Source :- BBC INDIA NEWS

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वेन्स

फोटो स्रोत, Getty Images

1 तासापूर्वी

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला असताना आंतरराष्ट्रीय समुदाय आणि विशेषकरून अमेरिका काय भूमिका घेतं याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांनी पाकिस्तानचा सहभाग आणि पाकिस्ताननं भारताला सहकार्य करण्यासंदर्भात वक्तव्यं केलं.

त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा काय परिणाम होणार, जे डी वेन्स यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, अमेरिका पूर्णपणे भारताच्या पाठिशी उभी राहणार का, याचा भारताला काय फायदा होणार या मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वेन्स यांनी फॉक्स न्यूच्या एका कार्यक्रमात पहलगाम हल्ल्याबाबत महत्त्वाचं वक्तव्यं केलं. वेन्स यांनी या हल्ल्यासाठी एका मर्यादेपर्यंत पाकिस्तानला जबाबदार ठरवलं असून पाकिस्तान भारताला सहकार्य करेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

24 एप्रिलला दिलेल्या मुलाखतीत जे डी वेन्स म्हणाले की, अमेरिकेला आशा आहे की, अलीकडेच झालेल्या हल्ल्यानंतर ‘भारताकडून दिलं जाणारं उत्तर एका व्यापक प्रादेशिक संघर्षात रुपांतरीत होणार नाही.’

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात एका काश्मिरी पोर्टरसह (प्रवाशांचं सामान वाहणारा) 26 जण मारले गेले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर देताना भारतानं कित्येक दशकांपासूनचा सिंधू जल करार स्थगित केला. तर पाकिस्ताननं पाणी अडवण्याची किंवा वळवण्याची कोणतीही कृती म्हणजे ‘युद्ध’ मानलं जाईल, अशा इशारा दिला.

पहलगाम हल्ल्याच्या वेळेस अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स त्यांच्या कुटुंबासह भारत दौऱ्यावर होते.

फोटो स्रोत, Getty Images

जे डी वेन्स काय म्हणाले?

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, फॉक्स न्यूजच्या ‘स्पेशल रिपोर्ट विथ ब्रेट बेयर’ या कार्यक्रमात जे डी वेन्स म्हणाले, “या हल्ल्यासाठी पाकिस्तान ज्या कोणत्या मर्यादेपर्यंत जबाबदार असला तरी, भारताला सहकार्य करेल, अशी आम्हाला आशा आहे. जेणेकरून दहशतवाद्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करता येईल.”

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आयएसआयच्या प्रमुखांची नियुक्ती करण्याचं समर्थन केलं आहे.

फोटो स्रोत, AFP

“जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, विशेषकरून दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये, तेव्हा आम्ही त्यांच्या संपर्कात राहतो”, असंही वेन्स यांनी नमूद केलं.

22 एप्रिलला पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळेस जे डी वेन्स त्यांची पत्नी उषा वेन्स आणि मुलांसह भारताच्या दौऱ्यावर होते. हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला होता.

वेन्स यांच्या वक्तव्यावर भारतात काय प्रतिक्रिया उमटली?

एक दिवस आधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा फोन कॉल आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांच्या ताज्या वक्तव्याबद्दल भारतात अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार आणि जेएनयूमधील प्राध्यापक अमिताभ मट्टू यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, “जे डी वेन्स यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे की, दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या योग्य प्रतिक्रियेसाठी पूर्ण पाठिंबा आणि पाकिस्ताननं त्यांच्या भूमीवरील सक्रिय दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी. तसंच अशी आशा व्यक्त केली की यातून व्यापक प्रादेशिक संघर्ष सुरू होणार नाही.”

वरिष्ठ पत्रकार सिद्धांत सायबल यांनी एक्सवर लिहिलं, “भारत-पाकिस्तान तणावासंदर्भात अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांनी भारताला सांगितलं आहे की, या कट्टरतावादी हल्ल्याच्या विरोधात कारवाई करताना व्यापक स्वरुपाचा प्रादेशिक संघर्ष व्हायला नको.”

“तसेच पाकिस्तानला सांगितलं आहे की, त्यांनी भारताला सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांना अटक करता येईल.”

वरिष्ठ पत्रकार गीता मोहन यांनी एक्सवर लिहिलं, “भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. या गोष्टीची अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांना चिंता वाटते. त्यांना वाटतं आहे की, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पाकिस्ताननं भारताला सहकार्य करावं.”

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी फोनवर बोलणं झाल्याची माहिती दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

‘मोदी और इंडिया’ या पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार राहुल शिवशंकर यांनी एक्सवर लिहिलं, “पहलगामचा हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स भारतातच होते. त्यांनी भारतीय आदरातिथ्याचा आनंद घेतला. मात्र एक आठवड्यानंतर देखील ते पाकिस्तानला विनाअट दोषी ठरवू शकलेले नाहीत.”

“त्याऐवजी त्यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तान ज्या कोणत्या मर्यादेपर्यंत जबाबदार असेल, तरी त्यानं भारताला सहकार्य केलं पाहिजे.”

सुशांत सरीन संरक्षण तज्ज्ञ आहेत आणि ऑब्झर्व्ह रिसर्च फाऊंडेशनमध्ये सीनियर फेलो आहेत.

त्यांनी याला उत्तर देताना एक्सवर लिहिलं, “आपण कोणत्या गोष्टीची तक्रार करत आहोत? आपण वैयक्तिक गोष्टींची राजकीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांशी सरमिसळ करतो आणि स्वत:लाच मूर्ख ठरवतो. गोरे लोक जास्त समजदार आणि व्यावसायिक असतात?”

व्यूहरचनात्मक बाबींचे जाणकार असलेल्या ब्रह्म चेलानी यांनी एक दिवस आधी एक्सवर लिहिलं होतं की, राजनयिकदृष्ट्या तटस्थ दिसण्याचा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा प्रयत्न आहे. हा ‘दहशतवादी हल्ल्याचं गांभीर्य’ आणि ‘जबाबदारी निश्चित करण्याचं’ महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री काय म्हणाले?

1 मे रोजी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेट यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली. पीट हेगसेट म्हणाले, “अमेरिका भारतासोबत आहे आणि भारताच्या आत्मरक्षणाच्या अधिकाराला पाठिंबा देते.”

भारतीय संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाकडून एक्सवर देण्यात आलेल्या एका वक्तव्यानुसार, “पीट हेगसेट यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या प्रयत्नांना अमेरिकाचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला. तसंच पहलगाममधील हल्ल्यात झालेल्या मृत्यूंबद्दल शोक व्यक्त केला.”

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

या वक्तव्यात म्हटलं, “त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांना हेदेखील सांगितलं की दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणं, प्रशिक्षण देणं आणि त्यांना आर्थिक मदत करण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं दहशतवादाच्या घृणास्पद कृत्यांचा स्पष्टपणे आणि एकजुटीनं निषेध केला पाहिजे.”

30 एप्रिलला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली होती आणि तणाव कमी करण्यावर भर दिला होता. तसंच ‘जबाबदार तोडगा’ काढण्याचं आवाहन केलं होतं.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या वरिष्ठ नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. तसंच हा हल्ला ‘दहशतवादी’ आणि ‘अविवेकी असल्याचं’ म्हटलं.

‘भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे’

पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी पुन्हा एकदा म्हटलं, ‘भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे, याची पाकिस्तानकडे अत्यंत विश्वासार्ह आणि प्रामाणिक गुप्तचर माहिती होती.’

दोन दिवस आधी अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्रीनंतर घाईघाईनं एक वक्तव्यं जारी केलं होतं की ’24 ते 36 तासांमध्ये पाकिस्तानवर हल्ला करण्याची भारताची योजना आहे.’

आता, सीएनएन या अमेरिकेच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तरार यांनी ही गुप्तचर माहिती उघड करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

ते म्हणाले, “मी योग्य वेळी आंतरराष्ट्रीय समुदायाला ही माहिती दिली. जेव्हा तुम्ही योग्य वेळी जगाला माहिती देता, तेव्हा ही गोष्ट हल्ला रोखण्याचं एक साधनदेखील ठरते.”

सीएननवरील कार्यक्रमाच्या होस्ट बेकी अँडरसन यांनी विचारलं की, ही माहिती उघड केल्यामुळे भारतीय हल्ल्याची शक्यता कमी झाली का?

त्यावर तरार म्हणाले, “कोणालाही थांबवण्याचे तीन मार्ग असतात. पहिला तुमची क्षमता, दुसरा राष्ट्राचा दृढनिश्चय आणि तिसरा माहिती मिळवत राहणं, तुमच्या नागरिकांना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती देणं.”

पाकिस्तान प्रदीर्घ काळापासून पाश्चिमात्य देशांचा व्यूहरचनात्मक सहकारी राहिला आहे. मात्र अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतल्यानंतर आता पाकिस्तानचं महत्त्व कमी झालं आहे.

त्याउलट चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी आता भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी झाला आहे.

पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार

फोटो स्रोत, Getty Images

पहलगाममधील हल्ल्यासाठी भारतानं पाकिस्तानला जबाबदार ठरवलं आहे. तर पाकिस्ताननं मात्र या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे आणि तटस्थ तपास करण्यात भारतानं सहकार्य करावं अशी मागणी केली.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, ते दक्षिण आशियातील दोन अण्वस्त्रसज्ज शेजारी देशांशी (भारत आणि पाकिस्तान) अनेक पातळ्यांवर संपर्कात आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याबद्दल बोलले आहेत. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्ताननं म्हटलं आहे की, भारताकडून लष्करी कारवाई केली जाण्याची शंका आहे.

भारतानं अनेक दशकं जुन्या सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे. भारतानं म्हटलं आहे की, पाकिस्तानात एक थेंब पाणीदेखील जाऊ दिलं जाणार नाही.

तर त्यावर पाकिस्ताननं म्हटलं आहे की, जर भारतानं पाकिस्तानात येणारं पाणी अडवलं, तर त्याकडे ‘युद्ध’ म्हणून पाहिलं जाईल.

दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी आपापलं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. भारताच्या पंतप्रधानांनी भारतीय सैन्याला लष्करी कारवाईची पूर्ण मोकळीक दिली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC