Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
16 मिनिटांपूर्वी
‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘सीमेपलिकच्या दहशतवादाविरोधात भारताची लढाई’ या संदर्भात बाजू मांडण्यासाठी संसदीय कामकाज मंत्रालयाने सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा केली आहे.
या शिष्टमंडळाचं उद्दिष्ट भारताच्या मुख्य मित्रराष्ट्रांचा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सदस्य असलेल्या देशांचा दौरा करून, त्याठिकाणी दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट करणं हे आहे.
या सात शिष्टमंडळांपैकी एकाचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरूर करणार आहेत. पण यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
एका शिष्टमंडळाचे अध्यक्ष म्हणून तिरुवनंपुरमचे खासदार शशी थरूर यांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने त्यांचं नाव मंत्रालयाकडे दिलंच नसल्याचं म्हटलं.
तर शशी थरूर सारख्या वक्त्याचं नाव का दिलं नाही? असा सवाल भाजपकडून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांना विचारला जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
निवेदनानुसार, “ऑपरेशन सिंदूर आणि सीमेपलिकडच्या दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढाई संदर्भात सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
ही शिष्टमंडळं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सदस्य असलेले देश आणि भारताच्या मित्रराष्ट्रांचा दौरा करतील.”
पीआयबीने सांगितल्याप्रमाणे, ही शिष्टमंडळं भारताची राष्ट्रीय एकता आणि दहशतवादाविरोधात कठोर धोरण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडणार आहेत.

फोटो स्रोत, ANI
पीआयबीच्या माहितीनुसार, सात शिष्टमंडळांच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद, जनता दल युनायटेडचे संजय कुमार झा, भाजपचे खासदार बैजयंत पांडा, डीएमके पक्षाच्या कनिमोझी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.
काँग्रेसने काय म्हटलं?
ही बातमी समोर आल्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्स (पूर्वीचं ट्वीटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की काँग्रेसच्या वतीने प्रतिनीधीमंडळासाठी दिलेल्या नावांत शशी थरूर यांचं नाव नव्हतं.
जयराम रमेश यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की, “काल सकाळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी विदेशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळासाठी 4 खासदारांची नावं देण्याची विनंती त्यांनी केली होती. “

फोटो स्रोत, ANI
जयराम रमेश यांच्या मते, शुक्रवारी (16 मे) दुपारपर्यंत चार नावं दिली होती. त्यात आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसैन आणि राज बरार यांचा समावेश होता.
तर यादीत नाव पाहून शशी थरूर यांनीही प्रतिक्रिया दिली. एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “सध्याच्या घटनांबद्दल देशाची भूमिका मांडण्यासाठी भारत सरकारकडून आलेल्या निमंत्रणाने माझा सन्मान वाढला आहे.”
“राष्ट्रहितासाठी माझ्या सेवेची गरज असेल तर, मी कधीही मागे हटणार नाही,” असं ते पुढं म्हणाले.
भाजपने उपस्थित केले प्रश्न
जयराम रमेश यांच्या या पोस्टनंतर भाजपचे आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करत काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
“शशी थरूर यांचं वत्कृत्व, संयुक्त राष्ट्रांत काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आणि परराष्ट्र विषयातील त्यांचं सखोल ज्ञान यावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही.”
“असं असतानाही काँग्रेस पक्ष आणि विशेषतः राहुल गांधी यांनी अशा महत्त्वाच्या विषयावर भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशी पाठवल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी त्यांचं नाव का दिलं नाही?” असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
“ही असुरक्षिततेची भावना आहे? मत्सर आहे की, ‘हायकमांड’पेक्षा उजव्या असणाऱ्या लोकांप्रतीची असलेली असहनशीलता?”
तसंच भाजपचे नेते आणि आसमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते गौरव गोगाई यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
जयराम रमेश यांची एक्सवरची पोस्ट रिपोस्ट करत त्यांनी लिहिलं की, “पाकिस्तानमध्ये दोन आठवडे राहिल्याचे आरोप नाकारलेले नसलेल्या खासदाराचं (आसाममधून) नाव या यादीत नाव आहे.”
“राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं आणि पक्षातलं राजकारण वेगळं ठेवत मी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना विनंती करतो की, अशा संवेदनशील आणि धोरणात्मक कामात या व्यक्तीचा समावेश करू नये,” असंही त्यांनी पुढे लिहिलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC