Source :- BBC INDIA NEWS

खो-खो विश्वचषकाचा लोगो लाँच करण्याच्या समारंभात प्रदर्शनीय सामना खेळताना खो-खो खेळाडू.

फोटो स्रोत, ANI

सोमवारचा (13 जानेवारी) दिवस भारताच्या स्वदेशी खेळांसाठी एक आगळावेगळा, विशेष महत्त्वाचा दिवस आहे. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खो-खो विश्वचषकाची सुरुवात होत आहे.

खो-खो हा खास भारतीय मातीतील खेळ म्हणून ओळखला जातो. विश्वचषकामुळे या खेळाला जागतिक पातळीवर एक वेगळीच ओळख मिळणार आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 23 देशांमधील खेळाडू येत आहेत. खो-खो विश्वचषकाचे सामने 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 दरम्यान खेळले जाणार आहेत.

विश्वचषकात पाकिस्तानचा संघ देखील भाग घेणार होता. मात्र व्हिसाशी संबंधित अडचणींमुळं हा संघ खेळणार नसल्याचं दिसतंय. स्पर्धेच्या वेबसाईटवर संघाच्या यादीतही पाकिस्तानचं नाव नाही.

पाकिस्तान वगळता स्पर्धेत पुरुषांचे 20 आणि महिलांचे 19 संघ भाग घेतील.

सुधांशू मित्तल खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे (केकेएफआय) अध्यक्ष आहेत. या विश्वचषकाचं आयोजन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अस्सल भारतीय खेळाच्या या जागतिक स्पर्धेसाठी विविध देशांचे संघ सहभागी होण्यामागची गोष्ट सुधांशू मित्तल यांनी सांगितली.

“खो-खो फेडरेशनच्या कठोर परिश्रमामुळंच हा खेळ एवढ्या देशांपर्यंत पोहोचला. आम्ही त्या देशांत प्रशिक्षक पाठवले, संपर्क वाढवला आणि संघटना उभी केली,” असं ते म्हणाले.

सुधांशू मित्तल म्हणाले की, विश्वचषकात भाग घेणाऱ्या देशांच्या संघांत स्थानिक लोक आहेत, ते बाहेरचे किंवा अनिवासी लोक नाहीत.

“आम्ही या देशांच्या स्थानिक लोकांमध्ये या खेळाबद्दल रस निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. कारण या खेळात चपळाई, वेग, सहनशक्ती आणि डावपेचांची आवश्यकता असते,” असंही ते म्हणाले.

“त्यामुळेच हा खेळ आवडतो. एखाद्या मॉडर्न खेळाला आणखी रंजक बनवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते, त्या सर्व गोष्टी या खेळात आहेत,” असंही ते म्हणाले.

सलमान खान ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

2021 मध्ये सुरू झालेल्या ‘अल्टीमेट खो-खो’ या स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाला ग्लॅमर मिळण्यास सुरूवात झाली. ही स्पर्धा फ्रँचायसीवर आधारित आहेत.

आता खो-खो वर्ल्ड कपमुळे या खेळाला मोठं प्रोत्साहन मिळेल आणि हा खेळ नवी उंची गाठू शकेल.

तसंही स्पोर्ट्स स्टार, भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि बॉलीवूड स्टार सलमान खान यासारख्या सेलिब्रिटींचं नाव खो-खो शी आधीच जोडलं गेलं आहे. सलमान खान तर खो-खो वर्ल्ड कपचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

बॉलीवूड स्टार सलमान खान खो-खो विश्वचषकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

फोटो स्रोत, Getty Images

या खेळाचा 2030 पर्यंत एशियन गेम्समध्ये आणि 2032 पर्यंत ऑलिंपिकमध्ये समावेश व्हावा अशी सुधांशू मित्तल यांची इच्छा आहे.

“आज खो-खो 55 देशांमध्ये खेळला जात आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत तो 90 देशांमध्ये पोहोचेल. एशियन गेम्स आणि ऑलिंपिक या स्पर्धांमध्येही या खेळाचा सहभाग होणं हे आमचं स्वप्न आहे,” असंही ते म्हणाले.

लाल रेष
लाल रेष

खेळाडू आणि प्रशिक्षकांना काय वाटतं?

महिला राष्ट्रीय खो-खो संघाची माजी कर्णधार नसरीन शेख म्हणतात की, या विश्वचषकामुळे खो-खो ची वेगळी ओळख निर्माण होईल. नसरीन यांना गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

या विश्वचषकात नसरीन भारतीय संघात आहेत. भारताच्या महिला खो-खो संघाचं कर्णधारपद प्रियंका इंगळे यांच्याकडे आहे.

नसरीन म्हणाल्या, “आपल्या सर्वांना माहिती आहे की, हा खेळ आपल्या मातीशी जोडलेला खेळ आहे. सुधांशू मित्तल आणि खो-खो फेडरेशनचे सचिव, एम. एस. त्यागी यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशननं या खेळाला ग्लॅमरची जोड दिली आहे.”

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हातून अर्जुन पुरस्कार घेताना भारतीय महिला खो-खो संघाच्या माजी कर्णधार नसरीन शेख.

फोटो स्रोत, @Nasreenkhokho

“विश्वचषकासाठी झालेल्या शिबिरात मी होते. अनेक राज्यांचे खेळाडूही संघात आहेत. आता या खेळाचं प्रशिक्षण वैज्ञानिक पद्धतीनं दिलं जातं आहे. आमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष दिलं जातं आहे. आम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात.”

नसरीन शेख खो-खो स्टार आहेत. खो-खो फेडरेशन त्यांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवण्यावर विचार करत आहे.

त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय खो-खो संघानं साऊथ एशियन गेम्स आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं.

महिला खो-खो संघाच्या प्रशिक्षक मुन्नी जून यांनी खेळाडूंच्या प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली.

ट्वीट

फोटो स्रोत, @SudhanshuBJP

मुन्नी जून म्हणाल्या, “महिनाभराच्या प्रशिक्षण शिबिरात आम्ही खेळाडूंकडून सकाळी स्किल्स प्रॅक्टिस (कौशल्य सराव) आणि संध्याकाळी मॅच प्रॅक्टिस (सामन्याचा सराव) करून घेतली.

“याशिवाय खेळाडूंनी अतिशय पोषक असा आहार देण्यात आला. त्यात व्हिटामिन आणि सुकामेवाचा समावेश होता. त्यांची पूर्ण फिटनेस टेस्ट देखील करण्यात आली,” मुन्नी जून म्हणाल्या.

मुन्नी स्वत: राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होत्या. साऊथ एशियन गेम्स आणि एशियन चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या खो-खो संघाच्या त्या मुख्य प्रशिक्षक होत्या.

 प्रतिक किरण वाईकर

फोटो स्रोत, @ultimatekhokho

पुरुषांच्या संघाचं कर्णधारपद पुण्याच्या प्रतीक किरण वाईकर यांच्याकडे आहे. त्यांना या खेळातील महारथी मानलं जातं.

कार्ड

प्रतीक वाईकर एक अष्टपैलू खेळाडू आहेत. ते ‘वजीर’ म्हणून खेळतात. या खेळात ही एक नवी पोझिशन आहे. यात खेळाडू कोणत्याही दिशेला हालचाल करू शकतो.

प्रतिक म्हणाला की, “यावर्षी मला खेळात 25 वर्षे पूर्ण होतील. खो-खोसाठी देखील आता एक विश्वचषक आहे, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.”

किती संघ, आव्हान कोणाचं?

अश्विनी कुमार पुरुष संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मते, नेपाळ आणि इंग्लंडचे खो-खो संघ यांचं तगडं आव्हान या स्पर्धेत आहे.

“हे दोन्ही संघ खूपच चांगले आहेत. विशेषकरून नेपाळचा संघ,” असं ते म्हणाले. अश्विनी कुमार यांना वाटतं की, भारतीय संघ या स्पर्धेत विजयाचा प्रमुख दावेदार आहे.

“खो-खो आपला स्वदेशी आणि मुख्य खेळ आहे. इतर देशांनी हा खेळ खेळण्यास आता सुरुवात केली आहे. त्यामुळं आपण त्यांच्यापेक्षा थोडं पुढे आहोत. विश्वचषकात आपल्याला दिसेल की आपल्या संघांची काय स्थिती आहे,” असं ते म्हणाले.

2016 च्या आशियाई खो-खो चॅम्पियनशिपमध्ये खेळताना नेपाळचा संघ.

फोटो स्रोत, Getty Images

सुधांशू मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खो-खो विश्वचषकात अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील, पेरू, दक्षिण आफ्रिका, घाना, केनिया, युगांडा, जर्मनी, नेदरलँड्स, पोलंड, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, इराण, भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचे संघ भाग घेणार आहेत.

खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (केकेएफआय) च्या माहितीनुसार, “आधीच पोहोचलेल्या संघाची प्रशिक्षण सत्रे झाली आहेत. स्टेडियम परिसरात खास तयार करण्यात आलेल्या कोर्ट्सवर संघ सराव करत असताना पाहून खूप उत्साह दिसून येतो आहे.”

खो-खोचा कुंभमेळा

खो-खो विश्वचषकामुळे दिल्लीत उत्साहाचं वातावरण आहे. या विश्वचषकामुळे खो-खोची जादू जगभरात पसरणार असून खो-खो जागतिक स्वरूप मिळणार आहे. हा देशी, मातीतील खेळ आता जागतिक स्तरावरील ग्लॅमरस खेळ होणार आहे.

एऱ्हवी अतिशय साधा सरळ, कोणताही झगमगाट नसलेल्या या खेळानं आता कात टाकली आहे.

बनियान, हाफ चट्टी आणि अनवाणी पायानं खेळला जाणाऱ्या या खेळात आता खेळाडू इतर खेळांप्रमाणे जर्सी आणि बुटांचा वापर करत आहेत.

खेळाडूंच्या प्रशिक्षणावर भर दिला जातो आहे. त्यांचा फिटनेस, आहार याची विशेष काळजी घेतली जाते. विश्वचषकाच्या माध्यमातून त्यांना मोठाल्या रकमांची बक्षीसं मिळणार आहेत. इतर खेळांना सेलिब्रिटी अ‍ॅम्बेसेडर असतात तसाच ग्लॅमरस अ‍ॅम्बेसेडर आता सलमान खानच्या रुपानं खो-खो लाही मिळाला आहे.

श्रीलंका आणि पेरू या दोन देशांचे संघ सर्वात आधी दिल्लीत दाखल झाले. तर 11 जानेवारीपर्यंत जवळपास सर्वच संघ दिल्लीत पोहोचल्याची माहिती भारतीय महासंघाचे महासचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दिली.

यंदाच्या विश्वचषकाचं वैशिष्ट्यं म्हणजे सर्वच खंडामधील देशांचे संघ यात भाग घेत आहेत. उत्तर अमेरिका खंडातील अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील, पेरू, अर्जेंटिना, आफ्रिका खंडातील, दक्षिण आफ्रिका, युगांडा, केनिया या देशांचे संघ यात भाग घेणार आहेत.

तर ऑस्ट्रेलिया खंडातील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, युरोपातील इंग्लंड, नेदरलॅंड्स, जर्मनी, पोलंड आणि आशिया खंडातील यजमान भारतासह बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, इराण, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांचे संघ खो-खो विश्वचषकात सहभागी झाले आहेत.

साहजिकच खो-खो ला आता खऱ्या अर्थानं जागतिक स्वरूप मिळालं आहे. यातील अनेक देशांना भारतानं प्रशिक्षक पुरवले होते. त्यातून त्या-त्या देशांमध्ये खो-खो ची सुरुवात झाली.

खो-खो विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा भव्य आणि दिमाखदार असणार आहे. त्यासाठी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये विशेष तयारी आणि सजावट करण्यात आली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC