Source :- BBC INDIA NEWS

डॉ. बाबा आढाव

    • Author, डॉ. भारत पाटणकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • 13 डिसेंबर 2025, 18:06 IST

    अपडेटेड 2 तासांपूर्वी

डॉ. बाबा आढावांच्या कार्याचे मुख्य मध्यवर्ती सूत्र ‘विषमता निर्मूलन’ करणारी चळवळ उभी करणे हेच राहिले आहे. या सूत्राचा जन्म त्यांच्या ‘सत्यशोधक’ असण्यातून झाला होता.

माझी आणि त्यांची पहिली ओळख त्यांनी संघटित केलेल्या अशा एका विषमता निर्मूलन शिबिरातून झाली आहे. त्यावेळी आम्ही लोक ‘मागोवा’ ग्रुप या संघटनेत होतो.

माझ्या आईची आणि त्यांची ओळख मात्र 1944 च्या दरम्यान सासवडच्या सेवादल केंद्रात झाली होती.

माझे वडील प्रति सरकारच्या सशस्त्र संघर्षाचे एक महत्त्वाचे नेते आणि कार्यकारिणीचे सदस्य असताना सुद्धा ते समाजवादी विचारांच्या प्रभावाखालीच होते. त्यामुळे आमच्या कुटुंबाचे आणि त्यांचे जुने संबंध होते.

महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीतील नेतेमंडळी महात्मा गांधींच्या आणि सत्यशोधक प्रवाहाच्या जेधे-जवळकरांच्या प्रभावाखालची होती.

गांधींचे नेतृत्व उदयाला येण्याच्या प्रक्रियेत हा प्रवाह काँग्रेसच्या व्यापक प्रवाहात सामील झाला.

बाबांना घरातूनच मिळाला वारसा

अच्युतराव पटवर्धन वगैरेंच्या नेतृत्वाखाली ही मंडळी होती. बाबांच्या घरचाच वारसा हा सत्यशोधक चळवळीचा होता.

त्यामुळं बाबा सत्यशोधक-समाजवादीच होते. त्यांच्या दृष्टीने ‘विषमता निर्मूलन’चा अर्थ फक्त वर्गीय विषमतेचा अंत करणे असा नव्हताच.

‘वर्गीय, जातीय, लैंगिक, धार्मिक विषमता आणि शोषण संपवणे’ असा त्यांच्या विषमता निर्मूलनाचा अर्थ होता.

अशा वैचारिक पायावर ‘विषमता निर्मूलन शिबिरे’ आयोजित करण्यात येत होती.

या शिबिरांमध्ये त्या काळच्या तरूणांच्या संघटनांमध्ये कार्य करणारी तरूण-तरूणी मोठ्या उत्साहाने सहभागी होत होती.

युवक क्रांती दल, समाजवादी युवक दल, मागोवा, दलित युवक आघाडी इत्यादी संघटनांमध्ये कार्य करणारी तरूण-तरूणी त्यासाठी लिहून आणत होती, चर्चा वाद-विवाद करीत होती, शिकत होती.

अनुभवाची देवाण-घेवाण करीत होती. बाबा या सर्व उपक्रमाचा केंद्रबिंदू होते. आणि प्रेरणाही होते. तरूणांचे आवडते होते.

डॉ. बाबा आढाव

बाबा ज्या इतर संघटनांचे नेते होते. त्या संघटनांव्यतिरिक्त असलेल्या या संघटना होत्या. त्याही वेगवेगळ्या चळवळी करीत होत्या.

पण त्याचबरोबर परिवर्तनवादी विचारांना समृद्ध करणारे, विचारांना तत्कालीन परिस्थितीमध्ये विकसित करणारे माध्यम म्हणजे विषमता निर्मूलन शिबिरे होती.

विचारांच्या घुसळणांची माध्यम म्हणून भूमिका बजावत होती. हे सर्व नंतर बंद पडत गेले आणि वैचारिक नवनिर्मितीचा आखाडाच बंद पडला. चळवळी-चळवळींमधला बंधु-भगिनीभाव संपत गेला.

विचारांची घुसळण घडवणारे माध्यम संपत गेले. बाबांच्या मनामध्ये सर्वात मोठी खंत या गोष्टीची होती.

असे जरी घडत गेले तरी बाबांच्या विचार-व्यवहारांमध्ये तीच धार कायम राहिली. सत्यशोधक विचारांचे पाईक असल्यामुळे नाती अंताचे स्वप्न हे बाबांचे सर्वात अव्वल स्वप्न राहिले. म्हणूनच त्यांनी सर्वात आधी महात्मा फुल्यांच्या घराच्या दुरावस्थेकडे पहिल्यांदा लक्ष दिले.

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या घराचे स्मारक हे देशातल्या सत्यशोधकी चळवळीचे केंद्र व्हावे या दृष्टीने त्यांनी ठोस पावले टाकली.

फुले वाड्याच्या जिर्णोद्धारासाठी सर्व शक्ती पणाला

‘फुले वाडा’ या वास्तूचा आणि परिसराचा जिर्णोद्वार करण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली.

महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी या जागेची अवस्था दाखवून तिथे स्मारक विकसित करण्यासाठी प्रयत्न केले.

आज संपूर्ण देशाला आणि जगाला प्रेरणा देऊ शकणाऱ्या या स्मारकाची वास्तू पुण्यात दिमाखाने उभी आहे. अजूनही विकासाचे कार्य होणे बाकी आहे. त्यातच या स्मारकावर खासगी संस्थेचा कब्जा होण्याचे संकट बाबांच्या निधनाच्या पूर्व संध्येला उभे राहिले.

स्मारकाचे दुसरे अंग महात्मा जोतीबा फुल्यांच्या लिखित साहित्याचे आहे.

विचार संपदा ही भावी पिढीला सत्यशोधक बनवणारी मोठी शक्ती आहे. बाबांनी हे कार्य सुद्धा मोठ्या जिद्दीने, कष्टाने आणि चिकाटीने अनेक वर्षांपासून करीत आणले आहे.

महात्मा फुलेंचा विचार आणि सिद्धांत केवळ जगाचा अर्थ लावण्यापुरता मर्यादित नाही. तो जगाला सुंदर, मानुष, पर्यावरण संतुलित आणि समृद्ध बनवणारा आहे. नवं शोषणयुक्त जग कसं घडवायचं याचा पर्याय मांडणारा आहे, हे बाबांनी हेरलं होतं.

म्हणून आमच्या आणि आमच्या नंतरच्या पिढ्यांना विचार-समृद्ध बनवण्यासाठी हे साहित्य हुडकून काढण्याचे आणि प्रसिद्ध करण्याचे कार्य त्यांनी चिकाटीने आणि नेटाने केले.

त्यांच्या व्यवहारामध्येही हे विचार त्यांनी रुजवले. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीनंतर पुन्हा एकदा ‘एक गाव-एक पाणवठा’ हा विचार महाराष्ट्रभर राबवला.

आमच्यासारख्या तरूणांनी या मोहिमेपासून प्रेरणा घेऊन अगदी तत्कालीन धुळे जिल्ह्याच्या आदिवासी भागापर्यंत हा विचार घेऊन मोहीम राबवली.

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मुद्यावरून दलितांवर जे भयानक, खुनशी हल्ले झाले, त्या विरुद्ध बाबांनी विषमता निर्मूलन शिबिराशी संबंधित सर्व संघटनांना प्रेरणा देऊन लाँग मार्च काढण्यात पुढाकार घेतला.

नामांतर होईपर्यंत तुरूंगात जाण्यापासून ते अनेक आंदोलने करण्यातून चळवळ चालू ठेवली.

‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’ची स्थापन करून बाबांनी सत्यशोधक विचारांचा प्रसार-प्रबोधन करण्याचं एक कायमचं माध्यम उभं केलं.

प्रकाशनं, नियतकालिकं सुरू करण्याचा आणि प्रबोधनाचा उपक्रम सुरू केला आणि अखेरपर्यंत नेटाने चालवला. सत्यशोधक चळवळीचा संपूर्ण इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला.

फुले वाडा

फोटो स्रोत, BBC/Nitin Nagarkar

‘दिनकरराव जवळकर समग्र वाङ्‍‍मय’च्या एका प्रस्तावनेत ते लिहितात, “महात्मा फुलेंबरोबरच चळवळ संपली” असे विधान बऱ्याच थोरामोठ्या विद्वानांनी केलेले आहे.

भारतीय समाजात सांस्कृतिक पातळीवर एवढ्या प्रचंड स्वरूपात उलथापालथ घडवून आणणारी चळवळ एखाद्या व्यक्तीच्या मरणाबरोबर संपुष्टात येते, असं म्हणणं वस्तुस्थितीला धरून होणारे नाही व न्यायाचेही नाही.

प्रतिष्ठानने अंगिकारलेल्या कामाला अगोदरच खूप उशीर झालेला आहे. ब्राह्मणेतर समाजात विद्या व ज्ञानोपासनेच्या प्रेरणा अद्यापही तुटपुंज्या आहेत.

वर्णजाती व्यवस्थेमुळे हाताची आणि डोक्याची फारकत झाली… त्यांनी तर 1818 ते 1878 या काळाला ‘अंधारयुग’ म्हणण्याचा पायंडा पाडला…” या समग्र लिखाणाला सर्व सत्यशोधकांच्या लिखाणाला उजेडात आणण्याचा उपक्रम बाबांनी जीव लावून केला.

‘आम्ही पाहिलेले फुले’, ‘कृष्णराव भालेकर समग्र वाङ्‍‍मय’, ‘दिनकरराव शंकरराव जवळकर समग्र वाङ्‍‍मय’ अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

बाबा आता आपल्यात नाहीत. उरलेल्यांना आता हे कार्य पुढे न्यावे लागेल. हे काम किती अवघड आहे, हे बाबांच्या वर उल्लेखलेल्या प्रस्तावनेत सविस्तरपणे आले आहे. याचे भान बाबांची परंपरा पुढे नेणाऱ्यांनी ठेवणे अत्यावश्यक आहे.

बाबांनी ठरवले असते तर त्यांनी मोठ्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या, तुलनेने भरपूर जास्त पगार मिळवू शकणाऱ्या थरातील कामगारांच्या ट्रेड युनियन चळवळीत सहजच भाग घेतला असता.

पण सत्यशोधक विचारांच्या प्रभावामुळेच त्यांनी ज्याला ‘असंघटित’ कामगार म्हटले जाते, अशा कामगार, मजुरांच्या चळवळी संघटित केल्या.

हमाल, मापाडी, रिक्षा ड्रायव्हर इत्यादींच्या जबरदस्त चळवळी त्यांनी संघटित केल्या. त्या यशस्वी करून दाखवल्या. महाराष्ट्रभर या चळवळींचे जाळे उभे केले. त्यांचे जीवन स्थिर करत नेले.

हमाल पंचायतीच्या माध्यमातून ‘झुणका भाकर’ केंद्रे उघडून स्वस्त, पौष्टिक आणि चविष्ट, भरपेट जेवण देण्याचा उपक्रम महाराष्ट्राच्या छोट्या-मोठ्या शहरांमध्ये सुरू केला.

हे सर्व कल्पनेपलिकडचे वाटणारे होते. पण त्यांनी, सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने करून दाखवले.

धरणग्रस्तांसाठी चळवळ

पुणे जिल्ह्यात होणाऱ्या मुळशी नदी खोऱ्यातील धरणग्रस्तांच्या चळवळीमुळे या देशातील पुनर्वसनाची आणि धरणांच्या बांधकामांना आव्हान देणारी चळवळ सुरू झाली.

याच पुणे जिल्ह्यात जन्मलेल्या बाबांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळातली, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर झालेली धरणग्रस्तांची चळवळ सुरू केली.

ही चळवळ धरणग्रस्त होऊ घातलेल्या उद्रेगातून सुरू झाली. येडगाव धरणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते व्हायचा होता.

तिथे जमलेल्या जनसागरातील अन्साई नावाच्या एका माऊलीने 6 ऑक्टोबर 1964 रोजी भूमिपूजनाचं साहित्य ठेवलेलं ताट उधळून भूमीपूजन उधळून लावलं- हजारोंच्या सहभागानं या लढ्यातील धरणग्रस्त शिवाजी चाळक यांनी कवितासंग्रह काढला आहे.

या अन्साईचा उल्लेख धरणग्रस्तांच्या सभांमध्ये नेहमीच करायचे. या अन्साबाई नेहरकरांना आयुष्यभर चहाची टपरी चालवून जगावं लागंल.

कुकडी नदीवर झालेल्या या घटनेच्या वेळी डॉ. बाबा आढाव आंदोलनात पुढाकारात होते. त्यांना लाठीमार सहन करावा लागला होता. बाबा ही चळवळ नेटानं करीतच राहिले.

त्यांच्या जोडीला माजी आमदार आणि लाल निशाण पक्षाचे नेते कॉ. दत्ता देशमुख आले, भाई दि.बा. पाटील, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, मी स्वतः अशा दोन पिढ्यांचे कार्यकर्ते-नेते एकत्र आले.

डॉ. बाबा आढाव

‘महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद’ स्थापन झाली होती. या परिषदेचा पाया घालण्यात कॉ.दत्ता आणि साथी बाबा यांची पायाभूत अशी भूमिका होती.

याच चळवळीतून जगातला, देशातला आणि महाराष्ट्रातला पहिला पुनर्वसन कायदा झाला. यात पुढे अनेक संघर्ष करून सुधारणा झाल्या.

2006 साली मी आणि बाबांचा समावेश असलेल्या शासकीय समितीने कायद्याला मजबूत करणारे शासन निर्णय झाले. त्यातच ‘आधी पुनर्वसन मगच धरण/प्रकल्प’ हा ऐतिहासिक शासन निर्णय झाला.

देशात 1975 ला लादली गेलेली आणीबाणी असो की, आजची फॅसिस्ट पद्धतीची आणि लोकशाहीला कागदावरच बांधून ठेवणारी राजवट असो, बाबा परखडपणे संघर्षाला उभे राहिले.

असे लोकशाहीच्या संरक्षणासाठीचे संघर्ष आणि कष्टकऱ्यांचे इतर संघर्ष करतानाच आजाराने जेरबंद होऊन त्यांची प्राणज्योत मालवली.

माझ्या सहचारिणी दिवंगत गेल ऑम्वेट यांच्या समग्र वाङ्‍‍मयाच्या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन त्यांच्या हस्तेच झाले.

तेच यापूर्वीच्या दोन वर्षांमधल्या प्रकाशनाचे अध्यक्ष होते. आजारी आणि थकवा असूनही ते चळवळीच्या पालकत्वाची जबाबदारी पार पाडत गेले.

त्यांना क्रांतिकारी जय जोती, जय भीम!

(डॉ. भारत पाटणकर हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक, आणि शेतकरी चळवळीतील नेते आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC