Source :- BBC INDIA NEWS

बारावीचा निकाल, HSC Results

फोटो स्रोत, Getty Images

4 मे 2025

अपडेटेड 4 तासांपूर्वी

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकाल आज (5 मे 2025) जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.

महाराष्ट्रातील एकूण 91.88 टक्के विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (96.73 टक्के) लागला असून. लातूर विभागाचा सर्वात कमी (89.46 टक्के)निकाल लागला आहे.

यंदाच्या निकालात 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत आणि मुलांचं प्रमाण मुलींपेक्षा कमी (89.51 टक्के) आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला आहे.

यासाठी शिक्षण मंडळाकडून अधिकृत संकेतस्थळंही दिली आहेत :

बारावीचा निकाल

फोटो स्रोत, Getty Images

परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे, Digilocker अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

तसंच, https://mahahsscboard.in (कॉलेज लॉगइन) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

निकालानंतर उपयुक्त माहिती

1) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्थी व सूचना संकेतस्थळावर देण्यात येतील, अशी माहिती मंडळानं दिली.

तसंच, गुणपडताळणीसाठी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 6 मे 2025 ते 20 मे 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच, ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल,

बारावीचा निकाल

फोटो स्रोत, ANI

2) फेब्रुवारी-मार्च 2025 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल, त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन शिक्षण मंडळानं केलंय.

3) फेब्रुवारी-मार्च 2025 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 आणि जून-जुलै 2026) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, असं शिक्षण मंडळानं सांगितलंय.

4) जून-जुलै 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार आणि खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 7 मे 2025 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळानं दिलीय.

SOURCE : BBC