Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Charles McQuillan

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या कट्टरतावादी गटानं स्वीकारल्याचा दावा काही भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला आहे.

टीआरएफ (TRF) ही पाकिस्तानस्थित कट्टरतावादी संघटना लष्कर-ए-तैयबाची एक शाखा असल्याचं सांगितलं जात आहे.

याबाबत त्यांनी दावा केलेलं निवेदन आम्ही पाहिले आणि ते टीआरएफने जारी केलेल्या मागील निवेदनांपेक्षा वेगळे आढळले. याआधीच्या अनेक हल्ल्यांमध्ये टीआरएफनं आपला सहभाग मान्य केला आहे.

या ताज्या निवेदनात टीआरएफ या नावाचा उल्लेख किंवा त्यांच्या गटाचा लोगो दिसत नाहीये. या गटानं भूतकाळात त्यांच्या निवेदनांमध्ये सातत्यानं याचा वापर केलेला दिसतो.

या निवेदनात हल्ल्याचं स्वरुप आणि हल्लेखोरांविषयीचा तपशीलही आढळून येत नाही. हल्लोखोर जिवंत आहे की फरार आहे, हे जिहादी गटाकडून साधारणपणे सांगितलं जातं.

भारताच्या इतर राज्यांतील स्थलांतरित कामगार, जम्मू काश्मीरमधील अल्पसंख्याक हिंदू समुदायातील लोकांवरील हल्ले यांसारख्या मोठ्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारण्याबाबतचे दावे टीआरएफने याआधी केले आहेत.

असं असलं तरी, टीआरएफनं भूतकाळात झालेल्या काही हल्ल्यांशी त्यांचा संबंध जोडल्यानंतर त्यास नकारही दिला आहे.

जून 2024 मध्ये, जम्मूच्या रियासी भागात हिंदू यात्रेकरुंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेला हल्ला टीआरएफनं केल्याचं स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी म्हटलं होतं.

या हल्ल्यानंतर झेलम मीडिया हाऊसनं टीआरएफच्या नावानं बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. पण टीआरएफनं एक निवेदन जारी करून या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचं म्हटलं होतं.

पहलगाममध्ये नेमकं काय घडलं?

पहलगामला ‘भारताचं स्वित्झर्लंड’ म्हटलं जातं. इथं भारत आणि जगभरातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात.

बीबीसीचे प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी गुजरातमधून आलेल्या पर्यटकाशी बातचित केली. पर्यटकांच्या ज्या गटावर हल्ला झाला होता, त्या गटामध्येच हा पर्यटकदेखील होता.

या पर्यटकानं सांगितलं की, “अचानक हल्ला झाल्यामुळे तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येकजण ओरडत, रडत तिथून पळू लागला.”

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातील नागपूरचं एक कुटुंब उपस्थित होतं. हे कुटुंब जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना नागपूरच्या या कुटुंबाने आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, “आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. तेथून बाहेर पडताना गोळीबारचा आवाज आमच्या कानावर पडला. या आवाजानं सर्वजण सैरावैरा पळायला लागले. आम्हीही मागे वळून न पाहता, तिथून कसंबसं बाहेर पडलो. या गोंधळात माझ्या पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.”

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

पहलगाममधील हल्ल्याच्या क्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर काहीजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी मृतांची नावे आहेत. पनवेलमधील एक तर पुण्यातील दोन जणांचा मृतांच्या यादीत समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर सशस्त्र हल्ला झाला आहे. अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, ‘सशस्त्र कट्टरतावाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे.’

पनवेलच्या दिलीप देसले (वय 60) यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोबत असलेले सुबोध पाटील (वय 42) हे जखमी असून त्यांच्यावर सध्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जगदाळे यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत.

हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने

या हल्ल्यावेळी एक नागपूरचे कुटुंबसुद्धा तिथे होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हेसुद्धा आहेत. तिघेही सुखरुप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरवण्यात येत आहे.

सध्या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, रायगडमधील दिलीप देसले, ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

पहलगाम आणि पर्यटक

अधिकृत आकडेवारीनुसार 2024 मध्ये 35 लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आणि मोठ्या संख्येनं लोक पहलगामलाही आले होते.

यातले बहुतांशजण मार्च ते जून या कालावधीत काश्मीरला भेट देतात. कारण या कालावधीत पहलगामचं सौंदर्य पाहण्याची संधी मिळते.

हे गाव आणि आसपासचा प्रदेश हिरवीगार कुरणं आणि सुंदर सरोवरांसाठी प्रसिद्ध आहे. इथला परिसर गर्द जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला आहे.

त्यामुळेच अनेकजण पहलगामला भारताचं स्वित्झर्लंड असंही म्हणतात. काश्मीर मधल्या पर्यटनाच्या दृष्टीनं पहलगाम अत्यंत महत्त्वाचं आहे.

हा प्रदेश हिंदू भाविकांच्या अमरनाथ यात्रेच्या वाटेवरचा सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

निसर्गानं पहलगामला भरभरून सौंदर्य दिलं आहे आणि या नेत्रदीपक परिसरात अनेक जागा पाहण्यासारख्या आहेत.

श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून पहलगाम हे 96 किलोमीटरवर आहे, असं अनंतनाग जिल्ह्याच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

तुम्ही रेल्वेनं प्रवास केला, तर उधमपूर आणि जम्मू इथे उतरून पुढे टॅक्सीनं पहलगामला जाता येतं. पहलगाम उधमपूरपासून 217 किलोमीटरवर तर जम्मूपासून 285 किलोमीटरवर आहे.

या परिसरात रस्त्यावरून दळणवळणाची चांगली सोय आहे. राज्याची बस सेवा आहे, तसंच श्रीनगर, जम्मू आणि अनंतनागमधून खासगी बसही उपलब्ध असतात. इथून टॅक्सीनंही पहलगामला जाता येतं.

काश्मीर टूरिझमच्या वेबसाईटवरील माहितीनुसार इथे स्नो लेपर्ड (हिमबिबट्या), आशियाई काळे अस्वल, लाल कोल्हा आणि कस्तुरी मृग अशा जंगली प्राण्यांच्या प्रजातींचा अधिवास आहे.

2011 च्या जनगणनेनुसार पहलगामची लोकसंख्या 9,264 एवढी आहे. पण आता ती 13,200 एवढी वाढल्याचा अंदाज आहे.

या परिसरात मुस्लीम बहुसंख्य (80%) आहेत, तसंच हिंदू (17%), शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि अन्य धर्मीय लोकही राहतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC