Source :- ZEE NEWS

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत पुढील 24 ते 36 तासांत आपल्याविरोधात लष्करी कारवाई करणार असल्याची विश्वासार्ह माहिती आपल्याकडे असल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. मध्यरात्री 2 वाजता बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार (Attaullah Tarar) यांनी जर भारतीय सैन्याने कारवाई सुरू केली तर विनाशकारी परिणाम होतील असा इशारा दिला आहे. 

“आमच्याकडे विश्वासार्ह गुप्तचर माहिती आहे की, भारत पुढील 24 ते 36 तासांत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करण्याची योजना आखत आहे. भारताच्या कोणत्याही कृतीला पूर्ण ताकदीने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे. 

पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनीचं रक्षण करेल आणि पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, असं तरार म्हणाले आहेत. “आमचा देश आपल्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे प्रत्येक प्रकारे रक्षण करेल. जर भारताने पाकिस्तानवर युद्ध लादण्याचा प्रयत्न केला तर होणाऱ्या विनाशकारी खर्चासाठी ते पूर्णपणे जबाबदार असतील,” असंही ते म्हणाले आहेत. 

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा दिला नसल्याचा दावा करताना मंत्र्याने भारत निराधार आणि बनावट आरोपांच्या आधारे आपल्यावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. 

“भारताची न्यायाधीश, ज्युरी आणि फाशी देणारे होण्याची सवय पाकिस्तानने नाकारली आहे”, असंही ते पुढे म्हणाले.पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर वारंवार युद्धबंदीचे उल्लंघन होत असताना, पाकव्याप्त काश्मीरला वेगळे करणाऱ्या लष्करी सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न होत असताना तरार यांनी हा दावा केला आहे. 

मंगळवारी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही भारतासोबत संभाव्य युद्धाचा इशारा दिला होता. आसिफ यांनी जिओ न्यूजला सांगितले की, “जर काही घडलेच तर ते दोन किंवा तीन दिवसांत होईल.”

SOURCE : ZEE NEWS