Source :- BBC INDIA NEWS

11 व्या शतकात राजराजा चोल यांनी बांधलेलं बृहदेश्वर मंदिर, आता युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे

फोटो स्रोत, Getty Images

मध्ययुगीन काळ म्हटला की, आपल्या डोळ्यासमोर मध्य आशियातून वायव्य दिशेनं आलेले आक्रमक आणि त्यांनी नंतर स्थापन केलेली राज्येच येतात. मात्र, दक्षिण भारतात चोल राजवंशानं आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात डोळे दिपवून टाकणारं दिलेलं योगदान सहसा विस्मरणात असतं.

फक्त दक्षिण भारतातच नव्हे तर जगभरात ठसा उमटवणाऱ्या वैभवशाली चोल साम्राज्याच्या वैशिष्ट्यांचा थोडक्यात परिचय करून देणारा हा लेख.

ते इसवीसन 1000 होतं. तो मध्ययुगातील मध्यवर्ती काळ होता.

त्यावेळेस युरोप अस्थिर होता. नॉर्मनचं राज्य असलेला इंग्लंड किंवा विविध विभागलेल्या प्रदेशातून जन्माला आलेला फ्रान्स यासारखे आज आपल्याला माहित असलेले शक्तीशाली देश अजूनही जन्मालादेखील आलेले नव्हते.

गॉथिक शैलीतील उंचच्या उंच कॅथेड्रलची उभारणी अजून व्हायची होती. कॉन्स्टंटिनोपल (आजचं इस्तंबूल) सारख्या दूरवरच्या आणि समृद्ध शहराव्यतिरिक्त, काही मोजक्याच महान शहरांचं तेव्हा वर्चस्व आणि दबदबा होता.

असं असताना जगाच्या दुसऱ्या बाजूला दक्षिण भारतातील एक महान सम्राट जगातील सर्वात विशाल, भव्य मंदिर बांधण्याच्या तयारीत होता.

ते मंदिर फक्त 10 वर्षांत बांधून पूर्ण झालं. त्याची उंची 216 फूट (66 मीटर) होती. 1,30,000 टन ग्रॅनाईटचा वापर मंदिराच्या बांधकामात झाला होता. उंचीच्या बाबतीत हे मंदिर इजिप्तमधील पिरॅमिड्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर होतं. यावरून त्या मंदिराची भव्यता लक्षात यावी.

या मंदिराच्या मध्यभागी भगवान शिवाची एक 12 फूट उंचीची मूर्ती होती. त्यावर सोन्याचं आवरण होतं आणि ते माणिक, मोत्यांनी मढवलेलं होतं.

दिव्यांनी उजळलेल्या या मंदिराच्या हॉलमध्ये म्हणजे सभामंडपात 60 कांस्य शिल्प होती. लंका (आजची श्रीलंका) जिंकून तिथून आणलेल्या हजारो मोत्यांनी ही शिल्प सजवण्यात आली होती.

त्या साम्राज्याच्या खजिन्यात कित्येक टन सोने आणि चांदीची नाणी होती. तसंच दक्षिण भारतातील पराभूत राजांकडून मिळवलेले दागिने, रत्नं, तुतारी आणि ढोल होते.

त्यामुळे तो सम्राट त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता.

महान चोल राजवंश

त्या सम्राटाला ‘राजराजा’ म्हणजे ‘राजांचा राजा’ असं म्हटलं जात असे. तो सम्राट मध्ययुगीन जगातील सर्वात अद्भूत राजवंशांपैकी एका राजवंशातील होता. तो महान राजवंश आणि ते वैभवशाली साम्राज्य म्हणजे ‘चोल’.

त्या सम्राटाच्या कुटुंबानं मध्ययुगीन जगच बदलून टाकलं होतं. मात्र असून देखील भारताबाहेर तो सम्राट आणि त्याचा राजवंश याबद्दल फारसं माहित नसतं, ते बऱ्याच प्रमाणात अज्ञात आहेत.

आज हिंदू धर्माचं प्रतीक असलेला नटराज, हे मूलत: मध्ययुगीन भारतातील चोल राजवंशाचं प्रतीक होतं

फोटो स्रोत, Getty Images

11 व्या शतकापूर्वी चोल राजे कावेरी नदीच्या पूर क्षेत्रातील अनेक भांडखोर राजांपैकी एक होते. आजच्या तामिळनाडूत हा भाग येतो आणि कावेरीच्या पूरामुळे त्याच्या आसपासच्या मोठ्या प्रदेशात गाळ वाहून आणला जातो.

मात्र त्या प्रदेशातील इतर राजांपेक्षा चोल राजे वेगळे ठरले ते त्यांच्या नाविन्यतेच्या क्षमतेमुळे. मध्ययुगीन कालखंडाचा विचार करता, त्या काळातील पद्धती आणि मानकं लक्षात घेता, चोल राण्यांचं लक्षणीय वर्चस्व होतं. त्या चोल राजवंशाचा लोकांसमोर असणारा चेहरा होत्या.

राजराजाची पणजी आणि चोल सम्राज्ञी सेम्बियन महादेवी यांनी तामिळ गावांमधून प्रवास केला. त्यांनी जुनी, लहान मातीच्या विटांची मंदिरं चमकदार दगडांमध्ये पुन्हा बांधली. शिवाचे सर्वात मोठे भक्त म्हणून त्यांनी चोल राजवंशाची नव्यानं ओळख निर्माण केली. त्यामुळे लोकांमध्ये चोल राजे लोकप्रिय झाले.

सेम्बियन यांनी नटराजाची पूजा केली. नटराज म्हणजे नृत्याचा राजा हे भगवान शिवाचं फारसं माहित नसलेलं रुप होतं. सेम्बियन यांच्या सर्व मंदिरांमध्ये भगवान शंकराला प्रमुख स्थान होतं.

मग हीच परंपरा पुढे आली. आज नटराज हे हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध प्रतीकांपैकी एक आहे. मात्र मध्ययुगातील भारतीयांसाठी नटराज म्हणजे चोलांचं प्रतीक होतं.

तामिळनाडूत चोल राजवंशानं बांधलेल्या एका छोट्या किल्ल्याचे अवशेष

फोटो स्रोत, Getty Images

सम्राट राजराजा चोल यांनी देखील सर्वसामान्यांशी संपर्क ठेवण्याचा आणि भक्तीचा त्यांच्या पणजीचा वारसा पुढे चालवला, तोही एका महत्त्वाच्या बदलासह.

राजराजा देखील एक विजेता सम्राट होते. 990 च्या दशकात त्यांच्या नेतृत्वाखाली चोलांच्या सैन्यानं पश्चिम घाटाच्या प्रदेशात हल्ला केला. भारताच्या पश्चिम किनाऱ्याला संरक्षण देणारी ही डोंगररांग आहे. तिथल्या बंदरात असलेली शत्रूची जहाजं त्यांनी जाळून टाकली.

त्यानंतर लंका बेटावरील अंतर्गत अस्थैर्याचा फायदा घेत त्यांनी तिथे चोल साम्राज्याचा तळ किंवा चौकी स्थापन केली. असं करून राजराजा लंकेवर कायमस्वरुपी उपस्थिती स्थापित करणारे भारताच्या मुख्य भूमीवरील पहिले राजा बनले.

त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा दख्खनच्या खडकाळ पठाराकडे वळवलं आणि त्यातील प्रदेश ताब्यात घेतला. युरोपच्या भूगालानुसार सांगायचं तर जर्मनी ते इटलीच्या किनाऱ्यापर्यंत.

लाल रेष
लाल रेष

बृहदेश्वराचं मंदिर म्हणजे कल्याणकारी कामांचं केंद्र

या विजयातून मिळालेली लूट, आज बृहदेश्वर नावानं प्रसिद्ध असलेल्या महान आणि भव्य मंदिरावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आली.

या मौल्यवान खजिन्याव्यतिरिक्त, या महान मंदिराला दक्षिण भारतातील जिंकलेल्या प्रदेशातून दरवर्षी 5,000 टन तांदूळदेखील जात असे. (आज इतका तांदूळ वाहून नेण्यासाठी 12 एअरबस ए 380 विमानं लागली असती)

बृहदेश्वराचं भव्य मंदिर म्हणजे सार्वजनिक बांधकाम आणि कल्याणकारी कामं करण्यासाठीचं चोल साम्राज्याचं एक साधन होतं. मंदिराला मिळालेल्या इतक्या प्रचंड संपत्तीमुळे मंदिराच्या माध्यमातून ते करणं शक्य झालं.

चोल सम्राट राजराजा यांच्या प्रचंड संपत्तीचा वापर नवीन सिंचन व्यवस्था तयार करणं, लागवडीखालील जमीन वाढवणं आणि मेंढ्या आणि म्हशींच्या भल्या मोठ्या नव्या कळपांसाठी करणं हा त्यामागचा उद्देश होता.

जगाच्या इतिहासातील फार थोडी राज्यं अशी असतील ज्यांना इतक्या व्यापक स्तरावर आणि इतक्या खोलवर आर्थिक नियंत्रण मिळवण्याबाबत विचार करता आला असता.

हिंद महासागर आणि आशियातील चोलांचं वर्चस्व

युरेशियाच्या आतील भागात मंगोल राजवटीचं जे महत्त्व होतं, तेच महत्त्व चोलांचं हिंद महासागराच्या बाबतीत होतं.

राजराजा चोल यांचा उत्तराधिकारी म्हणजे राजेंद्र चोल. राजेंद्र यांनी तामिळ व्यापाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. म्हणजेच व्यापारी आणि सरकारची शक्ती यांच्यातील भागीदारीचं ते उदाहरण होतं.

पुढे भारताच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर राज्य करणाऱ्या शक्तीशाली ईस्ट इंडिया कंपनीची पूर्वकल्पना त्यातून येते. जे 700 हून अधिक वर्षांनी भारतात येणार होतं.

1026 मध्ये राजेंद्र यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी व्यापारी जहाजांवर सैन्य पाठवलं आणि केदाह या मलह शहरावर (आजचा मलेशिया) हल्ला चढवत ते लुटलं. त्यावेळेस मौल्यवान लाकूड आणि मसाल्यांच्या जागतिक व्यापारावर केदाह शहराचं वर्चस्व होतं.

काही भारतीय राष्ट्रवादी केदाहवरील या हल्ल्याला आग्नेय आशियातील चोल साम्राज्याचा “विजय” किंवा आग्नेय आशियाचं चोलांनी केलेलं “वसाहतीकरण” असं म्हणतात.

मात्र पुरातत्वशास्त्रानुसार एक वेगळंच, विचित्र चित्र समोर येतं. चोल राजांकडे त्यांचं स्वत:चं आरमार नव्हतं. मात्र त्यांच्या राजवटीत बंगालच्या उपसागरात तामिळ व्यापाऱ्यांची एक लाट आली.

बृहदेश्वराचं मंदिर हे भारतातील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक आहे

फोटो स्रोत, AFP

या व्यापाऱ्यांचा प्रभाव इतका वाढला होता की 11 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत हे व्यापारी उत्तर सुमात्रामध्ये स्वतंत्र बंदरं चालवत होते. एक शतकानंतर त्यांचा प्रभाव वाढत ते सध्याच्या म्यानमार आणि थायलंडपर्यंत खोलवर पोहोचले होते.

इतकंच नाही तर जावामध्ये (सध्याचं इंडोनेशिया) ते कर वसूलीचं काम करत होते.

13 व्या शतकात, मंगोल राजवटीखालील चीनमध्ये कुबलाई खानच्या वंशजांचं राज्य होतं. अशा चीनमध्ये तामिळ व्यापारी क्वानझाऊ या बंदरात उत्तम व्यापार करत होते. अगदी पूर्व चीनी समुद्राच्या किनाऱ्यावर त्यांनी भगवान शिवाचं मंदिर देखील बांधलं होतं.

त्यामुळेच 19 व्या शतकात ब्रिटिश राजवटीत आग्नेय आशियातील भारतीय प्रशासक, अधिकारी आणि कामगारांमध्ये तामिळ लोकांचं प्रमाण सर्वाधिक होतं हा काही निव्वळ योगायोग नव्हता.

विविध प्रदेशात मिळवलेले विजय आणि जागतिक स्तरावर विविध राज्यांशी असलेल्या संबंधांमुळे चोल शासित दक्षिण भारत एक प्रचंड मोठी सांस्कृतिक आणि आर्थिक शक्ती बनला. जगभरात पसरलेल्या व्यापारी जाळ्याचा तो एक भाग होता.

चोल अमीर उमराव, सरंजामदारांनी युद्धांमध्ये लुटून आणलेली संपत्ती मोठ्या प्रमाणात बांधलेल्या नवीन मंदिरांमध्ये गुंतवली. त्यामुळे युरोप आणि आशियातील दूरच्या किनाऱ्यांना जोडणाऱ्या खऱ्या अर्थानं जागतिक अर्थव्यवस्थेतून उत्तमोत्तम वस्तू मिळाल्या.

त्यांच्या कांस्यसाठी लागणारं तांबे आणि कथील इजिप्तमधून आलं, अगदी स्पेनमधूनही यायचं. तर देवीदेवतांसाठी लागणारा कापूर आणि चंदन सुमात्रा आणि बोर्नियामधून मागवलं जायचं.

चोलांच्या राजवटीत दक्षिण भारताचा कायापालट

तामिळ मंदिरं मोठ्या विस्तीर्ण संकुलांमध्ये आणि सार्वजनिक जागांमध्ये बांधली जाऊ लागली. त्यांच्याभोवती बाजारपेठा तयार झाल्या, संपन्न अशी भातशेती वाढली.

कावेरी नदीच्या काठावरील चोलांच्या राजधानीच्या प्रदेशात (सध्याचं तामिळनाडूतील कुंभकोणम) मंदिरांनी नटलेल्या डझनभर नगरांच्या समूहात हजारो, लाखो लोक राहत होते. त्यावेळच्या युरोपमधील बहुतांश शहरांना ती मागे टाकत होती.

महत्त्वाचं म्हणजे चोलांची ही शहरं आश्चर्यकारकरित्या बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक होती. तिथे चिनी बौद्धांच्या खांद्याला खांदा लावून ट्युनिशियातील ज्यू वावरत होते. बंगाली तांत्रिक गुरू लंकेतील मुस्लीमांबरोबर व्यापार करत होते.

आज तामिळनाडू हे राज्य भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक आहे.

तामिळनाडूतील अनेक शहरांचा विस्तार चोल साम्राज्याच्या काळातील देवस्थानं, मंदिरं आणि बाजारपेठांभोवती झाला आहे.

शहरीकरण आणि स्थापत्यशैलीतील हा विकास कला आणि साहित्याच्या क्षेत्रात देखील झाला होता.

तामिळनाडूत चोल राजवंशानं बांधलेलं भगवान शिवाला समर्पित मंदिर

फोटो स्रोत, Getty Images

मध्ययुगीन कालखंडात चोल साम्राज्याच्या काळात मंदिरासाठी केलेलं तामिळ धातूकाम हे बहुधा मानवी हातांनी केलेलं सर्वोत्तम काम आहे. मानवी व्यक्तीरेखांची मांडणी करताना त्यावेळच्या कलाकारांनी, मायकल एंजेलो किंवा डोनाटेलो या युरोपातील विख्यात कलाकारांच्या कलाकृतींच्या तोडीचं काम केलं आहे.

चोल राजांची स्तुती करण्यासाठी आणि देवतांबद्दलचा भक्तीभाव दाखवण्यासाठी तामिळ कवींनी संतत्व, इतिहास आणि अगदी वास्तवाची सुंदर, जादूई मांडणी किंवा चित्रण करण्याच्या कल्पना विकसित केल्या. चोलांच्या राजवटीत साहित्य बहरलं होतं.

जर युरोपात झालेला सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील नवीन बदलांचा, पुनर्जागरणाचा काळ त्याच्या 300 वर्षे आधी दक्षिण भारतात घडला असता तर तो नक्कीच चोल राजांचा काळ होता, इतकी चौफेर प्रगती चोल राजवटीत दक्षिण भारतानं केली होती.

चोल राजांच्या काळातील कांस्य, विशेषकरून कांस्यातील नटराज, पाश्चात्य देशांमधील बहुतांश प्रमुख संग्रहालयांमध्ये आढळतात, हा काही निव्वळ योगायोग नव्हे.

आज आपण ज्या जगात राहतो त्याला आकार देणाऱ्या, अतिशय प्रभावशाली राजकीय नाविन्यपूर्ण कल्पना, जगाला जोडणाऱ्या सागरी मोहिमा, भव्यदिव्य देवस्थानं, मंदिरं, प्रचंड संपत्ती, व्यापारी, राज्यकर्ते आणि कलाकार यांचे ते जगभर विखुरलेले अवशेष आहेत.

(अनिरुध कानिसेट्टी हे भारतीय लेखक आहेत आणि अलीकडेच त्यांचे ‘लॉर्ड्स ऑफ अर्थ अँड सी: अ हिस्ट्री ऑफ द चोला एम्पायर’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC