Source :- ZEE NEWS
NASA Asteroid Alert: आपल्या प्रत्येकाला अंतराळाबद्दल आकर्षण असतं. तिथे काय असेल? आपण तिथे कधी पोहोचू? पृथ्वीवर घडणाऱ्या घडामोडींशी त्याचा काय संबंध? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण अंतराळातील जग जितके आकर्षक वाटते तितकेच ते आश्चर्यकारक देखील आहे. अंतराळातील घडामोडींसंदर्भात अमेरिकन अंतराळ संस्था नासाने इशारा दिलाय.
आकार एखाद्या स्टेडियमइतका
येत्या काही दिवसांत पृथ्वीजवळून 4 मोठे लघुग्रह म्हणजेच अंतराळ खडक जातील. तथापि, यापासून कोणताही धोका नसल्याचेही नासाकडून स्पष्ट करण्यात आलंय. नासाच्या अहवालानुसार 23 ते 25 मे 2025 दरम्यान हे लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येतील. यापैकी सर्वात मोठा लघुग्रह 387746 (2003 MH4) आहे. जे अंदाजे 1100 फूट लांब आहे. म्हणजे हा आकार एखाद्या स्टेडियमइतका मोठा आहे.
घरा इतका आकार
नासाच्या अहवालानुसार, 23 मे रोजी सर्वप्रथम 2025 केसी नावाचा एक लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे 6.36 लाख किलोमीटर अंतरावर जाईल. ते घराच्या आकाराचे आहे. यानंतर 24 मे रोजी 2025 केएल आणि 2003 एमएच4 हे दोन लघुग्रह पृथ्वीजवळ येतील. केएल सुमारे 19.10 लाख किलोमीटर अंतर कापेल आणि एमएच4 सुमारे 41.5 लाख किलोमीटर अंतर कापेल. अखेर 25 मे रोजी 2025 किमी नावाचा एक लघुग्रह पृथ्वीजवळून 9.6 लाख किलोमीटर अंतरावर जाईल.
अनेकदा पृथ्वीजवळून जातो
लघुग्रह हे खडकाळ पिंड आहेत जे सूर्याभोवती फिरतात. बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान असलेल्या ‘लघुग्रह पट्ट्यात’ आढळतात. जरी ते अनेकदा पृथ्वीजवळून जातात. पण बहुतेक नुकसान करत नाहीत. नासा आणि इतर अंतराळ संस्था अशा लघुग्रहांवर सतत लक्ष ठेवतात जेणेकरून कोणताही धोका वेळेत ओळखता येईल.
लघुग्रह अंदाजे दर 2000 वर्षांनी जवळून जातात
पृथ्वीवर आदळणारे लघुग्रह फारच दुर्मिळ आहेत. नासाच्या मते कारच्या आकाराचे उल्कापिंड वर्षातून एकदा पृथ्वीवर आदळतात. फुटबॉलच्या मैदानाइतके मोठे लघुग्रह अंदाजे दर 2000 वर्षांनी जवळून जातात. बहुतेक लघुग्रह समुद्रात किंवा रिकाम्या जागी पडतात. यावेळी घडणाऱ्या घटनेतही असेच काहीतरी घडणार आहे.
SOURCE : ZEE NEWS