Source :- ZEE NEWS

Masood Azhar Family Died: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैनाने पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर मध्यरात्री साधारण दीडच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. इतकंच नव्हे तर भारताच्या हल्ल्यात दहशतवादी संघटना जैशचा म्होरक्या अजहर मसूदच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झाला आहे. त्याच्या कुटुंबातील तब्बल 14 सदस्य या हल्ल्यात ठार झाले आहेत. 

दहशतवादी अजहर मसूद पाकिस्तानातून सातत्याने दहशतवादी कारवाया करत असल्याचे समोर आलं होतं. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच केले. या कारवाईत सैन्याने 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या कारवाईत मसूदच्या संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला. या हल्ल्यात मसूदची बहीणदेखील ठार झाली आहे. 

कंधार विमान हायजैकचा मास्टरमाइंड आणि जैश- ए-मोहम्मदचे प्रमुख मौलाना मसूद अजहरने एक पोस्टदेखील केली आहे. यात त्याने म्हटलं आहे की, बहावलपूरमध्ये झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये त्याच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि 4 सहकारी मारले गेले. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, मसूद अजहरने एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्याने घरातील सदस्यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे. त्याने म्हटलं आहे की, मृतांमध्ये त्याची मोठी बहिण तिचा पती, त्याचा पुतण्या आणि त्याची पत्नी तसंच, एक पुतणी आणि तिची पाच मुलांचा समावेश आहे. तसंच, त्याचे तीन सहकारीदेखील मारले गेले आहेत. 

पाकिस्तानच्या माध्यमांनुसार, आज दुपारी 4 वाजता बहावलपूर येथे 14 जणांवर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. सूत्रानुसार यावेळी अजहरदेखील उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर, अजहर मसूदने निवेदनात म्हटलं आहे की, माझादेखील मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं. 

SOURCE : ZEE NEWS