Source :- ZEE NEWS

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने माणुसकीला काळीमा फासली आहे. दिवसाढवळ्या दहशतवाद्यांनी मानवता मारुन टाकली आहे. हा हल्ला करुन दहशतवाद्यांनी पहलगाम परिसरातून पळ काढला तेव्हा स्थानिक लोकांनी हिंदू रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं. एका स्थानिक घोडेस्वाराचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो एका लहान मुलाला पाठीवर घेऊन धावत रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नेमकं त्या दिवशी काय घडलं? 

सज्जद भट्टने सांगितलं की, मी घरी बसलो होतो. माझ्या काकीचा मृत्यू झाला होता. अनेक लोक आमच्या घरी आले होते. यावेळी पोनी असोसिएशनचे अध्यक्षांनी मला फोन केला. त्यांनी सांगितलं की, बैसरनमध्ये काही घटना झाली आहे का. पुढे ते म्हणाले की, आपण सगळे घोडेस्वार रेस्क्यूसाठी जाऊया. आम्ही ज्यावेळी पोहोचलो तेव्हा तेथे आधीच अनेक लोक उपस्थित होते. आम्ही तेव्हा तेथील लोकांना पाणी पाजलं. आम्ही त्यांना समजावलं की, घाबरण्याची काही गरज नाही. आम्ही तुमचे भाऊच आहोत. 

“त्या’ लहान मुलाने…. 

मी जसा बैसरन खोऱ्यात पोहोचलो तेव्हा अनेक लोक जखमी झाले होते. कुणी रडत होतं तर कुणी हताश होऊन बसलं होतं. माझ्यासोबत असलेल्या अनेक घोडेस्वारांनी जखमींना वाचवलं. तेव्हा एक मुलगा रडत रडत माझ्याकडे आला आणि ‘अंकल मला वाचवा’ असं सांगू लागला. मी त्याला माझ्या पाठीवर घेतलं. माझा जीव धोक्यात टाकून मी त्या मुलाला रुग्णालयात दाखल केलं. या दरम्यान मी त्यांना पाणी पाजत होतो. 

यापेक्षा त्यांनी आम्हाला मारलं असतं…

सज्जाद भट्टने सांगितलं की, दहशतवाद्यांनी माणुसकीचा खून केला आहे. यापेक्षा त्या दहशतवाद्यांनी आम्हाला मारलं असतं तर बरं झालं असतं. सगळ्यांच्या घरी दुःखाच वातावरण होतं… दुकानं बंद होती. आमच्या एका साथीदाराला दहशतवाद्यांनी मारलं आहे. जे जखमी होते त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल केलं. तुम्ही आज कुणाच्याही घरी जा अगदी दुःखाचं सावट पसरलं आहे. 

तीन दहशतवाद्यांची ओळख पटली

या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आहेत; त्यापैकी दोघे पाकिस्तानचे आहेत. हाशिम मुसा उर्फ ​​सुलेमान, अली भाई उर्फ ​​तल्हा भाई आणि आदिल हुसेन ठोकर अशी त्यांची नावे आहेत. मुसा आणि तल्हा हे पाकिस्तानी नागरिक आहेत. पोलिसांनी तिघांवरही प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जो कोणी त्यांच्याबद्दल माहिती देईल त्याला पोलिसांकडून ही रक्कम दिली जाईल. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण अजूनही जखमी आहेत.

हल्ल्यानंतर, भारत सरकार आणि सुरक्षा संस्था अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी केले आहेत आणि दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील राजनैतिक अधिकारी आणि संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना हद्दपार केले आहे. तसेच, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्यात आले आहेत आणि त्यांना 48 तासांच्या आत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. तसेच अटारी सीमा तपासणी नाका तात्काळ बंद केला आहे आणि पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे सार्क व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

SOURCE : ZEE NEWS