Source :- ZEE NEWS

India International Border Lightining Photo: भारतात सध्या भारत-पाकिस्तान वाद आणि अवकाळी पाऊस हे दोन्ही विषय चांगलेच चर्चेत आहेत. एकीकडे पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. तर दुसरीकडे देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी आणि वेळेआधीच पाऊस आल्याने शेतकऱ्यांपासून ते शहरी भागांमध्ये राहणाऱ्यांनाही अगदी पाणी तुंबण्यापासून ते झाडांची पडझडीपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मंगळवारीही महाराष्ट्रातील अनेक शहरांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. पुढील चार दिवस महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाऱ्या वादळाबरोबरच विजांच्या कडकडाटासहीत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईसहीत उपनगर आणि बऱ्याच भागांमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पर्जन्यवृष्टी झाली. असं असतानाच सोशल मीडीयावरही एक फोटो व्हायरल होत असून हा फोटो भारताच्या सीमारेषेवरील असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोमध्ये भारताच्या अंतरराष्ट्रीय सीमेजवळ आकाशातून पडणाऱ्या विजांचा तांडव पाहायला मिळत आहे.

नेमका कुठला आहे हा फोटो आणि त्याची चर्चा का?

कंटेंट क्रिएटर असलेल्या समीर गायकवाड यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन सध्या व्हायरल झालेला फोटो शेअर केला आहे. या फोटसंदर्भातील सविस्तर माहिती त्यांनी पोस्टमध्येच दिली आहे. 18 मे रोजी पोस्ट केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये समीर यांनी, “हा फोटो आज रात्रीचा आहे, बांगलादेशातील मित्राने पाठवला आहे. भारतीय सीमेलगतच्या बांगलादेशमधील ‘राजशाही’ या शहरालगत पद्मा नदी वाहते. फोटोमध्ये हिरव्या रंगात दिसणारे राजशाही शहर आहे, त्याच्या पुढे काळसर करडे दिसणारे पद्मा नदीचे विशाल पात्र आहे आणि नदी पात्रापलीकडे एका रेषेत दिसत असलेले फ्लड लाइट्स असलेला भाग म्हणजे भारतीय हद्दीचा भूभाग आहे. राजशाहीच्या टेकडीवरून हा फोटो घेतलाय आणि भारतीय हद्दीत चमकत असणाऱ्या वीजा त्यात कैद झाल्या आहेत,” असं म्हटलं आहे.

भारतातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया…

पोस्टमध्ये पुढे, “पद्मा म्हणजे भारतातली गंगा नदी. बंगालमध्ये आल्यावर गंगेचा प्रवाह विभाजित होतो, भागीरथी जिला हुगळी या नावाने ओळखले जाते ती एक नदी आणि बांगलादेशात प्रवेश करणारी पद्मा! हुगळीचा प्रवाह बंगालच्या उपसमुद्रात जाऊन मिळतो तर पद्मा अनेक देखणी वळणं घेत भारतातून आलेल्या ब्रम्हपुत्रेशी संगम करते. या दोन्ही नद्या एकत्र येतात आणि बांगलादेशाच्या दक्षिणपूर्वेस वाहत जातात. पुढे जाऊन त्यांचेही विभाजन होते. त्यातली मेघना नदी ही मुख्य नदी! मेघनेचे पात्र आणि खोरे अत्यंत देखणे आणि समृद्ध आहे. माथवंगा नदी ही या पद्मा नदीचीच एक छोटीशी उपनदी होय. या माथवंगेच्या काठावर दौलतदिया हा जगातला सर्वात मोठा व कुख्यात रेड लाइट एरिया आहे. या सर्व प्रवाहांची साक्षीदार गंगा आहे, कारण भारतातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया कोलकत्यात सोनागाचीमध्ये आहे आणि हे शहर गंगेची उपनदी असणाऱ्या हुगळी नदीच्या काठी आहे,” असं समीर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रत्येक स्त्रीमध्ये एक नदी वाहते आणि प्रत्येक नदी ही एक स्त्रीरूपच

“वाराणसीपासून गंगेच्या काठालगतच्या मोठ्या शहरात स्त्रियांची फरफट जारी राहते ती थेट बंगालच्या उपसागरात मिळेपर्यंत कायम राहते! वाटेत तिला शरयू, सोन, घागरा, गंडक, गोमती यांचे प्रवाह मिळतात! नद्या आणि स्त्रिया यांचे परस्पर संबंध खूप गहिरे आहेत कारण प्रत्येक स्त्रीमध्ये एक नदी वाहते आणि प्रत्येक नदी ही एक स्त्रीरूपच असते,” असं समीर यांनी म्हटलं आहे.

नदीचे पात्र आणि स्री मन

“फोटोमधील पद्मा नदीचे पात्र आता शांत दिसतेय मात्र तिच्या अंतरंगात काय चाललेय हे कुणालाच ठाऊक नसेल, जसे एखाद्या स्त्रीच्या मनात काय चाललेय हे कुणालाच कळत नाही, अगदी तसेच,” असं म्हणत समीर यांनी पोस्टचा शेवट केला आहे.

SOURCE : ZEE NEWS