?” असं ते विचारतात.
अंबाबाई मंदिरासारख्या सार्वजनिक ठिकाणी सर्वधर्मीय लोकांना येण्याची परवानगी आहे.
“पण उद्या बुरखा घातलेली मुस्लिम महिला किंवा ख्रिश्चन समाजातील लोक आले, तर त्यांना प्रवेश नाकारणं हे तर संविधानाचं उल्लंघनच असेल.”
“मंदिरात बेकायदेशीर, घाणेरडी कृत्य करणं याचा पावित्र्याची संबंध आहे. त्यामुळे मंदिरात किंवा आवारात कुणी अर्वाच्य भाषेत बोलत असेल, घाण करत असेल, कुणी कुणाचा विनयभंग केला, गोंधळ घातला तर विरोध करणं समजून घेता येईल.
कारण मंदिराचं पावित्र्य शांततेत असतं, स्वच्छतेत असतं. त्याचा कपड्यांशी काही संबंध नसतो,” ते म्हणतात.
श्रद्धा महत्त्वाची की कपडे?
अशा प्रकारचे नियम केले जातात तेव्हा श्रद्धा महत्त्वाची आहे की बाहेरचे कपडे? असा प्रश्न कुंभार यांच्यासारखे इतरही विवेकवादी नागरिकही करत आहेत.
“मंदिरात लोक श्रद्धेने जातात. भक्तीभावाने कुणी मंदिरात येत असेल तर त्याच्या श्रद्धेला दुय्यम लेखून आणि त्याचा पेहराव, तो कसा दिसतो आणि देवासमोर कसा येतो हे मुद्दे महत्त्वाचे का ठरतात?”, असा प्रश्न शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ. मेघा पानसरे यांनी उपस्थित केला.
पारंपरिक कपडे आणि तोकडे कपडे याची व्याख्या कशी करणार? हे संस्कृतीत बसतं आणि हे बसत नाही हे कसं ठरवणार?
“आमच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या अनेक शेतकरी महिला ज्या पद्धतीची नववारी साडी नेसतात ती काम करण्यासाठी सोपं पडावं म्हणून वर खोचली जाते. त्यात त्यांचे पाय उघडेच असतात.
मच्छिमार महिलांचा पारंपरिक पोशाख वेगळा असतो. अशावेळी काय संस्कृती ते आपण कसं ठरवायचं?” असं त्या विचारतात.
पण सध्या समाजात धर्माच्या आधारावर मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. त्याचा आणि मंदिरातील वस्त्रसंहितेचा थेट राजकीय संबंध आहे हे लक्षात घ्यायला हवं, असंही पानसरे पुढे म्हणतात.
धार्मिक ओळखी कट्टर करणं, पक्क्या करणं हा अजेंडा सध्या देशभर सुरू आहे. ड्रेसकोड हा त्याचाच एक भाग आहे असं त्यांना वाटतं.

खरंतर हे देवीचं मंदिर आहे. त्याचे सगळे पुजारी, पुरोहित पुरूष आहेत. देवीला सजवणं, तिला स्नान घालणं, वस्त्र चढवणं ही सगळी कामं पुरूष पुजारीच करत असतात, हेही त्या लक्षात आणून देतात.
हा एकप्रकारे दुटप्पी व्यवहार असल्याचंही त्या पुढे सांगत होत्या.
“एकाबाजुला आधुनिकतेचे सगळे फायदे घ्यायचे. जगण्याची आधुनिक पद्धत स्वीकारायची. त्यातलं तंत्रज्ञान घेऊन सीसीटीव्ही लावायचे, अमेरिकेतल्या कुटुंबाची ऑनलाईन पुजा करायची.
पण दुसऱ्याबाजुला कपडे असेच असले पाहिजेत, असंच वागलं पाहिजे ही मनुस्मृतीची सक्ती करायची. हा सगळा दांभिकपणाचा व्यवहार आहे,” त्या म्हणतात.
बहुतेक भाविक या निर्णयाचं स्वागत करताना दिसतात. शाळेत, ऑफिसमध्ये युनिफॉर्म असतो तर मंदिरात का नाही असा युक्तीवाद भाविक करतात.
“शाळेत मुलं शिकत असताना मुलं कोणत्या जातीतून, आर्थिक वर्गातून किंवा समाजातून येतात यावरून त्यांच्यासोबत भेदभाव होऊ नये म्हणून तो युनिफॉर्म असतो,” असं डॉ. पानसरे म्हणतात.
वस्त्रसंहिता तिथे मुलांना एका पातळीवर आणते. मात्र, मंदिरात नवा भेदभाव निर्माण करते, असं त्या म्हणतात.
तरुणांना काय वाटतं?
अशा वस्रसंहितेमुळे तरूण पिढी देव-मंदिरापासून आणखी दूरावेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
मंदिरात अशा पद्धतीची कपड्यांची सक्ती करणं 25 वर्षांच्या तनुजा पांचाळ हिलाही बरोबर वाटत नाही. लहानपणापासून कोल्हापुरात राहणारी ही तरुणी एम.कॉम झाली आहे.
“मंदिरात दर्शनासाठी अनेक पर्यटक येतात. ते प्रवासात, फिरायला ज्या कपड्यांवर गेलेले असतात तेच कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करतात. त्यामुळं असा नियम केला असावा,” असंही ती पुढे म्हणाली.
थोडक्यात, अशी सक्ती करणं चुकीचं असलं तरी भाविकांनीही थोडं भान बाळगायला हवं, अशी सम्यक भूमिका ती घेते.

“मी स्वतः गुरुवारी म्हणजे 15 मे रोजी मंदिरात गेले होते. स्लिव्हलेस कुर्ता परिधान केलेल्या काही तरुणींना अंगावर गुंडाळण्यासाठी शाल देत असल्याचं मी पाहिलं. भाविकांना या नव्या नियमाविषयी माहिती होत नाही तोपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे,” असं तनुजा सांगत होती.
“मंदिरात जाताना मी पँट आणि शॉर्ट कुर्ता घातला होता. काही सेवेकरी माझ्याकडे निरखून पाहत होते, पण कोणी काही बोललं नाही,” तिने स्पष्ट केलं.
या प्रकारचे नियम आणि सक्ती तरुण पिढीला दूर नेऊ शकतात. आजची पिढी विचार करते, प्रश्न विचारते. जर तिच्या अभिव्यक्तीवर बंदी येते, किंवा तिचं मत दुर्लक्षित केलं जातं, तर ती रागावते, बंड करते. तिला काही लादणं पसंत नाही. त्यामुळे संवाद हवा, सक्ती नको, असं तिला वाटतं.
“एकूण मंदिर असू दे किंवा इतर कुठलीही जागा. कपड्यांवरून माझ्या विचारांचं, मुल्याचं आणि श्रद्धेचं मोजमापन केलं जात असेल तर फार वाईटच वाटतं,” असं तनुजा म्हणाली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC