Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
मुघल बादशाहांपासून ते अलीकडचे कलाकार, सर्वसामान्य माणूस सर्वांनाच जम्मू काश्मीरमधील चिनार वृक्षांनी नेहमीच भुरळ घातली आहे. कोणताही ऋतू असो, कोणताही मूड असो चिनार त्यात फीट बसतं.
अगदी महाकवी ग. दि. माडगूळकरांनी देखील मधुचंद्र या चित्रपटातील गीतामध्ये, “हे चिंचेंचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी” असं म्हणत चिनारचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.
जम्मू काश्मीरची शान असलेलं चिनार गेल्या काही वर्षांपासून मात्र धोक्यात सापडत चाललं आहे. चिनारची अंदाधुंद कत्तल होत असल्यामुळे या झाडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जम्मू काश्मीरमधील चिनारचा इतिहास, सांस्कृतिक महत्त्व आणि सध्या संवर्धनासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांबद्दल जाणून घेऊया.
मुघल बादशाह शहाजहाननं जवळपास 350 वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये ‘दल लेक’च्या काठावरील भल्या मोठ्या नसीम बागेत चिनार वृक्षाची 1200 रोपं लावली होती. त्यानंतर अनेक दशकं जागोजागी चिनारची रोपं लावण्याची पद्धत रुढ झाली होती.
आज जम्मू काश्मीरमध्ये क्वचितच एखादी जागा असेल जिथे चिनार वृक्ष नसतील. जम्मू काश्मीर म्हटलं की चिनार वृक्ष डोळ्यासमोर आल्याखेरीज राहत नाही. मात्र त्याचबरोबर कित्येक दशकांपासून चिनार वृक्ष निर्दयीपणे तोडले देखील जात आहेत.

फक्त तस्करीसाठीच चिनारची कत्तल केली जात नाहीये, तर सरकारी इमारती आणि रस्ते बांधण्याच्या कामांसाठी देखील चिनार वृक्ष तोडले जात आहेत.
चिनार वृक्ष तोडण्याविरोधात जम्मू काश्मीरमध्ये अनेकदा निदर्शनंदेखील झाली आहेत. तज्ज्ञांनी हे सुंदर झाड लुप्त होऊ शकतं असा धोक्याचा इशारादेखील दिला आहे.
त्याच कारणामुळे जम्मू काश्मीरच्या वन विभागानं चिनार वृक्षांचं जिओ टॅगिंग करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत 35 हजार झाडांचं जिओ टॅगिंग करण्यात आलं आहे.
जिओ टॅगिंगमुळे चिनार वाचतील का?
वन विभागाचे संशोधक डॉक्टर सैयद तारिक जिओ टॅगिंग अभियानाचे प्रमुख आहेत.
ते म्हणतात, “आम्ही प्रत्येक चिनार वृक्षाजवळ जाऊन त्याची जाडी, उंची, झाडाची स्थिती आणि त्याचं स्थान यांची नोंद करतो. त्यानंतर या माहितीचं कोडिंग होतं. त्यानंतर हा कोड एका प्लेटवर प्रिंट करून चिनार वृक्षावर लावला जातो.”
ते म्हणतात, “या अभियानामुळे फक्त चिनार वृक्षांची योग्य संख्येचीच माहिती मिळणार नाही, तर बेकायदेशीरपणे झाडं तोडणाऱ्यांवर देखील आळा घातला जाईल.”
या अभियानादरम्यान जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात 74 फूट जाडीचं खोड असलेलं चिनारचं झाडदेखील मिळालं आहे. त्याची माहिती संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थेलादेखील देण्यात आली आहे.
चिनार वाचवण्यासाठीच्या या अभियानादरम्यान लोकांना देखील जागरुक केलं जातं आहे.
डॉक्टर तारिक म्हणतात, “चिनारची झाडं असलेल्या बागांमध्ये लोक जेव्हा आग लावतात, तेव्हा झाडाच्या वाकलेल्या फांद्याचं नुकसान होतं. त्यामुळे देखील शेकडो चिनार वृक्ष पोकळ झाले आहेत.”

फोटो स्रोत, Getty Images
जम्मू काश्मीरमध्ये सापडणाऱ्या चिनारच्या झाडांचं वय 100 ते 300 वर्षांदरम्यान असतं. या झाडांना पूर्ण संरक्षण जरी देण्यात आलं तरी देखील ही झाडं पुढील 150 वर्षांच्या कालावधीत आपोआप पडतील.
हा धोका लक्षात घेऊन गांदरबलमध्येच वन विभागानं एक खूप मोठी नर्सरी तयार केली आहे. तिथे चांगल्या निरोगी चिनार वृक्षांच्या फांद्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली लावण्यात आल्या आहेत.
डॉक्टर सैयद तारिक म्हणतात, “वेगवेगळ्या भागांमध्ये लावण्यासाठी दरवर्षी आम्ही या नर्सरीमधून हजारो चिनार ‘कटिंग्स’ देऊ शकतो. त्याचा अर्थ, पुढील पाच वर्षांच्या काळात आम्ही संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये चिनारची 50 हजार ते एक लाख नवी रोपं लावलेली असतील.”
धर्म आणि संस्कृतीचं प्रतीक असलेलं चिनार
प्रत्येक बागेत, प्रत्येक शेताच्या बांधावर आणि रस्त्याच्या कडेला दिसणारं चिनारचं झाड, जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झालं आहे.
वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हिरव्यागार चिनार वृक्षाची सावली असो की पानगळीचा ऋतू, चिनारची सोनेरी पानं, एखादा फोटो, एखादी गझल आणि कोणताही शेर चिनारशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
जम्मू काश्मीरमध्ये मध्य आशियातून आलेल्या शेकडो इस्लामी धर्मोपदेशकांच्या कबरी आहेत. त्यातील अनेक कबरी चिनार वृक्षाखाली आहेत. त्यामुळेच चिनार वृक्षाला धार्मिक पावित्र्यदेखील लाभलं आहे.
प्रसिद्ध शायर इकबाल यांनी 1930 च्या दशकात जम्मू काश्मीरवर लिहिलेल्या एका शेरमध्ये चिनार वृक्षांचं वर्णन केलं होतं.
जिस ख़ाक के ज़मीर में हो आतिश-ए-चिनार
मुमकिन नहीं कि सर्द हो वो ख़ाक-ए-अर्जुमंद
(ख़ाक= माती, अर्जुमंद= प्रतिष्ठित, योग्य)
जम्मू काश्मीरचा सर्वात मोठा आणि सर्वात जुना राजकीय पक्ष असलेला नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक शेख मोहम्मद अब्दुल्लाह यांनी त्यांच्या आत्मचरित्राला देखील ‘आतिश-ए-चिनार’ असंच नाव दिलं होतं.
इतकंच काय, काही वर्षांपूर्वी श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याच्या 15 व्या कोअरच्या मुख्यालयाचं नाव देखील ‘चिनार कोअर’ ठेवण्यात आलं होतं. कारण कालव्यावर पसरलेल्या या लष्करी छावणीमध्ये चिनारची शेकडो झाडं आहेत.
चिनारच्या झाडांनी व्यापलेल्या जम्मू काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये बॉलीवूडच्या असंख्य चित्रपटांचे चित्रीकरण झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
1972 मध्ये आलेल्या ‘इंतजार’ या चित्रपटातील एका गाण्याचं चित्रीकरण दल लेकच्या किनाऱ्यावर चिनारच्या झाडांमध्ये करण्यात आलं होतं.
त्या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांनी गीत लिहिलं होतं. त्या गीताच्या काही ओळी आजदेखील सर्वांना ओठांवर असतात. त्या अशा आहेत,
कभी हम साथ गुज़रे जिन सजीली राह ग़ुज़ारों से
फ़िज़ा के भेस में गिरते हैं पत्ते अब किनारों से
यह राहें याद करती हैं, यह गुलशन याद करता है
बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है
असंख्य पक्षांचं निवासस्थान
डॉक्टर सैय्यद तारिक यांचं म्हणणं आहे की, चिनार हे फक्त सौंदर्याचंच प्रतीक नाही. तर चिनार वृक्ष हे पक्षांचं निवासस्थानदेखील आहे. त्याचबरोबर प्रदूषणावर मात करण्यासाठीचा तो एक नैसर्गिक उपायदेखील आहे.
ते म्हणतात, “चिनारची झाडं खूप उंच असतात. त्यामुळे ते अनेक जिवांचं निवासस्थान असतात. त्यांच्या मुळांजवळ मुंगूस त्यांचं घर बनवतात. त्यानंतर छोटे पक्षी असतात. त्यांच्यावर कावळे त्यांची घरटी बनवतात. सर्वात उंचावर गरुडासारख्या पक्षांची घरटी असतात.”
“चिनारचं झाड पाडल्यानंतर फक्त एक झाडंच पडत नाही, तर शेकडो पक्षांची घरटीदेखील नष्टं होतात.”
डॉक्टर सय्यद पुढे सांगतात की, इतर 200 झाडं हवेतून जितका कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, तितकाच कार्बन डायऑक्साईड एकटं चिनारचं झाड शोषून घेऊ शकतं.

डॉ. तारिक यांच्या मते, “नवी दिल्लीत वाय प्रदषूणाची स्थिती जेव्हा खूपच गंभीर झाली होती, तेव्हा कोणीतरी म्हणालं होतं की इथलं हवामान अनुकूल असतं तर फक्त 50 चिनार वृक्षांनी हे प्रदूषण संपवून टाकलं असतं.”
जम्मू काश्मीरमध्ये चिनारच्या झाडांचं संरक्षण करण्यासाठी 1969 चा एक कायदा आहे. त्या कायद्यानुसार चिनारचं झाड तोडणं हा एक गुन्हा आहे. चिनारच्या फांद्या तोडण्यासाठीदेखील सरकारची परवानगी घेतली पाहिजे.
मात्र चिनारची झाडं वाचवण्यासाठी हा कायदा आणखी कडक करण्याची मागणी कित्येक दशकांपासून केली जाते आहे. चिनारला ‘हेरिटेज ट्री’ घोषित करण्यात यावं, अशी जम्मू काश्मीरमधील लोकांची मागणी आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC