Source :- BBC INDIA NEWS

महिलेला मारहाण

30 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा या गावात आदिवासी वृद्ध महिलेला मारहाण करुन धिंड काढण्यात आली होती. या घटनेची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर संपूर्ण गावाने 21 जानेवारी रोजी ग्रामसभेत संबंधित महिलेची आणि कुटुंबाची माफी मागितली.

जादूटोण्याच्या संशयावरुन सदर महिलेस मारहाण करण्यात आली होती.

पीडित महिलेने न्यायासाठी कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

21 जानेवारीला रेट्याखेडा गावामध्ये झालेल्या ग्रामसभेत अधिकारी आणि पोलिसांसोबत गावकऱ्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणार नसल्याची शपथ घेतली. तसेच, वृद्ध महिलेची माफी मागितल्याचं समोर आलं आहे.

जादूटोणा करण्याच्या संशयावरून मारहाण

या घटनेनंतर पीडित महिला, 77 वर्षांच्या काळमी शेलूकर, अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत.

दोरखंडाने बांधून त्यांना लोखंडी सळीचे चटके देऊन मिरचीची धुरीही दिली.

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीनं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, कोरकूसोडून त्यांना कोणतीही दुसरी भाषा येत नसल्याचं समजलं.

जादूटोणा करण्याच्या संशयावरून काळमी यांना मारहाण करून गळ्यात चपलेचा हार घालून गावभर धिंड काढली असे आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहेत.

रेट्याखेडा हे अमरावती पासून जवळपास 130 किमी दूर असलेलं 450 लोकसंख्येचं दुर्गम गाव आहे. जंगलाने वेढलेल्या या गावात जायला धड रस्ताही नाही.

ही घटना 30 डिसेंबर रोजी घडली. अत्याचार करणाऱ्यांमध्ये गावातील पोलीस पाटीलही सहभागी असल्याचं म्हटलं जात आहे.

घटनेनंतर पोलिसांत मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पीडितेला न्याय मिळत नसल्यामुळे पीडित कुटुंबीयांनी शुक्रवारी, 18 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

शामू शेलूकर, या काळमी यांच्या सून बीबीसीशी बोलताना सांगत होत्या. “आम्ही बाहेरगावी होतो त्यादिवशी आम्हाला गावातून फोन आला. सासूबाईंची तब्येत बिघडल्याचं सांगितलं. म्हणून आम्ही धावत पळत गावात आलो,” त्या म्हणाल्या.

काळमी यांचा मुलगा राजकुमार आणि सून शामू दोघेही रोजंदारीसाठी गावोगावी फिरत असतात. नातू शिक्षणासाठी आश्रम शाळेत आहेत. त्यामुळे घटना घडली तेव्हा काळमी गावात एकट्याच कुटुंबीयांशिवाय राहत होत्या.

“आम्ही घरी येऊन पाहिलं तर सासूबाई नव्हत्या. ग्रामपंचायतीच्या ऑफिसात विचारायला गेलो तेव्हा त्यांनी थेट माझ्या नवऱ्याला मारहाण करायला सुरूवात केली. तुझी आई जादू करते, तूच तिला शोध असे सगळे म्हणू लागले. सासूबाईंचा शोध घेतला तेव्हा त्या त्यांच्या बहिणीकडे गेल्याचं आम्हाला कळालं. तिथं गेल्यावर सगळा खुलासा झाला,” शामू पुढे सांगत होत्या.

दोरखंडाने बांधून त्यांना लोखंडी सळीचे चटके देऊन मिरचीची धुरीही दिली.

फोटो स्रोत, Getty Images

घटनेच्या दिवशी काळमी पहाटे शौचासाठी उठल्या होत्या. गावातल्या सायबू चतुर यांच्या घरासमोर त्या आल्या. तेव्हा आरोपी सायबू याने काळमीला चोर समजून पकडलं आणि बांधून ठेवलं. काळमी त्यांच्या घरापुढे जादूटोणा करत असल्याचा आरोप करत त्यांना मारहाण करायला सुरवात केली. दोरखंडाने बांधून त्यांना लोखंडी सळीचे चटके देऊन मिरचीची धुरीही दिली.

त्यानंतर सकाळी सात-आठ वाजता गाव जमा झाल्यावर त्यांना कुत्र्याचं आणि माणसाचं मलमूत्र पाजलं गेलं. आणि तोंडाला काळं फासून, चपलेचा हार घालून गावातून धिंड काढली. नंतर त्यांच्या कपड्यांचं गाठोडं बांधून गावातून हाकलून दिलं.

“सासूबाईंसोबत काय झालं ते गावातल्या लोकांनी सांगितलं. आम्ही त्याचे फोटो पाहिल्यावर खूप वाईट वाटलं. तक्रार करून पण काही झालं नाही तेव्हा आम्ही अमरावतीला मोठ्या साहेबांकडे गेलो. साहेबांनी जखमा बघितल्या,” शामू पुढे सांगत होत्या.

काळमी स्वतः अंगणवाडीत खिचडी शिजवण्याचं काम करत असत. 20 ते 30 वर्ष त्यांनी हे काम केलं. काही वर्षांपूर्वी त्या निवृत्त झाल्या.

“मुलांनी त्यांच्या हातची खिचडी खाल्ली तेव्हा काहीच नाही झालं. मग आत्ताच कसा जादूटोणा करतील? यापूर्वीही अशीच घटना झाली होती एका व्यक्तीला चपलचा हार घालून गावातून बाहेर काढलं होतं,” शानू म्हणाल्या.

काळमी काम करत होत्या ती अंगणवाडीही शेलूकर कुटुंबाच्या चार एकर जमिनीतील जागेवरच बांधली आहे. काम मिळवण्यासाठी काळमी यांनी या बांधकामाला परवानगी दिली होती. पण आमची जागाही गेली आणि कोणाला कामही मिळालं नाही, असं शानू सांगत होत्या.

अंगणवाडीच्या बांधकामासाठी दिलेल्या जागेची किंमत काळमी मागत असल्याचं गावकरी सांगतात.

भानामतीमध्ये वापरली जाणारी काळी बाहुली

फोटो स्रोत, YOGESH_MORE

पीडित महिलेचा पती हा गावात भगताचं किंवा भुमक्याचं काम करत होता. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब जादूटोणा करत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आसपासच्या गावामध्येही पीडित महिलेची दहशत असल्याचं गावकरी सांगत होते. त्यामुळ या महिलेशी गावाकरी फार सबंध ठेवायचे नाहीत. शिवाय कुटुंबाशी कोणताही व्यवहार होत नसे. विशेषतः रात्रीच्या वेळी त्यांच्या घराकडे कुणी फिरकतही नसल्याचं काही गावकरी सांगत होते.

“त्यांना गावातून फिरवताना मी पाहिलं. जादूटोण्याबद्दल आमच्या गावात फार भीती बसली आहे. अलीकडे गावात एका नवरदेवाचे कपडे मध्येच कापलेले सापडले. तेव्हापासून काळमीच जादूटोणा करते असं समजलं जाऊ लागलं. तिची खूप भिती आहे,” केंडे हिरा या गावकऱ्याने माहिती दिली.

शिवाय, आरोपी पोलीस पाटील बाबू झापू जामूनकर यांची गावामध्ये चांगलीच दहशत असल्याचंही ते सांगत होते. आरोपी आधी गावचे सरपंच त्यानंतर पोलीस पाटील असल्यामुळे गावाची सत्ता त्यांच्याकडे एकवटली आहे. रोजगार सेवक, रेशन, चक्की त्यांच्याकडेच असल्यामुळे गावकरी त्यांच्या विरोधात जात नाहीत.

मात्र, मुलाला नाहक फसवण्यात आलं असल्याचं बाबू यांचे वडील झापू जामुनकर यांचं म्हणणं आहे.

“मी घरात झोपलो होतो. तेव्हा रात्री तीन वाजता सायबू घरी आला. त्याने एका चोराला पकडून ठेवल्याचं सांगितलं. घरासमोर शौचाला बसलेल्या महिलेला पकडल्यावर ती ओरडायला लागली आणि पळून जायचा प्रयत्न करू लागली, असं सायबू सांगत होता. त्यानं एखाद्या सैतानाला पकडल्यासारखं वाटतंय असं तो म्हणत होता,” झापू जामुनकर सांगत होते.

पुढे त्यांनीही पीडितेकडे जाऊन तू जादूटोणा का करतेस आणि किती वर्षापासून करतेस असे प्रश्न विचारले. त्यानंतर पोलीस पाटील आले आणि तिला सोडवलं, असं झापू जामुनकर पुढे म्हणाले.

दोरखंडाने बांधून त्यांना लोखंडी सळीचे चटके देऊन मिरचीची धुरीही दिली.

फोटो स्रोत, Getty Images

या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत सध्या गावातल्या पाच आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय, या प्रकरणाबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवाय, पोलिस पाटील जामुनकर यांनाही बडतर्फ करण्याचा आदेश सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी काढला आहे..

शिवाय, रेट्याखेडा गावाचं समुपदेशन करण्याची जबाबदारी शासनाने उचलली असल्याचं म्हाडदळकर यांनी सांगितलं आहे. पीडित महिलेला वेगवेगळ्या योजनांमधून शासनाचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या. दोन आठवड्यांत संजय गांधी नरेगा अंतर्गत त्यांना जॉब कार्ड काढून दिला जाईल.

“कमाईचं साधन नसल्यामुळे कुटुंबातल्या लोकांना स्थलांतरीत व्हावं लागे. त्यामुळं महिला गावात एकटी राहिली. त्यामुळे कुटुंबियांना त्यांच्याच गावात रोजगार कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पीडित महिलेच्या सुनेला मानधन तत्त्वावर नोकरी देता येईल का ते पाहण्यासंदर्भातही सूचना देण्यात आल्या आहेत,” म्हाडदळकर म्हणाल्या.

सोमवारी झालेल्या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन अंधश्रद्धाविरोधी शपथ घेतली. गावात झालेली घटना दुर्दैवी असून पुन्हा अशी घटना होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे गावकऱ्यांनी अधिकारी आणि पोलिसांसोबत वचन दिले.

जंगलात वसलेल्या आणि प्रशासनाच्या पटलावर नाहिसं असलेल्या या गावानं याआधी कधीही इतके अधिकारी गावात पाहिले नव्हते. पोलिस गावकऱ्यांवर प्रभाव टाकत असल्याचे दिसत आहे.

दोरखंडाने बांधून त्यांना लोखंडी सळीचे चटके देऊन मिरचीची धुरीही दिली.

फोटो स्रोत, Getty Images

अमरावती, मेळघाट भागात अशी अनेक गावं अतिदुर्गम भागात आदिवासी समुदायाकडून भगत, भुमका म्हणजेच यांचे सहकार्य घेतले जाते.

अशा घटना थांबवायच्या असतील तर समाजात प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

“या घटनेवरून आपण समाज म्हणून कुठल्या दिशेला चाललो आहोत असा प्रश्न पडतो. जादूटोणाविरोधी कायदा येऊन अनेक वर्ष झाली पण गावात कधीही यासंदर्भात साधी चर्चाही झाली नाही. इतक्या दुर्मग भागात राहणाऱ्या महिलेला न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावं लागतं,” अशी प्रतिक्रियी खोज संस्थेच्या समाज सेविका, पोर्णिमा उपाध्याय यांनी दिली.

जादूटोणा विरोधी कायदा असला तरी अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर लोकांमध्ये प्रबोधन करणं गरजेचं आहे, असं अखिल भारतीय अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गणेश हलकारे यांनी सांगितलं.

“हा कायदा देशव्यापी व्हायला हवा. प्रबोधन कसे करायचे याचं प्रशिक्षण ग्रामपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्याची गरज आहे,” हलकारे सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC