Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Zee Talkies/Screengrab
जब्या: ‘व्हय रं पिऱ्या, मी शालूला आवडन का रं?’
पिऱ्या: ‘लय भारी हाय लका तुझं अक्षर. काय सांगता येत नाही.. शालूनी वाचलं तर तिला आवडल पण.’
जब्या: ‘काळी चिमनी घावायला पाहिजी लका.’
नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ सिनेमातले हे संवाद.
चित्रपटाचा नायक जाबुवंत उर्फ जब्या झाडावर पुस्तक घेऊन बसलेला बसलेला आहे. त्याच्या पुस्तकातून त्याने नायिका शालूला लिहिलेली चिट्ठी खाली पडते. ती चिट्ठी तो त्याचा मित्र पिऱ्याला उचलून द्यायला सांगतो.
पिऱ्या चिट्ठी घेतो आणि वाचू लागतो. तिथे हा संवाद आहे.
जब्याला ‘काळी चिमणी सापडायला पाहिजे’ असं का वाटतं? या सिनेमात काळ्या चिमणीचं जे प्रतीक आहे, त्याचा संदर्भ हळूहळू उलगडायला लागतो.
अकोळनेर खेड्याच्या पार्श्वभूमीवर ‘फँड्री’ची कथा घडते.
यामध्ये तथाकथित खालच्या कैकाडी जातीतील जब्याचे (सोमनाथ अवघडे) त्याच्याच वर्गातल्या तथाकथित उच्चजातीय शालू (राजेश्वरी खरात) वर असणारे एकतर्फी प्रेम, जातीमुळे होणारी त्याची मानखंडना याचे चित्रण त्यात आहे.
जब्याचे शालूवर असलेले भाबडे, निरागस प्रेम त्याला कृतीप्रवण (अॅक्टिव) बनविते आणि मग त्याच्या अशा वेगवेगळ्या कृतीप्रवण घटनांच्या मालिकेतून पटकथालेखक व दिग्दर्शक नागराज मंजुळे भारतीय जातिव्यवस्थेच्या कुरूपतेचे आणि दाहकतेचे विविध पैलू उलगडत जातात.
जब्याने व्यवस्थेवरच भिरकावलेला दगड
‘फँड्री’ हा वास्तवादी चित्रपट आहे. मात्र, याची सुरुवात काहीशी गूढ आहे. जब्या हातात गलोल घेऊन एका माळरानावर काळ्या चिमणीला मारण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, त्याचा प्रयत्न फसतो आणि नंतर हा प्रसंग तो त्याचा जिवलग मित्र पिऱ्याला कथन करतो.
चांगला दोन-तीन तास चिमणीचा पाठलाग करूनही चिमणी सापडली नाही, असे सांगतो. त्यावर पिऱ्या त्याला भूताच्या माळावर काळी चिमणी सापडू शकते अशी आशा दाखवतो.
संपूर्ण चित्रपटभर ते काळी चिमणीचा पाठलाग का करत असतात? त्याचे गूढ प्रेक्षकांना हळूहळू उलगडत जाते. शालूला प्रभावित कसे करायचे यावर त्यांची चर्चा चाललेली असते. आणि शालूला प्रभावित करण्यासाठी ज्या गोष्टी त्याला हव्याशा वाटतात, त्यात एक ‘काळी चिमणी’ महत्त्वाची असते.
फोटो स्रोत, Zee Talkies
जब्या हा मितभाषी असून तो त्याच्या कुटुंबीयांसोबत गावकुसाबाहेरील झोपडीवजा छपराच्या घरात राहत असतो. त्याचे वडील, कचरू माने (किशोर कदम) आणि आई/नानी (छाया कदम) पडेल ते काम करून कुटुंबाचे पालनपोषण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.
त्याला धुर्पा (साक्षी व्यवहारे) आणि सुर्की (ऐश्वर्या शिंदे) अशा दोन बहिणी आहेत. आजोबा (रामचंद्र धुमाळ) थकलेले आहेत.
मोठ्या बहिणीला एक मूल असून, तीही त्यांच्यासोबतच राहते, तर लहान बहिणीचे लग्न ठरलेले आहे. त्यामुळे कचरू नेहमी कुटुंबाचा गाडा कसा रेटायचा, पैसे कसे जमवायचे या काळजीत असतो.
कचरू अनेक लोकांच्या दारी जाऊन काही काम मिळेल का? श्रीमंत उच्चजातीय शेतकऱ्यांकडून (सुरेश विश्वकर्मा, सचिन बिचीतकर) काही पैसे उसने मिळतील का? याची चाचपणी करत असतो.
पूर्ण गाव हे देवाची जत्रा करण्याच्या तयारीला लागलेले आहे आणि देवाची पालखी निघणार असल्यामुळं गावचे सरपंच, पाटील आणि गावकरी हे गाव स्वच्छ असावे, याची काळजी करताना दिसत आहेत.
यावेळी घडणाऱ्या अनेक प्रसंगांमधून जब्या आणि त्याच्या कुटुंबाला खालच्या जातीतील असल्याची हरेक प्रकारे जाणीव करून दिली जाते.
या सर्व घटना शेवटी कथेल एका वेगळ्या वळणावर नेतात. जेव्हा डुक्कर देवाच्या पालखीला शिवते, तेव्हा उच्चजातीय सरपंच (प्रविण तरडे) कचरूला बोलावून दुसऱ्या दिवशी दिवस उजाडायच्या आत डुक्कर पकडून त्याचा बंदोबस्त करायला सांगतो.
फोटो स्रोत, Zee Talkies/Screengrab
दुसऱ्या दिवशी कचरू आणि त्याचे कुटुंब सकाळी लवकर डुक्कर पकडण्यासाठी बाहेर पडतात. डुक्कर पकडण्यासाठी त्यांना हागणदारीत जावे लागते. त्यातच हे काम शाळेच्या जवळ आणि शाळा भरायच्या वेळेपर्यंत करावे लागत असल्यामुळे जब्या खूप अस्वस्थ असतो.
हळूहळू गावकरी त्यांच्या डुक्कर पकडण्याच्या कामाची मजा बघण्यासाठी आणि त्यांची हुर्यो उडविण्यासाठी जमा व्हायला लागतात. त्यांच्यासाठी ते करमणुकीचे दृश्य बनते. त्यात ते मुख्यतः जब्याला चिडवण्यासाठी टार्गेट करतात.
जब्या सुरुवातीला वर्गमित्रांपासून, विशेषतः शालूला दिसू नये म्हणून लपत असतो. बराच वेळ डुक्कर काही केल्या सापडत नाही आणि त्यातच जब्या लपून बसलेला पाहून कचरू आणखीनच चिडतो.
तो त्याला शिव्या घालत, ओरडत, मारत आणून डुक्कर पकडण्याच्या कामी पुन्हा जुंपतो. हे दृश्य आणखीच मग हुर्यो उडविणाऱ्या टोळीच्या पथ्यावर पडते आणि ‘ए…फँड्री…’ म्हणून ते जब्याची टर उडवितात.
शेवटी खूप प्रयासाने पकडलेले डुक्कर घेऊन जाताना उच्चजातीय आबा पाटील (भूषण मंजुळे), संग्राम पाटील (सोहेल शेख) व त्यांचे टोळके हे जब्या आणि त्याच्या बहिणींना टोमणे मारत, अपमान करत शिव्या देतात.
या वेळी जब्याने इतका वेळ दाबून ठेवलेला राग, चीड, अपमान एकदम उफाळून येतो आणि आबाला शिव्या देत दगड मारू लागतो.
आबा जब्याच्या दिशेने रागाने चाल करून येत असताना जब्याही पुढे सरसावत आबाच्या, पर्यायाने कॅमेरा आणि प्रेक्षकांच्या दिशेने त्वेषाने दगड भिरकावतो आणि चित्रपट संपतो.
तो भिरकवलेला दगड आपल्यासाठी अनेक प्रश्न सोडून जातो.
काळी चिमणी आणि डुक्कर यांची प्रतीकं
संपूर्ण चित्रपटभर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी समकालीन जातिव्यवस्था आणि स्पृश्यास्पृश्यता यावर चपखलपणे भाष्य करण्यासाठी काळी चिमणी आणि डुक्कर यांचा प्रतिकात्मक आणि रुपकात्मक वापर कसा केला आहे, याचे विस्तृत विश्लेषण नुकत्यात प्रकाशित झालेल्या ‘फँड्री: भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड’ ह्या पुस्तकात केलं आहे.
लोक-आख्यायिकेनुसार काळी चिमणी सापडण्यास अशक्य समजली जाते आणि आवडत्या मुलीला संमोहित करण्यासाठी तिच्या डोक्यावर काळ्या चिमणीची राख टाकली की ती वश होते, प्रेम स्वीकारते अशी ही दंतकथा आहे.
काळ्या चिमणीला मारून तिची राख शालूवर टाकायचा मंत्र हा चंक्या उर्फ चंकेश्वर साठे (नागराज मंजुळे) जब्याला देतो. नकारात्मक जातवास्तव असलेल्या असलेल्या आपल्या समाजात प्रेम करणे ही किती अवघड गोष्ट आहे, हे यातून जाणवते.
फोटो स्रोत, Zee Talkies/Screengrab
त्याचप्रमाणे संपूर्ण चित्रपटभर डुक्कर हे जातिव्यवस्थेचे आणि अस्पृश्यतेचे प्रतीक म्हणून वावरते. त्यातून कचरू आणि कुटुंबाचे जातिव्यवस्थेतील सामाजिक आणि अवकाशीय अस्पृश्य अस्तित्वही दिसून येते.
कचरू आणि कुटुंब हे यात्रेत बत्ती धरणे, चहा देणे, जमीन खोदणे, साफसफाई करणे, झाप विणणे, डुक्कर पकडणे, इ. मिळेल ते आणि पडेल ते काम करतात.
मात्र, त्यांना गावच्या राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक मुख्य प्रवाहात खऱ्या अर्थाने सामावून घेतले जात नाही. त्यांचे सामाजिक अस्तित्व हे डुकरासारखेच अस्पृश्य, बहिष्कृत कसे आहे हे ‘डुक्कर पालखीला शिवणे’ किंवा ‘राणीला डुक्कर शिवलंय’ सारख्या प्रसंगातून प्रतीत होते.
‘चित्रपटाचे प्रमोशनल साँग हे माझे छोटे आत्मचरित्रच’
या चित्रपटात एकही गाणे नाही. मात्र चित्रपटाच्या प्रमोशनचे ‘तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला’ हे अजय-अतुल यांनी यांनी लिहिलेलं, संगीतबद्ध आणि गायलेलं गाणं खूप प्रसिद्ध झाले.
फोटो स्रोत, Hanumant Lokhande
‘फँड्री: भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड’ ह्या पुस्तकात दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी म्हटलं की ‘खरेतर हे गाणं म्हणजे माझं छोटं आत्मचरित्रच आहे.
‘सांदी कोपऱ्यात उभा एकला कधीचा, लाज ना कशाची तक्रार न्हायी, भास वाटतोया हे खरं का सपान, सुखाच्या या सपनाला दार न्हायी’ हे माझ्या भावनेशी आणि स्वभावाशी मेळ साधणारं आहे, असं ते म्हणाले.
कचरूची भूमिका करायला आवडली असती: गिरीश कुलकर्णी
नागराज मंजुळे यांनी सगळे नवखे कलाकार घेऊन केलेला हा चित्रपट आहे. किशोर कदम वगळता त्याकाळी प्रसिद्ध असणारा एकही अभिनेता या चित्रपटात नाही.
‘फँड्री: भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड’ ह्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात किशोर कदम यांनी ‘फँड्री’ चित्रपट करण्याच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
मंजुळे यांनी जेव्हा कदम यांना चित्रपटाची पटकथा ऐकवली तेंव्हा त्यांना सुरुवातीला वाटले की, यात अभिनयाला फारसा वाव नाही कारण फक्त डुक्कर पकडत त्याच्यामागेच खूप वेळ पळायचे आहे.
पण जेव्हा त्यांनी ‘जन-गण-मन’ चा सीन ऐकला तेव्हा ते खूप भारावून गेले आणि चित्रपटाला होकार दिला. कारण हा सीन सद्यकालीन जातिव्यवस्था, राष्ट्रवाद यांवर खूप मार्मिकपणे भाष्य करणारा आहे.
फोटो स्रोत, Hanumant Lokhande
याच कार्यक्रमात गिरीश कुलकर्णी यांनी ‘किशोर कदम यांनी केलेली कचरूची भूमिका मला करायला आवडली असते, कारण ती खूप ताकदीची भूमिका आहे’ असं म्हटलं होतं.
कुलकर्णी यांनी ‘मी त्यावेळी किशोरवर प्रचंड जळलो होतो मला ती भूमिका करायला मिळाली नाही म्हणून कारण मी पण लहानपणी पुण्यात, धनकवडीत डुकराच्या मागे खूप पळालो आहे’ अशी प्रांजळ कबुलीही दिली.
‘जब्या’कसा सापडला?
2011 साली नागराज मंजुळे यांना ‘पिस्तुल्या’ लघुपटासाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यानिमित्ताने करमाळा तालुक्यातील केम गावात सचिन बिचीतकर आणि गावकऱ्यांनी नागराज यांचा सत्कार ठेवला होता.
त्यावेळी मिरवणुकीत सोमनाथ अवघडे उत्तम हलगी वाजवत होता. नागराज यांना आगामी ‘फँड्री’ चित्रपटात जब्याच्या भूमिकेसाठीही हलगी वाजवणारा, काळासावळा, चौदा-पंधरा वर्षांचा मुलगा हवा होता.
नागराजने सोमनाथला जब्याच्या भूमिकेसाठी विचारल्यावर सुरुवातीला सोमनाथने नकार दिला होता.
कारण त्याचा विश्वास बसत नव्हता की, त्याच्यासारखा दिसणारा चित्रपटात नायक कसा काय असू शकतो. त्याची चेष्टा करतात असे त्याला वाटत होते, मात्र नंतर तो या भूमिकेसाठी तयार झाला.
नंतर त्याला ‘उत्कृष्ट बाल-कलाकार’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले, तर नागराजला पदार्पणातील ‘उत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार मिळाला.
‘फँड्री’ ची पटकथा लिहिताना भावूक झाले होते नागराज
‘पिस्तुल्या’ लघुपटातील नायकाचा संघर्ष हा शिक्षणासाठीचा आहे, तर ‘फँड्री’तील जब्या प्रेमासाठी आणि सन्मानासाठी संघर्ष करतो.
नागराजही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असाच संघर्ष करीत होते आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रपटांत उतरलेले दिसते.
‘फँड्री’ची पटकथा लिहीत असताना नागराज एके ठिकाणी जब्याचा संवाद लिहिताना भावनिक झाले होते.
फोटो स्रोत, Hanumant Lokhande/New Era publ
तो अनुभव सांगताना नागराज म्हणतात, ‘एक सीन आहे- जब्या झाडावर बसलेला आहे आणि त्याच्या पुस्तकातून त्याने शालूला लिहिलेली चिट्ठी खाली पडते. ती चिट्ठी तो पिऱ्याला उचलून द्यायला सांगतो. पिऱ्या चिट्ठी उचलतो, वाचतो आणि म्हणतो, ‘लय भारी हाय लका तुझं अक्षर. काय सांगता येत नाही, शालूने वाचलं तर तिला आवडलपण.’
त्यावर जब्या प्रश्न विचारतो, ‘व्हय रं पिऱ्या, मी शालूला आवडन का रं?’ हे लिहून झाल्यावर मी पुन्हा वाचत होतो. तेव्हा टचकन डोळ्यात पाणी आले. मी खूप उदास झालो.
त्यावेळी मी चांगला तासभर रडूनरडून झोपी गेलो होतो एकटाच. जुनी जखम नव्याने भळभळावी तसं झालं होतं. आपण कोणालातरी आवडलो पाहिजे ही किती माफक अपेक्षा असते. पण आपण कोणाला आवडू का? या प्रश्नाचा विचार करण्यातच आयुष्य गेलं.
तेव्हा फिल्म सुरू झाली नव्हती. कास्टिंग वगैरे काही झालं नव्हतं. फक्त स्क्रिप्ट लिहून पूर्ण झाली होती. सगळं अमूर्त, अदृश्य असं होतं. मागे वळून बघताना, मी तेव्हा लिहीत असताना वाटले की, आपण कसे जगलो? आपले आयुष्य काय आहे? आपली माणसे कशी जगतात? याविषयी विचार करून खूप वाईट, उदास वाटल होतं.
अजूनही आपल्याला तोच प्रश्न सतावतो. आपण सगळी हाच विचार करत राहतो की आपण कोणालातरी आवडत असू का?’
भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड
एकूणच मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही जातीवर भाष्य करणारे अगदी मोजके असे काही चित्रपट तयार झाले आहेत. त्या यादीत अत्यंत वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून ‘फँड्री’ गणला जाईल.
किंबहुना तो खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटातील जातीविषयक समस्यांना थेटपणे हात घालणारा पहिलाच कल्ट सिनेमा होय असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
कारण अतिशय कमी बजेट, कुठलीही स्टारकास्ट नाही, सगळे नवखे कलाकार आणि नॉन-अक्टर, तरीही नागराज पटकथा, दिग्दर्शन आणि आशय-विषय हाताळण्याच्या धाटणीमुळे खूप परिणामकारकपणे जातिव्यवस्थेची भयावहता आणि त्रासदायकता उघड करतो.
हा भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड असून मानवमुक्तीचे गाणं गाणारा मानवतावादी चित्रपट म्हणून इतिहासात नोंदला जाईल.
(लेखक नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुणे इथे प्राध्यापक आहेत आणि ‘फँड्री: भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड’ या पुस्तकाचे लेखक आहेत. लेखातील विचार त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC







