Source :- BBC INDIA NEWS
शाळेत असताना आपण अनेकजण खो-खो खेळलो आहोत. महाराष्ट्रातल्या गल्लीत खेळल्या गेलेल्या या खेळाची कधी विश्वचषक स्पर्धा होईल, असं तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र, या खेळानं आता जागतिक पातळीवर ओळख मिळवली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे 23 देशांचा सहभाग असलेल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या खो-खो पटूंकडं आहे. त्यात महिला संघाचं नेतृत्व आहे मराठमोळ्या प्रियंका इंगळे या तरुणीकडं.
बीडच्या केजमध्ये मूळ गाव असलेली आणि पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रियंका लहानाची मोठी झाली. विश्वचषक खो-खो स्पर्धेत ती भारतीय महिला संघाचं नेतृत्व करत आहे. सोमवारपासून (13 जानेवारी) या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
बालपणी धावण्याचा वेग पाहून प्रशिक्षकांनी केलेली पारख आणि त्यांची निवड सार्थ ठरवत प्रियंकानं मिळवलेलं यश, तिनं केलेल्या मेहनतीची पावती आहे.
प्रियंका सध्या मुंबईत इनकम टॅक्स ऑफिसर पदावर कार्यरत आहे. स्पर्धा आणि सरावासाठी सुट्टी घेऊन प्रियंका देशाची मान अधिक उंचावण्याच्या मोहिमेवर निघाली आहे. इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे.
सर्वसाधारण मराठी कुटुंबामध्ये जन्म, सरुवातीला कुटुंबाकडून खेळासाठी झालेला विरोध आणि त्यानंतर मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये स्वतःला सिद्ध करून प्रियंकानं आज या क्रीडाप्रकाराचं शिखर गाठण्याच्या मार्गावरचा प्रवास केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
बीडचे मूळ, पुण्यात जन्म
प्रियंकाचे वडील हनुमंत इंगळे हे मूळचे बीड जिल्ह्यातल्या केजमधील कळम आंबा या गावचे. पण नोकरी किंवा उदरनिर्वाहाच्या कारणानं ते 1997-98 मध्ये पुण्याच्या भोसरी, दिघी परिसरात स्थलांतरीत झाले.
प्रियंकाचा जन्म 2000 मध्ये झाला. पिंपरी चिंचवडच्या वडमुख वाडीमधील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात प्रियंकाचं शिक्षण झालं. याठिकाणी शिकत असतानाच प्रियंकाला तिच्या जीवनाला आकार देणाऱ्या खो-खोमधील करिअरचा मार्ग सापडला.
प्रियंकाच्या धावण्याचा वेग पाहून शाळेतील क्रीडा प्रशिक्षक अविनाश करवंदे यांनी तिची खो-खो खेळासाठी निवड केली. त्यानंतर तिचं जीवनच बदलून गेलं. या खेळानं प्रियंकाला बरंच काही मिळवून दिलं. त्यामुळं देशाला एक उत्तम खो-खो पटू मिळाली.
प्रियंकानं 2009 मध्ये खो खोच्या अंदाजे 27 मीटर बाय 16 मीटरच्या मैदानावर धावायला सुरुवात केली. त्यानंतर यशाचा एक एक टप्पा पूर्ण करत तिनं वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतचा मजल मारली. असं असूनही तिचा वेग आणि चपळता कमी झालेली नाही.
रनिंगमुळे खो-खोसाठी निवड
प्रियंकाची खो-खो खेळाची सुरुवात कशी झाली याची गोष्टही खास आहे. पाचवीत असताना प्रियंकाच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स डे होता. त्यावेळी धावण्याच्या स्पर्धेत प्रियंकाचा पहिला क्रमांक आला होता. अविनाश करवंदे त्या शाळेत क्रीडा शिक्षक आहेत.
त्यांनी प्रियंकाचा धावण्याचा वेग पाहिला आणि तिनं खो-खो खेळायला हवं असं तेव्हाच त्यांना वाटलं. करवंदे सरांनी प्रियंकाला बोलावलं आणि खो-खो च्या संघात तिचा समावेश केला.
धावण्याबरोबरच खो-खो खेळण्यासाठी गरजेचा असलेला चपळपणा, चतुरला, शारीरिक तसंच त्वरित निर्णय घेण्याची क्षमता हे गुणही त्यांना तिच्यात पाहायला मिळाले. त्यामुळं त्यांनी प्रियंकाला अधिकाधिक प्रशिक्षित करायला सुरुवात केली.
पण प्रियंकाला एवढ्या सहजासहजी हा नवा प्रवास सुरू करता येत नव्हता. त्याचं कारण म्हणजे प्रियंकाच्या कुटुंबाचा सुरुवातीला तिनं खो-खो खेळावं याला फारसा पाठिंबा नव्हता. त्यामुळं तेवढ्या गांभीर्यानं तिला या दिशेनं पुढं जाता येत नव्हतं.
यातही प्रशिक्षक अविनाश करवंदे सरांनी प्रयत्न केले आणि त्यावर मार्ग शोधला.
कुटुंबाला असे केले राजी
प्रियंकाने पाचवीत असल्यापासून खो-खो खेळायला सुरुवात केली होती. तिला खो-खो विषयी भरपूर आवडही निर्माण झाली. पण त्यासाठी खूप वेळ द्यावा लागत होता. त्यामुळं प्रियंकाच्या कुटुंबाकडून याला विरोध व्हायला सुरुवात झाली होती.
“प्रियंका मूळची सामान्य कुटुंबातली होती. तिनं शिकून काहीतरी करावं स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी तिच्या कुटुंबाची इच्छा होती. शिक्षणाच्या अभावाने जीवनात किती तोटे होतात, या जाणीवेतून त्यांना मुलीनं खूप शिकावं असं त्यांना वाटत होतं,” असं प्रियंकाचे प्रशिक्षक अविनाश करवंदे यांनी सांगितलं.
खो-खो खेळत असताना अभ्यासाकडं प्रियंकाचं दुर्लक्ष होईल की काय? अशी भिती प्रियंकाच्या कुटुंबाला होती. तसंच इतर क्रीडा प्रकारांच्या तुलनेत खो-खोची स्थिती पाहता, यात मुलीचं फार करिअर होईल, याची खात्रीही त्यांना नव्हती. त्यामुळं ते याला विरोध करत होते, असं प्रियंकाचे वडील हनुमंत इंगळे यांनी सांगितलं.
असा प्रतिसाद पाहून करवंदे सरांनी प्रियंकाच्या कुटुंबाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेक दिवस तासन तास ते प्रियंकाच्या घरी जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचे असं स्वतः प्रियंकाने सांगितलं आहे.
रोज घरी जाऊन प्रियंकाच्या कुटुंबाबरोबर संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर प्रियंकामध्ये वेगळी क्षमता आहे, ती या क्षेत्रात काहीतरी मोठं करू शकते असं त्यांनी तिच्या कुटुंबांना समजावलं. त्यानंतर अखेर ते तयार झाले आणि प्रियंकाला असलेला त्यांचा विरोध दूर झाला.
तेव्हापासून खूप सहकार्य केलं आजही जिंकून गेले की घरी मोठा जल्लोष होतो.
8 वीत असताना खेळली पहिली नॅशनल
पाचवीपासून खेळायला सुरुवात केल्यानंतर अविनाश करवंदे सरांनी तिच्या खेळावर चांगली मेहनत घ्यायला सुरुवात केली. शालेय स्पर्धांमध्ये प्रियंकाची कामगिरी खूपच चांगली होती. संघाच्या विजयामध्ये कायम प्रियंकाचं मोठं योगदान असायचं.
त्यामुळं तिच्या खेळाचं कौतुक व्हायला लागलं आणि हळू हळू तिला ओळखही मिळायला लागली होती. अखेर आठवीमध्ये असताना प्रियंकाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आणि त्यानंतर तिनं मागं वळून पाहिली नाही.
प्रियंका रनर आणि चेसर अशा दोन्ही भूमिकांमध्ये संघांसाठी अत्यंत जबरदस्त खेळ करते असं करवंदे सर सांगतात. रनर असताना जास्तीत जास्त वेळ प्रतिस्पर्धी संघाच्या आवाक्याबाहेर राहायचं. तरेच चेसर असताना लवकरात लवकर समोरच्या संघातील रनरला परत पाठवायचं यात तिचा हातखंडा असल्याचं ते सांगतात.
या राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असताना भारतीय खो खो संघाच्या किशोर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रियंकानं जबरदस्त खेळ केला. या स्पर्धेमध्ये तिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
त्याचबरोबर ‘इला’ या पुरस्कारानं तिला गौरवण्यात आलं तो एक अविस्मरणीय क्षण आहे, असं प्रियंकानं बीबीसी मराठीबरोबर बोलताना सांगितलं. तसंच महिला गटामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत ‘राणी लक्ष्मीबाई’ या पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यावेळीही खूप आनंद झाल्याचं ती म्हणाली.
त्यापाठोपाठ चौथ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली. त्यानंतर भारतीय संघातील समावेश आणि वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्वाची संधी अशा प्रकारचं यश प्रियंकानं मिळवलं.
प्रियंकाला महाराष्ट्र शासनाचा ‘श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ही जाहीर झाला आहे. असे क्षण कधीच विसरू शकत नाही, असं प्रियंका म्हणते. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन आयकर विभागामध्ये तिला कर सहाय्यक पदावर नोकरी देण्यात आली आहे.
वेग आणि चपळता यांचा सर्वोत्तम मेळ प्रियंकाच्या खेळात आपल्याला पाहायला मिळतो.
सातत्याने शिस्तबद्ध पद्धतीनं परीश्रम करत राहिल्यास आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचणं शक्य असल्याचं प्रियंका सांगते. सुरुवातीला विरोध केला असला तरी कुटुंबानं त्यानंतर ज्या पद्धतीनं पाठिंबा दिला त्याजोरावर आणि प्रशिक्षक करवंदे सरांच्या मार्गदर्शनानं हा टप्पा गाठल्याचं प्रियंका सांगते.
शाळेतल्या मातीच्या मैदानावरून सुरू झालेला तिचा प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्ल्ड कप स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेते पदानं ते सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी आता पुढील काही दिवस प्रियंकाचा प्रवास असणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC