Source :- BBC INDIA NEWS
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Twitter,
-
17 डिसेंबर 2024
अपडेटेड 20 डिसेंबर 2024
परभणी येथे 11 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार असल्याचं आणि मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (20 डिसेंबर) म्हटलं आहे.
दरम्यान, परभणीमध्ये 10 ते 15 डिसेंबरदरम्यान नेमकं काय घडलं? हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे? परभणीतल्या आंबेडकरी वस्त्यांमधील नागरिकांचं काय म्हणणं आहे? यासंदर्भात बीबीसी मराठीनं 16 आणि 17 डिसेंबर रोजी परभणीतून केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.
“माझ्या लेकराला मुद्दाम उचलून नेलं. उचलून नेऊन माझ्या लेकराला मारहाण केल्यात. माझ्या लेकराचा जीव घेतल्यात आणि जीव घेऊन मला फोन केल्यात.”
विजया व्यंकट सूर्यवंशी यांच्याशी 17 डिसेंबरला सकाळी आमची भेट झाली. त्या नुकतंच मुलाच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीतून राख सावडून परतल्या होत्या.
विजया सूर्यवंशी यांचा 35 वर्षांचा मुलगा सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झालाय. सोमनाथ वडार समाजातून येतो.
परभणीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात परभणी पोलिसांनी सोमनाथला अटक केली होती.
16 डिसेंबरच्या संध्याकाळी सोमनाथवर परभणीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘माझ्या लेकराला वकील व्हायचं होतं’
परभणीतल्या भीमनगर परिसरात आम्ही पोहचलो तेव्हा विजया यांना महिलांनी गराडा घातला होता. मुलाच्या मृत्यूचं दु:ख त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होतं.
विजया यांना तीन मुलं आहेत. त्यापैकी मोठा मुलगा सोमनाथ सूर्यवंशी हा परभणीत वकिलीचं शिक्षण घेत होता. परीक्षा असल्याकारणानं तो परभणीत आला होता.
विजया सांगतात, “सोमनाथ 5 तारखेला परभणीला आला. 10 तारखेपर्यंत आमचं फोनवर बोलणं झालं. पण 11 तारखेपासून 15 तारखेपर्यंत त्याचा फोन आला नाही. मी फोन केला तर तो लागला नाही.”
त्यानंतर मात्र सोमनाथच्या मृत्यूचीच बातमी विजया यांनी कळाली. सोमनाथला हार्ट अटॅक आल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं त्या म्हणतात. पण, पोलिसांच्या सांगण्यावर विजया यांना विश्वास नाहीये.
याचं कारण सांगताना त्या म्हणतात, “माझ्या लेकराला शिक्षण शिकायचं होतं. वकील व्हायचं त्याचं स्वप्न होतं. माझं तरणंताठ पोरगं होतं. माझं बाळ सुपारी खात नव्हता. ना तंबाखू खात होता. माझ्या लेकराला कसलाही आजार नव्हता.
“रिपोर्टमध्ये काय आलंय? मारहाण केल्यात. लेकराला गंभीर मार बसलाय. लेकराला अवघड ठिकाणी मारल्यात. मांड्या धरुन मारल्यात. डोक्याला मारल्यात. छाती धरुन दाबल्यात. माझ्या लेकराचा जीव घेतल्यात. हे रिपोर्टमध्ये आलंय.”
सोमनाथच्या मृतदेहाचं छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात 16 डिसेंबरला शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण ‘Shock following multiple injuries’ असं नमूद करण्यात आलंय.
10 ते 15 डिसेंबरदरम्यान काय झालं?
10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली.
ज्याने ही नासधूस केली ती व्यक्ती मनोरुग्ण आहे आणि त्याच्यावर कारवाई केल्याचं सांगण्यात आलं.
पण, संविधानाच्या प्रतीचं नुकसान केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी 11 डिसेंबरला शहरात बंद पुकारला. या बंदला हिंसक वळण लागलं.
शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनांनंतर पोलिसांनी काही जणांची धरपकड केली. सोमनाथ सूर्यवंशी यापैकी एक होता.
सोमनाथ दोन दिवस पोलीस कोठडीत होता. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 15 डिसेंबरच्या सकाळी छातीत कळ येत असल्याची तक्रार सोमनाथनं केली. त्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याठिकाणी त्याला मयत घोषित करण्यात आलं.
पण, सोमनाथचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचा सूर्यवंशी कुटुंबीयांचा आरोप आहे.
सोमनाथचा लहान भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी म्हणतो, “पोलिसांनी 3-4 दिवस़ माझ्या भावाला जबरदस्त मारहाण केलेली आहे. त्याच्या शरिरावरचे कपडे काढून त्याला मारण्यात आलेलं आहे. जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत त्याला मारायचं आणि मेडिकल करायचं, असं पोलीस करत होते.”
भीम नगरमध्ये काय घडलं?
16 डिसेंबरच्या दुपारी आम्ही भीमनगरला पाहोचलो. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ अनेक महिला-पुरुष एकत्र झाले होते. सोमनाथचा मृतदेह संभाजीनगरहून परभणीला आणला जात होता. त्याची ते वाट पाहत होते.
सुधाकर जाधव भीम नगरमध्ये राहतात. 11 तारखेच्या दुपारी काय घडलं, असं विचारल्यावर ते म्हणाले, “दुपारी 3 वाजता पोलीस आले. 5 जण बकाबका घरात घुसले. त्यांनी मुलाला बाहेर ओढीत नेले आणि त्याला दणादणा मारायला सुरुवात केली. जनावरावानी मारलं. मी त्याला सोडण्यासाठी त्याच्यावर पडलो तर त्यांनी मला बी मारायला सुरुवात केली.”
“माझ्या पोराला एवढं मारलं की एवढाले चमडे निघाले त्याचे चोमडे असे सोलल्यावानी निघाले. काठीचे वळ असेच आहेत. पाठीवर, डोक्यात मारलंय,” सुधाकर सांगतात.
सुधाकर यांनी मुलाला नाशिकला नातेवाईकाकडे उपचारासाठी पाठवलंय. सुधाकर यांच्या हातावरचे वळ अजूनही स्पष्ट दिसतात.
किडनीचं ऑपरेशन झाल्यामुळे घरीच असतो, बाहेर कुठं जात नाही, त्यादिवशीही आंदोलनात सहभागी नव्हतो, असं सुधाकर पुढे म्हणाले.
सुधाकर यांच्या पत्नीनेही त्यांना मांड्यांवर मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं.
सुशील कांबळे या भागातले नगरसेवक आहेत. ते म्हणाले, “महिलांच्या गुप्तांगावर मारहाण करण्यात आलीय. काही जणांना बेशुद्ध होईपर्यंत मारलं. एवढं क्रूरपणे पोलिसांनी मारलंय.”
सुशील यांच्याशी बोलत असताना एक महिला आमच्याकडे आली. त्या अंध होत्या. त्यांच्या मुलाला पाठीत आणि दंडावर मारहाण झाल्याचं त्या सांगत होत्या.
‘पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन कशासाठी केलं?’
परभणीतल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी आंबेडकरी आणि बौद्ध वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केल्याचा आणि तिथल्या नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते राहुल प्रधान सांगतात, “पोलिसांनी 11 तारखेला परभणीतल्या दंगलीनंतर आंबेडकरी, बौद्ध वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं. कोम्बिंग ऑपरेशन करत असताना जे निष्पाप आहे, ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही, अशा लोकांचे घर तोडले, दरवाजे तोडले. जो दिसेल त्याला मारलं, महिला सोडल्या नाही की लहान मुलं सोडले नाहीत.”
आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे सांगतात, “पोलिसांनी कोम्बिंग करून आंदोलनकर्त्यांच्या वस्त्यांमध्ये दहशत निर्माण केली. आंबेडकरी समाजाच्या वस्त्यांना टार्गेट करण्यात आलंय. सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला पोलिसांनी PCR मध्ये असताना 2 दिवस मारहाण केली. नंतर त्याला MCR ला पाठवण्यात आलं. पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या दहशतीखाली त्याचा मृत्यू झाला. याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे.”
दरम्यान, 16 डिसेंबरच्या रात्री ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे वाकोडे यांचं निधन झालं.
कोंबिंग ऑपरेशनमध्ये एखाद्या भागात किंवा वस्तीमध्ये दखलपात्र गुन्ह्यातील आरोपी राहत असतील तर त्या भागाला पोलिस वेढा घालतात, नियोजन करुन आरोपीचा शोध घेतात आणि त्याला ताब्यात घेतात, असं माजी आयपीएस अधिकारी शिरीष इनामदार सांगतात.
पोलीस प्रशासनाने आरोप फेटाळले
काल दुपारी साडेचारच्या सुमारास परभणी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आमची भेट नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याशी झाली. यादरम्यान त्यांनी पोलिसांवर होणारे आरोप फेटाळून लावले.
बीबीसी मराठीशी बोलताना उमाप म्हणाले, “पोलिसांनी कोम्बिंग केलं नाही. 11 तारखेला दगडफेक, जाळपोळीच्या घटनेमध्ये जी धरपकड केली त्यातलेच आरोपी अटकेत आहेत. 11 तारखेनंतर कुणालाही अटक केली नाही, पोलीस कुणाच्याही घरी गेले नाही. पोलिसांनी दहशत केली किंवा कोम्बिंग केलं असा काही प्रकार नाही.”
सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा आरोप केला जात आहे. यावर बोलताना उमाप म्हणाले, “याविषयी काही बोलू शकणार नाही. वैद्यकीय अहवालात स्पष्ट होईल. फार काही विश्लेषण करू शकणार नाही.”
परभणी हिंसाचारानंतर अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर आले. यापैकी एका व्हीडिओत पोलीस ऑटोरिक्षावर काठ्या मारताना दिसत आहेत. या व्हीडिओसोबत ही तोडफोड पोलिसांनी केली असे दावे केले जात आहेत.
याविषयी विचारल्यावर उमाप म्हणाले, “प्रत्येकच गोष्टीवर आम्ही रिअॅक्ट होऊ शकत नाही. आम्ही शांत आहोत. लोकांनीही संयमानं राहावं आणि अफवा पसरवू नये.”
‘पायापासून मानेपर्यंत मारहाण’
16 डिसेंबरच्या संध्याकाळी सोमनाथ सूर्यवंशीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
अंत्यसंस्कारानंतर आमची भेट वत्सलाबाई मानवटे यांच्याशी झाले. त्यांच्यावर सध्या परभणीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या हातावरचे मोठे व्रण अजूनही कायम आहेत.
वत्सलाबाई यांचा मुलगा संदीप मानवटे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाला, “माझी आई पोलीस कारवाईचा व्हीडिओ मोबाईलवर रेकॉर्ड करत होती. तो का केला म्हणून तिला मारहाण करण्यात आली. केसापासून तळपायापर्यंत पूर्णच मार आहे. एकही जागा अशी शिल्लक नाही की जिथं मार नाही. तिला सुंदरी आणि काठीनं मारलंय.”
वत्सलाबाई या परभणीतल्या प्रियदर्शिनी नगर भागात राहतात. मुक्कामार मोठ्या प्रमाणावर लागल्याचं त्या सांगत होत्या.
पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित
सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमॉर्टेम अहवालानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
माजी आयपीएस अधिकारी शिरीश इनामदार म्हणतात, “कस्टडीत असो की विदाऊट कस्टडी मारहाण योग्य नाहीच. एखाद्या ठिकाणी जमाव असेल तर तो पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातो. पण लाठीचार्ज करण्याआधी जाहीरपणे लाऊडस्पीकरवर सांगितलं जातं आणि मग लाठीचार्ज केला जातो.”
“एखादा जमाव पांगवताना तो हिंसाचार करणार नाही, याचीही पूर्वतयारी करावी लागते. जमाव पांगल्यानंतर लाठीचार्ज अयोग्य आहे. कारण जमाव पांगला याचा अर्थ धोका संपला असा होतो. घरातून पकडल्यावर मारहाण करण्याचा काहीही प्रश्न नाही, ते अवैध आहे. तो दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,” इनामदार पुढे सांगतात.
‘मोठ्याचं लेकरू मारलं असतं का?’
विजया सूर्यवंशी आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या म्हणतात, “आज जरी कुण्या मोठ्याचं लेकरु असतं तर मारलं असतं का? त्यांच्या पोटातल्या लेकराला मारतील का ते? मला न्याय पाहिजे आता. जे जे कुणी माझ्या लेकराचा घात केल्यात, त्यांची सगळ्याची वर्दी उतरवायचं. सगळ्यांना सस्पेंड करायचं आणि घरी पाठवायचं.”
“पोलीस कशासाठी असतात. लोकांच्या सुरक्षेसाठी असतात की लोकांना मारण्यासाठी, मर्डर करत फिरण्यासाठी असतात?,” प्रेमनाथ सवाल करतो.
दरम्यान, आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांकडून याप्रकरणी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये,
- या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा आणि न्यायालयीन चौकशी करावी.
- सोमनाथ आणि इतरांना मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करावी.
- सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारनं 50 लाखांची मदत द्यावी.
- सूर्यवंशी कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी.
- जखमींवर उपचार करावेत आणि त्यांना आर्थिक मदत करावी.
- पोलिसांच्या कारवाईत ज्यांचं नुकसान झालंय, त्यांना नुकसानीचा मोबदला द्यावा.
मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
परभणी येथे 11 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असं फडणवीसांनी म्हटलंय.
सोमनाथ यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचं त्यांच्या मेडिकल अहवालात नमूद असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं.
परभणी हिंसाचारादरम्यान, पोलीस अधिकारी अशोक घोरबान यांनी वाजवीपेक्षा अधिक पोलीस बळाचा वापर केला. त्यांची याप्रकरणी चौकशी केली जाईल, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन.)
SOURCE : BBC