Source :- BBC INDIA NEWS

हा केविन कॅरोल आणि डेबी वेबर यांचा फोटो आहे, यात दोघेजण सांताक्लॉजच्या मांडीवर बसले आहेत आणि कॅमेऱ्याकडे हसत पाहत आहेत

फोटो स्रोत, Deb, Kevin, Val

1 तासापूर्वी

ही 1967 सालची गोष्ट आहे. याच वर्षी केविन कॅरोल आणि डेबी वेबर या दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं.

ही दोघंही तेव्हा किशोरवयीन होती. ते आपापल्या शाळेतील थिएटर ग्रुपमध्ये होते. पहिल्याच नजरेत दोघं एकमेकांना पसंत करू लागले होते.

केविन कॅरोलनं बीबीसी आऊटलूक प्रोग्रॅमला सांगितलं, “मी अशा शाळेत शिकत होतो, जिथे फक्त मुलंच होती. तर डेबी फक्त मुलींच्या शाळेत होती.”

ते म्हणाले, “एका जॉईंट ऑडिशनच्या वेळेस आम्ही सर्वजण ऑडिटोरियममध्ये बसलो होतो. त्यावेळेस मी माझ्या मित्रांना म्हणालो की, ती मुलगी दिसते आहे? मी तिला शाळेच्या नृत्याच्या कार्यक्रमात घेऊन येईन.”

डेबी वेबर म्हणाल्या, “मी ऑडिटोरियममध्ये एकटी बसली होती. कारण इतर शाळांमधून आलेल्या मुलींना मी ओळखत नव्हते. त्यावेळेस मी त्याला पाहिलं तर मला वाटलं की तो आतापर्यंतचा सर्वात गोड मुलगा आहे.”

गोष्ट फक्त या दोघांनी एकत्र नृत्य करण्यावरच संपली नाही. तेव्हापासून ही दोघं एकमेकांपासून दूर राहू शकली नाहीत.

दोघांनी मॅरीलँडला पळून जाण्याची योजनादेखील आखली होती. कारण तिथं लहान वयात लग्न करणं शक्य होतं.

मात्र, मग सर्वकाही बदललं.

डेबी वेबर गरोदर झाल्याचं कळाल्यावर त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. यामुळं दोघंही 40 वर्षांहून अधिक काळासाठी एकमेकांपासून वेगळे झाले.

आज, इतक्या वर्षांनी ते पुन्हा एकमेकांना भेटले आहेत. ते म्हणतात की, त्यांनी ते प्रेम जपलं आहे, जे त्यांना त्यांच्या तारुण्यात पूर्णपणे अनुभवता आलं नव्हतं.

मात्र, इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास, हॉलीवूडच्या एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हता.

लग्नाआधीच गरोदर झाल्यानं आयुष्यंच बदललं

जेव्हा डेबी वेबरच्या आई-वडिलांना माहिती झालं की, त्यांची मुलगी गरोदर आहे, तेव्हाही एका मर्यादेपर्यंत त्यांनी बरीच साथ दिली. अर्थात त्याकाळचा समाज अशा गोष्टी खूप सहजपणे स्वीकारत नसे.

डेबी वेबरनं बीबीसीला सांगितलं, “ते खूप चांगले होते. त्यांना केविनदेखील खूप आवडायचा. त्यांना माहिती होतं की तो एक चांगला मुलगा आहे आणि आमचं एकमेकांवर खरं प्रेम आहे. मात्र त्यावेळेस गरोदर होणाऱ्या मुलींसाठी परिस्थिती अतिशय वेगळी होती.”

त्यामुळे असं ठरवण्यात आलं की, डेबीला सिंगल मदर्ससाठी असणाऱ्या एका विशिष्ट ठिकाणी पाठवण्यात यावं.

केविन कॅरोल यांचा मिलिटरी युनिफॉर्मधील फोटो

फोटो स्रोत, Deb, Kevin, Val

डेबी म्हणतात, “केविन येऊन मला नेऊ शकत होता, याची परवानगी माझ्या आईनं दिली होती. आम्ही कारनं फिरायला जायचो आणि सोबत जेवण करायचो.”

यादरम्यान त्या दोघांच्या मनात अशी आशा होती की, कधी ना कधी त्यांचं लग्न होईल आणि जन्माला येणाऱ्या बाळाला ते एकत्रितपणे सांभाळतील.

डेबी म्हणतात, “मला आशा होती की, एकल आई असणाऱ्या घरात राहण्याची माझी वेळ संपेल आणि ते मला बाहेर जाऊ देतील, तेव्हा आम्हाला लग्न करता येईल.”

केविन याबाबत निर्धास्त होते. हे पाहून त्यांनी त्यांच्या आईचं मन यासाठी वळवलं होतं की वयाच्या 17 व्या वर्षीच त्यांना अमेरिकेच्या मरीन कोअरमध्ये भरती करण्यात यावं.

वैल आणि त्यांना दत्तक घेणारी आई फोटोत दिसत आहेत

फोटो स्रोत, Deb, Kevin, Val

असं करण्यामागे एक खास कारण होतं. ते म्हणतात, “मला माहिती झालं होतं की जर मी मरीन्समध्ये भरती झालो, तर मी डेबीला पैसे पाठवू शकत होतो. त्यासाठी लग्न करण्याची आवश्यकता नव्हती.”

ते म्हणाले, “मला आशा होती की, मरीन विभाग डेबी आणि मुलाची वैद्यकीय देखभालदेखील करेल. मला वाटत होतं की जेव्हा माझं प्रशिक्षण संपेल, तेव्हा आम्हाला लग्न करता येईल.”

मात्र, ही फक्त एक आशाच राहिली. प्रशिक्षणाच्या वेळेस केविन यांना डेबी यांचं एक पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं की ती बाळाला दत्तक देण्यास तयार झाली आहे.

केविननं सांगितलं की ते वाचून त्यांचा गळा दाटून आला होता. ते म्हणतात, “मला त्यावेळेस माझ्या काय भावना होत्या, ते आजदेखील आठवते. मी अनेक मरिन्सबरोबर प्रशिक्षण घेत होतो. तिथे भावना प्रकट करण्यास मनाई असते. मात्र आतून मी पूर्णपणे खचलो होतो.”

आयुष्यानं घेतलं वळण

केविन यांना जेव्हा व्हिएतनाम युद्धासाठी पाठवलं जाणार होतं, तेव्हा डेबीनं त्यांच्याबरोबरचं नातं संपवलं.

त्यानंतर डेबीला त्यांच्या बाळाला सोडल्याची भीतीदायक स्वप्नं पडायची. डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की एका कुटुंबाला ते बाळ दत्तक घ्यायचं आहे, तेव्हा त्यांना थोडासा दिलासा मिळाला.

डॉक्टर त्यांना म्हणाले, “एक कुटुंब आहे, त्यांना आधीच चार मुलं आहेत. मात्र आई आणि बाळांना जन्म देऊ शकत नाही. जर तुला मुलगी झाली, तर त्यांना ते बाळ दत्तक घ्यायचं आहे.”

शेवटी डेबीनं एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या मते ती मुलगी अगदी केविनसारखीच दिसायची.

मग त्यांनी ती मुलगी त्या कुटुंबाला दिली. असं करण्याआधी त्यांनी हा विचार केला नाही की ते कोण लोक आहेत आणि मुलीचं संगोपन कशाप्रकारे करतील.

त्यानंतर, नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी त्यांचं कुटुंबं दुसऱ्या ठिकाणी निघून गेलं. तर दुसऱ्या बाजूला केविन व्हिएतनाम युद्धात होते.

वैल यांना ज्या कुटुंबानं दत्तक घेतलं होतं, त्यात त्यांना चार भाऊ होते

फोटो स्रोत, Deb, Kevin, Val

केविन म्हणाले, “युद्धात ज्या पायलटची विमानं पाडली जात असत, त्या पायलटना परत आणण्याचं माझं काम होतं. 10 ऑक्टोबर 1969 ला आम्ही एक पुरवठा करणारं हेलिकॉप्टर वाचवण्यासाठी गेलो होतो.”

या ऑपरेशनच्या वेळेस केविन यांच्या हातांना, पायांना आणि पाठीला बरीच दुखापत झाली.

ते म्हणाले, “मला वाटलं की मी आता जिवंत राहणार नाही. त्यावेळेस मी देवाला एकप्रकारे भांडतच म्हणालो की तू मला इथे मरू देशील, यावर माझा विश्वास बसत नाही. घरापासून 18 हजार मैल अंतरावर. डेबी आणि माझ्या बाळाला पाहिल्याशिवाय.”

याच दरम्यान एका सैनिकानं त्यांचा जीव वाचवला. केविन आधी फिलिपाईन्स आणि नंतर जपानला नेण्यात आलं. त्यानंतर तिथे उपचार घेतल्यावर आणि विश्रांती घेतल्यानंतर ते अमेरिकेत परतले.

वैल आणि त्यांची आई

फोटो स्रोत, Deb, Kevin, Val

ते म्हणतात, “त्यावेळेस माझ्यावर 18 शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर आणखी 20 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र माझ्यात सुधारणा होत मी व्हीलचेअरवरून वॉकरपर्यंत पोहोचलो. वॉकरहून कुबडयांपर्यंत आलो आणि नंतर कुबड्यादेखील सुटल्या. त्यानंतर मग मी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही.”

इतक्या अडचणी असूनदेखील केविननं डेबीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, डेबी यांना मनातल्या मनात अतिशय पश्चाताप होत होता. त्या सर्वकाही विसरण्याचा प्रयत्न करत होत्या.

त्यांनी अनेकदा लग्नं केलं आणि त्यांना तीन मुलीदेखील झाल्या. दुसऱ्या बाजूला पत्नीच्या मृत्यूनंतर केविन एकटे होते.

त्या दोघांपैकी कोणालाही, अनेक वर्षांपूर्वी दत्तक देण्यात आलेल्या त्या मुलीबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती.

बाप, आई आणि लेक आले एकत्र

शेवटी डेबी वेबर यांनी त्यांच्या मुलींना सर्व सत्य सांगण्याचा निर्णय घेतला.

त्या पुढे म्हणतात, “तो मदर्स डे होता. आम्ही स्वयंपाकघरात होतो. मी माझ्या मुलींना म्हणाले की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी जेव्हा खूप लहान होते, तेव्हा मला एक मुलगी झाली होती. त्यानंतर मी आणि केविन कसे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो, याची सर्व कहाणी त्यांना सांगितली.”

त्यांची एक मुलगी म्हणाली की तिला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, जेणेकरून त्या मुलीचा शोध घेता येईल.

डेबी यांनी सांगितलं, “मला त्या कुटुंबाचं आडनाव माहिती होतं. मला हेदेखील माहिती होतं की त्यांना चार मुलं होते. ते राहायचे तो परिसरदेखील मला आठवत होता.”

कॅरोल, वैल आणि वेबर एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले आहेत

फोटो स्रोत, Deb, Kevin, Val

इतकी माहिती पुरेशी होती. डेबी यांच्या मुलीनं थोडाफार शोध घेतला आणि त्या कुटुंबाला शोधून काढलं. तिनं त्या कुटुंबातील चार मुलांपैकी एकाला संपर्क केला.

उत्तरादाखल तिकडून एक फोन आला आणि फोन करणारी व्यक्ती होती वैल. ही तीच मुलगी होती जिला अनेक वर्षांपूर्वी दत्तक घेण्यात आलं होतं.

वैल बीबीसीला म्हणाल्या, “मी सकाळी आठ वाजता त्यांना फोन केला. मी म्हणाले की, आम्हाला खूप काही बोलायचं आहे. मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नव्हती.”

या उत्तरामुळे डेबी वेबर यांना मोठाच दिलासा मिळाला होता. त्या म्हणाल्या, “अनेक वर्षांपासून माझ्या मनात जी लज्जेची आणि पश्चातापाची भावना होती, ती दूर झाली.”

केविन आणि डेबी 40 वर्षे एकमेकांपासून दूर राहिले, मात्र आता त्यांना लग्न करून दहा वर्षांहून अधिक काळ झाला आहे

फोटो स्रोत, Deb, Kevin, Val

त्याच रात्री त्या दोघी भेटल्या. दरम्यान एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. तो म्हणजे, वैल यांचे खरे पिता म्हणजे केविन कुठे आहेत?

इंटरनेटवर बराच शोध घेतल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या मृत्यूचा एक शोक-संदेश सापडला. त्यानंतर डेबी यांनी केविन यांना एक पत्र लिहिलं.

त्यानंतर आणखी एक खास क्षण आला. डेबी वेबर म्हणतात, “मी म्हणाले की मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. मी आपल्या मुलीला शोधून काढलं आहे. तुला तिला भेटायचं आहे का?”

केविन जोरात ‘हो’ म्हणाले. यानंतर त्यांनी डेबीच्या घरी भेटायचं ठरवलं. केविन पोहोचले, तेव्हा वैल त्यांच्या आईची प्रतिक्रिया पाहून हसू लागली.

डेबी म्हणाल्या, “अरे हा तर किती देखणा आहे.”

वैल आणि त्यांचे वडील केविन कित्येक तास बोलत राहिले. नंतर केविन यांनी मान्य केलं की त्यांचं डेबीवरील प्रेम कधीही संपलं नव्हतं.

पळून जाता न आल्यानं आणि एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर जवळपास 40 वर्षांनी त्या दोघांनी लग्न केलं. आता दोघंही जवळपास 70 वर्षांचे आहेत आणि एकमेकांची पूर्ण काळजी घेत आहेत.

डेबी म्हणतात, “आम्ही एकमेकांची काळजी घेऊ शकतो. एकमेकांवर प्रेम करू शकतो. खरं सांगायचं तर, मला आता आणखी काहीही नको आहे.”

(ही कहाणी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या आउटलुक प्रोग्रॅमवरील एक एपिसोडवर आधारित आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC