Source :- ZEE NEWS
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यारम्यान पाकिस्तानच्या एका मंत्र्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला जन्नत दिली. तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं असं विधान केलं आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तानचे (MQM-P) नेते आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्री सय्यद मुस्तफा कमाल यांनी हे विधान केलं आहे. यादरम्यान त्यांनी अण्वस्त्राचा उल्लेख करत भारताला धमकीही दिली आहे.
मुस्तफा कमाल यांनी म्हटलं आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला जन्नत देत असतील तर यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. यावेळी त्यांनी अण्वस्त्राचा उल्लेख करत धमकी दिली की, “आम्ही जी अण्वस्त्रं शस्त्रं बनवून ठेवली आहेत, ती काय शब-ए-बारातला फटाके फोडण्यासाठी बनवली आहेत का?”.
‘एक दिवस मृत्यू होणारच आहे’
“तुम्ही कोणाला मृत्यूची भिती दाखवत आहात. पण जर मृत्यूच प्रिय वाटू लागला, तर तुम्ही काय कराल? आपल्याला एक दिवस मरायचंच आहे. जर नरेंद्र मोदी आम्हाला जन्नत देणार असतील, तर यापेक्षा चांगली गोष्ट काय असेल,” असंही कमाल पुढे म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, “आम्ही मुस्लिम आहोत, हा मुस्लिम देश आहे. आमच्यासाठी खरं आयुष्य तर मृत्यूनंतर सुरु होतं. आम्ही गुन्हेगार लोक आहोत. आमचा निष्ठा इतकी मजबूत नाही. आपण सांसारिक गुंतागुंतींमध्ये व्यस्त आहोत. पण जेव्हा संकट येते तेव्हा अल्लाह तआला आम्हाला त्या स्तराची निष्ठाही देईल”.
‘भारतीय लष्कराला आत घुसू दे’
पाक मंत्र्याने पुढे म्हटलं की, “मी तर पाकिस्तानी लष्कराला सांगतो की, भारतीय लष्कराला आत घुसू दे, त्यांना शहरात येऊ दे. हे 25 कोटी लोक आणि आपली पूर्ण यंत्रणा….भारतीय सैन्य परत जाणार नाही. भारताने या धमक्या अन्य कोणाला तरी द्याव्यात”.
SOURCE : ZEE NEWS