Source :- BBC INDIA NEWS

सह्याड्रिया डेनिसोनी (रेडलाइन टॉर्पेडो बार्ब) हा लुप्त होण्याच्या मार्गावर असणारा मासा केरळ आणि कर्नाटकच्या दक्षिण भागातील नद्या आणि नाल्यांमध्ये सापडतो

फोटो स्रोत, Getty Images

पर्यावरण संवर्धन, हवामान बदल हे विषय आता ऐरणीवर आले आहेत. एरवी जंगलं, प्राणी, पक्षी यांच्या संवर्धनाची, संरक्षणाची चर्चा केली जाते, त्यासाठी योजनादेखील आखल्या जातात. मात्र तितक्याच किंवा त्याहूनही थोड्या अधिक महत्त्वाच्या असलेल्या माशांबद्दल मात्र अनास्थाच दिसून येते.

यासंदर्भात झालेल्या संशोधनावरील एका ताज्या अहवालातून पश्चिम घाटातील गोड्या पाण्यातील माशांच्या अनेक प्रजाती लुप्त होण्याचा धोका मांडण्यात आला आहे.

एकीकडे नदी आणि पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून माशांचं महत्त्व आहेच, परंतु त्याचबरोबर मानवी अन्न, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून देखील मासे अत्यंत महत्वाचे ठरतात. त्यामुळेच माशांच्या प्रजाती जर लुप्त झाल्या तर काय होणार हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात या अहवालात काय म्हटलं आहे ते जाणून घेऊया.

गोड्या पाण्यातील मासे धोक्यात असलेल्या जगातील तीन प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतातील पश्चिम घाटातील गोड्या पाण्यातील माशांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. आशियात गोड्या पाण्यातील माशांना सर्वाधिक धोका पश्चिम घाटात आहे.

एका प्रसिद्ध विज्ञान मासिकात प्रकाशित झालेल्या जागतिक मूल्यांकन अहवालातून ही बाब समोर आली आहे.

एट्रोप्लस कॅनेरेन्सिस ही पश्चिम घाटातील माशाची एक लुप्त होणारी प्रजाती आहे, हा मासा फक्त कर्नाटकात सापडतो

फोटो स्रोत, Beta Mahatvaraj

या अहवालानुसार, इंडोनेशिया, भारत आणि टांझानिया या तीन देशांमधील गोड्या पाण्यातील 25 टक्के जैव विविधता “लुप्त होण्याच्या प्रचंड धोक्याला” तोंड देते आहे.

गोड्या पाण्याच्या संकटग्रस्त प्रजातींची संख्या दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात आहे. दक्षिण भारतातील, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक ही राज्ये पश्चिम घाटाच्या क्षेत्रात येतात.

अॅमेझॉनचं खोरं, लेक व्हिक्टोरिया (हे महाकाय सरोवर केनिया, टांझानिया आणि युगांडामध्ये विस्तारलेलं आहे), लेक टिटिकाका (बोलिव्हिया आणि पेरू) आणि श्रीलंका या देशांमधील किंवा प्रदेशातील वेट झोन आणि पश्चिम घाटाचं पर्यावरण यात साम्य दिसून आलं आहे. ‘या सर्व प्रदेशांमध्ये गोड्या पाण्यातील माशांचा प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळतात, मात्र त्या धोक्यात आहेत.’

हा वायखोमिया सह्याद्रिएन्सिस (महाराजा बार्ब) मासा आहे, तो महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागातील नद्यांमध्ये सापडतो

फोटो स्रोत, Beta Mahatvaraj

याशिवाय लेक टिटिकाका, चिलीतील बायोबियो प्रदेश आणि द अजोरस (पोर्तुगाल) या प्रदेशातदेखील अशा प्रजातींची संख्या भरपूर आहे, ज्या “लुप्त होण्याचा मोठा धोका” आहे.

हा ‘मल्टी टॅक्सन ग्लोबल फ्रेशवॉटर जीव’ अभ्यास इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्न्हेशन ऑफ नेचर या संस्थेकडून करण्यात आला आहे. हा अहवाल ‘द नेचर’ या प्रसिद्ध आंतराष्ट्रीय विज्ञान मासिकात प्रकाशित झाला आहे.

जगभरातील एक हजारांहून अधिक संशोधक किंवा अभ्यासकांनी 20 वर्षांहून अधिक काळ केलेल्या कामातून हा अभ्यासपूर्ण अहवाल तयार झाला आहे.

राजीव राघवन, केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरिज अँड ओशन स्टडीजचे सहाय्यक प्राध्यापक आणि आययूसीएन फ्रेशवॉटर फिश स्पेशॅलिस्ट ग्रुपचे दक्षिण आशियाचे प्रमुख आहेत.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, “भारताच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वन्यजीव आणि जैव विविधतेशी निगडीत आपल्या बहुतांश योजना पूर्णपणे वाघ, हत्ती, गेंडा आणि पक्षी यासारख्या लक्ष वेधून घेणाऱ्या वन्यजीवांवर केंद्रित आहेत. या सर्व योजनांवर खूप अधिक लक्ष दिलं जातं, तसंच त्यावर खूप पैसा आणि साधनसंपत्ती खर्च केली जाते.”

“मात्र भारतात कोणताही मासा वाचवण्यासाठी किंवा त्याचं संवर्धन करण्यासाठी कोणतीही चांगली योजना नाही.”

लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या भारतीय प्रजाती

वेगवेगळ्या राज्यांमधून लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या गोड्या पाण्यातील माशांच्या काही प्रमुख प्रजातींचं नाव पुढीलप्रमाणे आहेत.

  • महाराष्ट्र : डेक्कन बार्ब आणि जेब्रा लोच.
  • केरळ : मलबार महासीर, रेडलाइन टॉर्पेडो बार्ब, ब्लॅक कॉलरेड कॅटफिश आणि पेनिनसुलर हिल बार्ब.
  • तामिळनाडू : डेव्हेरियो नीलघेरिएन्सिस, भवानी बार्ब आणि गर्रा कालाकाडेन्सिस.
  • कर्नाटक-तामिळनाडू : हम्पबॅक महासीर, नीलगिरी मिस्टस, हिप्सेलोबार्बस डबियस आणि केनेरा पर्लस्पॉट.

जगातील सर्वाधिक आयकॉनिक किंवा वैशिष्ट्यपूर्ण गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती पश्चिम घाटात सापडतात.

उदाहरणार्थ, हम्पबॅक्ड महासीर. हा एक आकारानं मोठा असलेला मासा असतो. त्याचं वजन 60 किलोपर्यंत असू शकतं. आययूसीएन रेड लिस्टमध्ये या माशाचा समावेश “गंभीररित्या लुप्त होण्याच्या मार्गावर” असलेला मासा म्हणून करण्यात आलं आहे.

हा लुप्त होण्याच्या मार्गावर असलेला ब्लॅक कॉल कॅटफिश (होराबाग्रस नायग्रीकोलारिस) मासा केरळमध्ये सापडतो

फोटो स्रोत, Beta Mahatvaraj

राघवन म्हणाले की, “हा मासा ज्या भागात आढळतो, त्या भागाला नदीतील योजना, वाळू, उत्खनन, या माशाची बेकायदेशीर शिकार आणि आक्रमक परदेशी प्रजातींपासून धोका आहे. त्यामुळेच हम्पबॅक्ड महासीर मासा जिथे आढळतो, त्या नदी आणि त्याच्या उपनद्यांचं संरक्षण करणं, या माशाचं अस्तित्व वाचवण्यासाठी महत्त्वाचं आहे.”

ते पुढे म्हणाले, “याशिवाय मासेमारीच्या नियमांव्यतिरिक्त परदेशी आक्रमक प्रजातींवर बंदी घालण्याचीही आवश्यकता आहे.”

राघवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, महासीर माशाप्रमाणे पश्चिम घाटात लुप्त होण्याचा धोका असलेल्या 30 ते 40 माशांच्या प्रजाती आहेत.

राघवन यांच्यानुसार, पश्चिम घाटात गोड्या पाण्यातील माशांच्या 300 हून अधिक प्रजाती आहेत. पश्चिम घाटात गोड्या पाण्यातील जलचरांचं प्रचंड वैविध्यं आहे.

आशिया खंडात हा एकमेव प्रदेश असा आहे, जिथे गोड्या पाण्यातील माशांच्या दोन फॅमिली राहतात. त्या दोन्हीही ग्राऊंड वॉटर आणि भूमिगत भागात राहतात.

पश्चिम घाटातील अनेक स्थानिक आणि गोड्या पाण्यातील लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या माशांच्या प्रजाती खूपच छोट्या भागात आढळतात. कधी-कधी हे मासे एकाच भागात किंवा एकाच नदीत असतात.

याचप्रकारे आययूसीएन रेड लिस्टमध्ये लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींमध्ये 23,496 जीव किंवा प्रजाती आहेत. यामध्ये डेकापोड क्रस्टेशियन्स सारख्या झिंगे, खेकडे, क्रेफिश आणि झिंगे, मासे आणि ओडोनेट्स (ड्रेगोन्फ्लाइज आणि डेमसेल्फिज) यांचा समावेश आहे.

या अहवालात म्हटलं आहे की प्रदूषण, धरण आणि ड्रेनेज, कृषी आणि आक्रमक प्रजातींबरोबरच खूप जास्त प्रमाणातील कापणीमुळे माशांच्या या प्रजाती लुप्त होण्याचा धोका आहे.

लाल रेष
लाल रेष

का निर्माण झाला आहे धोका?

राघवन सांगतात की, “या माशांचं वास्तव्यं असलेला भाग कमी होत जाणं किंवा त्याचं क्षेत्र आकसणं हा सर्वात मोठा धोका आहे. या भागाचं नुकसान अनेक कारणांनी होतं. उदाहरणार्थ, प्रदूषण करणाऱ्या गोष्टी वरून खालच्या बाजूस वाहून येतात. वरच्या भागात चहा, वेलची इत्यादीच्या बागा किंवा मळे असतात. तिथे कीटकनाशकांचा, रसायनांचा वापर केला जातो.”

ते पुढे म्हणतात, “नदीप्रवाहाच्या सुरुवातीपासून नदी समुद्राला मिळेपर्यंत प्रदूषण करणारे अनेक घटक नदीच्या पाण्यात मिसळलेले असतात. या घटकांचा संबंध उद्योग-कारखाने, कृषी आणि मानवी क्रिया या प्रदूषण करणाऱ्या गोष्टींशी असतो.”

जागतिक मूल्यांकन अहवाल म्हणतो, “जागतिक स्तरावर जैव विविधतेत घट होते आहे. विशेषकरून गोड्या पाण्यातील ईको-सिस्टम किंवा पर्यावरणावर याचा प्रतिकूल परिणाम होतो आहे.”

या अहवालानुसार, “जितक्या नैसर्गिक अंतर्गत वेटलॅंड म्हणजे पीटलॅंड, दलदलीचा प्रदेश, सरोवरं, नद्या, तलाव इत्यादींचा अभ्यास करण्यात आला, त्यातून ही बाब समोर आली की 1970 पासून 2015 पर्यंत 35 टक्के वेटलॅंड किंवा पाणथळीच्या जागा नष्ट झाल्या आहेत.”

सह्याड्रिया डेनिसोनी (रेडलाइन टॉर्पेडो बार्ब) हा लुप्त होण्याच्या मार्गावर असणारा मासा केरळ आणि कर्नाटकच्या दक्षिण भागातील नद्या आणि नाल्यांमध्ये सापडतो

फोटो स्रोत, Dencin Rons

अहवालानुसार, “जंगलाचं प्रमाण ज्या गतीनं कमी झालं आहे, त्याच्या तिप्पट वेगानं वेटलॅंड किंवा पाणथळीच्या जागा कमी झाल्या आहेत. आता वेटलॅंडचा जितका प्रदेश वाचला आहे, त्यामधील 65 टक्के प्रदेश असे आहेत ज्यांना मध्यम ते उच्च पातळीचा धोका आहे. याशिवाय पूर्णपणे मुक्तपणे न वाहणाऱ्या नद्यांचं प्रमाण 37 टक्के आहे.”

यासाठीचं दुसरं कारण “पायाभूत सुविधा” असल्याचं राघवन यांचं म्हणणं आहे. यात नद्यांवरील पूल, धरणं आणि कालवे यांचा समावेश आहे.

ते म्हणाले, “जर तुम्ही नदीचा, धरणाच्या पुढील किंवा खालचा भाग पाहिला तर तो बहुतांश कोरडा असल्याचं दिसून येईल. कारण धरणामुळे नदीचं पाणी मागच्या बाजूस अडवलं जातं.”

त्यामुळेच, “धरणाच्या खालच्या अंगास राहणारे लोक आणि जैवविविधता यावर नेहमीच प्रतिकूल परिणाम होतो. या कारणामुळेच मासे आणि इतर जलचर प्रजातींच्या नैसर्गिक अधिवासात घट होते आणि ते नष्ट किंवा लुप्त होतात.”

थोडक्यात याचा अर्थ असा आहे की माणसाच्या अस्तित्वासाठी ज्या संसाधनांची आवश्यकता आहे, ते सर्व गोड्या पाण्यातील जैव विविधतेच्या संरक्षणातील अडसर ठरत आहेत.

माणूस आणि प्राण्यांच्या संघर्षासारखंच हे आहे. यामुळे फक्त शेतकरी वर्गावरच परिणाम करत नाही तर शहरातील मानवी वस्त्यांवरदेखील त्याचा परिणाम होतो आहे. सध्या हा संघर्ष शहरं आणि महानगरांच्या परिघावर होतो आहे.

मोठं आव्हान

राघवन म्हणाले, “तुम्ही असं म्हणू शकता की वाघ किंवा हत्ती कोणत्याही मानवी गरजांसाठी आवश्यक नसतात. मात्र तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्ही मासे किंवा इतर जलचर पकडू शकत नाही, कारण ते सामुदायिक उद्दिष्टं पूर्ण करतात.”

ते पुढे म्हणाले, “या कामातून गरीब लोकांना अन्न मिळतं आणि रोजगार मिळतो. त्यामुळे यात संतुलन साधणं सर्वात कठीण काम आहे. गोड्या पाण्यातील जलचरांच्या संरक्षणाकडे लक्ष न देण्यामागचं हे देखील एक कारण आहे. तसंच बहुतांश लोक याबाबतीत सामाजिक दृष्टिकोनातून विचार करतात.”

ते असंही सांगतात की अन्न सुरक्षा आणि उदरनिर्वाहासाठी मासे महत्त्वाचा घटक आहेत.

याशिवाय ते पोषक तत्वांचा पुनर्वापर देखील करतात.

कार्ड

मासे पाण्याचं शुद्धीकरण करतात. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून माशांची भूमिका आहेच. त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टीकोनातून देखील ते महत्त्वाचे आहेत. कारण मानवी समाजाकडून त्यांना मोठी मागणी असते.

एकीकडे मासे आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत तर दुसरीकडे मासेमारी आणि माशांच्या विक्रीतून त्याचं अर्थव्यवस्थेत देखील महत्त्वाचं स्थान आहे.

राघवन या गोष्टीशी सहमत आहेत की, “सस्तन प्राणी आणि पक्ष्यांऐवजी, मासे आणि गोड्या पाण्यातील इतर जलचर हे उपजीविकेचं साधन आहेत, ही मुख्य चिंतेची बाब आहे.”

“त्यामुळेच माशांचं संरक्षण आणि त्यांच्यापासून होणारा उदरनिर्वाह यातील वादात संलुतन साधणं खूपच कठीण आहे.”

या अहवालात म्हटलं आहे की, “ज्या प्रदेशात मानवी समाज प्रोटीनशी संबंधित गरजांसाठी या माशांवर अवलंबून आहे, त्या भागात गोड्या पाण्यातील माशांचं संरक्षण करणं विशेषकरून महत्त्वाचं आहे. तसं झालं नाही तर, अन्न सुरक्षा, उदरनिर्वाह आणि त्याच्याशी निगडीत अर्थव्यवस्था यांच्याशी तडजोड करावी लागेल.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC