Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीतील ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट (एम्स) येथील डॉक्टरांनी गर्भाशय मुखाचा कर्करोग झालेल्या(सर्व्हायकल कॅन्सर) रुग्णांसाठी एक नवीन रक्त तपासणी तयार केली आहे.
या रक्त तपासणीमुळं रूग्णांना त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांचा काही परिणाम होत आहे की नाही हे समजू शकणार आहे.
ही चाचणी महागड्या आणि पारंपारिक वेदनादायक टिश्यू बायोप्सीची जागा घेऊ शकते, जी सध्या सर्व्हायकल कॅन्सरच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरली जात आहे.
या चाचणीमुळे उपचार अधिक प्रभावीपणे करता येणार आहेत. कर्करोगाशी लढणाऱ्या महिलांसाठी ही एक मोठी वैद्यकीय मदत ठरणार आहे.
एम्सच्या डॉक्टरांनी त्यांच्या शोधनिबंधात म्हटलं आहे की, या चाचणीमध्ये रक्ताच्या नमुन्यांद्वारे ट्यूमर पेशींचं विश्लेषण केलं जातं. ही एक अशी प्रक्रिया आहे जी हा रोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
नेचर ग्रुपच्या ‘सायंटिफिक रिसर्च’ या नियतकालिकात संशोधनाच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल प्रसिद्ध झाले आहेत.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग गर्भाशयाला (युटेरस) योनीशी जोडणाऱ्या गर्भाशयात होतो. डब्ल्यूएचओच्या मते, महिलांना होणारा हा चौथा सर्वात सामान्य कॅन्सर आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. 2022 मध्ये, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णांबाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर होता.
लसीकरणाद्वारे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येत असला तरी, भारतीय महिलांमध्ये मृत्यूचे हे एक प्रमुख कारण आहे. दर आठ मिनिटांनी एका महिलेचा सर्व्हायकल कॅन्सरमुळं मृत्यू होतो.
याचं कारण सांगताना डॉ. मयांक सिंह म्हणतात, “भारतात अजूनही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस फार कमी महिलांना दिली जाते. यामुळेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूदरात भारत सर्वात पुढं आहे.”
डॉ. सिंह म्हणतात, “भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळं रुग्णांमध्ये ते सुरुवातीच्या टप्प्यात शोधणं खूप महत्त्वाचं आहे. कारण भारतात या आजाराचे बहुतांश रुग्ण हे कॅन्सरच्या पुढच्या टप्प्यात उपचारासाठी येतात.”
नवीन चाचणीमध्ये काय महत्त्वाचं आहे?
या संशोधनातील महत्त्वाचा निष्कर्ष सर्व्हायकल कॅन्सरच्या रुग्णांमधील ह्यूमन पॅपिलोमाव्हायरसच्या (एचपीव्ही) डीएनए पातळीशी संबंधित आहे. एचपीव्ही हा एक विषाणू आहे, जो रोगाला कारणीभूत ठरतो.
या संशोधन अभ्यासात एम्सच्या डॉक्टरांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर नुकतेच उपचार सुरू केलेल्या 60 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. यासोबतच नियंत्रण गट तयार करणाऱ्या 10 निरोगी महिलांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले होते.
अभ्यासात असं दिसून आले की, तीन महिन्यांच्या उपचारानंतर, कर्करोगाच्या रुग्णांमध्ये व्हायरल डीएनएचे प्रमाण जवळजवळ निरोगी महिलांच्या पातळीपर्यंत कमी झाले होते.
डॉ. सिंह म्हणतात, “या अभ्यासाचे निकाल यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात हा उपचार प्रभावी आहे की नाही, हे सांगू शकणारा कोणताही विशिष्ट प्रतिजन (अँटीजेन) मार्कर नसतो.”

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, “प्रत्येक वेळी रुग्णाची पारंपारिक बायोप्सी करावी लागते आणि त्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करावं लागतं. तुम्हाला ट्यूमरचा नमुना घेऊन त्याची तपासणी करावी लागते. अशा प्रकारच्या पारंपारिक बायोप्सीला वेळ लागतो. ते महागडे असते आणि त्यामुळं रुग्णालाही खूप त्रास होतो.”
त्यांनी सांगितलं की, नवीन पद्धतीला ‘लिक्विड बायोप्सी’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याची किंमत सुमारे 2500 रुपये इतकी असेल. यामध्ये पारंपारिक बायोप्सीपेक्षा कमी वेदना सहन कराव्या लागतील. कारण यामध्ये रुग्णाचे फक्त 5 मिली रक्त घेतले जाईल.
या अभ्यासात सामील असलेल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर लक्ष ठेवण्यासाठी रक्त तपासणी हे एक व्यापक पाऊल ठरु शकतं.
परंतु, डॉ. सिंह यांचा असा विश्वास आहे की, अशा चाचणीसाठी डायगोनोस्टिक सुविधांची आवश्यकता असते. या सुविधा भारताच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध नाही.
ते म्हणतात, “एकदा तंत्रज्ञान व्यापक झालं की, ते सहज उपलब्ध होऊ शकतं.”

फोटो स्रोत, Getty Images
संशोधनाच्या पुढील टप्प्यात एम्सचे डॉक्टर चाचणी अधिक अचूक करण्याचा प्रयत्न करतील. ते सर्व्हायकल कॅन्सरमुळं निर्माण होणाऱ्या विषाणूंव्यतिरिक्त इतर म्यूटेशनचा समावेश करून हे करतील.
डॉ. सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, एम्समध्ये ही रक्त तपासणी सुरू करण्यापूर्वी रुग्णांच्या दुसऱ्या गटावर क्लिनिकल चाचणी करण्याची आवश्यकता भासेल.
ते म्हणाले, “जगभरात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी संबंधित आणखी तीन वेगवेगळे अभ्यास प्रकाशित झाले आहेत. त्यातही असे परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळं या चाचणीत शक्यता असल्याचे दिसते.”
सर्व्हाकयल कॅन्सर का होतो? त्याचे उपचार काय आहेत?
डब्ल्यूएचओच्या मते, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची 99 टक्के प्रकरणं एचपीव्ही विषाणूशी निगडीत आहेत, जी लैंगिक संपर्काद्वारे शरीरात प्रवेश करतात.
एचपीव्हीच्या अतिसंसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नसली, तरीही जर एखाद्याला या विषाणूचा वारंवार संसर्ग झाला, तर नंतर तो सर्व्हायकल कॅन्सरचं रूप घेतो.
अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, एचपीव्ही व्हॅक्सीन विषाणूमुळे होणारा संसर्ग 10 वर्षांपर्यंत रोखू शकते. परंतु, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हे संरक्षण दीर्घकाळ टिकू शकतं.
मुलांना लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी ही लस देणं आवश्यक आहे. कारण लस केवळ संसर्ग टाळू शकते. त्यामुळं विषाणूंपासून सुटका होत नाही.
डब्ल्यूएचओच्या मते, एचपीव्ही संसर्ग सर्व्हाकयल कॅन्सरमध्ये बदलू शकत असला, तरीही हा सध्या रोगाचा असा प्रकार आहे, ज्याचा उपचार शक्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कॅन्सरचे नंतरच्या टप्प्यावर निदान झाले तरी योग्य उपचार आणि काळजी घेऊन त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात त्याचा समावेश करण्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालय काम करत आहे. या कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केलं जातं.
भारत सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये देशातच विकसित ‘सर्व्हाव्हेक’ ही पहिली एचपीव्ही लस लाँच केली होती.
यानंतर, त्याच वर्षी केंद्र सरकारने राज्य सरकारांना 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना शाळा आणि आरोग्य केंद्रांद्वारे लसीकरण करण्यासाठी पत्र लिहिले.
या विषाणूशी संबंधित कर्करोगाचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टर 9 ते 14 वयोगटातील मुलांनाही एचपीव्हीपासून संरक्षण मिळावं यासाठी लस देण्यावर भर देतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC