Source :- BBC INDIA NEWS

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात अनेक पावलं उचलत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

26 मिनिटांपूर्वी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्यानं वाढतो आहे. भारतानं आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

भारताच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडनं (डीजीएफटी) पाकिस्तानकडून होणाऱ्या सर्व आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

पाकिस्तानच्या जहाजांना भारताच्या बंदरात प्रवेश दिला जाणार नाही, असा आदेश डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंगनं दिला आहे.

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात विविध पावलं उचलली आहेत. भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. त्यानंतर या दोन्ही देशांनी एकमेकांसाठी हवाई क्षेत्रदेखील बंद केलं आहे.

डीजीएफटीनं 2 मे रोजी नोटिफिकेशन जारी करत म्हटलं, “पाकिस्तानकडून होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ प्रभावानं बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

3 मे रोजी डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंगनं सांगितलं, “मर्चंट शिपिंग अॅक्ट 1958 च्या कलम 411 चा वापर करून हा आदेश देण्यात येतो आहे. पाकिस्तानचा झेंडा लावलेल्या जहाजाला भारताच्या कोणत्याही बंदरात येण्याची परवानगी दिली जाणार नाही.”

“तसंच, भारताचा झेंडा असलेलं कोणतंही जहाज पाकिस्तानच्या कोणत्याही बंदरात जाणार नाही.”

22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यात 26 जण मारले गेले होते आणि अनेकजण जखमी झाले होते.

व्यापारात सातत्यानं होते आहे घसरण

तसं, पाहता भारत आणि पाकिस्तानात ऐतिहासिकदृष्ट्या फारसा व्यापार होत आलेला नाही. विशेषकरून सागरी मार्गानं दोन्ही देशांमध्ये मर्यादित आणि प्रतिकात्मकच व्यापार होत आला आहे.

दोन्ही देश अरब समुद्रातून सागरी व्यापार करतात. मात्र, सुरक्षेच्या कारणांमुळे आणि राजनयिक तणावांमुळे दोन्ही देशांमधील व्यापारी जहाज एकमेकांच्या बंदरांपासून नेहमीच लांब राहिली आहेत.

आकडेवारीतूनही दिसतं की, गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारात सातत्यानं घसरण झाली आहे.

भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारतानं पाकिस्तानकडून 4 लाख 20 हजार डॉलर किंमतीच्या मालाची आयात केली आहे.

तर त्याआधीच्या वर्षी म्हणजे एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत भारतानं पाकिस्तानकडून जवळपास 28 लाख 60 हजार डॉलर किमतीच्या मालाची आयात केली होती.

दोन्ही देशांमधील निर्यातीबद्दल सांगायचं तर एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारताकडून पाकिस्तानला होणारी निर्यात घटून 44.765 कोटी डॉलरवर आली आहे.

तर एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान भारताकडून पाकिस्तानला 1.1 अब्ज डॉलर किमतीच्या मालाची निर्यात झाली होती.

भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सातत्यानं कमी होत गेला आहे

फोटो स्रोत, Getty Images

अजय श्रीवास्तव भारत सरकारच्या परराष्ट्र व्यापार संचालनायलयात अॅडिशनल डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड (एडीजीएफटी) या पदावर होते. अजय श्रीवास्तव म्हणाले की, पाकिस्तानातून भारतात होणाऱ्या आयातीवरील बंदीचा निर्णय प्रतिकात्मक आहे.

ते म्हणाले, “2019 मध्ये पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर 200 टक्के आयात शुल्क लावलं होतं.”

अजय श्रीवास्तव म्हणतात, “भारत पाकिस्तानकडून 4 लाख डॉलर किमतीच्या मालाची आयात करत होता. आता ही आयात शून्य होईल. भारतीय लोक पाकिस्तानातील वस्तूंचा वापर करतच नाहीत. सैंधव मीठ सोडून उर्वरित कोणत्याही गोष्टीवर याचा परिणाम होणार नाही.”

दोन्ही देशात कोणत्या मालाची आयात-निर्यात होते?

पाकिस्तानातून भारतात आयात होणाऱ्या प्रमुख गोष्टींमध्ये तांबं, तांब्याच्या वस्तू, कापूस, फळं, सुकामेवा, मीठ, ऑर्गेनिक केमिकल्स, लोकर यांचा समावेश आहे.

पाकिस्तानातून भारतात सैंधव मीठ येतं.

फोटो स्रोत, Getty Images

तर भारताकडून पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या मालात कापूस, ऑर्गेनिक केमिकल्स, कॉफी, चहा, मसाले, प्लास्टिकच्या वस्तू, डेअरी उत्पादनं, औषधं, तेलबिया आणि जनावरांच्या चाऱ्याचा समावेश आहे.

भारतानं आधी काय पावलं उचलली आहेत?

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात अनेक कठोर पावलं उचलली होती.

भारतानं पाकिस्तानबरोबरचा 1960 चा सिंधू जल करार तात्काळ प्रभावानं स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतानं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद केली आहे

फोटो स्रोत, Getty Images

तसंच भारतानं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट देखील तात्काळ प्रभावानं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याव्यतिरिक्त सार्क व्हिसा एक्झम्पशन स्कीम (एसव्हीईएस) अंतर्गत मिळालेल्या व्हिसाच्या आधारे पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करता येणार नाही.

पाकिस्तानातून येणाऱ्या विमानांसाठी भारतानं हवाई क्षेत्र बंद केलं आहे.

पाकिस्ताननं काय पावलं उचलली?

भारतानं पाकिस्तानविरोधात पावलं उचलल्यानंतर पाकिस्ताननं देखील त्याला प्रत्युत्तर देत पावलं उचलली आहेत.

पाकिस्ताननं भारताच्या मालकीची किंवा भारताकडून संचालित सर्व एअरलाईन्ससाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद केलं आहे.

त्याचबरोबर वाघा सीमा देखील बंद केली आहे.

शीख यात्रेकरून सोडून पाकिस्ताननं सार्क व्हिसा योजनेअंतर्गत भारतीय नागरिकांना देण्यात आलेले सर्व व्हिसा स्थगित केले आहेत आणि म्हटलं आहे की त्यांना रद्द मानलं जाईल.

भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा इशारा

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला इशारा दिला आहे. पाकिस्तानचं पाणी थांबवण्यासाठी किंवा दुसऱ्या दिशेला वळवण्यासाठी भारतानं काही बांधकाम किंवा संरचना उभी केली तर ती उद्ध्वस्त केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पाकिस्तानच्या एका खासगी वृत्तवाहिनीच्या ‘नया पाकिस्तान’ नावाच्या एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले, “सिंधू जल कराराचं उल्लंघन करून भारतानं पाणी थांबवण्यासाठी किंवा त्याची दिशा वळवण्यासाठी काही बांधकाम केलं, तर तो पाकिस्तानविरोधातला हल्ला मानला जाईल. ते बांधकाम आम्ही नष्ट करू.”

पाकिस्तानचे सुरक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला इशारा दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

“सिंधू जल कराराचं उल्लंघन करणं सोपं नाही. ती पाकिस्तानविरोधातल्या युद्धाची घोषणा असेल. युद्ध फक्त तोफा किंवा बंदुक चालवण्यापर्यंत मर्यादीत नसतं. त्याची अनेक रूपं असतात. त्यातलंच हेही एक. त्याने देशातले लोक भुकेनं किंवा तहानेनं व्याकूळ होऊन मरू शकतात.”

22 एप्रिलला भारतातल्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कडक पावलं उचलली आहेत. त्यात 1960 च्या सिंधू जल करार बरखास्त करण्याचाही समावेश आहे.

यापुर्वी सिंधू जल करारावर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनीही वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

‘सिंधू नदीत एकतर पाणी वाहत राहील किंवा त्यांचं रक्त’ असं ते पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या सुक्खरमध्ये आयोजित केलेल्या एका रॅलीत म्हणाले होते.

त्यावर केंद्रातले मंत्री हरदीप सिंह पुरी आणि केंद्रीय जल शक्ती मंत्री सीआर पाटील समवेत अनेक मोठ्या नेत्यांनी कडक प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

पण बीबीसीशी बोलताना बिलावल भुट्टो यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. रॅलीत बोलताना सामान्य पाकिस्तानी जनतेच्या भावनाचं प्रतिनिधत्व करत असल्याचं ते म्हणाले.

भारतावर वाढला आंतरराष्ट्रीय दबाव

जिओ न्यूज कार्यक्रमात पाकिस्तानचे सुरक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं, “गेल्या काही दिवसांत सिंधू जल कराराचं भारताने एकतर्फी उल्लंघन केल्याचा मुद्दा पाकिस्तानने विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर मांडला आहे.”

ते पुढे म्हणाले की, भारताने पहेलगाम घटनेबाबत अद्याप कोणताही पुरावा दिलेला नाही.

यावेळी त्यांनी 14 फेब्रुवारी 2019 ला झालेल्या पुलवामा हल्ल्याचीही आठवण काढली. त्यावेळी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 हून अधिक जवानांचा मृत्यू झाला होता.

त्यावेळीही भारताने 12 दिवसांनंतर या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं, असं ख्वाजा आसिफ सांगत होते. त्यामुळे आत्ताही दोन्ही देशांमधे निर्माण झालेला युद्धाचा धोका टळला किंवा कमी झाला असं इतक्यात म्हटलं जाऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.

गेल्या काही दिवसांत भारतावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दबाव वाढत आहे, असंही ख्वाजा आसिफ पुढे म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे.डी. वेन्स यांनी भारताचं समर्थन केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

गुरूवारी झालेल्या एका मुलाखतीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वेन्स पहलगाम हल्ल्याबाबत बोलले होते.

फॉक्स न्यूजच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पहलगाम हल्लासाठी पाकिस्तानला काही अंशी जबाबदार ठरवलं होतं. पाकिस्तान भारताला हल्लेखोर शोधण्यासाठी आवश्यक ती मदत करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.

“भारत पाकिस्तानला उत्तर देताना असा मार्ग निवडेल, जो व्यापक प्रादेशिक संघर्ष टाळू शकेल,” असंही ते म्हणाले होते.

ते पुढे म्हणाले, “आम्ही अशी अशा करतो की, पाकिस्तान, या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हल्लेखोरांना शोधण्यासाठी आणि पकडण्यासाठी भारताला सहकार्य करेल.”

त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारल्यानंतर ख्वाजा आसिफ म्हणाले, “जे. डी. वेन्स यांनी भारताला त्यांची प्रतिष्ठा वाचवण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. भारताला काही करायचं असेल, तर तो पाऊलं उचलू शकेल.”

शिवाय, हे अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांचं खासगी वक्तव्य असू शकतं. कारण धोरणात्मक वक्तव्य तर व्हाईट हाऊसच्या माध्यमातून जाहीर केलं जातं, असंही ख्वाजा यांनी सांगितलं.

22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्लावेळी वेन्स त्यांची पत्नी उषा वेन्स आणि मुलांसोबत भारताच्या दौऱ्यावरच होते. हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांप्रती त्यांनी सहानुभूती व्यक्त केली होती.

भारतावर दबाव वाढवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियासह अन्य देशांना वाढता तणाव कमी करण्यासाठी पावलं उचलण्याचं आव्हान केलं आहे. या देशांनी भारतावर दबाव टाकावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

रेडिओ पाकिस्तानने सांगितल्याप्रमाणे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शुक्रवारी इस्लामाबादमध्ये सौदी अरेबियाचे राजदूत नवाब विन सईद अल मालिकी यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केली.

शहबाज शरीफ

फोटो स्रोत, Getty Images

काश्मीरमध्ये पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर दक्षिण आशियातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर पाकिस्तानचा दृष्टीकोन सांगताना शहबाज शरीफ म्हणाले, “दहशतवाद कुठलाही असो पाकिस्तान त्याचा विरोधच करतं.”

शहबाज शरीफ यांनी शुक्रवारी युएईचे राजदूत हम्माद अबीद इब्राहिम सालिम अल-जाबी यांचीही भेट घेतली. ते म्हणाले, “पाकिस्तानलाही दहशतवादानं खूप पिडलं आहे.”

शुक्रवारीच ते कुवैतचे राजदूत नासिर अब्दुल रहमान जासर यांनाही भेटले. दहशतवादाविरोधात पाकिस्तानने पुकारलेल्या युद्धात गेल्या काही वर्षात 90 हजाराहून अधिक लोक मृत्यूमुखी पडल्याचं शरीफ सांगत होते.

त्यामुळे, पाकिस्तानने आत्तापर्यंत 152 अब्ज डॉलर्सचं नुकसान सोसल्याचंही त्यांनी सांगितलं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलीकडच्या घडामोडी

पहलगाम हल्लानंतर भारताने उचलेल्या कडक पावलांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही जोरदार प्रतिक्रिया दिली. भारत आता पाकिस्तानच्या हद्दीतील हवाई मार्गाचा वापर करू शकणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

भारताला पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरू दिले जाणार नाही आणि 1972 चा शिमला करार तात्पुरता स्थगित करण्यात येईल अशा दोन घोषणा पाकिस्तानने केल्या.

पहलगाम हल्ल्याचा परिणाम म्हणून भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने (पीबीए) गुरुवारी, पाकिस्तानातील एफएम रेडिओवर भारतीय गाणी प्रसारित करण्यावर बंदी घातली.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिकेच्या सुरक्षा मंत्र्यांसोबत फोनवर चर्चा केली.

फोटो स्रोत, Getty Images

हा निर्णय संपूर्ण देशाच्या सामूहिक भावना आणि एकजुटीचं प्रतीक असल्याचं पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटलंय.

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार म्हणाले, “मी पीबीएच्या या निर्णयाचं मनापासून कौतुक करतो. या संवेदनशील काळात आपण देशाच्या एकतेसाठी एकत्र उभे आहोत आणि सामान्य नागरिकांच्या भावनांचा आदर करत आहोत हेच यातून दिसतं.”

“राष्ट्रहितासाठी उचललेल्या या पावलाचा आम्हाला अभिमान आहे,” ते म्हणाले.

दरम्यान भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं सोशल मीडिया अकाऊंटही ब्लॉक केलं आहे. याशिवाय, शरीफ यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेल आणि इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरही भारतात बंदी घातली आहे.

याआधी भारताने काही पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि अभिनेत्यांच्या अकाऊंटवरही बंद घातली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC