Source :- BBC INDIA NEWS

सावित्रीबाई फुले

फोटो स्रोत, Maharashtra Government

( मे महिना हा महाराष्ट्राच्या स्थापनेचा महिना आहे. त्यानिमित्ताने बीबीसी मराठीवर महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा परिचय ‘महाराष्ट्राची नायिका’ या मालिकेतून करुन दिला जात आहे.)

“जोतीराव फुले यांचे निधन 1890 साली झालं. त्यानंतर अंत्ययात्रेच्या वेळी जोतीरावांचे भाऊबंद समस्त फुले मंडळी आडवी आली. दत्तकपुत्र यशवंत हे कडू बेणे! त्याला प्रेतयात्रेपुढे टिटवे (मर्तिकाचे मडके) धरू देण्यास फुलेमंडळींनी एकजात विरोध केला.”

“त्या प्रसंगी सावित्रीबाईच्या धैर्याचा कस लागला. उरावर धोंडा ठेवून बाईंनी पुरुषाच्या हिमतीने प्रेतयात्रेपुढे हातात टिटवे धरले. बाईच्या एका बाजूस यशवंत, दुसऱ्या बाजूस गजानन (जोतीरावाचा आप्त) अशी अंत्ययात्रा स्मशानभूमीवर पोहोचली.”

या प्रसंगाविषयी लेखिका शांता रानडे म्हणतात, “जोतीरावांच्या मृत्यूनंतर पोकळी निर्माण न होता दोघांनी मिळून उभ्या केलेल्या साऱ्या संस्था व सत्यशोधक समाजाच्या कामाचा सारा भार सावित्रीबाईंनी मोठ्या समर्थपणाने सांभाळला. सत्यशोधक समाजाच्या परिषदांमध्ये अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणांमधून त्यांच्या विचारांची खोली, कार्याबद्दलची आत्मीयता व तळमळ आणि संकटांना टक्कर देण्याचे सामर्थ्य यांचे पूर्ण दर्शन घडते.”

मात्र, त्यांनी केलेल्या असंख्य गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे. सावित्रीबाईंनी शिक्षणासह समाज घडवण्यासाठीच्या अनेक गोष्टी केल्या.

प्रसंगी लोकभावनेच्या विरोधात जाऊन ठाम भूमिका घेतल्या आणि माणूसपणाची वाट बळकट केली. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग याची साक्ष देतात. त्याविषयी जाणून घेऊयात.

सावित्रीबाईंचा जन्म आणि विवाह

सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 रोजी झाला.

जी. ए. उगले यांनी सावित्रीबाईंचे चरित्र लिहिले आहे. त्या चरित्रानुसार त्यांचा विवाह जोतिरावांशी 1840 साली झाला. विवाहानंतर जोतिरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिकवले. महात्मा फुले यांनी जेव्हा बहुजन मुलींसाठी पहिली शाळा उघडली तेव्हा त्या शिक्षिका बनल्या आणि इतिहास घडला.

पुढे त्या यशस्वी मुख्यध्यापिकाही बनल्या. सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांना प्रत्येक टप्प्यावर साथ तर दिलीच पण त्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व त्यांनी केले. दुष्काळ, प्लेगची साथ यामध्ये त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले.

जोतीरावांच्या मृत्यूनंतर

1890 साली महात्मा फुले यांचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

जोतीरावांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी इ.स. 1892 मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या काव्यात देशाचा सामाजिक इतिहास सांगितला.

तसेच हालअपेष्टा भोगणाऱ्या शूद्रातिशूद्रांसाठी जोतीरावांनी आपले जीवन कसे समर्पित केले याचे वर्णन केले.

महात्मा फुले

फोटो स्रोत, MAHARASHTRA GOVERNMENT

डॉ. मा. गो. माळी यांनी सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङमय संपादित केले आहे.

त्यात डॉ. माळी म्हणतात, “चूल आणि मूल ही पारंपरिक विचारसरणी झटकून ही स्त्री सार्वजनिक कार्यासाठी बाहेर पडली. असे कार्य करणारी सावित्रीबाई फुले ही महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील पहिली स्त्री!”

पुढं ते सांगतात, “त्या काळी उच्चवर्णीय सुशिक्षित स्त्रिया नव्हत्या असे नाही. परंतु त्यांच्या समाजजागृतीच्या कार्यालाही पारंपरिक मर्यादा होत्याच. हळदीकुंकवाचे सामुदायिक समारंभ साजरे करण्यापलीकडे त्यांच्या सुधारणा उंबरठा ओलांडून पुढे गेल्या नाहीत. माजघर आणि दिवाणखाना यातच त्या रेंगाळत राहिल्या. सावित्रीबाईंनी पुणे आणि पुण्याच्या ग्रामीण परिसरात सासवड, ओतूर, जुन्नर या ठिकाणी व्याख्याने दिली. सार्वजनिक सत्यधर्माचा प्रसार केला.”

माणुसकीच्या आड येणाऱ्या समाजमान्यतांना दिले आव्हान

29 ऑगस्ट 1868 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगावमध्ये (खंडाळा) घडलेला एक प्रसंग सावित्रीबाईंनी त्यांनी लिहिलेल्या एका पत्रात सांगितला आहे.

प्रातिनिधिक फोटो

या पत्रात सावित्रीबाई म्हणतात, “येथे एक अघटित वर्तमान घडले की, गणेश नामे ब्राह्मण यास पोथी पुराणाचा नाद असून गावोगाव फिरून पंचाग सांगून उदरनिर्वाह करत करत या गावी येता झाला. परंतु नुकतीच वयात आलेली सारजा नामे पोरीवर त्याची प्रीती जडली असोन त्यापासून तीस सहा महिने दिवस गेले आहेत. त्याचा बोभाटा होऊन गावातील दूरमती टवाळांनी त्या उभयतांस आणून मारपीट करून गावातील गल्लीबोळातून वाजतगाजत मिरवत ठार मारण्यास चालविले.”

जातीबाहेर प्रेम आणि त्यातून लग्नाआधीच गरोदरपण आल्यानं मुलीसह तिच्या प्रियकराचं ‘लिंचिंग’ करण्याचा प्रयत्न सावित्रीबाईंनी हाणून पाडला.

सावित्रीबाईंनी पुण्यात असलेल्या जोतीराव फुले यांना पत्र लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

या पत्रात सावित्रीबाई पुढे सांगतात, “ही भयंकर गोष्ट मला कळताच मी तेथे धावत पळत गेले व त्या लोकांस इंग्रज सरकारचे भय दाखविले व त्यांना क्रूर कर्मापासून वळविले. सदूभाऊने तोडमोडी दावून बोलणे केले की या (माणसाने) आणि या मुलीने आमचे गाव सोडून जावे. हे उभयतांनी कबूल केले. या उभयतांस मी वाचविले तेणेकरून लोकांस अद्भुत वाटले. ती उभयता मला देवी समजून माझ्या पाया पडून शोक करू लागली. त्यांचा शोक उणा होईना. त्यांची कशीबशी समजूत घालून या उभयतांस तुमचेकडे पाठविले आहे.”

सावित्रीबाई फुलेंचं पत्र.

फोटो स्रोत, Government Of Maharashtra

या घटनेवर भाष्य करताना संध्या नरे पवार म्हणतात, “गर्दीला आडवं जात त्या जोडप्याच्या बाजूनं ठामपणे उभी राहणारी स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. आंतरजातीय प्रेम आणि विवाहपूर्व गरोदरपण या दोन्ही गोष्टींकडं सावित्रीबाई गुन्हा म्हणून बघत नाहीत, त्या तरुणीला कलंकित मानत नाहीत, तर एक सहज मानवी व्यवहार म्हणूनच त्या या सगळ्या घटनांकडं बघतात. म्हणूनच समाज आणि ते जोडपं या दोघांच्या मध्ये त्या उभ्या राहतात.”

“सावित्रीबाईंची ओळख केवळ पहिल्या महिला शिक्षिका एवढ्यापुरतीच मर्यादित नाही, तर स्वतंत्र बाण्याची क्रांतिकारक स्त्री, हीच त्यांची खरी ओळख आहे, हेच या पत्रांमधील सावित्रीदर्शनानं स्पष्ट होतं. घराबाहेर पडून सार्वजनिक कार्य करणारी आद्य सामाजिक कार्यकर्ती जशी या पत्रांमधून आपल्याला भेटते, तसंच काळाच्या पल्याड पाहणारी, तिची मानवी हक्कांची भाषा उमगलेली एक संवेदनशील वैचारिकताही समोर येते,” असंही त्या नमूद करतात.

मुलींसह सर्वच जातींसाठी शिक्षणाची दारं खुली

ब्राह्मण आणि इतर उच्चजातीय वगळता इतरांसाठी शिक्षणाचे दरवाजे बदं असल्याच्या काळात सावित्रीबाईंनी वंचित आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींसाठी शाळा सुरू केल्या आणि त्या यशस्वीपणे चालवल्या.

या शाळेत सहभाग वाढावा यासाठी महात्मा फुलेंनी 1855 ला लिहिलेल्या ‘तृतीय रत्न’ नाटकाचाही प्रभावी वापर करण्यात आला.

या नाटकात परंपरा आणि अंधश्रद्धा यांचा प्रभाव असलेल्या निरक्षर कुटुंबाची धर्माच्या नावावर कशी लुबाडणूक होते याचं प्रभावी चित्रण आहे.

या नाटकात शेवटी सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या प्रौढ स्त्रियांच्या रात्रशाळेत येण्याबाबत महिलांना आवाहन केलं जायचं.

'सावित्रीबाई फुले समग्र वाङमय' पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्र

फोटो स्रोत, Government Of Maharashtra

सन 1851 साली वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सावित्रीबाईंनी बिकट परिस्थितीतही नॉर्मल स्कूल हे अध्यापक महाविद्यालय चालवले.

येथे भावी शिक्षक असलेल्या प्रौढ मुलींना प्रशिक्षण दिले.

तत्कालीन शिक्षणमंडळाचे अध्यक्ष जॉन वॉर्डन यांनी सावित्रीबाईच्या या अध्यापक महाविद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सावित्रीबाईच्या कार्याचा गौरव केला होता.

महाराष्ट्रातील पहिल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना

एके दिवशी पुण्यात रात्रीच्या वेळी जोतीराव लकडी पुलावरून फिरायला जात असताना त्यांना पुलाच्या कठड्यावरून कुणीतरी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले.

जोतीरावांनी तातडीनं त्या व्यक्तीला थांबवलं. ती एका पुरुषाच्या वासनेची शिकार बनून गरोदर झालेली विधवा होती.

महात्मा फुलेंनी त्या मुलीची समजूत घालून तिला धीर दिला आणि आपल्या घरी घेऊन आले. त्या स्त्रीचं नाव होतं काशीबाई.

सावित्रीबाईंनी काशीबाईची पुरेपुर काळजी घेतली आणि तिचे बाळंतपण केले. तसेच या बाळाला यशवंत हे नाव दिलं.

पुढे याच मुलाला सावित्रीबाई आणि जोतीरावांनी दत्तक घेत डॉक्टर केलं.

इतकंच नाही तर पुढे सावित्रीबाई आणि जोतीरावांनी यशवंताचा विवाह जातीबाहेरच्या मुलीशी लावून देऊन महाराष्ट्रातला पहिला मिश्र विवाह घडवण्याचा मान मिळवला.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, BBCBARTI

याविषयी शांता रानडे सांगतात, “तीव्र विरोध करूनही हा विवाह झालाच म्हणून सनातनांच्या मात्र अंगाचा तिळपापड झाला. या महापापाचे प्रायश्चित्त भोगावे लागेल” वगैरे शिव्याशाप ते देत राहिले. पण या विवाहाने काहीही अशुभ अगर अमंगल घडले नाही.”

नंतरच्या काळात सावित्रीबाई आणि जोतीरावांनी बालविधवांची दयनीय स्थिती लक्षात घेऊन 28 जानेवारी 1853 रोजी ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’ची स्थापना केली.

आपल्या घराजवळच्याच उस्मान शेख यांच्या बखळीतच (मोकळी जागा) त्यांचे काम सुरू झाले. महाराष्ट्रातले हे पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह होते.

विशेष म्हणजे या ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’च्या जाहिरातातीत त्यांनी म्हटलं, “कोणा विधवेचे अज्ञानपणाने वाकडे पाऊल पडून ती गरोदर राहिली, तर तिने या गृहात जाऊन गुपचूपपणे बाळंत होऊन जावे.”

या ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’तल्या मुलांची सावित्रीबाई किती काळजी घ्यायच्या हे दाखवणारा एक उताराही शांता रानडे त्यांच्या पुस्तकात सांगतात, “जोतीरावांच्या पत्नी सावित्रीबाई त्या गृहातल्या मुलांची अविरतपणे वात्सल्याने सेवा करीत. लालनपालन करीत. त्यांना स्वतःला अपत्य नव्हते. तथापि या माउलीने आपल्या दयाळू, उदार स्वभावाला अनुसरून त्या अर्भकांचे अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्याने संगोपन केले.”

दुष्काळ अन्नछत्र चालवत हजारोंचे प्राण वाचवले

1876-77 मधला दुष्काळ हा एकोणिसाव्या शतकातला सर्वांत भीषण दुष्काळ मानला जातो.

या दुष्काळात सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत गावोगाव फिरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं काम करत होत्या.

हे काम करत असताना जुन्नरहून 20 एप्रिल 1877 ला जोतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाई तत्कालीन भीषण दुष्काळाचं वर्णन करताना लिहितात-

”पत्रास कारण की, गेले 1876 साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागली आहेत. माणसांना अन्न नाही, जनावरांना चारापाणी नाही, यास्तव कित्येक देशांतर करुन आपले गाव टाकून जात आहेत. कित्येक पोटची पोरे व तरण्याबांड पोरी विकून परागंदा होत आहेत.”

सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले

फोटो स्रोत, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

“नद्या, नाले शुष्क व कोरडे ठणठणीत होऊन मृगजलानी व्याप्त झाले आहेत. झाडाझुडपांची पाने वाळून ती भूमीवर पडली आहेत. भूमीला भेगा पडल्या असून त्यातून अंगाला झोंबणाऱ्या झळ्या बाहेर पडतात.

अनेक लोक क्षुधित व तृषाक्रांत होऊन भूमीवर पडून मरत आहेत. कित्येक निवडुंगाची बोंडे अन्न म्हणोन खातात व मूत्र पाणी म्हणोन पितात व संतोष पावतात. देहत्यागापूर्वी भूकेची व तहानेची इच्छा पुरवितात व मृत्यूच्या स्वाधीन होतात, असे इकडचे भयानक वर्तमान आहे.” असंही पुढं त्या लिहितात.

1875 ते 1877 या काळात सावित्रीबाई फुलेंच्या नेतृत्वात सत्यशोधन समाजातर्फे पुणे परिसरात 52 अन्नछत्रे उघडून दुष्काळ निवारणाचं काम करण्यात आलं.

उद्योग, विद्यादान आणि कर्जावर सावित्रीबाई काय म्हणाल्या?

सावित्रीबाईंनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ‘उद्योग’, ‘विद्यादान’, ‘सदाचरण’, ‘व्यसने’, ‘कर्जे’ अशा महत्त्वाच्या विषयांवर भाषणं दिली.

उद्योग या आपल्या भाषणात सावित्रीबाई म्हणतात, “न थकता दिवसभर उद्योग करणे हा मनुष्याचा उत्तम धर्म असून तो त्याचा खरा कल्याण करणारा मित्र होय. या मित्राशिवाय कल्याण करणारा दुसरा कोणी मित्र जगाच्या पाठीवर नसतो याची प्रत्येकाने खूणगाठ बांधून ठेवावी. आपल्या देशात थोडेसे इंग्रज लोक व्यापाराला आले आणि त्यांनी एक प्रचंड राज्य स्थापन केले. हा दृढ उद्योगाचा व बुद्धिशक्तीचा चमत्कार आहे. त्यात दैवाचा संबंध नाही.”

“दैव, प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे लोक आळशी व भिकारी असून त्यांचा देश नेहमीच दुसऱ्यांच्या गुलामगिरीत राहतो. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे आपला हिंदुस्थान होय,” असं परखड भाष्य सावित्रीबाई करत श्रोत्यांना विचार करायला भाग पाडतात.

सावित्रीबाई फुले यांची स्वाक्षरी

फोटो स्रोत, BARTI

विद्यादान या भाषणात सावित्रीबाई म्हणतात, “इंग्रज सरकारने ज्ञानदानासाठी शाळा काढल्या. पण त्या थोड्या असून त्या तेवढ्यावरच राहिल्या, तर सारा हिंदुस्थान शिकलेला होण्यास आणखी 150 वर्षे लागतील. तरी देखील मी म्हणते की, सरकारने शिक्षण प्रसाराचा आपला वेळ वाढवून सारे लोक विद्या शिकल्याशिवाय येथून जाऊ नये.”

सावित्रीबाईंवर बोलताना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र बारलिंगे यांनी 1 मे 1983 रोजी म्हटलं होतं, “महात्मा फुल्यांची त्यांच्या हयातीत उपेक्षा झाली. मग नंतर सावित्रीबाईंची उपेक्षा झाली किंवा अजून होत असावी यात काय आश्चर्य ? पण म्हातारीने कोंबडे झाकले तरी सूर्य उगवायचा थोडाच राहतो! माझे मित्र डॉ. माळी यांनी कोंबड्यावर झाकलेली टोपली उचलण्याचा प्रयत्न केला.”

“ज्यांनी महाराष्ट्राला क्रांतीकारी विचार दिला आणि भारतीय भगिनीला ज्ञानामृत पाजले त्या सावित्रीबाई फुल्यांना मी अभिवादन करतो,” असंही त्यांनी नमूद केलं.

आधुनिक मराठी काव्याच्या जननी

‘काव्यफुले’ हा सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह 1854 मध्ये शिळा प्रेसवर छापून प्रसिद्ध झाला. हा कालखंड केशवसुतांच्या पूर्वी 30 वर्षे आधी येतो. यावरून या काव्याचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होते.

यावर बोलताना सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयाचे संपादक डॉ. मा. गो. माळी म्हणतात, “सावित्रीबाईंच्या काव्यरचना ही केशवसुतांच्या दोन अडीच तपे आधीची आहे हे लक्षात घेता मराठी काव्यात क्रांती घडवून आणल्याबद्दल पहिला मानाचा मुजरा सावित्रीबाईंनाच करणे अटळ ठरते. या दृष्टीने आधुनिक मराठी काव्याच्या जननी सावित्रीबाई फुले ठरतात.”

“आणखी एक ऐतिहासिक सत्य लक्षात घ्यावेसे वाटते ते म्हणजे सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह ज्या काळात (1854 मध्ये) प्रसिद्ध झाला; त्या काळात समकालीन अशी एकही कवयित्री झाल्याचे दिसून येत नाही. उपेक्षितांच्या जागरणांचा व समाजसुधारणेचा विषय समाविष्ट असलेली काव्यरचना या कालात केल्याचे उदाहरण महाराष्ट्र सारस्वतात सापडत नाही. त्यामुळे सावित्रीबाईंची काव्य रचना म्हणजे सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील क्रांतीच होय, हे मान्य करावे लागेल”, असंही डॉ. माळी नमूद करतात.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक

सावित्रीबाईंनी महिम्नस्तोत्र या संस्कृत पोथीवरही काव्य केले होते.

इतिहासकारांना त्यांच्या हस्ताक्षरातील मोडी लिपीतील दोन पाने उपलब्ध झाली आहेत.

या दोन पानांवरून त्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते हे तर लक्षात येतेच. याशिवाय त्यांच्या ओघवत्या शैलीचीही ओळख होते.

सावित्रीबाईंनी जोतीरावांची भाषणेही संपादित केलेली आहेत. सावित्रीबाईही बहुतेक ठिकाणी त्यांच्यासोबत जात.

अति प्राचीन काळी (प्राचीन भारत), इतिहास, सुधारणूक, आडदांड – पशु कुत्र्याची एक गोष्ट अशा काही महत्त्वाच्या विषयांवरील भाषणांची स्वतः सावित्रीबाईंनी टाचणे घेतलेली आहेत.

पुढे सावित्रीबाईंनी 25 डिसेंबर 1856 रोजी ‘जोतिबांची भाषणे’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.

सावित्रीबाईंकडून मनुस्मृतीवर कठोर भाष्य

काव्येफुले या आपल्या कवितासंग्रहातील ‘मनु म्हणे’ नावाच्या स्तोत्रात सावित्रीबाईंनी त्यावेळच्या जातीव्यवस्थेवर कठोर भाष्य केलं. ते पुढीलप्रमाणे,

मनु म्हणे

नांगर धरती। शेती जे करती। मठ्ठ ते असती। मनु म्हणे ।।१।।

करू नका शेती। सांगे मनुस्मृती। धर्माज्ञा करिती। ब्राम्हणास ।।२।।

शुद्र जन्म घेती। पूर्वीची पापे ती। जन्मी या फेडती। शुद्र सारे ।।३।।

विषम रचिती। समाजाची रीती। धूर्ताची ही नीती। अमानव ।।४।।

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Savitribai Phule Smarak

यावरून सावित्रीबाईंनी सामाजिक प्रबोधन करताना धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यातील उणिवांवर अचूकपणे बोट ठेवल्याचं दिसतं.

शोषण करणाऱ्या याच जातीव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी सावित्रीबाई पुढे अविरतपणे काम करताना दिसतात.

यशवंतच्या मदतीनं प्लेगच्या जीवघेण्या साथीत लोकांचे प्राण वाचवताना अखेरचा श्वास

सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर दीनदुबळ्यांच्या उत्थानासाठी प्राणपणाला लावून काम केलं. पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हाही हेच घडलं.

सावित्रीबाईंनी ब्रिटीश मिलिटरीत नोकरी करणाऱ्या डॉ. यशवंत या आपल्या मुलाला दक्षिण आफ्रिकेतून तार करून बोलावून घेतलं.

तसेच यशवंतकडून परिस्थिती समजून घेऊन प्लेगच्या साथीतून लोकांचे प्राण वाचवण्याच्या कामाला सुरुवात केली.

प्लेगच्या काळात सावित्रीबाईंनी केलेल्या कामाची माहिती देताना हरी नरके यांनी म्हटलं होतं, “सावित्रीबाईंनी पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या दलित समाजातल्या प्लेगच्या पेशंटला वाचवल्याची नोंद कागदोपत्री आहे. मुंढव्याच्या दलित वस्तीत पांडुरंग प्लेगने आजारी असल्याची माहिती सावित्रीबाईंना मिळाली. 11 वर्षांच्या पांडुरंगाला त्यांनी चादरीत गुंडाळून पाठीवर घेतलं.”

“मुंढव्यापासून 8 किलोमीटर चालत त्यांनी ससाणेनगर गाठलं. माळावरच्या दवाखान्यात येऊन त्याच्यावर उपचार केले. पांडुरंग वाचला खरा, पण दरम्यानच्या काळात सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली होती. काम करताना तापाने सावित्रीबाई फणफणल्या. अखेर 10 मार्चला त्या अविरतपणे काम करत असताना गेल्या,” असं ते नमूद करतात.

महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत त्यांचा मुलगा यशवंत

फोटो स्रोत, GOVERNMENT OF MAHARASHTRA

पुढे 1905 मध्ये पुन्हा प्लेगच्या साथीने पसरायला सुरुवात केली. त्यावेळीही फुलेंचा मुलगा डॉक्टर यशवंत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करायला उतरले.

या जीवघेण्या आजारात त्यांना प्लेगची बाधा झाली आणि त्यातच 13 ऑक्टोबर 1905 या दिवशी त्यांच्यावर मृत्यू ओढवला.

(संदर्भ – पुरोगामी सत्यशोधक, जुलै-डिसेंबर, 1981, पृ. 65/सावित्रीबाई फुले समग्रवाङ्मय)

(संदर्भ – सावित्रीबाई फुले समग्रवाङ्मय, संपादक – डॉ. मा. गो. मोळी)

(संदर्भ – सावित्रीबाई जोतीबा फुले जीवनकार्य – शांता रानडे, 1980)

(संदर्भ – सावित्रीबाई फुले समग्र वाङमयातील (सावित्रीबाईंचे पत्र)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC