Source :- BBC INDIA NEWS

गुलाब वाटुमुल यांचे वडील झमनदास यांनी 1915 मध्ये एका दुकानातून त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाची सुरूवात केली.

फोटो स्रोत, Flickr/East-West Center

‘वाटुमुल अँड धरमदास’ या नावाने हवाईमधील होनोलुलूच्या हॉटेल स्ट्रीटवर हे पहिलं दुकान सुरू झालं. त्यात रेशमाचं कापड, कोरलेले हस्तीदंत, पितळ्याची भांडी आणि पूर्वेकडील देशांमधल्या आणखी काही मनोरंजक वाटणाऱ्या गोष्टी विक्रीसाठी असायच्या.

दुर्दैवाने पुढच्या एक वर्षांत, म्हणजे 1916 मध्ये धरमदास यांचं कॉलराने निधन झालं. नंतर झमनदास यांनी त्यांचा भाऊ गोविंदराम याला होनोलुलूमधलं दुकान सांभाळायला पाठवलं. ते स्वतः फिलिपीन्सची राजधानी मनिलामधून व्यवसाय चालवत होते. पुढच्या काही वर्षांत त्यांचा व्यवसाय इतका चालू लागला की दोन्ही भावांना सतत हवाई-भारत असा प्रवास करावा लागे.

आज हवाई बेटावर वाटुमुल यांचं नाव सर्वश्रुत आहे. वस्त्र उत्पादन आणि रियल इस्टेटपासून ते शिक्षण आणि कलेपर्यंत सगळेकडे त्यांचं नाव घेतलं जातं.

भारतातून या बेटावर स्थलांतरित झालेले पहिले दक्षिण आशियाई आता तिथल्या सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत आहेत.

“हळूहळू आम्ही हे सगळं उभं केलंय,” असं झमनदास एका स्थानिक हवाई प्रकाशनाला 1973 मध्ये सांगत होते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

स्वातंत्र्यपूर्व भारतात जन्मलेल्या झमनदास यांचे वडील सिंध राज्यातल्या हैदराबादमध्ये (आताचं पाकिस्तान) वीटभट्टी ठेकेदार होते. त्यांचं कुटुंब शिकलेलं होतं; पण श्रीमंत नव्हतं. एका अपघातात वडिलांना पक्षाघात झाल्यानंतर आईने झमनदास यांची फिलीपिन्सला जायची सोय करून दिली. तिथं ते कापड गिरिणीत ते कामगार म्हणून कामाला लागले. पुढे 1909 मध्ये त्यांनी धरमदास यांच्यासोबत मनिलामध्ये स्वतःचा व्यापार सुरू केला.

त्यांचे नातू जेडी वाटुमुल सांगतात की अमेरिकेनं फिलिपीन्सवर ताबा मिळवल्यानंतर परदेशी उद्योगांवर निर्बंध लावले. त्यातून मलिनामधल्या व्यवसायाला तोटा बसला तेव्हा झमनदास आणि धरमदास हवाईला आले.

झमनदास वाटुमुल आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदारांनी त्यांचं पहिलं दुकान होनोलुलूमधल्या हॉटेल रस्त्यावर थाटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

झमनदास यांचा भाऊ गोविंदराम हवाईमधला व्यवसाय सांभाळायला लागला, तेव्हा त्यांनी त्याचं ‘ईस्ट इंडिया स्टोअर’ असं नामकरण केलं. काही वर्षांत छोटं दुकान मोठं झालं आणि हवाई आणि आशियाच्या इतर भागात त्याच्या अनेक शाखा सुरू झाल्या, असं साडा या दक्षिण आशियाई अमेरिकन इतिहासाचं डिजिटल संग्रह करणाऱ्या बिगर-सरकारी संस्थेनं म्हटलंय.

1937 मध्ये गोविंदराम यांनी वाईकीकी या होनोलुलूशेजारच्या बेटावर वाटुमुल कंपनीचं मुख्यालय बांधलं. साडाने दिलेल्या माहितीनुसार, 1957 पर्यंत त्यांचा व्यवसाय 10 दुकानं, एक रहिवासी इमारत आणि इतर अनेक व्यावसायिक मालमत्तांसह दहा लाख डॉलर्सपर्यंत वाढला होता.

लिलनचं कापड, अंतर्वस्त्र, पितळ्याच्या आणि सागाच्या लाकडाच्या वस्तू अशी उत्पादनं या दुकानात असल्याचं स्टार बुलेटिन नावाच्या वृत्तपत्राने सांगितलंय. दूर देशातून, सुंदर जागांमधून आलेल्या या खास वस्तू एक प्रकारे रोमँटिक आणि रहस्यमय भावनां जागृत करत असत, अशा पद्धतीचं वर्णनही या वृत्तपत्रात आलं होतं.

आलोहा शर्ट

1930 च्या काळात श्रीमंत पर्यटकांचं हवाई हे आवडतं ठिकाण बनलं होतं. इथं विकले जाणारे गडद रंगातले, बेटावरचं खास डिझाईन असलेले शर्ट प्रमुख आकर्षण बनू लागले. आजही ते ‘आलोहा शर्ट’ म्हणून ओळखले जातात.

खास हवाईयन आरेखन असलेले असे शर्ट सगळ्यात पहिल्यांदा वाटुमुल यांच्या ईस्ट इंडिया स्टोअरनेच विक्रीला ठेवले असल्याचं हवाईन वस्त्र परंपरेतले तज्ज्ञ डेल होप सांगतात.

असे शर्ट 1936 मध्ये गोविंदराम यांनी पहिल्यांदा त्यांच्या कलाकार असलेल्या मेव्हणीकडून, ईलसे जेन्सन यांच्याकडून बनवून घेतले.

“जपानमधल्या माऊंट फॉजीऐवजी त्या हवाईमधलाच डायमंड हेड हा ज्वालामुखीचा पर्वत काढू लागल्या. कोई माशाऐवजी इथला स्थानिक मासा, चेरीचा बहर दाखवण्याऐवजी जास्वंद, गंधराज अशा इथल्या फुलांची चित्र त्या काढत असत,” होप सांगतात.

आलोहा शर्ट वाटुमुल यांच्यामुळे लोकप्रिय झाल्याचं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

ही सगळी आरेखनं जपानला पाठवली जात. तिथे हँडब्लॉकपद्धतीने त्याचे ठसे रेशमाच्या कापडावर उमटवले जात, असं नॅन्सी शिफर त्यांच्या ‘हवाईयन शर्ट डिझाईन’ या पुस्तकात लिहितात.

“ही नाजूक फुलांची चित्र आणि नावीन्यपूर्ण संकल्पना असणारी, आधुनिक पद्धतीची व्यावसायिकदृष्ट्या विकली जाणारी पहिली हवाईन आरेखनं होती,” शिफर नोंदवतात.

“बोट भरून हे शर्ट विकत नेले जात आणि पार लंडनमध्येही त्याचं प्रदर्शन भरे,” पॅराडाईज ऑफ पॅसिफिक या पुस्तकात विलियम डेवेनपोर्ट लिहितात.

लॉरेटा यंग, जेक बेनी, लाना टर्नर आणि ईजी रोचेस्टर अँडरसन असे अमेरिकेत सिनेमात काम करणारे सेलिब्रेटीही वाटुमुलच्या वाईकीकीमधल्या मोठ्या दुकानात हे शर्ट विकत घेण्यासाठी येत असत असं गोविंदराम यांची मुलगी लिला यांनी होप यांना सांगितलं.

हवाईयन फॅशनचं दुसरं नाव वाटुमुल असल्याचं गुलाब वाटुमुल 1966 ला होनोलुलूमध्ये स्टार बुलेटिनला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले. त्यानंतर काही दिवसांतच वाटुमुल कंपनीने रॉयल हवाईयन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विकत घेतली. तिथेच पहिल्या कुटुंबासाठीच्या आलोहा कपड्यांची निर्मिती झाली.

नागरिकत्वासाठीची लढाई

एवढं यश मिळवूनही वाटुमुल भावांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अनेक दशकं वाट पहावी लागली. ते आले त्या सुरूवातीच्या वर्षांत देशात स्थलांतरितांसोबत भेदभाव होत होताच, शिवाय त्यांच्यासाठीचे कायदेही फार विचित्र आणि कडक होते, असं हवाई बिझिनेस मासिकात लिहिलंय.

1922 मध्ये गोविंदराम यांनी ईलेन जेन्सन यांच्याशी लग्न केलं. त्या जन्मतः अमेरिकन होत्या. पण अमेरिकेचं नागरिकत्व घेण्यासाठी पात्र नसलेल्याशी लग्न केल्यामुळे केबल कायद्यातंर्गत त्यांचंही नागरिकत्वही रद्द झालं. कायद्यात सुधारणा व्हावी आणि महिलांना त्यांचं नागरिकत्व परत मिळावं यासाठी काम करणाऱ्या एका महिला मतदारांच्या गटासोबत जेन्सन 1931 मध्ये काम करू लागल्या.

भारतीयांना नागरिकत्व देण्याची सुधारणा कायद्यात झाली तेव्हा गोविंदराम यांना 1946 मध्ये नागरिकत्व मिळालं.

त्यांचे भाऊ झमनदास तोपर्यंत भारत आणि हवाई अशा दोन्ही देशात ये-जा करत होते.

गोविंदराम वाटुमुल यांच्या पत्नी ईलेन नागरिकत्वाच्या कायद्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी महिला मतदारांच्या गटासोबत काम करत असत.

फोटो स्रोत, Getty Images

1947 साली भारताची फाळणी झाली तेव्हा वाटुमुल कुुटुंब सिंध प्रांतातून मुंबईला स्थलांतरित झालं. त्यांनी बरीच मालमत्ता मागे पाकिस्तानात सोडून दिली, अशी माहिती साडाकडून मिळते.

पुढे कौटुंबिक व्यवसायात काम करण्यासाठी झमनदास यांचा मुलगा गुलाब हवाईला आला आणि व्यवसाय त्याच्या हाती सोपवला गेला.

1955 मध्ये दोन्ही भावांनी व्यवसायाच्या वाटण्या केल्या. झमनदास आणि गुलाब यांच्याकडे वस्तू आणि सेवांची विक्री करणारे व्यवसाय आले तर गोविंदराम यांच्या कुटुंबियांना रिअल इस्टेटचा व्यवसाय देण्यात आला.

एका वर्षात झमनदास कायमचे हवाईला स्थलांतरित झाले. त्यांच्या पत्नीचा आणि एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर 1961 मध्ये ते अमेरिकेचे नागरीक झाले.

भारताशी संबंध

गेल्या अनेक वर्षांपासून वाटुमुल कुटुंब भारत आणि इथल्या लोकांना कल्याणकारी सेवा पुरवतंय. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गोविंदराम यांचा सक्रीय सहभाग होता. देशाच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी ते अनेकदा वॉशिंग्टनमध्ये जात, असं ईलिओट रॉबर्ट बार्केन यांनी ‘मेकिंग इट इन अमेरिका’ या पुस्तकात लिहिलंय.

“गोविंदराम यांचं लॉस एंजेलासमधलं घर म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित असणाऱ्या लोकांसाठी धर्मशाळाच झाली होती,” सचिंद्र नाथ प्रधान त्यांच्या ‘इंडिया इन युनायटेड स्टेट्स’ या पुस्तकात नोंदवतात.

1946 मध्ये वाटुमुल फाऊंडेशन या संस्थेने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या भाषणांची मालिका अमेरिकन विद्यापीठांमध्ये आयोजित केली होती. पुढे ते भारताचे राष्ट्रपती झाले.

गुलाब यांच्या पत्नी इंद्रू वाटुमुल हवाईन संगीतकार जेफ पीटरसन यांच्यासोबत 2012 मध्ये दिसल्या.

फोटो स्रोत, Getty Images

1959 मध्ये गोविंदराम यांची पत्नी इलेन यांनी दिल्लीत आंतरराष्ट्रीय पालकत्व परिषद भरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे देशात पहिले गर्भनिरोधनाचे दवाखाने उघडले.

या कुटुंबाने केलेलं समाजकार्य आजही सुरू आहे. हवाई आणि भारतातील शैक्षणिक संस्थांना निधी देणं, होनोलुलू मधल्या कलांना वाव मिळावा यासाठीच्या कार्यक्रमांसाठी देणग्या देणं आणि भारत – हवाई आदान प्रदानासाठी प्रयत्न करणं अशा वेगवेगळ्या स्वरूपात ते काम करतात.

वाटुमुल यांच्या पिढीतले अनेकजण आता हवाई आणि आसपास काम करतात.

ग्राहकांना धन्यवाद देत वाटुमुल यांचं शेवटचं दुकान 2020 ला बंद झालं. तेव्हापासून हे कुटुंब बहुतेक रिअल इस्टेटच्या व्यवसायात आहे.

गेल्या वर्षी हवाईमध्ये 19,045 चौरस मीटरची जागा वाटुमुल प्रॉपर्टिस या कंपनीनं विकत घेतलीय. “हवाईमधली बेटं आमच्या कुटुंबासाठी महत्त्वाची आहेत आणि पुढेही असणार आहेत,” कंपनीचे प्रमुख जेडी वाटुमुल सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC