Source :- ZEE NEWS
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टीम कूक यांना अॅपल आयफोनची निर्मिती भारतात हलवू नये आणि अमेरिकेत उत्पादनावर लक्ष केंद्रित करावं अशी विनंती केली आहे. गेल्या पाच वर्षांत, भारत अॅपल आयफोनच्या सर्वात मोठ्या उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 12 महिन्यांत कंपनीच्या असेंब्ली लाइन्सने २२ अब्ज डॉलर्स किमतीचे स्मार्टफोन बनवले आहेत. अमेरिकेतील कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत भारतात 60 टक्के जास्त आयफोनचे उत्पादन केलं आहे.
आपल्या आक्रमक कर आकारणीने जागतिक बाजारपेठेत खळबळ माजवलेल्या ट्रम्प यांनी कतारमध्ये म्हटलं की, कुक यांनी भारतात निर्मिती करावी असं मला वाटत नाही. ट्रम्प म्हणाले की, “मला काल कूर यांच्यासंदर्भात थोडी समस्या होती”.
“ते संपूर्ण भारतभर निर्मिती करत आहेत. त्यांनी भारतात निर्मिती करावी असं मला वाटत नाही,” असं सांगताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत उत्पादन वाढवण्याची आपली योजना असल्याचं म्हटलं आहे.
करोना व्हायसरचा उद्रेक झाल्यानंतर भू-राजकीय तणावामुळे अॅपल चीनच्या बाहेरदेखील निर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. ट्रम्प यांनी भारतावर जगातील सर्वात जास्त कर अडथळे असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात अमेरिकन उत्पादनं विकणं खूप कठीण आहे. अॅपल आपली बहुतेक उत्पादनं चीनमध्ये बनवते. भारतात, फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या प्लांटमध्ये आणि टाटा ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्लांटमध्ये आयफोन असेंबल केले जातात.
ट्रम्प यांनी भारताने ‘शून्य-कर’ ऑफर दिल्याचा दावाही केला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी असाही दावा केला आहे की भारताने अमेरिकन वस्तूंवरील कर कमी करण्याची ऑफर दिली आहे. गुरुवारी कतारमध्ये उद्योजकांसोबत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, “भारत सरकारने आम्हाला अशा कराराची ऑफर दिली आहे ज्यामध्ये ते आमच्याकडून कोणतेही शुल्क आकारणार नाहीत”.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष संपवण्यासाठी व्यापाराचा वापर सौदेबाजीचा एक मार्ग म्हणून केल्याचा दावा केला होता. आपण व्यापार थांबवण्याची धमकी दिल्यानेच शस्त्रसंधी झाल्याचंही ते म्हणाले होते. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे.
मात्र भारताने अमेरिकेने दोन्ही देशांना युद्धबंदी करारात मध्यस्थी करण्यास मदत केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे. स्टील आणि अॅल्युमिनियमवरील अमेरिकेच्या वाढीव शुल्काच्या प्रत्युत्तरात भारताने प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याची धमकी दिल्यानंतर काही दिवसांनी ट्रम्प यांचं हे विधान समोर आलं आहे.
SOURCE : ZEE NEWS