Source :- BBC INDIA NEWS

मृत हेमंत जोशी यांनी काल सकाळी पोस्ट केलेला फोटो. यात फिरायला गेलेले सर्व 9 जण आहेत.

22 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात डोंबिवलीच्या तीन मावस भावंडांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तर आहेच त्या बरोबर पीडित कुटुंबाचे शेजारी देखील हळहळले असून प्रचंड धक्क्यात आहेत.

“काल संध्याकाळी बेल वाजली आणि दारात अचानक न्यूज चॅनेलवाले आले. आम्ही विचारलं की, तुम्हाला खात्रीलायक माहिती आहे का? तेव्हा त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मृतांच्या यादीत अतुल मोने यांचंही नाव असल्याचं दाखवलं, तेव्हा आम्हाला धक्का बसला.”

“माझा खास भावासारखा मित्र यामध्ये मारला गेलाय,” असं म्हणताना महेश सुरसे यांचं वाक्य हुंदक्यांमध्ये विलीन झालं होतं.

महेश सुरसे हे अतुल मोने यांच्या बिल्डींगमध्ये राहणारे. गेल्या 25 वर्षांपासूनची त्यांची मैत्री.

पुढच्याच महिन्यात म्हणजेच 22 मे रोजी महेश सुरसेदेखील आपल्या कुटुंबीयांसमवेत काश्मीरला फिरायला जाणार होते. मात्र, आता त्यांनी आपलं हे नियोजन रद्द केलं आहे.

झालेल्या घटनेबाबतची भीती त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतीच; मात्र, त्याहून अधिक गडद होतं ते मित्राच्या जाण्याचं गहिरं दु:खं.

अतुल मोने (43) मध्य रेल्वेत सिनीयर सेक्शन इंजिनिअर म्हणून काम करत होते. ते पत्नी आणि 18 वर्षीय मुलीसह ते काश्मीरला गेले होते.

खरं तर अतुल मोने यांच्या जवळच्या नातेवाईकांचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे.

अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे तिघेही या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. हे तिघेही एकमेकांचे मावस भाऊ होते.

महेश सुरसे हे अतुल मोने यांच्या बिल्डींगमध्ये राहणारे. गेल्या 25 वर्षांपासूनची त्यांची मैत्री.

यातील संजय लेले यांचे नातेवाईक आणि शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, “संजय लेले माझे सख्खे मेहुणे आहेत. त्यांचा मुलगा आणि माझा भाचा हर्षल संजय लेले ह्याच्या हाताच्या बोटाला गोळी घासून गेली आहे. बाकी सर्व कुटुंबीय सुखरुप आहे. आम्ही पहाटेच्या फ्लाईटने तिकडे चाललो आहोत.”

कुटुंबातील 9 जण गेले होते काश्मीरला त्यातील तिघांचा मृत्यू

अतुल मोने यांची पत्नी अनुष्का मोने (35) आणि मुलगी रुचा मोने (18), संजय लेले (50) यांची पत्नी कविता लेले (46) आणि मुलगा हर्षल लेले (20) तर हेमंत जोशी यांची पत्नी मोनिका जोशी (41) आणि मुलगा ध्रुव जोशी (16) असं संपूर्ण कुटुंब काश्मीरला गेलं होतं.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी मृतांची नावे आहेत.

संजय लेले मुंबईतील एका फार्मा कंपनीत कामाला होते. त्यांचे चुलत बंधू कौशिक लेले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “आम्हाला काल रात्री कळालं. कुटुंबीयांना धक्का बसला. मन सून्न करणारी घटना आहे. आपण पर्यटनाला तिकडे जातो आणि असं काहीतरी होतं, हे दुर्देवी आहे.”

सध्या या कुटुंबीयांचे नातेवाईक पहाटेच्या फ्लाईटने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. त्यामुळे, सध्या डोंबिवलीतील त्यांच्या राहत्या घरी कुणीच नाहीयेत.

‘तुम्ही कोण आहात’ विचारलं मग गोळी झाडली

अतुल मोने यांचे साडू राहुल अकुल यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला.

ते म्हणाले की, “खरं तर काल संध्याकाळी साडेसहा वाजता बोलणं झालं होतं तेव्हा त्यांच्या मुलीनं सांगितलं की, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. मात्र, ती थोडीशी घाबरली होती. त्यानंतर फोन लागलाच नाही. आमचं बोलणंच झालं नाही.”

त्यानंतर न्यूजमधूनच ते गेल्याचं कन्फर्म झालं, असंही ते म्हणाले.

अतुल मोने यांचे साडू राहुल अकुल यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला.

पुढे ते म्हणाले की, एकूण 9 जण नातेवाईक फिरायला गेले होते. मुलीची बारावी झाली आहे, तर त्यानंतर फिरून एन्जॉय करायला म्हणून अतुल मोने आपल्या कुटुंबीयांसहित गेले होते. या नऊ जणांपैकी तीनजण जे पुरुष होते, फक्त त्यांनाच त्यांनी टार्गेट केलेलं आहे.”

“माझ्या पत्नीच्या बहिणीशी सकाळी सात वाजता बोलणं झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, माझ्यासमोरच गोळी झाडण्यात आली. आधी विचारलं की, तुम्ही कोण आहात? त्यानंतर जे संजय लेले होते, त्यांनी सांगितलं की, आम्ही यामध्ये इन्व्हॉल्व्ह नाहीत. त्यानंतर लगेच शूट केलं. आता असं कळलं की, लेलेंच्या डोक्यावरती आणि मोनेंच्या छातीवर गोळी मारण्यात आलीये.”

आता दीड वाजता एअर अॅम्ब्यूलन्सने ते निघत आहेत. दुसरी एक फ्लाईट नातेवाईकांसाठी आहे. साडे पाच वाजेपर्यंत ते पोहचतील, अशीही माहिती त्यांनी दिली.

‘मनामध्ये भीती बसलीये’

अतुल मोने यांचे शेजारी आणि मित्र महेश सुरसे सध्या धक्क्यात आहेत. सुरसे यांच्या पत्नी वनिता सुरसे यांच्या चेहऱ्यावरील भीती सुस्पष्टपणे दिसत होती.

त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या की, “आमचंही 22 तारखेला तिकडे जाण्याचं बुकींग होतं. हे सगळं पाहून आता आम्ही ते कॅन्सल केलंय. आम्हालाही प्रचंड मोठा धक्का बसला आहे. मनामध्ये भीती बसली. मला तर असं वाटतं की जोपर्यंत सरकार पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेत नाही, तोपर्यंत लोकांनी तिकडे जाऊच नये.”

सुरसे यांच्या पत्नी वनिता सुरसे यांच्या चेहऱ्यावरील भीती सुस्पष्टपणे दिसत होती.

महेश सुरसे म्हणाले की, “काल संध्याकाळी बेल वाजली आणि न्यूज चॅनेलवाले आले. आम्ही विचारलं की, तुम्हाला खात्रीलायक माहिती आहे का? तेव्हा त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मृतांच्या यादीत अतुल मोने यांचंही नाव असल्याचं दाखवलं. तेव्हा आम्हाला धक्का बसला. आमचा खास भावासारखा मित्र यामध्ये मारला गेलाय.”

पुढे आपला दाटून आलेला कंठ सावरत ते कसंबसं म्हणाले की, मोने यांच्या पत्नीचा फोन आला आणि त्यांनी आपल्याला काय माहिती दिली याबद्दल सुरसे यांनी सांगितले. “त्यांच्या मिसेसशी आमचं बोलणं झालं तेव्हा मलाही यातलं काही माहिती नाही, असं ती म्हणाली आणि ओक्साबोक्सी रडायला लागली. तिला फार सविस्तर काही विचारणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी सांत्वन करुन फोन ठेवला. त्याही सध्या श्रीनगरला आहेत.”

‘संज्याची यात काय चूक होती?’

संजय लेले यांचे मित्र प्रवीण राऊळ हे वर्तमानपत्र विक्रेते आहेत. अत्यंत उद्विग्नतेने ते बोलत होते.

ते सांगतात की, “मी आधी नाव वाचलं. मला वाटलं दुसरा कोणी संजय लेले असेल. पण फोटो पाहीला तर म्हटलं हा तर आपला संज्या आहे. मला खूप वाईट वाटलं. धक्का बसला.” असं ते भावनिक होऊन सांगतात.

प्रवीण राऊळ 1992 पासून वर्तमानविक्रेते म्हणून काम करत आहेत. आजपर्यंत त्यांनी देशासह राज्यातल्या अनेक मोठ्या बातम्या वर्तमानपत्र पोहचवताना पाहिल्या, वाचल्या. पण आज (23 एप्रिल 2025) पहाटे आपल्या लहानपणीच्या मित्राच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्र उघडताच समोर दिसेल असं त्यांना स्वप्नातही कधी वाटलं नाही.

संजय लेले यांचे मित्र प्रवीण राऊळ हे वर्तमानपत्र विक्रेते आहेत.

प्रवीण राऊळ हे संजय लेले यांचे 40-45 वर्षांपासूनचे मित्र आहेत. राऊळ यांचे लेले कुटुंब राहत असलेल्या इमारतीच्या अगदी समोर वर्तमानपत्र विक्रीचे स्टॉल आहे. त्यांच्याकडे मोबाईल नाही. घरी टिव्ही बंद. यामुळे काश्मीरमध्ये हल्ला झाल्याची बातमी प्रवीण राऊळ यांना 22 तारखेच्या रात्रीपर्यंत कळालेलीच नव्हती.

पहाटे त्यांनी वर्तमानपत्र उचलले. तेव्हा त्यांना हल्ल्याची बातमी तर कळाली पण आपला मित्र त्यात मरण पावला हे त्यांना कळाले नाही. त्यांनी स्टॉलवर वर्तमानपत्र रचायला घेतले. त्यात एका वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजवर संजय लेले यांचा फोटो त्यांनी पाहीला आणि त्यांना धक्का बसला.

ते म्हणाले, “20 दिवसांपूर्वीच मला चौकात भेटला होता. आम्ही लहानपणापासून बागशाळा मैदानात क्रिकेट खेळलोय. त्यांच्या घरी मी पेपरही पोहचवायचो. त्याचे आई-बाबा कायम घरात बोलावूनच पेपर द्यायचे. मला विश्वास बसत नाही,”

“सरकार सांगत होतं की काश्मीरमध्ये सर्वकाही ठीक आहे. म्हणून लोक तिकडे फिरायला जात होते. यावर सर्व पक्षांनी मिळून तोडगा काढला पाहिजे. निरपराध लोक यात गेले. संज्याची यात काय चूक होती?” उद्विग्नतेनं ते म्हणतात.

महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू

पहलगाममध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात महाराष्ट्रातील इतरही काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने डोंबिवली, पनवेल, नागपूर आणि पुणे या ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पहलगाममध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात महाराष्ट्रातील इतरही काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

सध्या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, रायगडमधील दिलीप देसले, ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

राज्यातील मृतांचे पार्थिव शरीर मुंबई आणि पुण्यात विमानाने आणले जाणार आहे. चार जणांचे पार्थिव शरीर मुंबईत येणार आहे तर दोन जण जणांचे पार्थिव शरीर पुण्यात आणले जाईल. या व्यतिरिक्त हल्ल्यात सुमित परमार, यतिश परमार या दोन जणांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव शरीर मुंबईत आणले जाणार आहे.

(या बातमीचे संपादन विनायक होगाडे यांनी केले आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC