Source :- BBC INDIA NEWS

ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपाखाली पोलीस रिमांडमध्ये पाठवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Travel With Jo/Instagram

1 तासापूर्वी

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी या आठवड्यात ज्या लोकांना अटक केली आहे, त्यात हरियाणाची ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर, ज्योती मल्होत्राचा देखील समावेश आहे.

ज्योतीच्या विरोधात ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 152 अंतर्गत (भारताचं सार्वभौमत्व, ऐक्य आणि अखंडतेला धोका निर्माण करणारं कृत्य केल्याबद्दल) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अटक झाल्यापासून ज्योतीच्या पाकिस्तान प्रवासाची खूपच चर्चा होते आहे. याशिवाय तिचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे. गेल्या वर्षी भारतात झालेल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या डिनर पार्टीचा हा व्हिडिओ आहे.

सोशल मीडियावर ज्योती मल्होत्रा किती लोकप्रिय?

‘ट्रॅव्हल विथ जो’ असं ज्योती मल्होत्राच्या युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्राम पेजचं नाव आहे.

तिच्या युट्यूब चॅनलचे 3.79 लाखांहून अधिक सबस्क्राईबर आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे 1.40 लाख फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर 3.22 लाख फॉलोअर्स आहेत.

ज्योतीच्या चॅनलवर देश-परदेशातील प्रवासाचे व्हिडिओ टाकतात. तिच्या चॅनलवर आतापर्यंत 400 हून अधिक व्हिडिओ टाकण्यात आले आहेत.

देशातील विविध राज्यांमधील प्रवासांच्या व्हिडिओपासून ते परदेश प्रवासाचे अनेक व्हिडिओ तिने तिच्या चॅनलवर पोस्ट केले आहेत.

ज्योती मल्होत्राचं युट्यूब चॅनल

फोटो स्रोत, Youtube

या व्हिडिओंमध्ये ज्योती एखाद्या ठिकाणाला भेट देते किंवा तिथे वेगवेगळ्या गोष्टी शोधते आणि त्याची माहिती तिच्या व्ह्यूअर्सना देते.

या व्हिडिओमध्ये ती प्रवासासाठी येणाऱ्या खर्चापासून ते त्या ठिकाणाचं वैशिष्ट्यं, तिथली स्थानिक बाजारपेठ, वेगवेगळ्या वस्तूंची किंमत याबद्दल सांगते.

तिनं इंडोनेशिया, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात, थायलंड, भूतान, नेपाळ आणि चीनमध्ये प्रवास केला आहे. त्याचे व्हिडिओ तिच्या चॅनलवर आहेत.

तिच्या चॅनलवर टाकण्यात आलेला सर्वात ताजा व्हिडिओ, इंडोनेशियातील प्रवासाचा आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यात ज्योती मल्होत्रा पाकिस्तानात गेली होती. यादरम्यान तिनं अनेक व्हिडिओ आणि रील तिच्या चॅनवर अपलोड केले आहेत.

पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या डिनर पार्टीचा व्हिडिओ चर्चेत

या व्हिडिओच्या सुरुवातीला ज्योती मल्होत्रा सांगते की, तिला ‘नॅशनल डे ऑफ पाकिस्तान’च्या कार्यक्रमाच्या इफ्तार डिनर पार्टीचं विशेष आमंत्रण मिळालं आहे.

या व्हिडिओमध्ये ज्योती एका व्यक्तीला भेटते. त्या व्यक्तीला ज्योती ‘दानिश जी’ म्हणते. ही व्यक्ती इतर लोकांशी ज्योतीचा परिचय युट्यूबर म्हणून करून देते.

भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या डिनर पार्टीमध्ये ज्योती मल्होत्राचा एक फोटो

फोटो स्रोत, @TravelwithJo/Youtube

व्हिडिओमध्ये दिसतं की, ज्योती, पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाचे अधिकारी आणि समारंभात सहभागी झालेले इतर युट्यूबर्स आणि इतर पाहुण्यांना भेटतात. त्याचबरोबर ती या लोकांबद्दल तिच्या फॉलोअर्सला देखील माहिती देते.

ज्योती मल्होत्राला रिमांडमध्ये घेतल्यानं गेल्या वर्षीचा तिचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

बीबीसी प्रतिनिधी कमल सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिस्सारचे डीएसपी कमलजीत यांनी सांगितलं, “आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही निसारची रहिवासी ज्योती मल्होत्राला ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट आणि बीएनएसच्या कलम 152 अंतर्गत अटक केली आहे.”

पोलिसांचं म्हणणं आहे की, ज्योती सातत्यानं एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होती.

चौकशी करताना यासंदर्भात तिला अधिक माहिती विचारली जाईल.

हिस्सारचे एसपी शशांक कुमार यांनी रविवारी (18 मे) प्रसारमाध्यमांना सांगितलं की, “आधुनिक युद्ध फक्त सीमेवरच लढलं जात नाही. एक नवीन पद्धत ज्याची आम्हाला माहिती मिळाली आहे ती म्हणजे पीआयओ काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची भरती करण्याचा प्रयत्न करत आहे.”

“तिथे ते सॉफ्ट पॉवरचा वापर त्यांची भूमिका किंवा नरेटिव्ह पुढे नेण्यासाठी करत आहेत.”

त्यांनी सांगितलं की, “याचसंदर्भात आम्हाला केंद्रीय यंत्रणांकडून इनपूट मिळालं आणि आम्ही ज्योती मल्होत्राला अटक केली. ज्योती पीआयओच्या संपर्कात होती. ती अनेकवेळा पाकिस्तानातदेखील गेली आहे आणि एकदा चीनला गेली आहे.”

“आम्ही तिला पाच दिवसांच्या रिमांडवर घेतलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांबरोबर आम्ही तिच्या आर्थिक बाबी आणि प्रवासाबद्दल सखोल तपास करत आहोत.”

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, हिस्सारच्या एसपीचं म्हणणं आहे, “ज्योती मल्होत्रा पीआयओच्या संपर्कात होती.”

शुक्रवारी (16 मे) तिला अटक करण्यात आली. शनिवारी (17 मे) तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथे तिला पाच दिवसांच्या पोलीस रिमांडवर पाठवण्यात आलं.

ज्योती यांच्या पाकिस्तानमधील प्रवासादरम्यानचा एक फोटो.

फोटो स्रोत, Travel With Jo/Facebook

‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये आलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ज्योतीवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आणि तिच्या कंटेंटद्वारे पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी तिथल्या हस्तकांच्या थेट संपर्कात राहण्याचा आरोप आहे.

वृत्तानुसार ज्योती गुरुग्राममधील एका कंपनीत नोकरी करायची. कोरोना काळात तिनं नोकरी सोडली आणि जवळपास 3 वर्षांपूर्वी ती ट्रॅव्हल व्लॉगर झाली.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या बातमीमध्येच पोलिसांच्या हवाल्यानं माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, सुरुवातीच्या तपासात ज्योतीनं सांगितलं की ‘ती 2023 मध्ये व्हिजिटर व्हिसासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तालयात गेली होती.’


ज्योतीच्या पाकिस्तानमधील प्रवासादरम्यानचा एक फोटो

फोटो स्रोत, Travel With Jo/Facebook

‘द हिंदू’ या वृत्तपत्रानं एफआयआरचा संदर्भ देत लिहिलं आहे की, जवळपास 2 वर्षांपूर्वी ज्योती पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाचे अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्या संपर्कात आली होती. त्यावेळी ज्योती व्हिसासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तालयात गेली होती.

ती दानिश यांच्या संपर्कात होती आणि दोन वेळा पाकिस्तानात गेली होती. तिथे तिची भेट दानिशच्या परिचयातील अली आहवान याच्याशी झाली. त्यानेच ज्योतीची कथितरित्या पाकिस्तानात राहण्याची व्यवस्था केली होती.

तर ‘इंडियन एक्सप्रेस’नं लिहिलं आहे की, ज्योतीनं कथितरित्या दानिशचा नंबर पोलिसांना दिला आणि सांगितलं आहे की ती दानिशच्या संपर्कात होती.

‘द इकॉनॉमिक टाइम्स’नुसार, 13 मे रोजी भारतानं पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील हसान-उर-रहीम उर्फ दानिश यांना पर्सोना नॉन ग्राटा (नको असलेले) जाहीर केलं होतं आणि त्यांना 24 तासात देश सोडण्याचा आदेश दिला होता.

ज्योतीचे वडील काय म्हणाले?

‘द हिंदू’मधील वृत्तानुसार, ज्योतीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीवर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की त्यांच्या मुलीला अडकवण्यात येतं आहे.

ज्योतीचे वडील हरीश कुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, गुरुवारी (15 मे) सकाळी साडेनऊ वाजता पोलीस अधिकारी घरी आले आणि ते ज्योतीला सोबत घेऊन गेले.

ज्योती मल्होत्राचे वडील हरीश कुमार

फोटो स्रोत, Kamal Saini/BBC

ते म्हणाले, “पाच-सहा जण आले. त्यांनी जवळपास अर्धा तास घराची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांनी लॅपटॉप आणि तीन मोबाईल फोन जप्त केले.”

ते पुढे म्हणाले, “माझी मुलगी सरकारच्या परवानगीनं पाकिस्तानात गेली होती. तपासणी झाल्यानंतरच तिला व्हिसा देण्यात आला. त्यानंतरच ती पाकिस्तानात गेली होती.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC