Source :- BBC INDIA NEWS

मनीएज

मुंबईत टोरेस कंपनीने पाँझी स्कीमद्वारे लाखो लोकांची फसवणूक केल्याची घटना ताजी आहे. त्यातच आता मनीएज नावाच्या कंपनीने देखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांना फसवल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि उदरनिर्वाह चालवण्यासाठी अनेक लोक राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यापासून आलेली असतात.

याठिकाणी मिळेल ते काम करत, मेहनत आणि कष्टाने ते त्यांच्या परिने मुंबईत आलेला प्रत्येक माणूस भविष्यासाठी पै नी पै जमा करतो.

हा कमावलेला पैसा अधिक परताव्याने मिळेल या दृष्टीने हे सर्वसामान्य लोक अनेक स्कीममध्ये पैसे गुंतवतात. पण बऱ्याचदा फसव्या स्कीममध्ये पैसे गुंतवून लोक स्वतःची फसवणूक करून घेतात.

पैसा कमावण्यासाठी जगात शॉर्टकट नाही हा आर्थिक नियम असला, तरीही आमिषाने आणि प्रलोभनाने काही कंपन्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याचे वृत्त अनेकदा समोर येते.

यातच आता मुंबईत मनीएज कंपनीकडून 3000 गुंतवणूकदारांची साधारण शंभर कोटीपेक्षा अधिकची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मुलुंड पोलीस ठाण्यात गुंतवणूकदार राहुल पोद्दार यांच्या तक्रारीवरून मनीएज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक राजीव जाधव , हरिप्रसाद वेणूगोपाल, प्रणव रावराणे , प्रिया प्रभू आणि इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यापैकी वेणूगोपाल आणि रावराणे यांना अटक करण्यात आली आहे.

रावराणे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत, तर प्रभू हिने टपाल खात्यातून निवृत्ती घेतली आहे. तर अन्य दोघे एका खाजगी कंपनीत कामाला होते. या सर्व आरोपींनी एकत्र येत मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.

मनीएज कंपनी काय आहे ?

राजीव जाधव, हरिप्रसाद वेणूगोपाल आणि प्रदीप प्रभू हे कंपनीचे हे संचालक आहेत. ही कंपनी 3 नोव्हेंबर 2011 मध्ये स्थापन करून कामकाजाला सुरुवात करण्यात आली.

तक्रारीनुसार मनीएज इनव्हेस्टमेंट मनीएज फिनकॉप, मनीएज रियालेटर्स आणि मनीएज कॅपिटल सर्व्हिसेस माध्यमातून अनेक गुंतवणुकीच्या स्कीम राबवल्या. त्यात लोकांना गुंतवणूक करण्यासाठी आवाहन करण्यात आलं.

विविध स्कीम्सच्या माध्यमातून महिन्याला 9% पासून 24% व्याजाचा परतावा देण्याचं प्रलोभन ही कंपनी गुंतवणूकदारांना द्यायची. महत्त्वाचं म्हणजे यासाठी लागणारा सेबीचा अधिकृत परवानाही या कंपनीकडं नाही.

तरीही त्यांनी पोर्टफोलिओ व्यवस्थापनाच्या नावाखाली सेवा म्हणून आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांना पैसे गुंतवायला भाग पाडलं, असं तक्रारदारांनी तक्रारीत म्हटलं आहे.

म्हणजेच, ही कंपनी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत सल्ला द्यायची, तसंच त्या माध्यमातून पैसा गुंतवून घ्यायची.

ही कंपनी मुंबईतील मुलुंड वेस्ट परिसरात स्थित आहे. तर या कंपनीची काही कार्यालयं मुंबईतील विविध भागात आहेत.

मनीएज कंपनीचे संचालक.

कांदिवली येथील राहुल पोद्दार नावाच्या व्यावसायिकानं ऑक्टोबर 2024मध्ये ‘मनीएज’विरोधात तक्रार केली होती.

त्यांच्या तक्रारीत असं नमूद करण्यात आलं होतं की, तक्रारदार आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी 2022 ते 2024 या कालावधीत गुंतवलेल्या 2 कोटी 80 लाख रुपयांचे नुकसान झाले.

राहुल पोद्दार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, “जितेन गुप्ता या मनीएज कंपनीच्या ॲडव्हायझीबरोबर वांद्रे इथं एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली.

त्यावेळी पोद्दार यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते. यावेळी कंपनीच्या विविध योजना आणि सल्ल्यानुसार अधिक परतावा मिळेल असं सांगण्यात आलं. त्यामुळं लोक आकर्षित झाले.”

गुप्ता यांनी सादर केलेल्या माहितीनंतर एक दिवस मुलुंड येथील कंपनीच्या कार्यालयात पोद्दार यांनी भेट दिली. तिथं मुद्रा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जीवन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी याबद्दल गुप्ता यांनी पोद्दार यांना फिक्स डिपॉझिट बद्दल माहिती सुरुवातीला दिली होती.

त्यानंतर पोद्दार यांनी त्यात दोन लाख रुपये गुंतवले होते. त्यात त्यांना काही वर्ष वार्षिक 12 टक्के व्याज मिळालं. नंतर एका योजनेत त्यांना 15% व्याज मिळालं. हळूहळू त्यांना कंपनीवर विश्वास बसू लागला.

तक्रारीत पोद्दार यांनी म्हटलं आहे की, “जितेन गुप्ता यांनी नंतर संचालक जाधव यांच्याशी ओळख करून दिली. त्यात जाधव आणि इतर सहकाऱ्यांनी डीपीएमएस (DPMS) ही स्कीम कंपनी मार्फत सांगितली.”

यानंतर पोद्दार यांनी अडीच कोटी रुपयांचं बहिणीचं घर याच कंपनीला विकून कंपनीतील या स्कीममध्ये गुंतवणूक केली, त्यात त्यांना दरमहा तीन लाख रुपये या प्रमाणे 21 महिने पैसे मिळाले.

परंतु मे 2024 पासून ही रक्कम मिळणं बंद झालं. कंपनी टाळाटाळ करू लागली. यानंतर अधिक चौकशी केली असता, फसवणूक झाल्याचं पोद्दार यांच्या लक्षात आलं.

आमिष दाखवून गुंतवणूकदारांना अडकवले

राहुल पोद्दार यांनी फसवणुकीनंतर लेखी तक्रार दिली. त्यात मनीएज ग्रुप ऑफ कंपनीजच्या कंपन्यांनी ‘सेबी’कडून अधिकृत परवाना न घेताच पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवेच्या नावाखाली आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना पैसे गुंतवायला भाग पाडले, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

या तक्रारीनुसार प्राथमिक चौकशीनंतर मुलुंड पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

नंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. इतरही काही गुंतवणूकदारांनी याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे.

याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता (भादंवि) कलम 420 (फसवणूक), 409 (विश्वासघात), 34 (एमपीआयडी) कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलुंड पोलीस स्टेशन

या प्रकरणी बुधवारी वेणूगोपाल आणि रावराणे यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले. त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी राजीव जाधव (43) आणि प्रिया प्रभू या टपाल विभागाच्या माजी कर्मचाऱ्यांची या प्रकरणात फरार आरोपी म्हणून नावे दिली आहेत.

आरोपींनी मनीएज ग्रुप आणि त्यांच्या शाखाः मनीएज इन्व्हेस्टमेंट, मनीएज फिनकॉर्प, मनीएज रियाल्टर्स आणि मनीएज कॅपिटल सर्व्हिसेस यासह त्यांच्या कंपन्यांद्वारे ही फसवणूक केली.

या संस्था 2011 मध्ये सुरू करण्यात आल्या आणि त्यांनी एकत्रितपणे सुमारे 3,000 गुंतवणूकदारांची फसवणूक केली असेही दाखल झालेल्या गुन्ह्यात स्पष्टपणे म्हटलेले आहे.

गुंतवणूकदार राहुल पोद्दार यांनी या संदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, “पोलीस तपास सध्या सुरू आहे. माझे पैसे मला परत मिळावे. दोषींवर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत, त्यामुळे याबाबत मी अधिक काही बोलणार नाही.”

24% पर्यंत परताव्याचे आश्वासन

आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्राम सिंग निशाणदार यांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं.

मुंबईत नुकता टोरेस कंपनीनं गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो लोकांना गंडा घातला आहे. यामध्ये साधारण एक लाख 25 हजार पेक्षा अधिक गुंतवणूकदार अडकले असून हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

त्यातच आता मनीएज या कंपनीमार्फत देखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक परताव्याचा अमिष दाखवून फसवलं गेल्याचं समोर येतंय.

या प्रकरणात दाखल करण्यात आलेली तक्रार

मनीएज कंपनीमार्फत म्युचल फंड, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, शेअर मार्केट आणि इतर गुंतवणुकीच्या प्लॅटफॉर्म मार्फत नऊ ते 24 टक्क्यापर्यंत परतावा देण्याचा आश्वासन देण्यात यायचं.

त्यातच राहुल पोद्दार यांना कांदिवलीतील कंपनीने दिलेल्या प्रलोभनानंतर त्यांनी स्वतः आणि नातेवाईकांचे दोन कोटी 80 लाख रुपये 2022 ते 2024 या कालावधीत गुंतवले होते.

वार्षिक 24% परतावा देण्याचे आमिष कंपनीकडून देण्यात आले. मे 2024 मध्ये व्याजानुसार पैसे मिळणे बंद झाले, त्यामुळे काही महिन्यात त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

त्यांच्याप्रमाणे 3000 पेक्षा अधिक लोकांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे अनेक जण कंपनीत रोज फेऱ्या मारतात, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं.

नागरिकांनी सत्यता पडताळून पाहावी

अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही वित्तीय संस्थेची सत्यता नागरिकांनी पडताळून पाहावी, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

तसंच, महत्त्वाचं म्हणजे काही वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी अशा प्रकारे गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपन्यांच्या माहितीसाठी गुप्त वार्ता विभाग सुरू केला होता.

मात्र, तो पुढे काही कारणास्तव बंद पडला. आता पुन्हा मुंबईत अशा प्रकारे गुंतवणुकीचे फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने, हे गुप्तवार्ता विभाग सुरू करून अशा प्रकारे फसवणुकीवर आळा आणता येईल का? यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं समोर येत आहे.

या कंपनीतील संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या कंपनीची बाजू जाणून घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला.

मात्र कंपनी प्रतिनिधींशी संपर्क झालेला नाही. तसंच कोणत्याही माध्यमातून त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केलेली नाही. कंपनीचे संकेतस्थळ उघडण्यासही अडचणी येत आहेत.

1920 च्या दशकात अमेरिकेत चार्ल्स पाँझी नावाच्या एका माणसाने अतिशय चढ्या दराने गुंतवणूक परतावा देणारी योजना आणली आणि लोक यात फसत गेले. त्यावरून अशा प्रकारच्या सगळ्या योजनांना पाँझी स्किम्स म्हटलं जाऊ लागलं.

अशा प्रकारच्या सगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये आजवर आढळलेली समान गोष्ट म्हणजे – कमी काळात प्रचंड मोठ्या दराने परतावा मिळण्याचे आमीष. कमी काळात जास्त पैसे कमावायच्या लालसेने गुंतवणूकदार या योजनांकडे आकर्षित होतात आणि तिथेच गणित फसतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC