Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
17 मिनिटांपूर्वी
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये 27 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.
या कारवाईमध्ये सीपीआय-माओवादी पक्षाचा जनरल सेक्रेटरी आणि नक्षली चळवळीचा कणा म्हणून ओळखला जाणारा नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू यालाही ठार करण्यात आलं आहे.
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात हे नक्षलवादी ठार झाले आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
नक्षलवाद निर्मुलनाच्या लढाईमध्ये ही कारवाई म्हणजे एक मैलाचा दगड असल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले आहेत की, “आज, छत्तीसगडमधील नारायरणपूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये 27 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. यामध्ये सीपीआय-माओवादी पक्षाचा सरचिटणीस, सर्वोच्च नेता आणि नक्षलवादी चळवळीचा कणा असलेल्या नंबला केशव राव उर्फ बसवा राजू याचाही समावेश आहे.”
“भारताच्या नक्षलवादाच्या विरोधातल्या तीन दशकांच्या लढाईत पहिल्यांदाच आपल्या सैन्याने सरचिटणीसपदाच्या नेत्याला निष्क्रिय करण्यात यश मिळवलं आहे. या मोठ्या यशाबद्दल मी आपल्या शूर सुरक्षा दलांचे आणि एजन्सींचे कौतुक करतो.”

फोटो स्रोत, Facebook/Amit Shah
“तसेच, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट पूर्ण झाल्यानंतर, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे आणि 84 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे, हे सांगण्यासदेखील मला आनंद होत आहे. मोदी सरकारने 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा संकल्प केला आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
याआधी, पोलिसांनी छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील 26 माओवाद्यांना ठार केल्याची माहिती दिली होती.

फोटो स्रोत, X/Amit Shah
छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी बुधवारी (21 मे) सांगितलं आहे की, ओरछा परिसरात सुमारे 50 तासांपासून शोध मोहीम सुरू आहे.
26 हून अधिक माओवादी या कारवाईमध्ये मारले गेले आहेत. माओवाद्यांचे काही प्रमुख नेतेही या कारवाईमध्ये मारले गेल्याची माहिती असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
या कारवाईमध्ये नक्षलवाद्यांचे काही प्रमुख नेते मारले गेल्याचं वृत्त आहे; मात्र, अधिकृतरित्या याची पुष्टी झालेली नाही. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते, असंही त्यांनी म्हटलंय.
“ही शोधमोहिम अद्यापही सुरु आहे. लाल दहशतवादापासून छत्तीसगडला मुक्त करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे,” असंही छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, 31 मार्च 2026 पर्यंत देशातून माओवाद्यांना पूर्णपणे संपवले जाईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC