Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, BBC/Jamie Niblock
इंग्लंडमध्ये सफोक हा एक प्रांत किंवा काऊंटी आहे. सफोकमधील संग्रहालयात ठेवण्यात आलेलं एक पुस्तक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ एका माणसाच्या कातडीपासून बनवण्यात आल्याचं अलीकडेच आढळून आलं आहे.
जवळपास 200 वर्षांपूर्वी एका कुप्रसिद्ध हत्येसाठी फाशी देण्यात आलेल्या एका माणसाच्या कातडीपासून हे मुखपृष्ठ बनवलेलं आहे.
1827 मध्ये विल्यम कॉर्डर याला एका महिलेच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं होतं. या हत्येनं जॉर्जियन ब्रिटनला (त्या काळी जॉर्ज चौथा याचं ब्रिटनवर राज्य होतं) धक्का बसला होता. ही हत्या रेड बार्न मर्डर म्हणून ओळखली जाऊ लागली.
बरी सेंट एडमंड्समधील मॉयसेस हॉल संग्रहालयातील व्यवस्थापकांच्या लक्षात आलं की, एका कार्यालयातील बुकशेल्फमध्ये हे पुस्तक होतं आणि त्याकडे दुर्लक्ष झालं होतं. मात्र आता हे पुस्तक प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.
काही दशकांपूर्वी एका कुटुंबानं हे पुस्तक दान केलं होतं. या कुटंबाचे एका सर्जनशी (डॉक्टर) जवळचे संबंध होते. याच सर्जननं कॉर्डरच्या शरीराचं विच्छेदन (शव विच्छेदन) केलं होतं.
आजही लक्ष वेधून घेणाऱ्या, विल्यम कॉर्डर आणि या हत्येबद्दल आपल्याला काय माहित आहे?
विल्यम कॉर्डर कोण होता आणि त्यानं हत्या केली ती मारिया कोण होती?
विल्यम हा 19 व्या शतकाच्या सुरुवातीला इप्सविच आणि सडबरीदरम्यान असलेल्या पोलस्टेड गावातील एका मध्यमवर्गीय जमीन कसणाऱ्या शेतकरी कुटुंबातील होता.
वयाच्या 22 व्या वर्षी, तो आणि मारिया मार्टेन एकमेकांच्या प्रेमात पडले. विल्यम, कॉर्डर कुटुंबाचा प्रमुख होता. महिलांचं लक्ष वेधून घेणारा, त्यांना आकर्षित करणारा म्हणून विल्यमची ख्याती होती. मारिया 24 वर्षांची होती.
मारियाचे वडील शेतात, बागेत धुडगूस घालणारे उंदीर पकडणारे होते. वडिलांबरोबर मारिया तिची सावत्र आई, बहीण आणि तिच्या लहान भावासह राहत होती. विल्यमकडे कदाचित तिनं तिच्या घरातून सुटका होण्याचं साधन म्हणून पाहिलं असेल.

फोटो स्रोत, Getty Images
1827 मध्ये विल्यमनं मारियाबरोबर लग्न करण्यासाठी गुपचूप पळून जाण्याचा प्लॅन आखला. त्यानं मारियाला कॉर्डर्सच्या शेतातील रेड बार्नमध्ये भेटण्यास सांगितलं.
त्यानंतर त्यांच्या लग्नाचं बान्स म्हणजे एक प्रकारे त्यांच्या लग्नाची घोषणा करणारं चर्चकडून मिळालेलं पत्र आणण्यासाठी मारियाला इप्सविचला पळून जाण्यास सांगितलं.
मात्र त्यानंतर मारिया पुन्हा कधीच दिसली नाही आणि विल्यमदेखील गायब झाला.
पुढे काय झालं?
अखेरीस विल्यमनं सफोक सोडलं. त्यांनं मार्टेन कुटुंबाला पत्र लिहून कळवलं की तो मारियाबरोबर आयल ऑफ वाईट या बेटावर लग्न करण्यासाठी पळून गेला आहे.
प्रत्यक्षात तो लंडनच्या बाहेरच्या बाजूस लपून राहिला होता. प्रेमी युगुल जिथे भेटतात अशा ठिकाणी मारियाला पुरण्यात आलं होतं. तिच्या मानेवर गोळी झाडण्यात आली होती.
आख्यायिकेनुसार, जवळपास एक वर्षानंतर अॅन मार्टेनला स्वप्न पडलं की तिची सावत्र मुलगी मृत आहे आणि ती रेड बार्नमध्ये आहे. मारियाच्या वडिलांनी विशिष्ट प्रकारच्या फावड्यानं तिथे जमीन खोदली. त्यांना तिथे त्यांच्या मुलीचे अवशेष सापडले.
हत्या करणाऱ्याचा शोध सुरू असतानाच, एका वृत्तपत्राच्या संपादकानं सांगितलं की, तो विल्यम कॉर्डरला ओळखतो.

फोटो स्रोत, Getty Images
“तो फरार झाला आहे आणि तो एकटाच आहे. तो वृत्तपत्रात लग्नासाठी पत्नीबद्दल जाहिरात देतो,” असं डॅन क्लार्क यांनी सांगितलं. ते मॉयसेस हॉल संग्रहालयात हेरिटेज अधिकारी आहेत.
त्या संग्रहालयात रेड बार्न मर्डरशी संबंधित अनेक जुन्या वस्तू आहेत. त्यात कॉर्डरच्या कातडीचं मुखपृष्ठ असलेली दोन पुस्तकंदेखील आहेत.
मग मारियाच्या हत्येसंदर्भात अधिकाऱ्यांनी विल्यम कॉर्डरचा शोध घेतला. त्यांनी विल्यमला पकडल्यानंतर त्यानं मारियाबद्दल काहीही माहित नसल्याचं सांगितलं. मात्र पोलस्टेडहून त्याला एक पत्र मिळालं होतं, ज्यात म्हटलं होतं की, मारियाचा मृतदेह सापडला आहे.
मारियाच्या हत्येचा खटला आणि विल्यमला सार्वजनिक फाशी
विल्यम कॉर्डरला 10 हत्यांच्या गुन्ह्यासाठी बरी सेंट एडमंड्सला आणण्यात आलं. प्रत्येक गुन्हा मारियाच्या मृत्यूबद्दलच्या वेगवेगळ्या सिद्धांतावर आधारित होता. त्यातून तो दोषी ठरवला जाण्याची शक्यता अधिक होती.
स्वत:चा बचाव करताना विल्यम कॉर्डरनं दावा केला की, मारियानं आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्यानं मारियाच्या मृत्यूचा दोष मारियावरच ठेवला. दोन दिवस चाललेल्या या खटल्यात विल्यमला दोषी ठरवण्यात आलं.
विल्यमनं अंतिम कबुलीजबाबात सांगितलं की, मारिया आणि त्याच्यात झालेल्या एका वादाच्या वेळेस त्याच्याकडून अपघातानं मारियावर गोळी झाडली गेली.

फोटो स्रोत, Getty Images
11 ऑगस्ट 1828 ला तुरुंगाबाहेर दुपारी विल्यम कॉर्डरला मारियाच्या हत्येसाठी फाशी देण्यात आली. ते पाहण्यासाठी साधारण 7,000 ते 10,000 लोक आल्याचा अंदाज आहे. त्या दिवशी नंतर, शायर हॉलमध्ये विल्यमच्या मृतदेहाजवळून जाण्यासाठी लोकांनी रांग लावली.
“त्यावेळेस तुरुंगाबाहेर इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमले होते की, अधिकाऱ्यांना विल्यमला फाशी देण्यासाठी तुरुंगाबाहेर काढता आलं नाही. त्यामुळे त्यांनी तुरुंगाच्या इमारतीच्या बाजूला एक भोक पाडून त्यावर फाशीचा तख्ता तयार केला,” असं क्लार्क म्हणाले.
“तिथे नृत्य आणि गाणं झालं असतं. त्यानंतर त्या दोरखंडाचा एक तुकडा लोकांना खरेदी करता आला असता,” असं ते म्हणाले.
यामुळे पोलस्टेड हे पर्यटकांच्या आकर्षणाचं ठिकाण बनलं. त्या घटनेची आठवण असलेली वस्तू जवळ संग्रही असावी म्हणून रेड बार्न आणि अगदी स्मशानभूमीतील मारियाचं स्मृतीचिन्हं देखील ते शोधणाऱ्यांनी तोडून टाकलं.

विल्यम कॉर्डरचा वारसा आणि संग्रहालयातील वस्तू
रेड बार्न मर्डरबद्दल लोकांच्या मनता प्रचंड कुतुहल आणि उत्सुकता होती. त्यातूनच अनेक पुस्तकं, नाटकं लिहिली गेली आणि संगीत निर्माण झालं. ते आजही खऱ्या गुन्हेगारी संस्कृतीत पसरलं आहे.
दोन शतकानंतरच्या काळातही मारियाची हत्या एक थरारक कहाणी बनली आहे. खरी कहाणी या दंतकथेआड झाकोळली गेली आहे.
कॉर्डरच्या प्रतिमेच्या समोरासमोर उभं राहण्यामुळे, त्याचे बंद डोळे आणि त्याच्या नाकपुड्या पाहिल्यामुळे कदाचित या गोष्टीला इंधन मिळालं असेल. कारण विल्यम कॉर्डरच्या मृत शरीरावरून त्याच्या चेहऱ्याचा एक मुखवटा तयार करून घेण्यात आला होता आणि मॉयसेस हॉल आणि नॉर्विच कॅसलमध्ये ठेवण्यात आला आहे.
अनेक वर्षे त्याचा सांगडा, जोपर्यंत तुटण्यास सुरुवात झाली नाही तोपर्यंत, पश्चिम सफोकमधील हॉस्पिटलमध्ये वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वापरला जात होता.

विचलित करणारी एक बाब म्हणजे, दोन पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर विल्यमची कातडी वापरण्यात आली होती. त्याच्या टाळू किंवा डोक्याचा काही भाग, तसंच त्याचे कान, एक भयानक दागिना म्हणून संग्रहालयात ठेवण्यात आले होते. ते सर्व आता मोयसेस हॉल संग्रहालयात आहेत.
हॉरिबल हिस्ट्रीज तयार करणाऱ्या टेरी डिअरी यांना वाटतं की, विल्यम कॉर्डरवर अन्याय करत त्याला बदनाम करण्यात आलं आहे. तर मारियाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं एक निष्पाप तरुणी म्हणून तयार करण्यात आली आहे.
मॉयसेस हॉल संग्रहालयानं म्हटलं आहे की, ते कॉर्डरबद्दलची चूक दुरुस्त करताना भविष्यातील प्रदर्शनात सफोकच्या इतिहासातील महिला पीडितांवर प्रकाश टाकतील, त्यात मारियाचाही समावेश असेल.
हेरिटेज असिस्टंट अॅबी स्मिथ म्हणाल्या की, तिथे भेट देणारे 80 टक्के लोक रेड बार्न मर्डरबद्दल जाणून घेण्यासाठी “प्रचंड उत्सुक” होते.
“ते कसं संपलं ही मोठी बाब आहे. ते इतकं प्रभावी दृश्य होतं की लोक त्याकडे आकर्षित होणार आहेत.”
“ते दृश्य रक्तरंजित, विचित्र होतं. त्यामुळे लोकांना ते कदाचित आवडलं असावं. ती एक चिंतेची बाब आहे,” असं त्या पुढे म्हणाल्या.
त्या पुस्तकांबद्दल आणखी काय माहिती आहे?
विल्यम कॉर्डरची कातडी वापरलेल्या त्या दोन पुस्तकांपैकी एक पुस्तक त्या खटल्याबद्दल आहे. ते पुस्तक पत्रकार जे कर्टिस यांनी लिहिलं आहे. त्याचं नाव “ट्रायल ऑफ डब्ल्यू कॉर्डर” असं आहे.
विल्यम कॉर्डरच्या मृतदेहाचं विच्छेदन करणारे सर्जन जॉर्ज क्रीड यांनी त्या पुस्तकात एक नोट लिहिली आहे. त्यात म्हटलं आहे की, 1838 मध्ये त्यांनी स्वत:च विल्यमच्या त्वचेवर टॅनिंग केलं होतं आणि त्या कातडीनं पुस्तकाची बांधणी केली होती.

फोटो स्रोत, BBC/Jamie Niblock
दुसरं पुस्तक देखील त्याच आवृत्तीचं असल्याचं मानलं जातं. मात्र त्या पुस्तकावर “पोलस्टेड-विल्यम कॉर्डर” असं लिहिलेलं आहे.
जॉर्ज क्रीड यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या एका कुटुंबानं हे पुस्तक संग्रहालयाला दान केलं होतं. त्याच कुटुंबाकडे त्यांनी त्यांच्या इतरही अनेक मालमत्ता दिल्या होत्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC