Source :- BBC INDIA NEWS

अबोली

“मी चार ते पाच महिन्यांची होती तेव्हा माझ्या आई-बाबांना समजलं की मला मूत्राशय (युरीनरी ब्लॅडर) नाहीये. त्यामुळे माझी युरीन सतत वाहत राहायचं. मी ओली-चिंब व्हायचे. ब्लॅडर नसल्यानं युरीन जमा राहत नव्हती. सतत वाहत राहायचं. मग माझं ऑपरेशन्स करून कंबरेच्या दोन्ही बाजूला दोन छिद्र केले. आता त्यातून माझी युरीन सतत वाहत असते. कधी थांबतच नाही. 24 X 7 तास सुरूच असते. तरीपण मला काही वाटत नाही. हे सगळं दुःख बाजूला ठेवून मी माझ्या टॅलेंटवर फोकस करते.”

हे दुःख सांगताना एखाद्याला रडू येईल. पण, 21 वर्षांची अबोली जरीत मात्र सगळं काही अगदी हसतमुखानं सांगत होती.

अबोलीचं वय 21 वर्ष असलं तरी तिची उंची जेमतेम 3 फूट 4 इंच आणि आवाजही लहान मुलीसारखाच गोड.

YouTube पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

अबोली नागपुरातील धंतोली भागात राहते. तिची आई वनिता या खासगी रुग्णालयात एक्स रे टेक्निशियन आहेत, तर वडील विजय जरीत निवृत्त आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आजारानं दोन्ही पाय निकामी झाल्यानंतरही बनली व्हीलचेअर मॉडल

अबोलीला जन्मापासूनच क्रोनिक किडनी डिसीज आहे. एक किडनी खराब, तर दुसरी आकारानं लहान आहे. तसेच युरीनरी ब्लॅडर नसल्यानं युरीन तिच्या कंबरेतून सतत वाहत असते. त्यासाठी तिला कंबरेभोवती डायपर बांधतात.

तसेच आजारामुळे तिचे हाडं खूप ढिसूळ झाले. तिला सतत अंगदुखी असते. या आजारामुळे तिचे दोन्ही पाय निकामी झाले. तिला चालताही येत नाही.

आपण दिव्यांग आहोत, आपल्याला इतका गंभीर आजार आहे असं समजून अबोली घरात बसत नाही, तर संधी मिळेल तेव्हा तिचं टॅलेंट दाखवत असते.

अबोली

चालता येत असेल तरच मॉडलिंग करता येतं हे अबोलीनं खोटं ठरवलं. ती व्हीलचेअरवरूनच मॉडलिंग करतेय. तसेच तिला व्हीलचेअर मॉडल म्हणून पारितोषिकही मिळाले.

अबोली सांगतेय, “इंडियाज दिव्यांग ग्लॅमर शो होता तिथं मी सहभाग घेतला. मी ग्रुमिंगसाठी गेले नाही. मी युट्युबवरून सगळं शिकले. आपल्या नखांपासून केसांपर्यंत परफेक्ट राहायला मला आवडतं. इतर स्पर्धक म्हणायचे ही ग्रुमिंगला आली नाही तरी जिंकली कशी? त्यांनी माझ्यावर खूप टीका केली. पण, सगळ्यांना हसत हसत उत्तर दिलं.”

अबोलीची ही पहिली मॉडलिंगची स्पर्धा होती. त्यानंतर तिनं अनेक मॉडलिंग शो गाजवले आणि व्हिलचेअर मॉडल म्हणून ओळख निर्माण केली.

इंडियन आयडलमधून झळकली टीव्हीवर

अबोली फक्त मॉडलिंगच करत नाही तर ती एक गायिका सुद्धा आहे. 2018 मध्ये सारेगम लिटल चॅम्प्स मध्ये तिची निवड झाली होती.

तिसऱ्या राऊंडपर्यंत ती या शोमध्ये होती. पण, पुढच्या राऊंडसाठी तिची निवड झाली नाही. त्यानंतर 2019 मध्ये इंडियन ऑयडलसाठी तिनं ऑडिशन दिलं.

त्यातही तिची निवड झाली. मुंबईला जाऊन तिन राऊंड पूर्ण केले. तसेच 12 ऑक्टोबर 2019 ला ती इंडियन आयडलमधून टीव्हीवर झळकली.

अबोली

फोटो स्रोत, aboli__jarit

अबोली सांगतेय, “आम्ही शूटसाठी मुंबईतल्या फिल्म सिटीत गेलो तेव्हा आई घाबरत होती. पण, मी नाही घाबरले. कारण, मला आता कशाचीच भीती वाटत नाही. मी टीव्हीवर दिसले तेव्हा जे लोक नकारात्मक बोलायचे ते पण चांगला विचार करू लागले. म्हणताना ना प्यार दो प्यार लो असंच माझ्यासोबत घडलं.”

अबोलीला संगीताचे कुठलेही शिकवणी नाही. ती घरीच गाणं शिकली.

अबोली घरी गाण गुणगुणत असायची. पण, पहिल्यांदा तिनं बालदिनाच्या एका कार्यक्रमात गाणं गायलं. त्यानंतर आत्मविश्वास वाढला आणि सारेगम लिटल चॅम्प्स आणि इंडियन आयडलमध्ये निवड झाल्याचं अबोली सांगतेय. तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नेहा कक्करसोबतचा व्हिडिओही शेअर केला आहे.

‘इरादे बुलंद हो तो पैरों के बिना भी डान्स किया जा सकता हैं’

यासोबतच अबोली उत्तम नृत्यही करायची अशी तिची आई वनिता सांगतेय. पण, अबोली आठवीत असताना तिचा आजार वाढला आणि तिचे दोन्ही पाय निकामी झाले.

तिला चालताच येत नव्हते. त्यामुळे डान्सही बंद झाल्याची खंत अबोली बोलून दाखवते. पण, यावेळीही ती निराश झाली नाही.

“मी स्वतःचं युट्युब चॅनल सुरू केलं. यात मी गायनाचे व्हिडिओ टाकत होते. पण, त्यासोबतच आणखी काय टाकायचं हा प्रश्न होता. मग मी माझी एक टॅगलाईन बनवली ‘इरादे बुलंद हो तो पैरों के बिना भी डान्स किया जा सकता हैं’. यावेळी माझ्यावर टीका झाली. पाय नसताना डान्स कशी करणार असं सगळे बोलू लागले. पण, बसल्या बसल्या हाताची अक्शन आणि चेहऱ्यावरच्या हावभावानं मी डान्स करून अशा लोकांना उत्तर दिलं” असं अबोली म्हणाली.

अबोली आताही तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर असे डान्सचे व्हिडिओ टाकत असते. तिचे इंस्टाग्रामवर सध्या 28.2K फॉलोअर्स आहेत.

तिच्यावर 2022 मध्ये लंडनमधील “Truly” या चॅनलने डाक्युमेंट्रीही बनवली आहे. तसेच ती ग्लिटरीस्ट या कोलाकात्याच्या मॅगझीनसह आणखी तीन मॅगझिनमध्येही ती कव्हर गर्ल म्हणून झळकली आहे.

पदवीपर्यंतचं शिक्षणही केलं पूर्ण

फक्त कलात्मक क्षेत्रातच नाहीतर अबोलीनं तिचं पदवीपर्यंतचं शिक्षणही पूर्ण केलं. पण, शिक्षण घेताना सुरुवातीला कशा अडचणी आल्यात याबद्दल अबोलीनं तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला.

ती सांगतेय, “मी लहानपणापासून आजारी होते. पण, तेव्हा मला चालता येत होतं. म्हणून मला नर्सरीत प्रवेश द्यायचं ठरवलं. आई-बाबा एका नर्सरीत घेऊन गेले. तेव्हा त्यांनी मला प्रवेश द्यायला नकार दिला. माझ्या आजाराचा संसर्ग इतर मुलांना होईल असं ते म्हणायचे. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि माझा आजार संसर्गजन्य आहे का हे विचारलं. तेव्हा माझ्या आजारामुळे कोणाला कुठलाही संसर्ग होत नसल्याचं प्रमाणपत्र आम्हाला डॉक्टरांनी दिलं. त्यानंतर मला नर्सरीत प्रवेश तर मिळाला. पण, त्यांनी दुसऱ्या दिवशी मला काढून टाकलं. त्यानंतर मला कुठंच प्रवेश मिळाला नाही.”

नर्सरीत प्रवेश मिळत नसल्यानं कॉन्व्हेंटचं शिक्षण तिनं घेतलं नाही. काही वर्ष थांबून अबोलीनं थेट पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. यातही आठवीपर्यंत ती दररोज शाळेत जात होती. पण, आठवीत असताना अचानक आजार वाढला आणि तिचं शाळेत जाणंही बंद झालं. अशा परिस्थितीत तिनं घरात अभ्यास करूनच पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.

आपल्या घरातल्या दिव्यांगांना घरातल्या एका कोपऱ्यात बसवून ठेवू नका

अबोलीची उंची कमी असल्यानं काही लोक हिणवतात. ही एवढीशी आहे मग 21 वर्षांची कशी काय असंही विचारतात. पण, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. जिंदगी हैं, एक ही तो बार मिलती हैं. जितनी अच्छे से जिनी जी लो, असं अबोली सांगतेय.

ती पुढे म्हणतेय, घरातून पाठिंबा मिळाला म्हणूनच मी सगळं करू शकले. माझ्या घरातले सगळे मला खूप सपोर्ट करतात. जर माझं कुटुंब चांगलं नसतं तर मी पुढे जाऊ शकली नसती. असे खूप लोक असतात जे एखादी दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना घरातच बसवून खाऊ घालतात. त्यांची आवड जोपासण्याचा प्रयत्न करत नाहीत. टॅलेंटला वाव देत नाहीत. माझे पण असे काही मित्र आहेत ज्यांना घरातून पाठिंबा मिळत नाही. पण, माझ्या कुटुंबानं मला पाठिंबा, प्रेम, आशीर्वाद, मदत सगळं दिलंय.”

सोबतच अबोली इतर दिव्यांगाच्या आई-बाबांना सल्लाही देते. ती म्हणतेय, “आपल्याकडे कोणी दिव्यांग असतील तर त्यांना पाठिंबा द्या. त्याला विचारा तुला नेमकं काय करायचं आहे? त्याच्यामध्ये असणाऱ्या टॅलेंटला सपोर्ट करा, त्याला घरातल्या एका कोपऱ्यात बसवून ठेवू नका.”

अबोली आणि तिचं कुटुंब

अबोलीचे पाय निकामी असतानाही ती व्हिलचेअरनं सहज इकडे तिकडे फिरू शकते असंही नाही. तिच्या आजारामुळे दिवसेंदिवस तिचे हाडं अधिकच ढिसूळ झालेत. त्यामुळे तिला झोपेतून उठवण्यापासून तर सगळ्या कामासाठी कोणीतरी सतत जवळ लागतं.

तिची आई सांगतेय, तिला सकाळीच झोपेतून उठवून बसवावं लागतं. युरीनमुळे ती पूर्ण भिजलेली असते. त्यामुळे तिचे पूर्ण कपडे बदलून तिचं अंग पुसून द्यायचं असतं. कारण, तिच्या अंगदुखीमुळे तिला दररोज आंघोळही घालता येत नाही. तिला उचलून व्हिलचेअरवर ठेवायचं असेल तरी त्याला अर्धा तास लागतो. आधी तिच्या मागे एक उशी ठेवून ती थोडी पुढे सरकते. त्यानंतर एक एक करत पाच उश्या मागे ठेवून ती सोफ्याच्या काठावर येते. त्यानंतर हळुच पाय पुढे करून 15 मिनिटं आराम करते. कारण, तिला प्रचंड दम लागतो. त्यानंतर ती हळूहळू खाली पाय टेकवते आणि त्यानंतर तिची आत्या तिला उचलून व्हिलचेअरवर ठेवते.

ती व्हिलचेअरवरून बाहेर फिरायलाही जायची. फूड ब्लॉगही बनवायची. त्यासाठी तिचे बाबा तिला बाहेर घेऊन जात होते. पण, गेल्या एक महिन्यात तिची तब्येत खूप खराब झाली. आता तिचं डायलिसिस होऊ शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं.

अबोलीला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तरीही अबोली निराश झाली नाही. औषध खायचं आणि राहायचं. आपले गायनाचे, मॉडलिंगचे स्वप्न पूर्ण करत जगायचं असं अबोली बोलून दाखवते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC