Source :- BBC INDIA NEWS
1 तासापूर्वी
पुण्यात जिल्ह्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे तब्बल 24 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी 5 रुग्ण हे पुणे शहरातील तर इतर रुग्ण हे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील इतर भागातील असल्याची माहिती आहे.
सध्या सर्व संशयित रुग्णांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आजाराचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान, 8 संशयित रुग्णांचे नमुने आयसीएमआर-एनआयव्ही (ICMR-NIV) कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
शहरात पसरलेल्या या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था (PATH) यांच्या सहभागाने शीघ्रकृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजाराची प्राथमिक पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे, बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणे, धाप लागणे/श्वास घेण्यास त्रास होणे ही आहेत.
रुग्णांबाबत माहिती देताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी वैशाली जाधव म्हणाल्या, “पुणे शहर तसेच जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे विविध रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. रुग्ण एकाच ठिकाणचे नसल्याने नेमक्या कारणांची निश्चिती करता येत नाही. यासाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करुन अभ्यास केला जात आहे.”
तर, पालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, “रुग्णांचे सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहे. आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं.
हा आजार होण्याचे विविध कारण आहेत, जसे की बॅक्टेरिअर इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आदि. गोष्टी याला कारणीभूत ठरण्याची शक्यता असते.
12 ते 30 वयोगटातील व्यक्तींना हा आजार होतो. या आजारासंदर्भात तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. याबाबत सर्व एक्सपर्टची कमिटी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “या सर्व संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर उपाययोजना काढणार आहोत. सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही.”
नेहमीची जी ट्रीटमेंट असते, ती ट्रीटमेंट दिली जाते. लवकरात लवकर बरं होणारा हा आजार आहेत. लहान मुलांना दिलेल्या लसीमुळे देखील हा आजार होऊ शकतो. रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तरीही हा आजार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी या आजारामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असंही डॉ. नीना बोराडे यांनी सांगितलं आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम आजार काय आहे?
गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे. यामुळे स्नायु कमकुवत होतात, स्नायूंची संवेदना कमी होतात.
याची सुरुवात सामान्य लक्षणांनी होते. जसे की, हातांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे आदि.
बहुतांश लोक या आजारातून बरे होतात, परंतु बरे होण्याचा कालावधी रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC