Source :- BBC INDIA NEWS
25 मिनिटांपूर्वी
अमेरिकेत आग लागण्याचा घटना गेल्या काही वर्षांपासून सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेत आहेत.
आधी निव्वळ वणवा किंवा इतर काही कारणांमुळे या आगी लागत असल्याचं मानलं जायचं. मात्र, सतत लागणाऱ्या या आगींमागे हवामान बदलासारखं संकट कारणीभूत असल्याचं समोर येतं आहे.
अमेरिकन प्रशासन या भीषण आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अंमलात आणतं. त्यातील एक म्हणजे गुलाबी रंगाच्या द्रवाचा विमानातून आगीवर मारा करणं.
सध्याची लॉस एंजेलिसची भीषण आग का लागली, त्यामुळे किती मोठं नुकसान झालं, हे गुलाबी रंगाचं द्रव नेमकं काय असतं, त्याचा वापर कसा केला जातो याचा आढावा घेणारा हा लेख.
अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक विमानं सातत्यानं गुलाबी रंगाचा एक द्रव आगीवर टाकत आहेत.
लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेली आग इतकी प्रचंड होती की, तिचा विस्तार होत या आगीच्या तडाख्यात अनेक निवासी वस्त्या आल्या आहेत.
या आगीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या संख्या आता 24 झाली आहे.
या आगीमुळे आतापर्यंत अब्जावधी डॉलर्सच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. हवामानावर लक्ष ठेवणाऱ्या एका खासगी कंपनीनं या आगीमुळे जवळपास 250 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज रविवारी (12 जानेवारी) व्यक्त केला आहे.
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी अथक प्रयत्न करत आहेत. अजूनही अनेक ठिकाणी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरला जाणारा गुलाबी द्रव
लॉस एंजेलिसमधील आग विझवण्यासाठी विमानातून पिंक लिक्विड म्हणजे गुलाबी रंगाचा द्रव टाकला जातो आहे.
हा गुलाबी रंगाचा द्रव एक फायर रिटार्डंट आहे. म्हणजेच असा पदार्थ ज्यामुळे आग लागण्यासाठी किंवा आग वाढण्याची प्रक्रिया मंदावते.
हा गुलाबी द्रव म्हणजे साल्ट्स किंवा क्षार (केमिकल) आणि खतांचं मिश्रण असतं. हा द्रव म्हणजे मुख्यत: अमोनियम फॉस्फेट असलेलं द्रावण किंवा द्रव असतो.
आग लागण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. या गुलाबी रंगाच्या द्रवातील रासायनिक मिश्रणामुळे आगीला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. म्हणूनच आग वेगानं पसरू नये यासाठी हा गुलाबी द्रव वापरला जातो.
त्यामुळे ज्या ठिकाणी आग लागली असेल तिथल्या पृष्ठभागाला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि आगीच्या ज्वाळा कमी होऊ लागतात.
अशाप्रकारे या गुलाबी द्रवामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
आता हा प्रश्न येतो की या द्रवाचा रंग गुलाबी का असतो. तर या द्रवाला गुलाबी रंग मुद्दाम दिलेला असतो. जेणेकरून हा द्रव जेव्हा फवारला जातो, तेव्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना हे कळावं की या द्रवाचा वापर करण्यात आला आहे.
याशिवाय गुलाबी रंग देण्यामागचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे आग लागलेल्या भागात देखील हा गुलाबी रंग स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे लोकांना हे माहित होतं की कोणता भाग आगीच्या तडाख्यात सापडला आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरलं जाणारं हे तंत्र वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलं आहे. कारण या द्रवातील रसायनांचा माणूस आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
लॉस एंजेलिसच्या आगीचं रौद्र रूप
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अजूनही तीन ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू आहे.
लॉस एंजेलिसमध्ये किमान सहा ठिकाणी आग लागली होती. यातील काही ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही.
तर इटन आणि हर्स्टमध्ये अजूनही मोठा भाग आगीच्या विळख्यात सापडलेला आहे. रविवारी (12 जानेवारी) संध्याकाळी अग्निशमन दलानं माहिती दिली की केनेथमध्ये लागलेली आग 100 टक्के म्हणजे पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.
या भीषण आगीमुळे लॉस एंजेलिसमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
ही भयंकर आग हजारो एकर परिसरात पसरलेली होती. त्यामुळे लाखो लोकांना हा परिसर सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागलं आहे.
आगीमुळे या परिसरातील हजारो घरं आणि लाखो गाड्या जळाल्या आहेत. लॉस एंजेलिसमधील सर्वसामान्य लोकांबरोबरच अनेक सेलिब्रिटींची घरं देखील या आगीत नष्ट झाली आहेत.
नेटफ्लिक्सवरील ‘नोबडी वॉंट्स धिस’ या शो मध्ये अभिनय केलेले अभिनेते ॲडम ब्रॉडी आणि ‘गॉसिप गर्ल’ मध्ये काम केलेली त्यांची पत्नी लीटन मीस्टर यांचं घरदेखील या आगीत जळालं आहे.
लॉस एंजेलिसच्या हॉलीवूड हिल्स परिसरातील हजारो घरं, इमारती या आगीत नष्ट झाली आहेत. यामध्ये घरं, शाळा आणि प्रतिष्ठित सनसेट बुलेवार्डवर असलेल्या व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे.
आग इतकी पसरण्यामागचं कारण
लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीसाठी, वेगानं वाहणारे वारे आणि कोरडं हवामान हे कारण असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे झाडं-झुडुपं वाळली आणि त्यामध्ये आग पसरणं सोपं झालं.
जोरदार वारे आणि पावसाचा अभाव यामुळे सध्या आगी लागत आहेत.
‘सेंटा एना’ वारे हे आग लागण्यामागचं एक मोठं कारण आहेत. हे वारे जमिनीकडून समुद्र किनाऱ्याकडे वाहतात. जवळपास ताशी 100 किलोमीटरहून अधिक वेगानं वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे आग आणखी भडकली आणि तिचा विस्तार झाला, असं मानलं जातं आहे.
‘सेंटा एना’ वारे अमेरिकेच्या पूर्व किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेकडून किनाऱ्याकडे वाहतात. वर्षातून अनेकवेळा हे वारे वाहतात.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हवामान बदलामुळे परिस्थिती बदलते आहे. त्यामुळे आग लागण्याचा धोका सातत्यानं वाढतो आहे.
अमेरिकन सरकारच्या संशोधनात स्पष्टपणे म्हटलं आहे की, पश्चिम अमेरिकेत जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात लागलेल्या भीषण आगींचा संबंध हवामान बदलाशी आहे.
अमेरिकेतील महासागर आणि वातावरण किंवा हवामानाशी संबंधित प्रशासनाचं म्हणणं आहे की, “पश्चिम अमेरिकेतील जंगलातील आगीचे धोके आणि आग वाढण्यामागे, वाढत असलेली उष्णता, प्रदीर्घ काळ असलेला दुष्काळ आणि कोरड्या वातावरणासह हवामान बदल ही प्रमुख कारणं आहेत.”
अलीकडच्या महिन्यांमध्ये उन्हाळ्यात खूप जास्त उष्णता वाढणं आणि पावसाचं प्रमाण कमी होणं यामुळे विशेषकरून कॅलिफोर्निया असुरक्षित झालं आहे.
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियात सर्वसाधारणपणे मे ते ऑक्टोबर हा आग लागण्याचा काळ असल्याचं मानलं जातं. मात्र कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी आधीच सांगितलं आहे की आग लागण्याचं संकट ही संपूर्ण वर्षभराची समस्या झाली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC