Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, BBC/Nagarkar
“कधी बोलताना सासू सासरे म्हणायचे ही शिकलेली नाही. दुसरी सून शिकलेली आणू. मला ते ऐकून वाईट वाटायचं. आता मी नवऱ्याला ठणकावून सांगितलं मला म्हणता ना अनपढ, आता मी दहावी झालीये.”
पुण्यातल्या कात्रज परिसरात राहणार्या प्रियांका कांबळेंचे हे शब्द त्यांच्या कष्टाची आणि निर्धाराची जाणीव करुन देतात.
तर याच उमेदीनी आणि आपण काही बनून घर स्थिर स्थावर करावं या जिद्दीने कोमल गायकवाडांनीही दहावी पूर्ण केली आहे. कोमल आणि प्रियांका दोघीही पुण्यात कचरा वेचक म्हणून काम करतात.
पुण्यातल्या कोमल आणि प्रियांका या दोघींच्या जिद्दीची ही गोष्ट.
पुण्यातल्या दांडेकर पुलाजवळच्या वस्तीत राहणार्या कोमल मुळच्या सोलापूर जिल्ह्यातल्या नातेपुतेच्या. दहावीच्या परीक्षेत त्या नापास झाल्या आणि त्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षीच त्यांचं लग्न झालं.
लग्नानंतर काही दिवसातच नवरा व्यसन करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग घराला आधार देण्यासाठी त्यांनी वेगवेगळी कामं करायला सुरुवात केली.
आधी पाळणाघरात, मग नेटवर्क मार्केटिंग आणि त्यानंतर पेट्रोल पंपावर त्यांनी काही वर्ष काम केलं. पण या सगळ्यात एकच अडचण सातत्याने त्यांच्या समोर येत होती.

फोटो स्रोत, BBC/Nitin Nagarkar
कोमल सांगतात,”कुठंही नोकरी मागायला गेले तर शिक्षण नसल्याने पगार कमी सांगितला जायचा. यामुळे जाणवत होतं की शिक्षण पूर्ण करायला हवं.”
अशातच 1 दिवसाचं बाळ असताना कोव्हिडच्या काळात त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं. त्या सांगतात “एवढं लहान तान्हं बाळ होतं. नवरा गेला पण सासूने संशय घेतला,” यानंतर मात्र त्यांनी ठरवलं की आपण स्वत:च्या पायावर उभं रहायचं.
मार्केटिंग करत असताना एका मुलीशी त्यांची मैत्री झाली होती. ती नाईट स्कूल मध्ये शिक्षण घेत असल्याचं त्यांना समजलं.
दरम्यान मुलगी आणि लहान मुलगा यांना सांभाळण्यासाठी सोयीचं म्हणून कोमलनी कचरावेचक म्हणून काम सुरू केलं होतं.
‘काम सांभाळून अभ्यास’
सकाळी कचरावेचक म्हणून काम आणि दुपारी जवळच भाजीचं दुकान टाकून तिथं भाजी विक्री करून त्या आपलं घर चालवत होत्या. आता त्यात भर पडली ती नाईट स्कूलची आणि अभ्यासाची.
कोमल सांगतात “रात्री भाजीचं दुकान बंद करुन उशिरा घरी यायचे. पहाटे 3 वाजता उठायचे. आणि मग अभ्यास करुन कामाला जायचे. पेपर असतानाही कामाला सुट्टी दिली नाही. पेपर देऊन मार्केटला जायचे भाजी आणायला.”
या कष्टांचं फळ त्यांना मिळालंय. दहावीत 58 टक्के मार्क मिळून कोमल उत्तीर्ण झाल्या आहेत. अर्थात एक टप्पा पार पडला असला तरी त्यांचं मुख्य स्वप्न होतं ते पोलीस होण्याचं. पोलीस भरतीसाठी वयाची अट असल्यामुळे त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता येणार नाही.
आता त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं आहे ते घरात चार पैसै यावे आणि मुलांचं भविष्य चांगलं घडावं यासाठी.

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
हेच पोलीस होण्याचं स्वप्न 28 वर्षांच्या प्रियांका कांबळेंनीही पाहिलं होतं. प्रियांका कांबळेंच्या घरातले सगळेजण कचरावेचक म्हणून काम करायचे.
प्रियांका यांचा संघर्ष
लहानपणी चौथी पाचवीत असतानाच प्रियांकांचं शिक्षण सुटलं. पुढं लग्न झालं आणि त्या सोलापूरला सासरी राहायला लागल्या. मात्र काही वर्षांनी संधीच्या शोधात पुन्हा पुण्यात आल्या.
शिक्षण नसलेल्या प्रियांकांना तोपर्यंत दोन मुलं झालेली होती. मुलीला सासरी ठेवून मुलाला घेऊन पुण्यात आलेल्या प्रियांका मग धुणं भांड्यांचं काम करायला लागल्या.
दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कामं करुन त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या. पण काम करतानाच शिक्षणाची ओढ मात्र कमी होत नव्हती. हीच ओढ त्यांनी त्या काम करत असलेल्या एका कुटुंबातल्या सदस्यांना सांगितली. आणि मग त्या कुटुंबानेच त्यांचं शिक्षण सुरू करण्याची जबाबदारी उचलली.

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
प्रियांका सांगतात, “ज्या घरी मी कामाला जात होते तिथे माझ्या शिक्षणाच्या आवडीबद्दल त्यांना सांगितलं. ते एक वृद्ध जोडपं होतं. ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते. त्यांना मी बाबाच म्हणायचे. ते मला म्हणाले की तुला शिकायचं आहे तर आपण तुझे अॅडमिशन करू. ते मला म्हणाले तू घरी जाऊन आवरुन ये. पण मी घरी गेले आणि परत आलेच नाही. मला शाळेत जाण्याची भीती वाटत होती.”
“दुसऱ्या दिवशी जेव्हा कामाला आले त्यावेळी त्या आजी मला रागावल्या. त्यांनी मला समजावून सांगितलं. ते आजोबा मला म्हणाले की मला दोन मुली आहेत तू मला त्यांच्यासारखीच आहे. तू पण पुढे शिक. त्यातून मला हिम्मत आली आणि मी त्यांच्यासोबत मंडईत असलेल्या प्रौढांच्या शाळेत गेले.
“शाळेत गेल्यावर मला मॅडमनी मला पुस्तक दिलं आणि वाचून दाखव म्हटल्या. मी अडखळत वाचलं. त्या म्हणाल्या तुला थेट दहावीला प्रवेश देता येणार नाही. मग त्यांनी मला आठवीत प्रवेश दिला,” प्रियांका सांगतात.
आठवीची परीक्षा देत एक टप्पा पार झाला. पण नववीच्या ऐन परीक्षेच्या वेळीच प्रियांकांची तब्येत बिघडली. मग ती परीक्षा देता न आल्याने पुन्हा वर्ष वाया गेलं. पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

फोटो स्रोत, BBC/Nitin Nagarkar
पुढच्या वर्षी परीक्षा देत नववी पूर्ण केली आणि दहावीच्या परीक्षेला बसल्या. दहावीच्या टप्प्यावर मात्र त्यांना वेगळीच अडचण येत होती. दररोज घरातली कामं करुन सकाळी त्या कचरावेचक म्हणून काम करायला जायच्या.
त्यानंतर दुपारी शाळा, संध्याकाळी घरची कामं आणि ती झालं की अभ्यास असं रुटीन त्यांनी ठरवून घेतलं होतं. पण अभ्यास म्हणजे नेमका कोणता करायचा ते सुचतच नसल्याचं त्या सांगतात. मग शिक्षकांशी बोलून त्याचंही वेळापत्रक ठरलं आणि अभ्यासाला सुरुवात झाली.
‘एका टोमण्याने बदललं आयुष्य’
शिक्षणाची ओढ होतीच. पण अशिक्षित असण्याचा टोमणा प्रियांकाच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला होता. त्या सांगतात “माझे सासू सासरे चांगलेच आहेत. पण कधीतरी बोलताना म्हणायचे की मी फारशी शिकलेली नाही. दुसरी सून शिकलेली करू म्हणायचे. मग मला वाईट वाटायचं. आपण शिकलो असतो तर हे वाट्याला आलं नसतं असं वाटायचं. मनात म्हणायचे सासू आई सारखीच आहे. मी काही तरी बनणार आणि सासू सासरे आणि आईला सांभाळणार.”

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR
याच जिद्दीने प्रियांका शिकत राहिल्या. सोबतच्या कचरावेचकांसह इतर सर्वांनीच मदत केली तरी परिस्थिती अशी की ऐन परीक्षेच्या काळातही सलग सुट्टी घेणं परवडणारं नसल्याचं त्या सांगतात.
त्यामुळे मग परीक्षेच्या वेळी सकाळी लवकर काम करुन मग पेपरला पोहोचत परीक्षा दिली. त्या सांगतात, “मी सगळ्या लोकांना अगोदर सांगून ठेवलं की माझे पेपर आहेत. मी काही 10-12 दिवस नाही येणार मॅडम पण बोलल्या की तसंच करावं लागेल नाहीतर पेपर कसं देणार. बोर्डाच्या पेपरला टायमाला तिथे पाहिजे असतं. मग मी विचार केला एवढे दिवस सुट्टी घेतल्यावर घर कसं चालणार. मी लोकांना सांगितलं मी एक दिवसा आड येईन लोकांनीही साथ दिली. मग परत माझा विचार बदलला. मी कचरा गोळा करुन पॉईंट वर ठेवून जात होते. आईला सांगायचे की तू तुझं काम संपलं की तो गाडीत टाक. असं करत परीक्षेचा काळ संपला.”
दोन मुलांची आई असलेल्या प्रियांकांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत शिक्षण पूर्ण केलंय. दहावीच्या परीक्षेत त्यांना 47.6 टक्के मार्क पडले आहेत. पुढं शिक्षण पूर्ण करून स्वत:ची ओळख निर्माण करण्याचं स्वप्न त्या पाहतायत.
पास झाल्याचा आनंद नवऱ्याला सांगताना त्या म्हणाल्या “तुम्ही बोलत होतात मला अनपढ आहे वगैरे. आता बघा म्हणलं पास झाले आहे. आता किती पण टोमणे मारा.”
कचऱ्यात राबणाऱ्या हातांमध्ये आलेल्या वही पेनाची ताकद ओळखून त्यांची वाटचाल सुरू झाली आहे स्वप्नपूर्तीच्या दिशेने.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC