Source :- BBC INDIA NEWS

964 मध्ये फातिमा जिना पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्या विरोधात संयुक्त विरोधी पक्षाच्या उमेदवार होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

पूर्व पाकिस्तान (सध्याचे बांगलादेश) असो किंवा पश्चिम पाकिस्तान, संपूर्ण देश त्यावेळी फातिमा जिनांसाठी वेडा झाला होता.

1964 साली 71 वर्षांच्या फातिमा जिना या राष्ट्रीय निवडणुकीत पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्या विरोधात संयुक्त विरोधी पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांचा निवडणूक प्रचार अगदी जोशात सुरू होता.

30 ऑक्टोबर 1964 रोजी या निवडणूक प्रचाराचा वृत्तांत ‘टाइम’ मासिकाने प्रसिद्ध केला होता. त्यात ढाका येथे सुमारे अडीच लाख लोक फातिमा यांना पाहण्यासाठी आल्याचे लिहिले होते.

टाइम मॅगझिनने आपल्या वृत्तांतात म्हटले होते की, “ढाका ते चितगाव या 293 मैल लांबीच्या मार्गावर सुमारे दहा लाख लोकांनी त्यांचे (फातिमा जिना) स्वागत केले. त्यांची रेल्वे (ज्याला फ्रीडम स्पेशल असे नाव देण्यात आले होते) 22 तास उशिराने पोहोचली. कारण प्रत्येक स्टेशनवर लोक रेल्वेतील साखळी ओढत आणि त्यांना भाषण करायला सांगत.”

अशाच पद्धतीने ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या 8 नोव्हेंबर 1964 च्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये (पूर्व आणि पश्चिम) फातिमा जिनांचा पांढरा शुभ्र वेष आणि त्यांचा रुबाबदार चेहरा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. आपल्यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जात.

“त्या थोड्या गर्विष्ठ आहेत, असे त्यांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर वाटते. परंतु, जेव्हा त्या स्मितहास्य करतात त्यावेळी सर्वांच्या मनात घर करतात,” असे या वृत्तात म्हटले होते.

“जेव्हा त्या बोलतात तेव्हा त्यांचे इंग्रजी कोणालाच समजत नाही. परंतु, त्यांचा प्रत्येक शब्द लोक कान देऊन ऐकतात. त्यांच्या भाषणातील प्रत्येक वाक्याचे भाषांतर झाल्यानंतर तो संपूर्ण परिसर घोषणा आणि टाळ्यांनी निनादून जातो.”

‘मादर-ए-मिल्लत’ (राष्ट्रमाता) अशा घोषणा देणाऱ्या जमावाला जेव्हा त्या, ‘तुम्ही माझ्यासोबत आहात का’, असे विचारतात. तेव्हा उत्साहात हजारो हात वर येतात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

संयुक्त विरोधी पक्षाच्या उमेदवारामुळे अयुब खान यांना धक्का

शाहीद रशीद आपल्या ‘मादर-ए-मिल्लत, मोहसिना-ए-मिल्लत’ या पुस्तकात लिहितात, “सत्ता मिळावी अशी फातिमाजींची इच्छा नव्हती. परंतु, संविधानाची निर्मिती आणि जनतेचे हक्क, अधिकार यात त्यांना रस होता. सत्तेत नसतानाही त्या वेळोवेळी तत्कालीन नेतृत्त्वाला त्यांच्या चुकांची जाणीव करुन देत असत.

“जे लोक लोकशाहीच्या नावावर जनतेच्या हक्कांचे उल्लंघन करत होते, मादर-ए-मिल्लतने त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आणि जेव्हा देश हुकूमशहांच्या तावडीत सापडला तेव्हा त्या त्याच्या परिणांमाबाबत सामान्य लोकांना जागरुक करु लागल्या.”

राजकारणी नवाबजादा नसरुल्लाह खान अजहर मुनीर त्यांचे पुस्तक ‘मादर-ए-मिल्लत का जम्हूरी सफर’च्या प्रस्तावनेत लिहितात की, “त्यांनी अयूब खानच्या मार्शल लॉ आणि त्यांच्या हुकूमशाहीला कडाडून विरोध केला. इतकेच नाही, तर त्या आपल्या वृद्धापकाळातही हुकूमशहाच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार झाल्या होत्या.”

1964 मध्ये फातिमा जिना पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्या विरोधात संयुक्त विरोधी पक्षाच्या उमेदवार होत्या.

फोटो स्रोत, Courtesy Learning and Life

नवाबजादा नसरुल्लाह खान यांनी याबाबत एका घटनेचा संदर्भ देताना लिहिले की, “एकदा मी फातिमा जिना यांना सांगितले की, पत्रकारांनी आमचा पाठलाग केला आणि फ्लॅग स्टाफ हाऊस (फातिमा जिना यांचे निवासस्थान) गाठले.”

“आम्ही इथून बाहेर जाऊन पत्रकारांना काहीही सांगितले नाही तर उद्या फातिमा यांनी संयुक्त विरोधी पक्षाचा प्रस्ताव स्वीकारला नाही, अशा बातम्या छापून येतील. त्यामुळे जनतेची घोर निराशा होईल आणि त्याचा फायदा अयुब खान यांना होईल.”

“आमच्यावर दया दाखवत फातिमाजींनी आमचा प्रस्ताव स्वीकारला. त्याचवेळी, पत्रकारांच्या प्रतिनिधींना या निर्णयाची माहितीही देण्यात आली.”

‘टाइम’नुसार,”एकाच उमेदवारावर कम्युनिस्टांपासून उजव्या विचारसरणीच्या मुस्लिमांपर्यंत विरोधी पक्षांचे एकमत होईल, असे अयुब यांना वाटले नव्हते. या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी अनपेक्षित होत्या.”

1958 मध्ये अयुब खान यांनी लष्करी उठाव करून सत्ता मिळवली.

फोटो स्रोत, Getty Images

नवाबजादा नसरुल्ला हे विरोधकांच्या हालचालीत सक्रिय सहभागी होते.

ते वकील अंजुम यांचे पुस्तक ‘शमा-ए-जम्हूरियत’च्या प्रस्तावनेत लिहितात की, विरोधी पक्ष त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करु शकणार नाहीत, असा दावा अयुब खान यांच्या कायदा मंत्र्याने राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यावर केला होता.

“पाच विरोधी पक्षांनी एकत्रित येत संयुक्त विरोधी पक्ष नावाने एक राजकीय युती केली. या बैठकीत मुस्लिम लीगचे (कौन्सिल) अध्यक्ष ख्वाजा निजामुद्दीन, निजाम-ए-इस्लाम पक्षाचे अध्यक्ष चौधरी मोहम्मद अली, नॅशनल अवामी पक्षाचे अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद भाशानी आणि मियां मोहम्मद अली कसुरी, अवामी लीगकडून मी आणि शेख मुजीबर रहमान आणि जमात-ए-इस्लामीच्या वतीने चौधरी रहमत इलाही सहभागी झालो होतो.”

नंतर मौलाना अबुल आला मौदुदी यांनी जमात-ए-इस्लामीचे प्रतिनिधीत्व केले. पहिल्या बैठकीच्या वेळी ते तुरुंगात होते.

मोहम्मद अली जिना यांच्या बहीण

नवाबजादा नसरुल्लाह यांच्या मते, पहिल्या बैठकीत कोणाच्याच नावाचा उमेदवार म्हणून विचार झाला नव्हता. परंतु, प्रत्येक नेत्यांच्या मनात दोनच नाव होते, एक फातिमा जिना आणि दुसरे पूर्व पाकिस्तानचे गव्हर्नर आझम खान यांचे.

फातिमा जिना यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याच्या निर्णयापर्यंत सर्वांचे एकमत कसे झाले आणि दोन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर त्यांनी ते कसे मान्य केले, याची माहिती दिल्यानंतर नवाबजादा नसरुल्लाह यांनी लिहिले की, ‘या निर्णयामुळे संपूर्ण देशात अभूतपूर्व उत्साह निर्माण झाला.

फातिमा जिना यांची प्रचार मोहीम रंगात आली असतानाच त्याला धक्का देण्यासाठी अचानक निवडणुकीची तारीख बदलण्यात आली. आधी घोषित केल्याप्रमाणे निवडणूक मार्च महिन्याऐवजी दोन जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली.

फातिमा जिना या पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या बहीण होत्या आणि त्यांच्या खूप जवळच्या होत्या.

फोटो स्रोत, Nazaria Pakistan Trust

1 डिसेंबर 1964 रोजी ‘जंग’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने एकाच दिवसात तीन अधिसूचना जारी केल्या. ज्यात राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांची नावे, त्यांचे निवडणूक चिन्ह आणि मतदान 2 जानेवारीला जाहीर करण्यात आले.

अयुब खान यांचे निवडणूक चिन्ह ‘फूल’ तर फातिमा जिना यांचे चिन्ह ‘कंदील’ होते.

नवाबजादा नसरुल्ला लिहितात, “ते जिथे जिथे जात, तिथे लहान मुले, तरुण, वृद्ध, पुरुष आणि स्त्रियांच्या हातात फातिमा यांचे निवडणूक चिन्ह ‘कंदील’ असत. लोक हे चिन्ह हातात घेऊनच त्यांचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर येत.”

“पूर्व पाकिस्तानच्या दौऱ्यादरम्यान, फातिमा यांनी ढाका ते चितगावपर्यंत रेल्वेने प्रवास केला. त्यांनी वेळापत्रकापेक्षा तिप्पट वेळ घेतला. कारण प्रत्येक स्टेशनवर लाखो लोक त्यांना भाषण करण्याचा आग्रह करत. लोक त्यांच्या भाषणाची वाट पाहत असत. भाषणासाठी हट्टाने पेटलेले लोक रेल्वेच्या समोर झोपत असत.”

‘न्यूयॉर्क टाईम्स’ने लिहिले की, फातिमा जिना यांची निवड मुळात या कारणासाठी केली होती की, त्या पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या बहीण होत्या आणि त्यांच्या खूप जवळच्या होत्या.

अयुब खान यांच्या प्रखर टीकाकार

‘न्यूयॉर्क टाईम्स’नुसार, “देशभरातील विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. बहुतेक कायदेशीर संघटना फातिमा जिना यांच्या समर्थनार्थ उतरल्या होत्या. त्यांना अयुब यांनी ‘खट्याळ’ म्हणून फेटाळून लावले होते.”

“सर्वसाधारणपणे सरकारला पाठिंबा देणाऱ्या वृत्तपत्रांच्या संपादकांनी नवीन कठोर प्रेस कायदा स्वीकारण्यास नकार दिला. ते ‘मूलभूत लोकशाही’ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अयुब यांच्या दाव्यावर, फातिमा जिना यांनी ही कसली लोकशाही आहे? एका व्यक्तीची लोकशाही?,” असे विचारले होते.

वृत्तपत्राने पुढे लिहिले की, “सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अयुब खान यांच्यावर हुकूमशहा असल्याचा आरोप केला… पाश्चात्य मानकांनुसार, अयुब हे खरोखरच हुकूमशहा आहेत. ते माध्यमांना नियंत्रित करतात आणि अनेक विरोधकांना तुरुंगात टाकले आहे.”

फातिमा जिना यांनी अयुब खान यांच्या मार्शल लॉ आणि त्यांच्या हुकूमशाहीला कडाडून विरोध केला.

फोटो स्रोत, Nawa-e-Waqt

त्या काळातील माहिती सचिव अल्ताफ गौहर यांनी त्यांच्या ‘फर्स्ट 10 इयर्स ऑफ फौजी राज’ या पुस्तकात म्हटले आहे की, लाहोरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अयुब खान यांनी मिस जिना अविवाहित असून ‘निसर्गविरोधी’ जीवन जगत असल्याचा आरोप करत त्या वाईट सवयींच्या आहारी गेल्याचे म्हटले होते.

एका कोपऱ्यात राहणारी कमकुवत मनाची ती एक म्हातारी आहे. त्या निवडून आल्यास अराजकता माजेल, असे अयुब यांनी फातिमा यांच्याबाबत म्हटले होते.

दुसरीकडे, त्यांचे विरोधक स्पष्टपणे म्हणतात की, तुम्ही ताकद आणि लाठीच्या जोरावर स्थिरता मिळवू शकत नाही.

डॉ. रुबिना सहगल यांच्या ‘फेमिनिझम अँड द वुमेन्स मूव्हमेंट इन पाकिस्तान’ या शोधनिबंधानुसार आणि त्यावेळच्या वर्तमानपत्रांत आलेल्या वृत्तानुसार, अयुब खान यांनी निवडणूक प्रचारादरम्यान फातिमा जिना यांचे वर्णन ‘स्त्रीत्व आणि आपुलकीने रहित’ महिला असे केले होते.

ग्राफिक्स

अहसान अली बाजवा यांच्या ‘मादर-ए-मिल्लत, फखर-ए-मिल्लत’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या संशोधनात अयुब खान सरकारने महिला देशाची प्रमुख असण्याच्या विरोधात फतवा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कराचीतील मौलाना मौदुदी यांनी पुरुषांमुळे राष्ट्राचे भले होत नसेल तर महिला राज्यप्रमुख होऊ शकते, असे म्हटले होते.

या काळात मौलाना मौदुदींचे एक वाक्य सर्वांच्या ओठावर होते, ते म्हणजे, “अयूब खान यांच्यात ते पुरुष असतील असा कोणताच गुण त्यांच्यात नाही. आणि फातिमा जिनांमध्ये याच्या शिवाय कसलीच कमतरता नाही की त्या महिला आहेत.”

लोकशाही देशात एक महिला राष्ट्रपती होऊ शकते, असा फतवा दारूल इफ्ता, दारुल उलूम कराचीचे मौलाना मुफ्ती मोहम्मद शफी यांनी जारी केला. सुरुवातीच्या विरोधानंतर जमियत उलेमा-ए-इस्लामनेही फातिमा जिना यांना पाठिंबा जाहीर केला.

ख्वाजा नाझिमुद्दीन यांना निवडणुकीच्या तणावामुळे 22 ऑक्टोबरला हृदयविकाराचा झटका आला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आणि फातिमा जिना यांनी या दुर्दैवी घटनेचे एक शोकांतिका म्हणून वर्णन केले.

‘लोकशाही हरली आणि हुकूमशाही जिंकली’

निवडणूक मोहिमेने वेग घेतला असतानाच मौलाना भाशानी आपल्या पक्षासह फातिमा जिना यांच्यापासून वेगळे झाले. मौलाना भाशानींच्या ‘गद्दारीमुळे’ बिहारींची मते फातिमा जिन्ना यांना मिळाली नाहीत, असा दावा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना वाजिद यांनी त्या काळात केला होता.

मौलाना भाशानी यांनी अयुब खान यांच्याकडून 40 लाख रुपये घेतल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

मौलाना भाशानी यांनी 40 लाख रुपयांच्या बदल्यात मादार-ए-मिल्लत मोहतरमा जिना यांच्याशी सौदा केला होता, असे पत्रकार आणि निवेदक हमीद मीर यांनी अब्दुला मलिक यांच्या ‘दास्तान-ए-खानवादा मियाँ मोहम्मद अली कसुरी’ या पुस्तकाचा संदर्भ देत एका स्तंभात लिहिले.

खडतर स्पर्धा असूनही अयुब खान यांनी सहज विजय मिळवला.

फोटो स्रोत, Nazaria Pakistan Trust

शेख मुजीब हे पूर्व पाकिस्तानात फातिमा जिना यांचे पोलिंग एजंट होते.

“मादर-ए-मिल्लतने पूर्व पाकिस्तानमधून बहुमत मिळवून निवडणुका जिंकल्या असत्या, तर कदाचित पाकिस्तानची फाळणी झाली नसती. अयुब खान यांनी निवडणुका जिंकून पाकिस्तानचा पराभव केला,” असे हमीद मीर यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे.

जेव्हा अयूब खान यांना आपल्या विजयाची बातमी समजली, तेव्हा त्यांनी, “देवाचे आभार आहेत! देश वाचला,” असे म्हटले होते.

निवडणुकीचे निकाल आल्यानंतर फातिमा जिना यांनी निवडणुकीत अफरातफर झाली यात तीळमात्र शंका नसल्याची प्रतिक्रिया दिली होती.

याकडेच लक्ष वेधत पाकिस्तानी शायर हबीब जालिब यांनी एक शेर लिहिला होता –

धांधली, धौंस, धन से जीत गया

ज़ुल्म फिर मक्र व फ़न से जीत गया

‘जालिब यांच्या ‘शेर’मुळे देशात खळबळ उडाली’

नवाबजादा नसरुल्लाह लिहितात, “जर पश्चिम पाकिस्तानमधील सरकारी यंत्रणेने उघडपणे हेराफेरी केली नसती आणि पश्चिम पाकिस्तानातील बीडी सदस्य (राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणारे सदस्य) मोठ्या प्रमाणावर विकले गेले नसते, तर अयुब खान यांचा नक्कीच पराभव झाला असता. त्याचबरोबर जर प्रौढ मताधिकाराच्या आधारावर थेट निवडणुका झाल्या असत्या तर अयुब खान यांचे डिपॉझिटही जप्त झाले असते.

वकील अंजुम यांच्या मते, ज्यांना अयूब खान यांचे हात बळकट करायचे होते, त्यांना नंतर ‘लोकशाहीचे चॅम्पियन’ म्हणून ओळखले गेले. त्यांनी अयूब खान यांना आजीवन राष्ट्रपती बनवण्याचे प्रयत्न देखील केले होते.

ग्राफिक्स

वकील अंजुम यांनी लिहिले आहे की, “झुल्फिकार अली भुट्टो आणि सिंधच्या महत्त्वाच्या धार्मिक जागेचे प्रमुख मखदूम सय्यद जमान तालिब अल मौला यांनीही खुल्या पद्धतीने अयूब खान यांच्या समर्थनात प्रचार केला.”

अनेकदा बलुचिस्तानचे सरदार अयुब खान यांच्यासोबत असत. त्यामुळे तेथून मादर-ए-मिल्लत यांना फारच कमी मते मिळाली.

दक्षिण पंजाबमधील मुलतान विभागात फातिमा जिना यांना मोठा पाठिंबा मिळाला.

भारतीय राजदूताची भेट मुद्दा बनला महत्त्वाचा

मुस्तफा मलिक यांनी त्यांच्या ‘कौन कहां खड़ा था’ या संशोधनात्मक लेखात कोणते राजकारणी, धार्मिक नेते आणि शायर कोणाच्या बाजूने होते हे सविस्तरपणे लिहिले आहे.

त्यांच्या मते, राज्यपाल आमिर मोहम्मद खान हे मोजक्याच लोकांवर नाराज होते. यात सर्वात आघाडीवर होते सय्यद अबुल आला मौदुदी, शौकत हयात, ख्वाजा सफदर, चौधरी हसन आणि ख्वाजा रफिक जे फातिमा जिना यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहिले.

“फातिमा जिना यांच्यावरही पाकिस्तानची फाळणी केल्याचा आरोप करण्यात आला. पत्रकार झेड ए सुल्हारी यांनी त्यांच्या एका वृत्तात हा आरोप केला होता. त्यात मिस जिना यांच्या भारतीय राजदूतांसोबत झालेल्या भेटीचा हवाला दिला होता. प्रत्येक प्रचार सभेत हे वृत्तपत्र दाखवले जात असत. अयुब हे प्रचार सभांमध्ये लोकांना हे वृत्तपत्र दाखवत आणि मिस जिना या गद्दार, देशद्रोही असल्याचे ते म्हणत.”

माजी आयजी हाफिज सबाहुद्दीन जामी यांनी त्यांच्या ‘पोलीस, क्राइम अँड पॉलिटिक्स’ या पुस्तकात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फातिमा जिना यांच्या विरोधात कराची पोलिसांच्या उघड हस्तक्षेपाबद्दल लिहिले गेले आहे.

असे असूनही कराचीतून फातिमा जिना यांना 1046 आणि अयुब यांना 837 मते मिळाली. तर ढाकामधून फातिमा जिना यांना 353 तर अयुब यांना 199 मते मिळाली.

या निवडणुकीत फातिमा जिना अनेक ठिकाणी आघाडीवर होत्या. पण शेवटी अयुब खान 67 टक्के मतांनी विजयी झाले.

फोटो स्रोत, Nazaria Pakistan Trust

जामी यांच्या मते, “जादूच्या छडीने काम केले आणि अयुब खान 67 टक्के मतांनी विजयी झाले. कराचीच्या लोकांना फातिमा जिना आणि लोकशाहीचे समर्थक म्हणून शिक्षा मिळाली.”

15 जानेवारी 1965 च्या अंकात ‘टाइम’ने लिहिले की, “गेल्या आठवड्यात अध्यक्ष मोहम्मद अयुब खान यांच्या निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कराचीच्या रस्त्यांवरून एक मोठी मिरवणूक निघाली. जेव्हा हा जमाव लियाकताबादच्या परिसरात गेला तेव्हा तणाव वाढला होता. तिथे बहुतांश भारतातून आलेले मुसलमान होते, जे भारतातून आले होते.”

“ट्रकमधील लोकांनी पायी चालत जाणाऱ्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली, दुकाने लुटली, घरांना आग लावली. दंगल संपेपर्यंत 33 लोक मरण पावले होते, 300 जखमी आणि 2000 हून अधिक लोक बेघर झाले होते.”

यावर फैज अहमद फैज यांनी लिहिले :

न मुद्दई, न शहादत, हिसाब पाक हुआ

यह ख़ून-ए-ख़ाक नशीनां था, रिज़्क़-ए-ख़ाक हुआ

(कोणताही वादी नव्हता, साक्षीदार नव्हता, हिशोबही नव्हता, हे मातीने माखलेले, मातीत मिसळलेले दुर्बलांचे रक्त होते.)

आपल्या समर्थकांच्या हत्याकांडावर फातिमा जिना म्हणाल्या की, अशा रानटी कृत्यांना सुसंस्कृत जगात कुठेही परवानगी दिली जाऊ शकत नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC