Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
43 मिनिटांपूर्वी
बुधवारी रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतातील अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भारताच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
दुसरीकडे, पाकिस्ताननेही भारतावर तसाच आरोप करत, भारताचे 25 ड्रोन्स पाडल्याचे म्हटले आहे. बीबीसीने दोन्ही देशांच्या कोणत्याही दाव्याची स्वतंत्रपणे खात्री केलेली नाही.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, पाकिस्तानने ड्रोन्सच्या माध्यमातून अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुजसह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानच्या या हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टिमने निकामी करण्यात आल्याचं, भारताच्या संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे.
पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष आता अनेक ठिकाणी सापडत आहेत. यावरून हे हल्ले पाकिस्ताननेच केल्याचे सिद्ध होते, असंही भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. भारतानेही पाकिस्तानला त्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे.
‘पाकिस्तानचा नियंत्रण रेषेवर गोळीबार’
भारतीय सशस्त्र दलांनी गुरुवारी सकाळी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी एअर डिफेन्स रडार आणि सिस्टिमला लक्ष्य केले. विश्वसनीय माहितीनुसार, लाहोरमधील एक एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करण्यात आली आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले नसल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर भारतीय लष्करी ठिकाणांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, याचा पुनरुच्चारही केला होता.
भारताच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे की, पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार आणि तोफांचा वापर करून नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात तीन महिला आणि पाच मुलांसह 16 निष्पाप भारतीय लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे, पाकिस्तानने 25 भारतीय ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. हे ड्रोन पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाडले गेले आहेत, पाकिस्तानचं म्हणणं आहे.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी गुरुवारी (8 मे) पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत 7 मेच्या रात्रीपासून “ड्रोनच्या मदतीने घुसखोरीचे प्रयत्न” करत आहे.
लष्कराची कारवाई सुरूच असल्याचं जनरल चौधरी यांनी सांगितलं आहे. लाहोर, गुजरांवाला, चकवाल, अटक, रावळपिंडी, मियांवली आणि कराची येथे ड्रोन नष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले.
पाकिस्तानच्या प्रवक्त्याच्या या वक्तव्यावर भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बीबीसीने पाकिस्तानच्या या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.
तीव्र प्रत्युत्तर दिलं जाईल: एस. जयशंकर
पाकिस्तानकडून भारताविरुद्ध लष्करी कारवाई करण्यात आली, तर त्याला कठोर उत्तर दिलं जाईल, असं भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.
जयशंकर यांनी हे विधान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान केलं.
भारत – इराण मैत्री कराराच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्यासाठी ते सध्या नवी दिल्लीत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली.
त्यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. “या हल्ल्यामुळे आम्हाला सीमेपलिकडे कारवाई करणं भाग पडलं”, असं ते म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर 22 एप्रिल रोजी भारताने 7 मे रोजी पाकिस्तानमधील काही ठिकाणी हवाई हल्ले केले.
“आम्हाला तणाव वाढवायचा नाही, पण आमच्यावर लष्करी कारवाई झाल्यास, त्याला आम्ही ठाम आणि कठोर उत्तर देऊ, याबद्दल काहीच शंका नाही,” असं जयशंकर म्हणाले.
अरागची यांच्याशी चर्चा करताना जयशंकर पुढे म्हणाले की, “शेजारी आणि जवळचा भागीदार म्हणून, तुम्हाला या परिस्थितीची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे.”
रिजिजू म्हणाले- ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरूच
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली.
संरक्षणमंत्र्यांनी बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल माहिती दिल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं.
“ऑपरेशन सिंदूर हे सध्या सुरू आहे”, असंही किरेन रिजिजू म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
“राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक चांगल्या प्रकारे पार पडली. हा गंभीर विषय होता, त्यामुळे सर्वांनी आपापली मते गांभीर्याने मांडली. सर्वात आधी संरक्षणमंत्र्यांनी सर्व नेत्यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली.
त्यांनी संपूर्ण परिस्थिती आणि सरकारच्या हेतूबद्दल सांगितले. विविध पक्षांच्या नेत्यांनीही आपली मते मांडत काही सूचनाही केल्या,” असंही ते म्हणाले.
सर्व नेत्यांनी लष्कराच्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा देण्याचा विश्वास दिला, असंही रिजिजू यांनी यावेळी सांगितलं.
रविवारीचा आयपीएलचा सामना धर्मशालातून हलवला
भारताच्या उत्तरेकडील धर्मशाला येथे रविवारी (11 मे) होणारा आयपीएल क्रिकेट सामना पश्चिम अहमदाबाद शहरात हलवण्यात आला आहे.
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता रविवारी दुपारी अहमदाबादमध्ये होणार आहे, असं गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं.
या सामन्याबद्दल अनिश्चितता होती. कारण देशातील 20 हून अधिक विमानतळ 10 मे पर्यंत बंद असणार आहेत. त्यात धर्मशाला विमानतळाचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, ANI
धर्मशाला स्टेडियमवर होणारा आजचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल क्रिकेट सामना नियोजनाप्रमाणे खेळला जाईल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दोन्ही संघ काही दिवसांपूर्वीच सरावासाठी धर्मशाळा येथे आले होते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC