Source :- BBC INDIA NEWS
जेट ब्लू कंपनीच्या फ्लाईटमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.
विमानानं उ्डडाण केल्यानंतर ज्या ठिकाणी विमानाची चाके दुमडली जातात, त्या ठिकाणीच विमानाचे लँडिंग गिअर कंपार्टमेंट असते. त्याच ठिकाणी दोन मृतदेह सापडणं, हे निश्चितच आश्चर्यकारक आहे.
ही घटना फ्लोरिडामधील फोर्ट लॉडरडेल विमानतळावर उघडकीस आल्याची माहिती जेट ब्लू कंपनीनं दिली आहे.
या घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना जेट ब्लूनं म्हटलं की, विमान लँड झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या नियमित तपासणीदरम्यान ही घटना उघडकीस आली. सोमवारी (6 जानेवारी) रात्री विमानाची नियमित तपासणी केली जात होती. यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे.
“ही निश्चितच हृदयद्रावक घटना आहे. या दोन व्यक्ती विमानामध्ये कशा आल्या, याबाबतचा अधिक तपास केला जात आहे,” असं जेट ब्लूनं जाहीर केलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे.
लँडिंग गिअरमध्ये दोन व्यक्ती कशा आल्या?
‘एअरबस’द्वारे या विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. हे विमान न्यूयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता निघाले आणि रात्री 11 वाजता ते लँड झाले.
या दोन व्यक्ती विमानामध्ये कशा आल्या, याचा तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे.
बीबीसी न्यूजची अमेरिकेतील सहकारी माध्यमसंस्था असलेल्या सीबीएस न्यूजनं माहिती दिली की, या दोन व्यक्तींचा मृत्यू नेमका कसा झाला असावा, याचा शोध घेण्यासाठी मेडिकल एक्झामिनर्स ऑफिसकडून पोस्टमॉर्टम केलं जात आहे.
लँडिंग गिअर कंपार्टमेंटमध्ये मृतदेह सापडण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही अशाच स्वरुपाची घटना दोन आठवड्यांपूर्वी नोंदवण्यात आली होती.
दोन आठवड्यांपूर्वी ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान युनायटेड स्टेट्समधील हवाई राज्यामध्ये आलेल्या एका विमानाच्या लँडिंग गिअर कंपार्टमेंटमध्येही अशाच प्रकारचा एक मृतदेह आढळून आला होता.
मात्र, लँडिंग गिअर कंपार्टमेंटमध्ये एखादा व्यक्ती प्रवेश करुच कसा शकतो? या प्रश्नाचं उत्तर अद्यापही अनुत्तरितच असून संबंधित अधिकाऱ्यांनीही यासंदर्भात काहीही माहिती दिलेली नाही. तसेच त्यांच्या मृत्यूचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.
कोणत्याही विमानाचं लँडिंग गिअर कंपार्टमेंट हा प्रचंड धोकादायक भाग असतो. तिथे जाणाऱ्या वा लपणाऱ्या व्यक्तींना तीव्र थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरता जाणवून फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
विमानाच्या टेकऑफनंतर लँडिंग गिअर दुमडला जातो. अशावेळी, जी व्यक्ती लँडिंग गिअर कंपार्टमेंटमध्ये लपली असेल, ती विमानाच्या चाकांमध्ये चिरडण्याचा प्रचंड मोठा धोका असतो. अर्थातच, यामुळे तिचा मृत्यूही होऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC