Source :- BBC INDIA NEWS

जुळी मुलं

जुळ्या भावंडांमधील एकाला किंवा एकीला एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असेल तर या जोडीतल्या दुसऱ्या व्यक्तीला देखील त्या पदार्थाची अ‍ॅलर्जी असू शकते का?

अ‍ॅलर्जी मग ती धुळीची असो किंवा काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यामुळे होणार श्वसनाचा त्रास असो, कुठलीही अ‍ॅलर्जी ही त्या माणसाच्या शरीरातील जनुकीय रचना आणि तो व्यक्ती राहत असलेल्या वातावरणामुळे तयार होत असते.

कोणत्याही दोन व्यक्तींना एकाच पदार्थाची अ‍ॅलर्जी असण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात जर त्या दोन व्यक्ती खूपवेळ एकत्र राहत असतील किंवा एकाच वातावरणात राहत असतील तर ही शक्यता अजून वाढते.

जुळ्या भावंडांमध्ये एकाच पदार्थाची अ‍ॅलर्जी असण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या असतात. पण, ही गोष्ट इथेच संपत नाही.

मात्र अ‍ॅलर्जी हा विषयच एकदम गुंतागुंतीचा आहे आणि कुणाला, कोणत्या गोष्टीची अ‍ॅलर्जी होईल किंवा होणार नाही हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं.

अ‍ॅलर्जी म्हणजे काय?

तुमच्यात असणारी रोगप्रतिकारकशक्ती वेगवेगळ्या अँटीबॉडीज म्हणजेच डिफेन्स प्रोटिन्स तयार करत असते.

या अँटीबॉडीज शरीरात प्रवेश करणाऱ्या रोगजंतूंवर हल्ला करत असतात, जेणेकरून हे रोगजंतू तुम्हाला आजारी करण्याआधी अँटीबॉडीज त्यांचा नायनाट करतात.

त्याचप्रमाणे एखाद्या निरुपद्रवी पदार्थाला धोकादायक समजून तुमचं शरीर काम करतं तेव्हा अ‍ॅलर्जी होते. शरीरात अचानक अ‍ॅलर्जन तयार होतात.

तुमच्या शरीरातील अँटीबॉडीज या अ‍ॅलर्जन्सना चिकटतात आणि यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कार्यान्वित होते.

या सगळ्या प्रक्रियेमुळे अ‍ॅलर्जीची सामान्य लक्षणं दिसून येतात. या लक्षणांमध्ये अचानक शिंका येणे, सर्दी होणे, सतत नाक गळणे, डोळ्यांवाटे पाणी येणे, डोळ्यांना खाज सुटणे आणि खोकला यांचा समावेश होतो. ही लक्षणं सूक्ष्म पण त्रासदायक असू शकतात.

जुळी भावंडं

फोटो स्रोत, Getty Images

अ‍ॅलर्जीमुळे अ‍ॅनाफिलेक्सिससारखे जीवघेणे परिणाम देखील होऊ शकतात. अशा परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत घेण्याची गरज असते.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने तिला अ‍ॅलर्जी असणारी एखादी गोष्ट खाल्ली आणि त्यामुळे तिचा गळा सुजला किंवा चट्टे उमटले तर अशा परिस्थितीला अ‍ॅनाफिलेक्सिस म्हणून बघता येईल.

रुग्णाच्या स्नायूंमध्ये एपिनेफ्रिन (अ‍ॅड्रेनालाईन) हार्मोनचं इंजेक्शन देऊन अ‍ॅनाफिलेक्सिसवर उपचार केले जातात.

जुळ्या बहिणी

फोटो स्रोत, Alamy

या लोकांना अ‍ॅलर्जी आहे असे लोक स्वतःकडे एक इंजेक्शन बाळगू शकतात जेणेकरून अ‍ॅनाफिलेक्सिस सारख्या आपत्कालीन परिस्थितीत ते स्वतःचा उपचार स्वतः करू शकतील.

नाकावाटे घेता येणार एपिनेफ्रिन स्प्रेसुद्धा अशा परिस्थितीत उपयोगी ठरतात.

एखाद्या व्यक्तीला घराबाहेरच्या वस्तूंची जसे की, गवत, झाडांचे परागकण, मधमाशांचा डंख अशा वस्तूंची अ‍ॅलर्जी असते. किंवा घरातले पाळीव प्राणी, कार्पेट आणि गाद्यांमध्ये आढळणारे लहान कीटक, धूळ यांची देखील अ‍ॅलर्जी असू शकते.

लोकांना विशिष्ट खाद्यपदार्थांची देखील अ‍ॅलर्जी असू शकते. जगभरातल्या 4 ते 5 टक्के लोकांना खाद्यपदार्थांची अ‍ॅलर्जी असते.

सामान्यतः लोकांना गायीचं दूध, अंडी, गहू, सोया, शेंगदाणे, मासे आणि तिळाची अ‍ॅलर्जी असते. कधीकधी ही अ‍ॅलर्जी निघून जाते तर कधी आयुष्यभर तशीच राहते.

अ‍ॅलर्जी कुणाला होऊ शकते?

प्रत्येक अँटीबॉडीचं एक विशिष्ट लक्ष्य असतं. त्यामुळे काही व्यक्तींना एखाद्या विशिष्ट गोष्टीचीच अ‍ॅलर्जी असू शकते. अ‍ॅलर्जी निर्माण करणाऱ्या अँटीबॉडीज शरीरात येणाऱ्या काही परजीवींचा देखील समूळ नायनाट करतात.

आधुनिक औषधांमुळे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना या पॅरासाईट्स म्हणजेच परजीवींचा सामना करावा लागत नाही. पण तरीही त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज सतत सज्ज असतात आणि त्यामुळे कधीकधी या अँटीबॉडीज एखाद्या अन्नपदार्थावर किंवा परागकणांवर देखील हल्ला करतात.

तुमच्या आजूबाजूचा परिसर आणि स्वच्छता या दोन घटकांमुळे देखील तुम्हाला एखादी अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता कमी किंवा जास्त होऊ शकते.

लहानपणी एखादा व्यक्ती जेवढा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टरीयाच्या संपर्कात येईल तेवढीच तुम्हाला अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता कमी असते.

लहानपणी वेगवेगळ्या बॅक्टरीयासोबत जेवढा तुमचा संपर्क होईल, तेवढीच तुम्हाला अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता कमी असते.

वसंत ऋतूतील फुलं

फोटो स्रोत, Getty Images

अनेक अभ्यासांमधून हे स्पष्ट झालं आहे की ज्या मुलांकडे लहानपणी पाळीव प्राणी असतात, किंवा ज्यांना खूप भावंडं असतात किंवा मग जी मुलं शेतात वाढलेली असतात त्यांना कुठल्याही प्रकारची अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता कमी असते.

लहानपणी तुमचं स्तनपान झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही भविष्यात अनेक अ‍ॅलर्जी पासून सुरक्षित राहता.

शहरात वाढलेल्या मुलांमध्ये अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता जास्त असते. शहरात होणारं वायुप्रदूषण किंवा धुम्रपानाच्या सतत संपर्कात असल्यामुळे देखील अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता बळावते.

कधीकधी काही विशिष्ट कामांमुळे देखील प्रौढ व्यक्तींना पर्यावरणीय अ‍ॅलर्जी होऊ शकते. उदाहरणार्थ सलूनमध्ये काम करणारे, बेकरीमध्ये काम करणारे, कारचे मेकॅनिक यांना त्यांच्या कामात विविध रसायनांशी संपर्क आल्यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते.

शरीराच्या जनुकीय संरचने (जेनेटिक्स)चा देखील अ‍ॅलर्जी विकसित होण्यावर मोठा प्रभाव असतो. जर पालकांना पर्यावरणीय किंवा विशिष्ट अन्न पदार्थांची अ‍ॅलर्जी असेल तर त्यांच्या मुलांना तीच अ‍ॅलर्जी असण्याची शक्यता असते.

विशेषतः शेंगदाण्याच्या अ‍ॅलर्जीच्या बाबतीत असं घडतं की, जर तुमच्या पालकांना किंवा भावंडांना अ‍ॅलर्जी असेल तर तुम्हाला ती अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता सात पटींनी वाढते.

जुळ्या भावंडांना एकाच गोष्टीची अ‍ॅलर्जी असते का?

आता पुन्हा जुळ्यांच्या अ‍ॅलर्जीकडे येऊया. जुळ्या भावंडांना एकाच गोष्टीची अ‍ॅलर्जी असू शकते पण नेहमीच असं घडत नाही.

ऑस्ट्रेलियातील संशोधकांना असं आढळलं आहे की, 60 ते 70 जुळ्यांना एकाच प्रकारची पर्यावरणीय म्हणजे वातावरणातून निर्माण झालेली अ‍ॅलर्जी असू शकते. आयडेंटिकल ट्विन्स म्हणजेच एकसारख्या जुळ्यांना अशी अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता नॉन आयडेंटिकल ट्विन्सपेक्षा जास्त असते.

आयडेंटिकल ट्विन्समध्ये असणारी जनुकं 100 टक्के सारखी असतात तर नॉन आयडेंटिकल ट्विन्समध्ये हे प्रमाण 50 टक्के असतं. नॉन आयडेंटिकल ट्विन्समधलं जनुकीय वाटप हे इतर कुठल्याही सामान्य भावंडांप्रमाणे असतं.

अन्नपदार्थांमुळे निर्माण होणाऱ्या अ‍ॅलर्जीवर आणखी बरंच संशोधन झालेलं आहे. शेंगदाण्याच्या अ‍ॅलर्जीवर केलेल्या एका संशोधनात असं आढळून आलं की, नॉन आयडेंटिकल ट्विन्सपेक्षा आयडेंटिकल ट्विन्सना ही अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळे जुळ्या भावंडांना एकाच गोष्टीची अ‍ॅलर्जी असू शकते. त्यांच्यात असणाऱ्या जनुकीय समानतेमुळे असं घडू शकतं किंवा त्यांची वाढच एकत्र झालेली असल्यामुळे देखील असं होतं. पण जुळ्या भावंडांमध्ये जन्मतःच आपोआप एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी तयार होत नाही.

जुळी भावंडं

फोटो स्रोत, Getty Images

कल्पना करा की एकाच वेळी जन्माला आलेली दोन जुळी भावंडं एकमेकांपासून विभक्त झाली आणि त्यांची वाढ वेगवेगळ्या वातावरणात झाली.

त्यातल्या एकाच बालपण शेतात गेलं आणि दुसऱ्याच शहरात गेलं. जर त्यातल्या एकाचे पालक धूम्रपान करत असतील आणि आणि दुसऱ्याचे करत नसतील तर काय होईल? जर यातलं एक मूल इतर भावंडांसोबत वाढलं असेल आणि दुसरं मूल एकट्यानेच मोठं झालं असेल तर?

असं घडलं तर अर्थातच दोघांना वेगवेगळ्या गोष्टींची अ‍ॅलर्जी होऊ शकते किंवा अजिबात कशाचीच अ‍ॅलर्जी न होण्याची देखील शक्यता असते.

माझ्यासारखे शास्त्रज्ञ अ‍ॅलर्जीवर सतत संशोधन करत आहेत आणि आम्हाला भविष्यात याबाबत नवनवीन उत्तरं मिळण्याची आशा आहे.

ब्रियान हेस हॅनी या अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठात अ‍ॅलर्जी या विषयावर काम करणाऱ्या तज्ज्ञ इम्यूनोलॉजिस्ट आहेत.

* हा लेख द कॉन्व्हर्सेशनच्या क्युरियस किड्स या मालिकेत प्रकाशित झालेल्या एका लेखावरून रूपांतरित केला आहे, जिथे तज्ञ मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि क्रिएटिव्ह कॉमन्स परवान्याअंतर्गत पुनर्प्रकाशित केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC