Source :- BBC INDIA NEWS
“100 ते 150 मशीन आणि 400 ते 500 हायवा ह्या तळ्यात चालतात. बेकायदेशीर चालतात.”
परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील तळ्याच्या बांधावर आम्ही उभे होतो.
शेजारीच असलेल्या वडगाव दादाहरी गावचे नागरिक प्रकाश मुरकुटे आम्हाला या तळ्यात काय चालतं ते सांगत होते.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील औष्णिक विद्युत केंद्र आणि राखमाफिया चर्चेत आलेत.
या राखमाफियांची परळीत एवढी दहशत आहे की त्यांच्याबाबत कुणीही ऑन कॅमेरा बोलण्यास तयार होत नाही.
“आपण आपलं काम करत राहायचं, त्यांच्या म्हणजे राखमाफियांच्या नादाला लागायचं नाही. ते फार डेंजर लोक आहेत,” राखमाफियांची दहशत परळीकरांच्या या वाक्यातून समजू शकते.
राखमाफियांचा उदय कसा झाला?
बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये 1971 साली औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आलं. केंद्र उभारल्यानंतर इथं एक बाजारपेठ उभी राहिली. त्या माध्यमातून लोकांना रोजगारही मिळू लागला.
विद्युत केंद्र उभारण्यासाठी परिसरातल्या गावांमधील जमीन संपादन करण्यात आली.
परळीतल्या औष्णिक विद्युत केंद्रात कोळश्यापासून वीजनिर्मिती केली जाते. जळालेल्या कोळश्यातून जी राख तयार होते, ती इथल्या तळ्यांमध्ये टाकली जाते. एक असते कोरडी राख आणि दुसरी असते ओली राख.
सुरुवातीला या राखेला काही किंमत नव्हती. अगदी 10 रुपयांत एक ट्रक भरुन राख मिळायची. हातात कुदळ, फावडे घेऊन लोक राखेचे पोते भरुन आणायचे.
पण, कालांतरानं बांधकाम उद्योग वाढीस लागला. दिवसेंदिवस माती कमी पडायला लागली आणि राखेचा वापर विटांमध्ये, सिमेंटमध्ये करता येतो, असं इथल्या लोकांच्या लक्षात आलं.
त्यामुळे मग त्यांची नजर या राखेकडे गेली आणि त्यांनी राख उचलण्यास सुरुवात केली. ही कोरडी आणि ओली राख विकण्यासाठी अधिकृतपणे टेंडर निघाले की नाही यावर वाद आहेत.
बीडस्थित ज्येष्ठ पत्रकार दत्ता देशमुख सांगतात, “राख उचलण्यासंदर्भात निविदा काढण्याची किंवा त्यासंदर्भातल्या इतर गोष्टी झाल्या नाहीत. मग ही राख उचलायला चालू केलं, त्याच्यातून माफियागिरी निर्माण झाली. मग त्याच्यावर कंट्रोल कुणाचा, तर काही गाड्यावाले, काही वाहतूकदार आणि काही खरेदीदार या सगळ्यांचा एक बॉस म्हणजे त्या व्यक्तीला काही टोल दिल्याशिवाय, काही रक्कम दिल्याशिवाय ती राख जात नव्हती.”
राखेचे डोंगर आणि वीटभट्ट्यांचं आगार
परळी ते गंगाखेड रस्त्यावर हे औष्णिक विद्युत केंद्र आहे. या रस्त्यावरुन जाताना तुम्हाला राखेचे डोंगर दिसून येतात. रस्त्यावर दुतर्फा राख साचलेली दिसून येते.
परळीतल्या रस्त्यांवर राखेची वाहतूक करणारे हायवा-टिप्पर राजरोसपणे धावताना दिसतात. यातल्या अनेक हायवाला नंबर प्लेटही नसते. त्यामुळे विना नंबर प्लेटचे हाया धावतात तरी कसे, हा परळीकरांच्या चर्चेचा विषय असतो. परळी परिसरात 4-5 किलोमीटर अंतरावर जागोजागी हे हायवा टिप्पर पार्क केलेले दिसतात.
एका हायवामध्ये जवळपास 6 ब्रास राख मावते आणि त्याची किंमत 12 ते 15 हजार रुपयांदरम्यान आहे. दररोज जवळपास 500 हायवांमधून राखेची वाहतूक होत असल्याचं स्थानिक सांगतात. या राखेचा वापर वीटभट्ट्यांमध्ये, सिमेंटमध्ये केला जातो.
राखेची एक वीट 7 रुपयांना मिळते. एकट्या परळीत 1 हजारांहून अधिक वीटभट्टया असल्याचं सांगितलं जातं. परळी-बीड, परळी-गंगाखेड, परळी-अंबाजोगाई, परळी-नंदागौळ या रस्त्यांवर दुतर्फा वीटभट्ट्या दिसतात. बीडच्या शिरसाळा या गावात सर्वाधिक वीटभट्ट्या असल्याचं सांगितलं जातं. यातल्या अनेक वीटभट्ट्या गायरान जमिनींवर सुरू असल्याचं स्थानिक बोलून दाखवतात.
इथल्या वीटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांसहित कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातही जातात. राखेतून उभ्या राहिलेल्या अर्थकारणाची वार्षिक उलाढाल करोडोंमध्ये असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात.
दत्ता देशमुख सांगतात, “विद्युत केंद्राचे कर्मचारी बाहेरुन आलेले असतात. महसूल असेल किंवा पोलीस असेल या दोन यंत्रणांनी एखाद्या माफियाशी लोटांगण घातलेलं असेल तर कायदेशीर प्रक्रिया करण्याची औष्णिक विद्युत केंद्राच्या अभियंत्याची काय मजाल? पुढे यातून माफियागिरी सुरू झाली.”
राखमाफिया साधारणपणे किती पैसे कमावत असतील असं विचारलं तर स्थानिकांकडून उत्तर येतं, “बापा बापा बापा..त्याचा हिशोबच नाही. हजारो करोडो रुपये.”
राखेतून कोट्यवधींची कमाई सुरू झाली. पुढे राखमाफियांना अभय मिळाल्यानं राखमाफियांची मुजोरी वाढली. त्यातून बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले. परळीच्या गल्लोगल्लीत तुम्हाला राखेच्या व्यवसायातून झालेले खून, मारामाऱ्या यांच्या कहाण्या ऐकायला मिळतील. पण याविषयी कॅमेऱ्यावर कुणीही बोलत नाही.
पण लोकांची भावना एकच, ती म्हणजे, “त्यांचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही, कारण सगळीकडे त्यांचीच माणसं आहेत. यंत्रणा त्यांच्या हातात आहे.”
राखेमुळे दम्याचा त्रास, अपघातही होतात
परळी-गंगाखेड रोडवरुन विद्युत केंद्राकडे जाताना आधी दाऊतपूर नावाचं गाव लागतं. या गावाच्या परिसरात विद्युत केंद्र उभारण्यात आलं आहे. या गावातून फिरताना अनेकांनी तीन-तीन, चार-चार मजली बंगले बांधल्याचं दिसून आलं. थोडं पुढे गेलं की दादाहरी वडगाव हे गाव येतं.
परळीतल्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख हवेच्या माध्यमातून परिसरातल्या गावांमध्ये पसरते. यामुळे या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान होतं आणि त्यांना आरोग्याचे प्रश्नही उद्भवतात.
औष्णिक विद्युत केंद्रापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर दादाहरी वडगाव हे गाव आहे. या गावात आमची भेट बिभीषण चौधरी यांच्याशी झाली.
राखेविषयी बोलताना ते म्हणाले, “राखेचा त्रास 10 वर्षांपासून व्हायलाय. भाकरीमध्ये राख येतिया, जेवणामधी राख येतिया. डोळे राखानं कचकच करते. डोळ्यावर परिणाम होतोया.”
पत्रकार आहात पण वाईट वाटून घेऊ नका असं म्हणत बिभीषण पुढे म्हणाले, “आम्ही अनेक आंदोलनं केली, पण पत्रकारांनी दाखवली नाही. तुम्ही पण मॅनेज होऊ नका म्हणजे झालं, कारण सगळा खेळ पैशांवरच आहे म्हणून म्हटलं.”
थोडं पुढे गेल्यानंतर उसाच्या शेतात एक जण काम करताना दिसले. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मुंजाभाऊ खाटीक असं नाव सांगितलं आणि बोलायला सुरुवात केली.
“राखेमुळे मला दम्याचा त्रास सुरू झालाय. मला दम लागतो. हा फुफुटा हवेनं उडाय चालू होतो. तो जर उडायला लागला, तर मला दम लागतो,” असं ते म्हणाले.
मुंजाभाऊ यांचं वय 30 आहे.
राखेचा शेतातल्या पिकांवरही परिणाम होत असल्याचं इथले शेतकरी सांगतात.
“पिकाची वाढ बरोबर होत नाही. ऊस जर लावला तर तो पोसत नाही बरोबर. जवारी केली, कांदा केला, तर त्याला मर लागल्यावानी होते,” मुंजाभाऊ सांगत होते.
त्यानंतर त्यांनी उसाच्या पानावरील राख दाखवायला सुरुवात केली.
परळीतल्या विद्युत केंद्राच्या परिसरातील ओढ्यांतून राखयुक्त पाणी येत असल्याचं स्पष्टपणे दिसतं.
जनावरांना ते पाणी प्यावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होत असल्याचं स्थानिक सांगतात.
परिसरातल्या गावांमधील तरुणांना औष्णिक केंद्रामुळे रोजगार मिळालाय. पण राखेच्या प्रदूषणानं कुटुंबीयांचे हाल होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
दादाहरी वडगावच्या ग्रामस्थांनी राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ती सध्या पेंडिंग असल्याचं ग्रामस्थ सांगतात.
लोक परळी सोडायला लागले…
औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातून रात्रंदिवस राख उपसली जाते आणि त्यामुळे परिसरातील 7-8 गावांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचं स्थानिक सांगतात.
प्रकाश मुरकुटे सांगतात, “आम्ही रास्ता रोको केला की, आम्हाला न्याय द्या, हे प्रदूषण बंद करा. आमच्या गावच्या पोरांनी 9 दिवस उपोषण केलं पण कुणी दखल घेतली नाही. उलट ते इथं ओली राख फेकतात. परळी ते गंगाखेड रोड असा आहे की महिन्याचे चार-दोन अॅक्सिडेंट होतात.”
दादाहरी वडगावमध्ये परतल्यानंतर आम्ही एका दुकानात थांबलो. तर दुकानदारानं काचावर साचलेली राख दाखवली. त्यांनी काचावरुन हात फिरवला तेव्हा हाताला लागलेली राख स्पष्टपणे दिसत होती.
परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून होणारी राखेची बेकायदेशीर वाहतूक आणि प्रदूषणाची समस्या याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला नोटीसही पाठवली. मुंबई हायकोर्टाने जुलै 2024 मध्ये महाजेनको आणि प्रदुषण मंडळाला याविषयी स्पष्ट निर्देशही दिले होते.
पण आजही इथली परिस्थिती जैसे-थे असल्याचं दिसून येतं.
राखेच्या व्यवसायातून निर्माण झालेली दहशत आणि आरोग्याच्या समस्या यामुळे अनेक जण परळीतून अंबाजोगाई आणि इतर ठिकाणी स्थलांतर करत असल्याचं स्थानिक लोक सांगतात.
स्थानिक प्रशासन मात्र राख माफियांवर काहीही बोलायला तयार नाहीये.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील माफियांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय.
फडणवीस म्हणाले, “बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया, वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे, भूमाफियाही असतील, अशाप्रकारचे जे लोक असतील एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल.”
दरम्यान, सरकारचं जसं वाळू उपशाबाबत धोरण असतं तसं परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून राख उचलण्याबबात धोरण असलं पाहिजे. ते नसल्यामुळे आजवर सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचं स्थानिक अभ्यासक सांगतात.
दुसरीकडे, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेली राखमाफियांची माफियागिरी आता तरी मावळतीकडे जाईल, अशी आशा परळीची जनता बाळगून आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC