Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Courtesy: Sotheby’s
भगवान बुद्धांच्या अवशेषांशी संबंधित चमकदार रत्नांच्या साठ्याचा बुधवारी (7 मे) हाँगकाँगमधील सदबीजमध्ये लिलाव केला जाणार आहे.
ही रत्नं पुरातत्वाशी संबंधित सर्वात आश्चर्यकारक शोध म्हणून मानली जात आहेत. सदबीज ही जगातील लिलाव करणाऱ्या सर्वात मोठ्या फर्मपैकी एक आहे.
1898 मध्ये उत्तर भारतात मातीच्या ढिगाऱ्याखाली हे अवशेष सापडले होते. एक शतकाहून अधिक काळापासून हे अवशेष एका खासगी ब्रिटिश संग्रहात आहेत आणि ते बहुतांशपणे नजरेआड आहेत.
आता ही रत्नं त्या संग्रहातून बाहेर काढली जात असताना अशा रत्नांचा संग्रह करणाऱ्यांची त्या संदर्भातील उत्सुकताच वाढली आहे.
काय आहेत हे अवशेष?
जवळपास 1,800 मोती, माणिक, पुष्कराज, नीलमणी आणि नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या पत्र्यांच्या चमकदार साठ्यात ही रत्नं सापडली आहेत. ती पहिल्यांदा उत्तर प्रदेशात एका विटांच्या खोलीत जमिनीखाली दिसली होती. हे ठिकाण भगवान बुद्धांच्या जन्मस्थळाजवळच आहे.
तसंच एक अस्थीकलश सापडला आणि त्यावर कोरलेल्या माहितीवरून तो खुद्द भगवान बुद्धांचाच असल्याचे स्पष्ट झाले.ही रत्नं आणि भगवान बुद्धाचे अवशेष यांच्या शोधामुळे पुरातत्वशास्त्राच्या जगात मोठी चर्चा झाली.
निकोलस चाऊ, सदबीज एशियाचे चेअरमन आणि एशियन आर्टचे वर्ल्डवाईड प्रमुख आहेत.
त्यांना वाटतं की, “हा पुरातत्वाशी संबंधित सार्वकालिक सर्वात असामान्य शोधांपैकी एक आहे.”
आता या अवशेषांचा लिलाव होत असताना बीबीसीशी बोलताना तज्ज्ञांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, भारताच्या पवित्र भूतकाळाशी इतक्या जवळून जोडल्या गेलेल्या या खजिन्याची विक्री नैतिकदृष्ट्या योग्य आहे का?
1898 विल्यम क्लॅक्सटन पेप्पे या एका इंग्रज इस्टेट मॅनेजरनं पिपरहवा येथील एका स्तुपाचं उत्खनन केलं. पिपरहवा हे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील गाव आहे. ते लुंबिनीपासून जवळच दक्षिणेला आहे. लुंबिनी इथे भगवान बुद्धांचा जन्म झाल्याचं मानलं जातं.

फोटो स्रोत, Courtesy Peppé family
विल्यम पेप्पे यांना या उत्खननात जवळपास 2,000 वर्षांपूर्वी विधी करून ठेवण्यात आलेले पवित्र अवशेष सापडले. त्यावर काही माहिती कोरलेली होती.
हे अवशेष इतका काळ लोटल्यानंतरही अबाधित राहिले होते. इतिहासकार या गोष्टीशी सहमत आहेत की हे अवशेष, भगवान बुद्धांच्या शाक्य कुळाचे वंशज आणि जगभरातील बौद्ध या दोघांचाही वारसा आहेत.
भगवान बुद्धांच्या हाडांचे अवशेष थायलंड, श्रीलंका आणि म्यानमारसारख्या देशांमध्येही विखुरले आहेत. तिथे या अवशेषांची पूजा केली जाते.
लिलाव करणारे आणि इतिहासकार यांची भूमिका
“भगवान बुद्धांच्या अवशेषांना बाजारात विक्री करता येईल अशी एखादी कलाकृती मानता येईल? आणि जर ते असे अवशेष नाहीत, तर मग त्यांची विक्री करणाऱ्याला त्यांचा लिलाव करण्याचा नैतिक अधिकार कसा काय आहे?” असा प्रश्न नमन अहुजा विचारतात. ते दिल्लीस्थित कला इतिहासकार आहेत.
ते पुढे विचारतात, “विक्रेत्याला कस्टोडियन म्हटलं जात असल्यामुळे मला विचारायचं आहे की कोणाच्या वतीनं कस्टोडियन? कस्टोडियन असल्यामुळे त्यांना हे अवशेष विकण्याची परवानगी मिळते का?”
हे अवशेष पेप्पे कुटुंबाच्या संग्रहात आणि क्रिस पेप्पे हे विल्यम पेप्पे यांचे पणतू आहेत.
क्रिस यांनी बीबीसीला सांगितलं की, “त्यांच्या कुटुंबानं हे अवशेष दान करण्याचा विचार केला. मात्र सर्वच पर्यायांमध्ये अडचणी आल्या. त्यामुळे बौद्धधर्मीयांना हे अवशेष हस्तांतरित करण्यासाठी या अवशेषांचा लिलाव करणं हा सर्वात योग्य आणि पारदर्शक मार्ग वाटला.”
ज्युलियन किंग हे सदबीज इंटरनॅशनलचे तज्ज्ञ आणि न्यूयॉर्कमधील हिमालयन आर्टचे विक्री प्रमुख आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, लिलाव करणाऱ्या फर्मनं म्हणजे सदबीजनं या रत्नांचा सखोल अभ्यास केला आहे.
ज्युलियन किंग म्हणाले, “सदबीजमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जाणाऱ्या कोणत्याही महत्त्वाच्या वस्तू आणि संग्रहीत वस्तूंची ज्याप्रमाणे आवश्यक ती तपासणी केली जाते.”
“या अवशेषांच्या बाबतीत देखील वस्तूंचा अधिकृतपणा आणि त्यांचं मूळ किंवा उगम, कलाकृती आणि खजिन्यासंदर्भातील कायदेशीर बाबी आणि आमची धोरणं आणि या क्षेत्रातील मानकं तसंच इतर गोष्टींशी संबंधित आवश्यक ती तपासणी आम्ही केली आहे.”

फोटो स्रोत, Icon Films
लंडनच्या सोआस विद्यापीठातील अॅश्ले थॉम्पसन आणि क्युरेटर कोनन चेआँग, दोघेही आग्नेय आशियातील कलेचे तज्ज्ञ आहेत. या दोघांचेही यासंदर्भात आणखी प्रश्न आहेत.
दोघांनी बीबीसीला एक संयुक्त वक्तव्यं दिलं आहे, त्यात ते म्हणाले: “भगवान बुद्धांच्या अवशेषांच्या विक्रीमुळे उपस्थित होणारे इतर नैतिक प्रश्न म्हणजे: मानवी अवशेषांचा व्यापार किंवा विक्री करावी का? एखादी गोष्ट मानवी अवशेष आहे की नाही, हे कोण ठरवतं?”
“जगभरातील बौद्धधर्मियांसाठी विक्रीसाठी ठेवण्यातील आलेली रत्नं, ही बुद्धांच्या अस्थी आणि राख या अवशेषांचाच अविभाज्य भाग आहेत.”
अवशेषांच्या विक्रीमुळे बौद्ध नेत्यांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.
लंडनमधील ब्रिटिश महाबोधी सोसायटीचे अमल अबेयवर्धने यांनी बीबीसीला सांगितलं,”परवानगीशिवाय इतरांच्या वस्तू घेऊ नयेत अशी शिकवण भगवान बुद्ध आपल्याला देतात. ऐतिहासिक नोंदींमधून असं दिसतं की शाक्यमुनी कुळांना (भगवान बुद्धांचं कूळ) या अवशेषांचा ताबा देण्यात आला होता.”
“कारण भगवान बुद्ध त्यांच्या समुदायातील किंवा कुळातील होते. त्यांची इच्छा होती हे अवशेष, या रत्नांसारख्या अलंकारांसह जतन करण्यात यावेत. जेणेकरून भगवान बुद्धांच्या अनुयायांना त्यांची कायमची पूजा करता येईल.”
पेप्पे कुटुंबं आणि भगवान बुद्धांचे अवशेष
क्रिस पेप्पे यांनी लिहिलं आहे की, ही रत्नं त्यांच्या पणजोबांकडून त्यांच्या चुलत भावाकडे गेली आणि 2013 मध्ये त्यांना आणि इतर दोन चुलत भावांना मिळाली. तेव्हापासूनच त्यांनी त्यांच्या पणजोबांनी लावलेल्या शोधाबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली.
लॉज एंजेलिसमधील टीव्ही दिग्दर्शक आणि चित्रपट संपादकानं लिहिलं की, त्यांना 1898 मधील रॉयटर्सपासून ते न्यूयॉर्क ट्रिब्युनपर्यंतच्या वृत्तपत्रांमधील बातम्या सापडल्या आहेत. त्यात भगवान बुद्धांच्या अवशेषांचा शोध लागल्याची बातमी देण्यात आली आहे.
“ब्रिटिशांनी भारताला वसाहत बनवलं हे माझ्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या लज्जेचं कारण होतं (आणि अजूनही आहे). मात्र खनिजा शोधणारे लोक जे त्यांनी शोधलेल्या गोष्टी इंग्लंडला परत आणत होते, त्यात ज्ञानाच्या शोधावर लक्ष केंद्रित करणारे लोक देखील होते,” असं क्रिस पेप्पे लिहितात.
त्यांनी नमदू केलं आहे की त्यांच्या संशोधनातून त्यांच्या पूर्वजांबद्दल बरीच माहिती समोर आली, ज्यांना त्यांनी ‘भूतकाळातील पूर्वग्रहदूषित व्हिक्टोरियन’ (व्हिक्टोरिया राणीच्या काळातील) म्हणून नाकारलं होतं.

फोटो स्रोत, courtesy: Sotheby’s
ते पुढे लिहितात की “संशोधनातून मला कळालं की विली पेप्पे यांच्या पहिला पत्नीनं हनिमूनसाठी भारतभर प्रवास करणं पसंत केलं होतं. त्यांना हा देश आणि तिथली संस्कृती खूप आवडली. दुर्दैवानं, त्यांचं एका आजारानं निधन झालं.”
“मला असंही कळालं की भारतीय महिलांना लागू होणाऱ्या जमिनीच्या कायद्याबद्दल माझी आजी संतापली होती. आणि मला हे माहित झालं की 1897 च्या दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकर्यांना काम देण्याचा प्रयत्न म्हणून विली पेप्पे यांनी स्तुपाचं उत्खनन केलं होतं.”
क्रिस लिहितात की, “त्यांच्या पणजोबांच्या तरफेच्या तांत्रिक आकृत्यांवरून असंदेखील दिसतं की ते एक प्रशिक्षित अभियंते होते जे प्रकल्पाला विरोध करू शकत नव्हते.”
विल्यम पेप्पे यांनी उत्खननातून सापडलेली रत्नं आणि अवशेष भारतातील ब्रिटिश सरकारला दिले. असअवशेष सियामचे बौद्ध राजा, राम पाचवा यांच्याकडे गेले.
अवशेषांचे पाच कलश, एक दगडीपेटी आणि इतर बहुतांश अवशेष कोलकात्यातील इंडियन म्युझियममध्ये पाठवण्यात आले. आधी ते इम्पिरिअल म्युझियम ऑफ कलकत्ता म्हणून ओळखले जायचे.
फक्त ‘ड्युप्लिकेट्सचा एक छोटा भाग’ पेप्पे कुटुंबाकडे राहिला. तो ठेवण्यास त्यांना परवानगी देण्यात आली होती, असं क्रिस लिहितात.
(सदबीजच्या नोंदीनुसार, पेप्पे यांना या शोधातील अंदाजे एक पंचमांश भाग ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.)
अवशेषांच्या व्यापारीकरणाचा मुद्दा
सूत्रांनी बीबीसीला सांगितलं की लिलाव करणारी फर्म म्हणजे सदबीज त्या ‘डुप्लिकेट’ वस्तूंना मूळ वस्तूच मानते, ज्या वस्तू दान करण्यात आल्या त्यात या वस्तू अधिकच्या होत्या, ज्या भारत सरकारनं पेप्पे कुटुंबाला ठेवण्याची परवानगी दिली होती.
गेल्या सहा वर्षांमध्ये, ही रत्नं प्रमुख प्रदर्शनांमध्ये मांडण्यात आली आहेत. यात 2023 मधील ‘द मेट’ मधील प्रदर्शनाचाही समावेश आहे. न्यूयॉर्कमधील द मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्टलाच ‘द मेट’ म्हणून ओळखलं जातं. पेप्पे कुटुंबानं त्यांचं संशोधन लोकांसमोर आणण्यासाठी एक वेबसाईटदेखील सुरू केली आहे.
काही विद्वानांचा असा युक्तिवाद आहे की, भगवान बुद्धांच्या अवशेषांकडे कधीही बाजारातील वस्तूंप्रमाणे पाहता कामा नये.
थॉम्पसन आणि चेआँग म्हणतात, “सदबीजच्या लिलावात या अतिशय पवित्र वस्तूंचं रुपांतर विक्री करण्यायोग्य वस्तूंमध्ये होतं आहे. त्यातून वसाहतवादी हिंसाचाराच्या कृत्यांनाच पुढे सुरू ठेवलं जात आहे.”
क्रिस पेप्पे यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांनी भेट दिलेल्या सर्व बौद्ध मठांमधील कोणतीही बौद्ध व्यक्ती या अवशेषांना भौतिक किंवा शारीरिक अवशेष मानत नाही.”

फोटो स्रोत, Peppé family
“अलीकडेच पाश्चात्य विद्यापीठांमधील काही बौद्ध संशोधकांनी यासंदर्भात एक गुंतागुंतीचा आणि प्रचलित सत्याला आव्हान देणारा तर्क मांडला आहे. ज्याद्वारे त्यांना असं मानलं जाऊ शकतं, की ही एक संशोधकांनी मांडलेली रचना आहे, जी सामान्यपणे शोधाचा तपशील माहित असलेले बौद्ध लोक मांडत नाहीत,” असं ते म्हणाले.
क्रिस पेप्पे म्हणाले की “त्यांच्या कुटुंबानं हे अवशेष मंदिरं आणि संग्रहालयांना दान करण्याचाही विचार केला. मात्र बारकाईनं तपासणी केल्यावर त्या सर्वांनीच वेगवेगळ्या समस्या मांडल्या.”
“लिलाव हाच, हे अवशेष बौद्धांना हे अवशेष हस्तांतरित करण्याचा सर्वात योग्य आणि सर्वात पारदर्शक मार्ग दिसतो. आम्हाला खात्री आहे की सदबीज ते नक्कीच साध्य करेल,” असं क्रिस म्हणाले.
काहीजण कोहिनूर हिऱ्याकडेही लक्ष वेधतात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं हा हिरा ताब्यात घेतला होता आणि आता तो क्राऊन ज्वेल्सचा भाग आहे. अनेक भारतीय याकडे हिऱ्याची चोरी म्हणूनही पाहतात. आता त्यात भगवान बुद्धांच्या रत्नांची भर पडावी का?
“माझ्या मते, अवशेष त्याच्या मूळ ठिकाणी परत आणणं क्वचितच आवश्यक असतं. असे दुर्मिळ आणि पवित्र अवशेष, जे अद्वितीय आहेत आणि जे त्या भूमीच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असतात, त्याकडे सरकारनं अपवादात्मक लक्ष दिलं पाहिजे,” असं अहुजा म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC