Source :- BBC INDIA NEWS

नितिन नबीन

फोटो स्रोत, X/@NitinNabin

बिहार सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नितीन नबीन यांना भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रात म्हटलं आहे, “भाजपाच्या संसदीय बोर्डानं बिहार सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नितीन नबीन यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केलं आहे.”

पत्रानुसार, नितीन नबीन यांची नियुक्ती तत्काळ प्रभावानं लागू होणार आहे.

नितीन नबीन बिहार सरकारमध्ये रस्ते निर्माण मंत्री आहेत, तसंच भाजपाचे छत्तीसगडचे प्रभारी आहेत. ते बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर नितीन नबीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.

ते म्हणाले, “हे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम आहेत. मला वाटतं की कार्यकर्ता म्हणून काम केल्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते नेहमीच तुमच्यावर लक्ष देतात. मला जो आशीर्वाद मिळाला आहे. आम्ही मिळून काम करू.”

पंतप्रधान मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलं, “श्री नितीन नबीन जी यांनी एक कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांची एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. ते एक तरुण आणि मेहनती नेते आहेत. त्यांच्याकडे संघटनेचा चांगला अनुभव आहे.”

“बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केलं आहे. त्याचबरोबर लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी समर्पित होऊन काम केलं आहे.”

“ते विनम्रपणे काम करण्यासाठी ओळखले जातात. मला पूर्ण खात्री आहे की त्यांची ऊर्जा आणि कटिबद्धता यामुळे येणाऱ्या काळात आमच्या पक्षाची ताकद आणखी वाढेल. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा.”

वडिलांच्या फोटोला नमस्कार करणारे नितीन नबीन.

फोटो स्रोत, ANI

2006 मध्ये बिहारमधील पाटणा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून नितीन नबीन पहिल्यांदा आमदार झाले होते. 2010 ते 2025 पर्यंत ते सातत्यानं पाच वेळा बांकीपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत.

नितीन नबीन सध्या बिहारच्या एनडीए सरकारमध्ये रस्ते निर्माण आणि नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्री आहेत.

निवडणूक आयोगाकडे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, नितीन नबीन यांच्या वडिलांचं नाव नवीन किशोर प्रसाद सिन्हा आहे. ते पाटण्यातील टेलर रोडचे रहिवासी आहेत.

त्यानुसार त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते दाखवलं आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर कोणतंही गुन्हेगारी प्रकरण नाही आणि कोणत्याही गुन्ह्यामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं नाही.

नितीन नबीन 1996 मध्ये पाटण्यातील सेंट मायकल हायस्कूलमधून मॅट्रिक झाले आणि 1998 मध्ये त्यांनी दिल्लीतील सीएसकेएम पब्लिक स्कूलमधून इंटरचं शिक्षण पूर्ण केलं.

कोण आहेत नितीन नबीन?

नितीन नबीन पाटण्यातील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि बिहार सरकारमधील मंत्री आहेत.

ज्येष्ठ पत्रकार नचिकेता नारायण यांच्या मते, “नितीन नबीन यांनी 2006 मध्ये राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यांना वारश्यात राजकारण मिळालं असंही म्हणता येईल. कारण त्यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हेही सुरुवातीच्या काळात अनेक वेळा भाजप आमदार होते. वडिलांच्या निधनानंतर नितीन नबीन या जागेवरून विजयी होत आहेत.

नितीन नबीन 2017-2018 मध्ये भाजप युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष होते. 2020 मध्ये त्यांना सर्वात आधी नितीश कुमार सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आलं होतं.

नचिकेता नारायण यांनी एका रंजक घटनेचीही आठवण करून दिली.

“नितीश कुमार यांनी एकदा ज्या फोटोविरोधात जेवणाचा कार्यक्रम रद्द केला होता, तो फोटो नितीन नबीन आणि संजीव चौरसिया या दोन आमदारांनी वर्तमानपत्रात छापून आणला होता. त्यामुळं राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींबद्दल कोणतीही चर्चा नव्हती तेव्हापासून नितीन नबीन मोदींकडे झुकले होते, असं म्हणता येईल.”

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (डावीकडे) यांच्यासह एका कार्यक्रमात नितीन नबीन.

फोटो स्रोत, @NitinNabin

ही 2010 ची घटना आहे. तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी बिहारची राजधानी पाटण्यात आले होते.

त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार यांनी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली होती.

या जाहिरातीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार एकत्र हातात हात धरून असल्याचं दाखवण्यात आलं होतं. गुजरात सरकारनं पुरात बिहारला कशी मदत केली याचं त्यात वर्णन केलं होतं.

त्यावर नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं होतं की, ही जाहिरात त्यांच्या परवानगीशिवाय प्रकाशित करण्यात आली आहे.

जाहिरातीमुळं संतप्त झालेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजप नेत्यांसोबतचा जेवणाचा कार्यक्रम रद्द केल्याची बरीच चर्चाही तेव्हा झाली होती.

नचिकेता नारायण यांच्या मते, “नितीन नबीन यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष का बनवण्यात आलं? हे लगेचच निश्चितपणे सांगणं सोपं नाही. पण भाजपचं सर्वोच्च नेतृत्व त्यांच्यावर विश्वास ठेवतं हे त्यावरून निश्चितपणे दिसून येतं.”

भाजपने का केली कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती?

भाजपला दीर्घकाळापासून नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावावर निर्णय घेता आला नव्हता. त्याची राजकीय वर्तुळात आणि संसदेतही चर्चा होत होती.

“भाजपला त्यांचा राष्ट्रीय अध्यक्षही निवडता आलेला नाही”, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी संसदेत केला होता.

त्यावेळी, यावर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, “भाजप हा कुटुंबाचा नाही तर कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे, म्हणूनच विलंब होत आहे”, असं उत्तर दिलं होतं.

भाजपनं अनेकदा जेपी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला आहे. त्यामुळं यावर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले.

ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांच्या मते, “हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे. जेपी नड्डा यांना जवळजवळ तीन वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळं या मुद्द्यावरील प्रश्न टाळण्यासाठी भाजपनं कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले आहेत, असं दिसतं. पण या पावलामुळं प्रश्न आणखी वाढतील.”

त्यांच्या मते, “लोक आता, भाजप आणि आरएसएसमध्ये काही मतभेद आहेत का? असंही विचारू शकतात. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वात एका नावावर एकमत नाही काय़ म्हणूनच त्यांना पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्याऐवजी आता कार्यकारी अध्यक्षाचं नाव पुढे आले आहे का?”

रशीद किडवई

रशीद किडवई म्हणतात की, एखादा नेता भाजपसारख्या मोठ्या पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारतो तेव्हा राष्ट्रीय पातळीवर त्याला एक दूरदृष्टी असली पाहिजे. देशाच्या विविध भागातील लोकांच्या त्यांना बैठका घ्याव्या लागतात.

नितीन नबीन या पदावर किती दिवस राहतील हे सध्या निश्चित झालेलं नाही.

पण, अनेकदा असे पाहायला मिळतं की, पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व अशा व्यक्तीकडं पक्षाची जबाबदारी सोपवतं ज्यांच्याद्वारे सहजपणे काम होऊ शकेल.

पण भाजपच्या या निर्णयामुळं राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळणार? की विरोधक या मुद्द्यावर नवीन प्रश्न उपस्थित करणार? हेही आता पाहावं लागेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC