Source :- BBC INDIA NEWS
- Author, कॅग्नी रॉबर्ट्स
- Role, बीबीसी न्यूज
-
26 डिसेंबर 2024, 17:06 IST
अपडेटेड 45 मिनिटांपूर्वी
आरोग्य चांगलं राहण्यासाठी, शारीरिक क्षमता उंचावण्यासाठी अलीकडे विविध प्रयत्न केले जातात.
अनेकदा काहीतरी चमत्कारी पेय, औषधं, पूरक पोषक घटक शोधण्याचा प्रयत्न केला जातो. वेळोवेळी यात नवनवीन ट्रेंड्स किंवा फॅशन येत असते.
मात्र यासंदर्भात वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. उगाच जाहिराती किंवा कोणीतरी सांगतं किंवा करतं आहे म्हणून एखाद्या गोष्टीचं सेवन करण्याऐवजी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं योग्य ठरतं.
बिटाच्या रसाबद्दल अलीकडे फार बोललं जातं. विशेषकरून क्रीडा विश्वात त्याची खूपच चर्चा आहे. यामागचं वास्तव काय आहे? संशोधक आणि तज्ज्ञ काय म्हणतात त्याची मांडणी करणारा हा लेख…
खेळ किंवा स्पर्धांमधील आपली कामगिरी उंचावण्यासाठी, शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी अॅथलीट बऱ्याच काळापासून वेगवेगळ्या पद्धती आणि पोषक आहारांचे प्रयोग करत आहेत.
बीट पोषक तत्वांशी अतिशय समृद्ध असतं, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. बीटाच्या रसात मोठ्या प्रमाणात नायट्रेट्स असतात.
काही पोषणतज्ज्ञ आणि संशोधकांना वाटतं की बीट अॅथलीटना खेळात यश मिळण्यास उपयुक्त ठरू शकतात.
बिटाच्या रसामुळे एखाद्या खेळाडूची कामगिरी नैसर्गिकरित्या सुधारू शकते का?
ब्रायन मॅजेन्स हे नेदरलॅंड्समधील एक सेमी-प्रोफेशनल सायकलपटू आहेत. म्हणजेच ते सायकलिंग स्पर्धांमध्ये भाग घेतात मात्र पूर्णपणे व्यावसायिक स्पर्धक नाहीत. त्यांना वाटतं की बिटाचा रस प्यायल्यामुळे सायकलिंग स्पर्धांमध्ये त्यांची कामगिरी उंचावण्यास मदत होते.
इतकंच नाही तर ते आपल्या पत्नीबरोबर जे कॉफी शॉप चालवतात, त्यात ते बिटाचा रसही विकतात.
बिटाचा रस खरंच चमत्कार घडवणारं पेय आहे का?
ब्रायन मॅजेन्स म्हणतात, “बिटाचा रस हे नक्कीच एखादं चमत्कार घडवून आणणारं पेय नाही. मात्र मला वाटतं की खेळातील कामगिरी उंचावण्यासाठी त्याची काही प्रमाणात मदत होते.”
“मला वाटतं की अॅथलीट आधीच त्यांना शक्य असेल तितकं कठोर प्रशिक्षण घेत असतात, मेहनत करत असतात. स्पर्धेत जिंकण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न ते करतात. त्यामुळे शरीराला अतिरिक्त पोषण मिळावं यासाठी बिटाचा रस पिण्यात चुकीचं काहीच नाही.”
ब्रायन म्हणतात की त्यांना वाटतं की त्यामुळेच अनेक अॅथलीट बिटाचा रस पित असावेत.
क्रिस्तिन जॉन्विक आणि डॉ. समेफ्को लुडीडी आहारतज्ज्ञ आहेत. त्यांनी बिटामधील पोषक घटकांवर केलेल्या संशोधनाची माहिती दिली.
फक्त एक ग्लासभर बिटाचा रस प्यायल्यानं आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढू शकते का?
“पोषण मिळवण्यासाठी बिटाचा रस प्याणं ही काही नवीन कल्पना नाही.” असं क्रिस्तिन जॉन्विक म्हणतात. त्या नॉर्वेजियन स्कूल ऑफ स्पोर्ट सायन्सेसमध्ये काम करतात.
“धावपटू मो फराहनं 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये दोन सुवर्णपदकं पटकावल्यानंतर
बिटाच्या रसाची चर्चा सुरू झाली. मो फराह म्हणाले की स्पर्धेच्या काळात ते बिटाचा रस पित होते. बिटाचा रस प्यायल्यानं खरोखरंच खेळाडूंची कामगिरी उंचावते का, हे जाणून घेण्यास अनेक जण उत्सुक होते,” असं क्रिस्तिन म्हणाल्या.
कामगिरी उंचावण्याची शक्यता
बिटाच्या रसामुळे खेळाडूंची कामगिरी उंचावण्याच्या मुद्द्याबद्दल आहारतज्ज्ञ लुडीडी म्हणाले, या मुद्द्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला अॅथलीटना याचा फायदा कसा होतो? हा मुद्दा आहे. तर दुसऱ्या बाजूला, वैज्ञानिक दृष्टीकोनातून बिटाच्या रसाचा उपयोग कसा होतो? हा प्रश्न आहे.
“बिटाच्या रसाबद्दलचं माझं वैयक्तिक मत असं आहे की एखाद्या खेळाडूची कामगिरी नैसर्गिकरित्या उंचावण्याची क्षमता बीटाच्या रसात आहे,” असं लुडीडी म्हणतात.
“म्हणूनच मी बिटाचा रस पितो,” असं ब्रायन म्हणाले.
बिटाचा रस आपण कशा पद्धतीनं पितो याबद्दल ब्रायन सांगतात, “मी बिटाच्या रसाचा वापर कसा करतो याची मला काळजी घ्यावी लागते. महत्त्वाच्या स्पर्धेआधी आठवडाभर मी दररोज एक ग्लास बिटाचा रस पितो.”
“ज्या दिवशी स्पर्धा असते त्या दिवशी सकाळी मी एक ग्लास बिटाचा रस घेतो. त्यानंतर स्पर्धा सुरू होण्याच्या दोन अगोदर मी आणखी एक ग्लासभर रस पितो. मी या पद्धतीनं बिटाचा रस पित असल्यामुळे मला त्याचा चांगला फायदा होतो.”
अलीकडच्या काळात अॅथलीट आणि खेळाडूंच्या संघासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करताना आहारतज्ज्ञ नायट्रेटची पातळी लक्षात घेतात.
अभ्यासातून असं आढळून आलं आहे की बिटाचा रस प्यायल्यामुळे आपल्या स्नायूंच्या आणि रक्ताच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते.
बिटाच्या रसाचे फायदे खेळाच्या प्रकारावर अवलंबून असतात का?
यासंदर्भात क्रिस्तिन म्हणतात, “यावर आम्ही बरंच संशोधन केलं आहे. बिटाचा रस प्यायल्यामुळे आवश्यक असलेले पोषकतत्त्व मिळतात का हे तपासण्यासाठी आम्ही अॅथलीटच्या विविध प्रकारांचा अभ्यास केला आहे.”
त्यांनी हा अभ्यास, ऑलिंपिक स्प्रिंट ट्रॅक सायकलिंग स्पर्धेच्या निवडीबाबत केला आणि त्यात राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या सायकलपटूंना सहभागी करून घेतलं.
त्याचवेळी अभ्यास करण्यासाठी त्यांनी, जे लोक हौस किंवा छंद म्हणून अधूनमधून सायकल चालवतात अशा लोकांना देखील सहभागी करून घेतलं.
या सर्वांची वारंवार अल्पकालीन सायकलिंग चाचणी (स्प्रिंट टेस्ट) करण्यात आली.
अॅथलीट्सनी ऑल-आऊट स्प्रिंटमध्ये 30 सेकंद भाग घेतला. त्यानंतर त्यांना चार मिनिटांची विश्रांती देण्यात आली. त्यानंतर हे त्यांना पुन्हा तीन वेळा करण्यास सांगण्यात आलं.
“ही खूपच थकवणारी क्रिया होती. यामुळे त्यांना श्वास घेणं कठीण झालं तसंच अधिक शारीरिक श्रम केल्यामुळे त्यांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता होती. या अभ्यासात आम्ही अॅथलीटवर होणारे अगदी छोट्या स्वरुपाचे परिणाम पाहिले. सायकलिंग करण्याच्या त्यांच्या वेगात वाढ झाल्याचं आम्हाला दिसून आलं,” असं क्रिस्तिन म्हणाल्या.
त्या असंदेखील सांगतात की सर्व तिन्ही श्रेणीतील सायकलपटूंनी त्यांची कमाल क्षमता दाखवली होती.
बिटाचा रस प्यायल्यामुळे उच्च शारीरिक क्षमतेच्या खेळांवर (फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी, टेनिस) तात्काळ होणारे परिणाम स्पष्ट आहेत.
मात्र काही संशोधकांचं म्हणणं आहे की बिटाचा रस ट्रायथलॉन्स, लांब पल्ल्याची सायकलिंग किंवा पोहणे यासारख्या काही विशिष्ट खेळांमध्ये तितकासा प्रभावी ठरू शकत नाही.
“आता ही चर्चा अतिशय रंजक झाली आहे. म्हणजेच यातून बिटाच्या रसाचा फायदा काही खेळांमध्ये का होतो आणि काही खेळांमध्ये का होत नाही हे स्पष्ट करता येऊ शकतं,” असं लुडीडी म्हणतात.
क्रिस्तिन म्हणतात की या प्रकारच्या संशोधनात उच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय अॅथलीटना सहभागी करून घेणं हे नेहमीच एक आव्हान असतं. (उच्च स्तरीय खेळाडू म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू ज्यांनी ऑलिंपिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं जिंकली आहेत.)
कारण अशा अभ्यासात सहभागी होण्यासाठी पुरेसे उच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळवणं सोपं नसतं.
“त्यामुळे बिटाचा रस हे एक नैसर्गिक पौष्टिक पेय आहे की नाही, या प्रश्नासंदर्भात, अशा नामांकित किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंवर फारसा अभ्यास झालेला नाही,” असं क्रिस्तिन सांगतात.
क्रिस्तिन पुढे म्हणाल्या, “मात्र एका अभ्यासात आढळून आलं की खूपच शारीरिक तंदुरुस्तीची आवश्यकता असणाऱ्या खेळांचं प्रशिक्षण घेतलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही अॅथलीटना बीटाचा रसचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे त्यातून असा निष्कर्ष काढण्यात आला की उच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नायट्रेट्स युक्त आहाराचा फायदा होत नाही.”
“त्यामुळे कमी तीव्रतेच्या, जास्त तीव्रतेच्या खेळांमध्ये उच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंना बीटाच्या रसाचा फायदा होऊ शकतो की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतो.”
बिटाच्या रसाची भूमिका
“या अभ्यासात आम्हाला असं आढळलं की शरीरात ऑक्सिजनचं सेवन किंवा ऑक्सिजन प्रमाण वाढवण्यात बिटाच्या रसाची महत्त्वाची भूमिका असते. व्यायामाच्या तीव्रतेत शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण महत्त्वाचं ठरतं आणि जर पुरेसा ऑक्सिजन शरीरात गेला नाही तर तो एक प्रकारचा अडथळा ठरतो. त्याचबरोबर मनोरंजनात्मक सायकलिंग करणाऱ्या सायकलपटूंसाठी तीव्र गतीनं श्वास घेणं आवश्यक असतं, त्यांच्यासाठी देखील बीटाचा रस फायद्याचा ठरू शकतो,” असं ते म्हणतात.
यासंदर्भात क्रिस्तिन म्हणतात की उच्चस्तरीय अॅथलीटना याचा कोणताही फायदा होत नाही, असं म्हणता येणार नाही आणि बिटाच्या रसाचे होणारे परिणाम पाहण्यासाठी परिस्थिती अत्यंत टोकाची असणं आवश्यक आहे.
लुडीडी म्हणतात, “विशेषकरून सायकलिंगमध्ये, दोन सायकलपटूंमधील अतिशय छोटं अंतर देखील अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मला म्हणायचं आहे की ते अंतर काही सेकंद किंवा अगदी मिलीसेकंदाचं देखील असू शकतं.”
तर ब्रायन देखील याच्याशी सहमत आहेत. ते म्हणतात, “त्यामुळेच सायकलपटू प्रशिक्षण आणि आहारावर खूप लक्ष केंद्रित करतात. कारण त्यांना माहित असतं की अगदी लहान सहान बदलाचा देखील मोठा परिणाम होऊ शकतो.”
क्रीडा विश्व बिटाच्या रसाच्या सेवनाला प्रोत्साहन देतं आहे. आपल्या अधिक मजबूत आणि वेगवान बनवण्याची ही चावी असू शकते का?
आहारतज्ज्ञ लुडीडी म्हणतात, “अनेकजण चमत्कारी पेयं किंवा औषधांच्या शोधात असतात. मात्र प्रत्यक्षात असं काहीही नाही. आरोग्य आणि कामगिरीचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा त्यासाठी एक चौकट किंवा आराखडा आहे. विश्रांती, आहार आणि व्यायाम हे त्याचा आधार आहेत.”
“या चौकटीत लक्षात घेतल्यानंतर आणि त्यावर काम केल्यानंतरच कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करा. जर या चौकटीच्या आधारातच जर चूक झाली, तर मग त्याचा काहीही उपयोग होणार नाही.”
“योग्य तो आहार घ्या, कठोर प्रशिक्षण घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. त्यानंतर कामगिरी उंचावणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. मग ते उपवास असो, बीटाचा रस असो किंवा इतर काहीही असो,” असं लुडीडी सांगतात.
बिटाचा रस लोकप्रिय होतो आहे
बिटाच्या रसाच्या फायद्यांबद्दल क्रिस्तिन सांगतात, “सर्वसाधारणपणे, मी सांगेन की बिटाचा रस खूपच फायदेशीर असतो. जर तुम्ही कमी प्रमाणात प्रशिक्षण घेतलेलं असेल, तर तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याची किंवा रक्तप्रवाह वाढण्याची शक्यता अधिक असते. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या स्नायूंवर जास्त मेहनत घेतलेली नसेल तर त्याचा फायदा होतो.”
त्या असं देखील म्हणतात की ज्या खेळांमध्ये खूप जास्त शारीरिक श्रम घ्यावे लागतात, त्या उच्च स्तरीय अॅथलीटना नायट्रेटच्या पूरक घटकांपासून फायदा मिळत नाही, कारण त्यांनी आधीच त्यांच्या शारीरिक क्षमतेचा पुरेसा विकास केलेला असतो.
मात्र, “जेव्हा खूप जास्त तीव्रतेच्या खेळाचां संबंध येतो, मग ते विशिष्ट उंचीवर असो की पाण्यात असो, तुमच्या शारीरिक क्षमतेचा विचार न करता, कमी अंतराच्या धावण्यात (स्प्रिंट) किंवा जेव्हा तुम्हाला दम लागत असेल, अशावेळी बीटाचा रस किंवा नायट्रेट्स उपयुक्त ठरू शकतात,” असं क्रिस्तिन म्हणतात.
क्रिस्तिन असंही म्हणतात की ही बाब उच्च कौशल्य असणाऱ्या खेळाडूंना देखील लागू होते.
प्रत्येक नव्या अभ्यासासह, बिटाच्या रसाची लोकप्रियता वाढते आहे. बीटाच्या असंख्य कॅप्सूल, पावडर आणि इतर गोष्टींसह कामगिरी उंचावणारी उत्पादनं म्हणून त्यांची अधिक जाहिरात होते आहे.
म्हणून, संशोधकांनुसार, व्यायामापूर्वी किंवा खेळाच्या सामान्यापूर्वी किंवा स्पर्धेपूर्वी ग्लासभर बिटाचा रस प्यायल्यास आपली कामगिरी उंचावण्यासाठी आवश्यक असलेलं उत्तेजन आपल्याला मिळू शकतं.
“बिटाच्या रसाचा आपल्याला काही प्रमाणात जरी फायदा होत असेल तर ते का नाकारायचं?” असं ब्रायन म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC