Source :- BBC INDIA NEWS
2 तासांपूर्वी
इस्रायल देश आणि हमास या पॅलेस्टाईनमधल्या सशस्त्र राजकीय गटामधला संघर्ष गेले 15 महिने सुरू होता. पण आता इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेच्या करारावर सहमती झाली असल्याची माहिती अमेरिका आणि कतार या मध्यस्थांनी दिली आहे.
7 ऑक्टोबर 2023 ला हमासचे शेकडो सैनिक इस्रायलच्या दक्षिणी सीमेतून आत घुसले तेव्हा या हिंसाचाराला सुरुवात झाली. त्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले तर 250 लोकांना ओलिस ठेवून गाझामध्ये परत आणलं गेलं.
प्रत्युत्तर म्हणून 27 ऑक्टोबरपासून इस्रायलनं लष्करी मोहीम सुरू केली. हवाई मार्गे हल्ला सुरू करत जमिनीवरूनही आक्रमण केलं.
तेव्हापासून इस्रायलने गाझा आणि आसपासच्या भागांना लक्ष्य करत जमिनीवरून, समुद्रमार्गे आणि हवाईमार्गातून हमासवर अनेक हल्ले केलेत.
गाझातल्या हमासकडून चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार इस्रायलच्या हल्ल्यात 46,700 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. त्यातील बहुतेक सामान्य नागरिक होते.
अखेर 15 महिन्यांच्या हिंसाचारानंतर शस्त्रसंधी होत आहे. मात्र, या तडजोडीची सुरुवात हमासच्या पहिल्या हल्ल्यानंतर एक-दीड महिन्यातच झाली होती. त्याचा घटनाक्रम आपण समजून घेऊ.
2023
7 ऑक्टोबर : हमाससाठी काम करणाऱ्या शेकडो शस्त्रधारी सैनिकांनी इस्रायलच्या दक्षिण भागावर अचानक हल्ला केला. सीमेवरच्या तारा तोडत हमासने पोलिस स्टेशन्स, लष्करी छावण्या आणि लोकांना लक्ष्य केलं. त्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले तर 250 लोकांना ओलिस ठेवून गाझामध्ये आणलं गेलं. त्याचसोबत हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट्सचा वर्षाव केला. त्यावर इस्रायली लष्कराने प्रत्युत्तर देत गाझावर हवाई मार्गाने हमले सुरू केले.
27 ऑक्टोबर : इस्रायलने जमीन मार्गाने गाझामध्ये घुसखोरी सुरू केली. या भयावह लष्करी मोहिमेनं गाझा बेचिराख झालं. 23 लाख लोक विस्थापित झाले आणि जवळपास 46,000 मारले गेले, असं गाझातल्या हमासकडून चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
21 नोव्हेंबर : अमेरिका, कतार आणि इजिप्त या तीन देशांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांसमोर एक करार सादर केला. त्यात एक आठवडा युद्ध थांबवून हमासने 105 ओलिसांना सोडावं आणि बदल्यात इस्रायलनं त्यांच्या कारागृहात असलेल्या 240 पॅलेस्टिनी कैद्यांना परत पाठवावं असा प्रस्ताव मांडला गेला. मात्र, युद्धविराम यशस्वी न होण्याबद्दल हमास आणि इस्रायल एकमेकांना दोष देत राहिले.
28 December: युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेच्या नव्या करारासाठी मध्यस्थीचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले.
2024
31 मे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलने सादर केलेला तीन टप्प्यांचा युद्धबंदी करार मांडला. त्यानंतर आठ महिन्यांनी, म्हणजे जानेवारी 2025 ला महिन्यात मान्य करण्यात आलेल्या कराराचा पाया या प्रस्तावात होता.
10 जून : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत गाझामध्ये युद्धबंदी करण्याच्या योजनेचा प्रस्ताव मतदानासाठी मांडला गेला.
31 जुलै : तडजोडीच्या बोलणीत सामील असलेले हमासचे मुख्य नेते इस्माइल हानिये इराणची राजधानी तेहरानमधल्या ज्या घरात रहात होते तिथं इस्रायलने हल्ला केला. त्या हल्ल्यात ते मारले गेल्याने युद्धबंदीच्या वाटाघाटी पुन्हा फसल्या. दोन आठवड्यांनंतर चर्चेला पुन्हा सुरूवात झाली. मात्र, त्यात सुरुवातीला हमासने सहभाग घेतला नाही.
17 ऑक्टोबर : इस्रायली लष्कराने याह्या सिनवार या हमासच्या आणखी एका नेत्याला दक्षिण गाझात ठार मारले. त्यावेळी युद्धबंदीची ही सुरुवात असल्याचं इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होेते.
9 नोव्हेंबर : अनेक महिने युद्धबंदीसाठी काहीही सकारात्मक काम झालं नसल्याने मध्यस्थीतून कतारने माघार घेतली. हमास आणि इस्रायल दोघे चर्चेची इच्छा दाखवतील तेव्हाच मध्यस्थीचे काम पुन्हा करू, असं कतारने म्हटलं.
20 नोव्हेंबर : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजुरीसाठी आलेला गाझा शस्त्रसंधी ठरावाचा मसुदा व्हेटो पॉवरचा (नकाराधिकाराचा) वापर करत अमेरिकेनं स्थगित केला. या मसुद्यात युद्ध थांबवणे आणि ओलिस ठेवलेल्या लोकांना सोडवणे यातला सहसंबंध व्यवस्थितपणे मांडला गेला नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं.
27 नोव्हेंबर : इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात हिजबुल्लाहसोबत 13 महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपवण्याबाबत एकमत झालं. मित्र हमासवर केलेल्या हल्ल्यामुळे हिजबुल्लाहने इस्रायलवर हमले करणं सुरू केलं होतं. या युद्धबंदीने गाझातील युद्धबंदी करार संमत होण्याची आशा वाढली आणि प्रादेशिक सत्तेचा वापर करून युद्धबंदीसाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचं बायडन यांनी सांगितलं.
2 डिसेंबर : अमेरिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदी निवडून दिलं. 20 जानेवारी 2025 ला पदभार स्वीकारण्याआधी गाझामधला संघर्ष संपला नाही तर त्याची तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
17 डिसेंबर : इस्रायलसोबत अप्रत्यक्षपणे सुरू असलेली चर्चा शेवटच्या आणि निर्णायक पातळीवर येऊन पोहोचली असल्याचं एका वरिष्ठ पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने सांगितलं. तर, कराराचा निर्णय खूप जवळ येऊन पोहोचला असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ म्हणाले.
2025
13 जानेवारी : बायडन यांच्या कामाचा शेवटचा आठवडा राहिला असताना त्यांचं नेतन्याहू यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं. कराराचा निर्णय फारच जवळ आलेला असून ट्रम्प यांनी कार्यभार सांभाळण्याआधी तो पूर्ण होईल अशी आशा वाटत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांनी सांगितलं.
15 जानेवारी : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेच्या करारावर सहमती झाली असल्याचं कतारच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं. युद्धबंदी करार 19 जानेवारीपासून लागू होईल असंही ते म्हणाले.
या कराराने गाझामध्ये सुरू असलेलं युद्ध थांबेल, पॅलेस्टिनी नागरिकांसाठी गरजेची मानवाधिकारी मदत पोहोचवली जाईल आणि ओलिसांची त्यांच्या कुटुंबियांसोबत भेट घडवली जाईल, असं बायडन म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC