Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
रजोनिवृत्तीपूर्व (प्रिमेनोपॉज) काळात जगभरातल्या लाखो महिलांना त्रास होत असतो. पण त्याची फारशी चर्चा केली जात नाही. शिवाय, या त्रासाबद्दल अनेक गैरसमजही पसरले आहेत.
काही देशात आणि समाजात याबद्दल बोलणंही टॅबू मानला जातो.
रजोनिवृत्तीपूर्व स्थिती ही मासिक पाळी थांबण्याकडे नेणारी एक टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया आहे. या काळात महिलांच्या संप्रेरकांचं प्रमाण बदलू लागतं आणि प्रजननक्षमता हळूहळू कमी होऊ लागते.
जेव्हा इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH), ल्युटिनायझिंग हार्मोन (LH) आणि टेस्टोस्टेरोन यांसारख्या हार्मोन्सचे प्रमाण बदलू लागते, तेव्हा ही अवस्था येते.
या बदलामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात. त्याने महिलांच्या रोजच्या जगण्यावरही मोठा परिणाम होत असतो.
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, रजोनिवृत्तीपूर्व काळात दिसणारी काही नेहमीची लक्षणं म्हणजे,
- अनियमित मासिक पाळी
- झोपेत अतिरिक्त घाम येणं
- लक्ष्य केंद्रित करायला त्रास होणं
- उदासिनता
- बिघडलेली झोप
- लैंगिक इच्छा कमी होणं
- योनीमार्ग कोरडा पडणं
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, चाळीशी जवळ आली की रजोनिवृत्तीपूर्व काळाची लक्षणं दिसू लागतात. काही महिलांना ही लक्षणं पंचेचाळीशीच्या आसपास दिसू लागतात.
आपल्या शरीरात नेमके काय बदल होत आहेत हे समजून घेतल्याने आणि त्यानुसार उपाययोजना केल्याने या त्रासासोबत जुळवून घेणं शक्य होतं.
काही महिलांना हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही उपचारपद्धती घेण्याचा सल्ला दिला जातो. तर काही महिला जीवनशैलीत बदल करून नैसर्गिकरित्या रजोनिवृत्तीपूर्व काळाच्या लक्षणांची तीव्रता कमी करतात.
रजोनिवृत्तीपूर्व काळातल्या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी या 6 गोष्टी अवलंबता येतील.
1. खाण्यापिण्यात बदल
समतोल आहारातून शरीराला आवश्यक असतील ते पोषक घटक मिळाले तर संप्रेरक नियंत्रित रहायला मदत मिळते. शिवाय, खाणंपिणं नीट नसेल तर त्याचा परिणाम मूडवर, शरीरातील उर्जेवर, पचनशक्तीवर आणि एकूणातच आरोग्यावर होतो.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे रजोनिवृत्तीपूर्व काळात काय खायला हवं?
- फायटोएस्ट्रोजेन असलेलं अन्न – ते जवस, सोयाबिन आणि शेंगांमध्ये असतं.
- फळं आणि भाज्या – त्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात.
- धान्य – त्याने शरीराची पचनशक्ती आणि उर्जेची पातळी नियंत्रणात राहते.
- प्रथिनं – स्नायूंची ताकद टिकवून ठेवतं.
- आरोग्यासाठी चांगली चरबी – अवोकाडो, सुका मेवा आणि बियांमुळे संप्रेरकांचं उत्पादन व्यवस्थित होतं.
2. योग्य व्यायाम
व्यायामाने मेंदूत डोपामाईन नावाचं संप्रेरक तयार होतं. त्याने मूड चांगला राहतो.
पण व्यायाम नियमित केला तर त्याने तुमच्या मेंदूतली डोपामाईनची प्रणालीही बदलते. त्यामुळे रक्तातलं डोपामाईन आणि डोपामाईन रिसेप्टर्सही वाढतात. व्यायाम तुमच्या आरोग्यासाठी आणि मानसिक अवस्थेसाठी किती महत्त्वाचा आहे हेच या न्युरोकेमिकल रिॲक्शन मधून दिसून येतं.

फोटो स्रोत, Getty Images
मासिक पाळी थांबली तरी महिलांमध्ये स्नायूंची वाढ थांबत नाही असं ईक्सटर विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या एका अभ्यासात समोर आलं आहे. व्यायाम केल्यानं शरीराची कार्यक्षमता, लवचिकता आणि संतुलन यामध्ये सुधारणा होते.
रजोनिवृत्तीपूर्व काळात या व्यायामावर भर द्यायला हवा :
- स्ट्रेंथ ट्रेनिंग (शक्तिवर्धक व्यायाम) – स्नायूंना बळकटी देतो आणि हाडांची घनता टिकवून ठेवतो.
- योगा आणि स्ट्रेचिंग – शरीराची लवचिकता वाढवतो आणि तणाव कमी करतो.
- ऍरोबिक व्यायाम – हृदयाचे आरोग्य सुधारतो आणि झोपेच्या नियमिततेस मदत करतो.
3. तणाव कमी करा
मानसिक तणावामुळे रजोनिवृत्तीपूर्व लक्षणं आणखी बिघडू शकतात. विशेषतः सतत मूड बदलणे, काळजी वाटणे आणि अनियमित झोप ही लक्षणं आणखी तीव्र होतात. 2019 साली मायो क्लिनिकने केलेल्या एका अभ्यासानुसार 40 ते 60 वयातल्या, कमी तणाव असणाऱ्या महिलांमध्ये रजोनिवृत्तीपूर्व लक्षणांचं प्रमाण कमी दिसून येतं.

फोटो स्रोत, Getty Images
तणाव कमी करण्यासाठी या गोष्टी करता येतील :
- ध्यानधारणा – त्यामुळे तणाव कमी होतो आणि लक्ष्य केंद्रीत करण्याची क्षमता वाढते.
- श्वसनाचे व्यायाम – मज्जासंस्था शांत होते.
- रोजनिशी लिहिणे – दररोज लिहिण्यानं विचारांमध्ये स्पष्टता यायला मदत होते आणि समाधानाची भावना येते.
4. झोपेला महत्त्व द्या
रजोनिवृत्तीपूर्व काळातल्या झोपेच्या त्रासाचं मूळ संप्रेरकांच्या बदलांमध्ये असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणं फार अवघड होतं.
एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरकं झोपेचं नियंत्रण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचं प्रमाण अचानक कमी झालं तर झोपेवर उपाय शोधणं अवघड होतं.
शिवाय, झोपेत अतिरिक्त घाम येणं, काळजी वाटणं आणि मूड बदल यासारख्या लक्षणांमुळे झोपेच्या त्रासाची तीव्रता वाढते. यासाठी जीवनशैलीतला बदल, हार्मोन थेरेपी किंवा औषधं अशा मिश्र उपचारपद्धतीची गरज असते.

फोटो स्रोत, Getty Images
वयाच्या वाढीमुळे झोपेच्या सवयींमध्ये होणारे बदल आणि स्लीप अॅपनियासारख्या झोपेशी संबंधित आजारांचा धोका यामुळे ही समस्या अधिक तीव्र होऊ शकते. म्हणून झोपेचा दर्जा सुधारण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरतील, हे शोधायला अनेकदा वैद्यकीय तपासणी करावी लागते.
चांगल्या झोपेसाठी या गोष्टींची मदत होऊ शकते :
- कपडे आणि झोपायची जागा – मेमरी फोमसारख्या काही गाद्या उष्णता शोषून घेतात आणि त्यामुळे त्यावर चांगली झोप लागत नाही. कॉटनच्या कपड्याचे किंवा ओलावा शोषून घेणारे (मॉईश्चुअर विकिंग) कपडे घातल्यानं शरीर थंड राहतं.
- झोपायची एकच वेळ पाळल्यानं शरीराचं नैसर्गिक चक्र नियंत्रित राहतं.
- झोपण्यापूर्वी कॅफेन आणि मोबाईल, टीव्हीसारख्या स्क्रिनचा वापर टाळण्यानं मेंदूला नको ते उत्तेजन मिळत नाही.
- झोपायची खोली थंड असेल आणि तिथे पुरेसा अंधार असेल तर गाढ झोप लागते.
5. नैसर्गिक पद्धती
हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपीसोबत तुम्ही कोणतीही हर्बल उपचारपद्धती घेण्याचा विचार करत असाल तर त्याच्या परिणामांबद्दलही सावध रहायला हवं.
उदाहरणार्थ, हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो. खूप मोठ्या प्रमाणात त्याचं सेवन केलं तर त्याचा हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, याबद्दलचं संशोधन फार मर्यादीत स्वरूपात उपलब्ध आहे.
इव्हिनिंग प्राईमरोज तेल, सोय, रेड क्लोव्हर, ब्लॅक कोहोश आणि जिनेन्ग असे काही हर्बल पदार्थ रजोनिवृत्तीच्या लक्षणांवर नेहमी वापरले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, या घटकांबद्दल पुरेसे वैज्ञानिक पुरावे नसल्यानं त्याच्या सुरक्षिततेविषयी आणि परिणामकारकतेविषयी अस्पष्टता असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
त्यामुळे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीसोबत अशा हर्बल उपाययोजना करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.
पेपी मेनोपॉज सर्व्हिसेसच्या संचालिका कॅथी अबरनेथी म्हणतात, “अनेक महिला पूरक औषधांकडे वळतात, पण सर्वच औषधांमागे ठोस वैज्ञानिक आधार नसतो.
विशेषतः हिवाळ्यात ड जीवनसत्त्वाच्या गोळ्या आणि कॅल्शियमचं पूरक औषध उपयोगी असलं तरी आवश्यक पोषकतत्त्वं मिळवण्यासाठी संतुलित आहार हीच सगळ्यात चांगली पद्धत आहे.”
ऑनलाईन किंवा दुसऱ्या देशातून खरेदी केलेली पूरक औषधं नियामक निकषांची पूर्तता करणारी नसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांसोबत त्याची प्रक्रिया होऊन वाईट परिणाम होऊ शकतो.
औषधांवरचे लेबल्स तपासणं, औषधविक्रेत्याचा सल्ला घेणं आणि व्यावसायिक तज्ज्ञांनी सांगितलेल्या वैद्यकीय उपचारांऐवजी पूरक औषधांचा वापर केला जात नाही याची खात्री करणे आवश्यक आहे, असा सल्ला अबरनेथी देतात.
6. जवळच्या माणसांशी बोलणे
रजोनिवृत्तीपूर्व काळ भावनिकदृष्ट्या खूप त्रासदायक ठरू शकतो. पण हा काळ एकट्यानं पार करू नका, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
त्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींशी आणि जवळच्या माणसांशी बोलावं, आधार गटांमध्ये सामील व्हावं किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
असा त्रास किती वर्षं होतो?
रजोनिवृत्तीपूर्व काळ काही वर्षं चालतो. महिलांना 4 ते 10 वर्षांपर्यत या काळातून जावं लागू शकतं असं काही तज्ज्ञ सांगतात.
हा कालावधी हा अनुवंशिकता, जीवनशैली आणि एकूण आरोग्य अशा घटकांवर अवलंबून असतो.
एखाद्या महिलेला सलग 12 महिने मासिक पाळी आली नाही, तर त्याला रजोनिवृत्ती असं म्हटलं जातं.
2022 साली अमेरिकेत झालेल्या राष्ट्रीय महिला आरोग्य सर्वेक्षणानुसार, कृष्णवर्णीय महिलांमध्ये रजोनिवृत्ती लवकर येते. त्यांच्यामध्ये दिसणारी निराशा आणि निद्रानाशासारखी लक्षणंही जास्त तीव्र असतात.
जोडीदारासोबतचा दुरावा
“रजोनिवृत्तीपूर्व काळातल्या लक्षणांमुळे जोडीदारासोबतचेच नाहीत, तर मुलांसोबतचेही नातेसंबंध खराब होऊ शकतात,” लंडनमधील मानसशास्त्रज्ञ शाहरझाद बोरअब्दुल्ला बीबीसीशी बोलताना सांगत होते.
संवादाची योग्य पद्धतीने देवाणघेवाण न झाल्यास, विशेषतः जोडीदारासोबतच्या जवळकीत एक दरी निर्माण होऊ शकते. अनेकदा या दरीचं रूपांतर राग आणि नाराजीत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण शरीरात घडणारे हे बदल समजून घेऊन, ते स्वीकारून आणि संयमानं नातं अधिक दृढ करता येतं, असं शाहरझाद सांगतात.
काळजी, सतत थकव्याची भावना आणि थायरॉईडच्या या आजारांची लक्षणं रजोनिवृत्तीपूर्व काळाशी मिळतीजुळती असतात.
उदाहरणार्थ, अनियमित पाळी आणि मूड स्विंग्स हे संप्रेरकात बदल झाला तरी होतात किंवा थायरॉईड झाला असला तरी.
थकवा आणि अशक्तपणा रजोनिवृत्तीपूर्व काळात जाणवतो तसाच शरीरात जीवनसत्त्व कमी असतील तरी जाणवू शकतो.
तर, सांधेदुखी आणि डोकेदुखी ही इतर आजारांमुळेही होऊ शकते.
एखाद्या ॲपच्या माध्यमातून किंवा डायरीत या लक्षणांची नोंद करून ठेवता येईल. डॉक्टरांचा सल्ला घेताना ही नोंद वापरली तर लक्षणं रजोनिवृत्तीपूर्व काळातली आहेत की इतर कोणत्या आरोग्याच्या समस्येशी निगडीत आहे हे समजून घेणं सोपं होईल.
रक्ताच्या तपासण्यांमधून अंदाज काढता येऊ शकतो. पण संप्रेरक बदलत असल्याने त्यावर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही.
त्यामुळे डॉक्टरांसोबत रजोनिवृत्तीपूर्व काळातल्या लक्षणांबद्दल आणि एकूणच आरोग्याबद्दल दीर्घ चर्चा करणं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC