Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
अपडेटेड 13 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित केले. त्यावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदींचे भाषण हे ‘चिथावणीखोर’ असल्याचे म्हणत पाकिस्तानने ते अस्वीकार केले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, “जेव्हा या क्षेत्रात शांती आणि स्थैर्य यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होताना दिसत आहेत, त्यावेळी हे दावे चिथावणीचे काम करू शकतात. चुकीची माहिती, राजकीय संधीसाधूपणा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली यावर हे दावे आधारित आहेत,” असं पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने म्हटले.
पाकिस्तानने म्हटले आहे की “भारताने कोणतीही चूक करू नये, आम्ही येत्या काळात या संबधी भारताच्या हालचाली आणि वागणुकीवर बारीक लक्ष ठेवणार आहोत.”
पाकिस्तानने म्हटले की “भारताने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आम्ही केवळ भारतीय सैनिक तळांनाच लक्ष्य केले.”
पाकिस्तानने हे देखील म्हटले आहे की ‘आम्ही सिंधू नदी करारानुसार आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पाऊल उचलू.’
मंगळवारी (13 मे) भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले ‘जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देणे पूर्णपणे थांबवणार नाही तोपर्यंत सिंधू नदी करार हा स्थगित असेल.’
पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने पुढे म्हटले आहे की ‘पाकिस्तान शस्त्रसंधी आणि प्रदेशातील तणाव कमी करण्यास कटिबद्ध आहे. शस्त्रसंधी अनेक मित्र राष्ट्रांच्या प्रयत्नांनी झाली आहे. शस्त्रसंधी ही केवळ पाकिस्तानच्या इच्छेखातर झाली असं म्हणणं खोटेपणाचे आहे.’
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
भारताने म्हटले आहे की शस्त्रसंधी पाकिस्तानच्याच विनंतीहून झाली.
‘पाकिस्तानने निराशा आणि असहाय होऊन शस्त्रसंधी करण्याची मागणी केली असा दावा भारताने केला आहे, हे पूर्णपणे खोटे,’ असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.
आपल्या निवेदनात पाकिस्तानने स्वतःला ‘दहशतवादाचा पीडित’ असे म्हटले आहे.
‘दहशतवाद्यांच्या घरात घुसून मारलं’
दरम्यान, मंगळवारी (13 मे) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या आदमपूरमधील भारतीय हवाई दलाच्या तळाला भेट दिली. भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर त्यांनी सैन्याचं कौतुक करण्यासाठी हा दौरा केला.
“आमच्या मुलींचं आणि बहिणींचं कुंकू पुसलं तेव्हा भारतीय सेनेनं दहशतवाद्यांच्या घरात घुसून मारलं,” असं मोदी यांनी सांगितलं.
आदमपूरमधील भारतीय हवाई दल्याच्या तळावर मोदींनी सैन्यांना संबोधून भाषण केलं.
“ऑपरेशन सिंदूर’ने भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक न्यू नॉर्मल (नवीन सामान्य स्थिती) मानक स्थापन केला आहे,” असं मोदी म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानमधील कट्टरवाद्यांच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्या घटनेच्या पाच दिवसांनंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं.

फोटो स्रोत, ANI
या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये सशस्त्र संघर्षाला सुरुवात झाली होती. शनिवारी (9 मे) दोन्ही देशांतील संघर्ष थांबला. कारण अण्वस्त्रसज्ज शेजारी देशांनी सीमापार लष्करी कारवाया थांबवण्यासाठी एक समजूतदारपणा दाखवण्याची गरज होती.
मात्र सोमवारी मोदी यांनी स्पष्ट केलं की, भारताने केवळ आपल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईला स्थगिती दिली आहे.
“आगामी काळात आमचं पाकिस्तानच्या प्रत्येक पावलाकडे लक्ष असेल. ते पुढे कोणती भूमिका स्वीकारतात, हेही आम्ही पाहू,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे :
- भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली.
- 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.
- दहशतवाद्यांच्या आकांना आता लक्षात आलं असेल की भारताकडे जर वाकडी नजर केली, तर त्याचा एकच परिणाम असेल – विनाश आणि महाविनाश.
- ज्या पाकिस्तानी सैन्याच्या भरवशावर हे दहशतवादी बसले होते, त्यांना भारताच्या सैन्याने धूळ चारली.
- भारताने पाकिस्तानी सैन्यालाही दाखवून दिलं की पाकिस्तानात बसून दहशतवादी निवांत श्वास घेऊ शकणार नाहीत. आम्ही घरात घुसून मारणार.
- त्यांना जीव वाचवण्यासाठी एकही संधी देणार नाही. आमच्या ड्रोन, मिसाईल्सच्या आठवणीने पाकिस्तानला अनेक दिवस झोप लागणार नाही.
- ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे देशाचा आत्मविश्वास वाढला आहे.
- भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या पार आत असलेल्या दहशतवादी तळांना टार्गेट केलं. 20-25 मिनिटांत सीमेपलिकडील लक्ष्यांना भेदलं.
- पाकिस्तानमधील दहशतवादी मुख्यालयं नष्ट करणं हा आमचा उद्देश होता. पण पाकिस्तानने नागरी विमाने समोर केली. तरीही भारतीय सेनेनं त्यांना नुकसान न करता प्रत्युत्तर दिलं.
यावेळी दहशतवादविरोधातील भारताने नवीन लक्ष्मणरेषा ओढली असल्याचं मोदी म्हणाले. आपण केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई स्ट्राईकवेळी हे दाखवून दिलं.
दहशतवादाविरोधातील भारताच्या नवीन धोरणातील तीन गोष्टी:
- भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर, त्याला आम्ही आपल्या पद्धतीने आणि आपल्या वेळेनुसार प्रत्युत्तर देणार.
- भारत पाकिस्तानचं न्यूक्लियर ब्लॅकमेल सहन करणार नाही.
- दहशतवाद्यांना सहकार्य करणारे आका किंवा सरकार आणि दहशतवादी यांना वेगळं समजलं जाणार नाही.
शस्त्रसंधीनंतरचे पहिले भाषण
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष विरामानंतर सोमवारी (12 मे) रात्री पहिल्यांदाच देशाला संबोधित केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनी केलेल्या पराक्रमाला देशातील प्रत्येक माता-भगिनीला समर्पित केले.

फोटो स्रोत, ANI
सध्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सुरू असलेली कारवाई फक्त स्थगित करण्यात आली आहे, पाकिस्तानची भूमिका काय असेल याकडे आमचे लक्ष राहील असे मोदींनी सांगितले.
आपल्या पहिल्या भाषणात मोदी काय म्हणाले, हे जाणून घेऊ.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि संयम दोन्ही पाहिलं. मी सर्वांत आधी भारताच्या पराक्रमी लष्कराला, गुप्तचर संस्थांना, संशोधकांना प्रत्येक भारतीयांकडून सॅल्यूट करतो.
आपल्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी मोठं शौर्य दाखवलं. मी तो पराक्रम आपल्या देशातील प्रत्येक आईला, मातेला आणि प्रत्येक लेकीला समर्पित करतो.
2 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे क्रौर्य दाखवलं होतं. त्यानं देश आणि जगाला हादरवलं होतं.
” कुटुंबासोबत सुट्या साजऱ्या करणाऱ्या निर्दोष नागरिकांना धर्म विचारून कुटुंब, मुलांसमोर निर्घृणपणे मारणं हा दहशतवादाचा बीभत्स चेहरा होता. क्रौर्य होतं. देशातील एकता तोडण्याचा हा प्रयत्न होता.”
“माझ्यासाठी ही वेदना खूप मोठी होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष एका सुरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी एकत्र उभा राहिला.
“आपण दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण सूट दिली. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतवादी संघटना यांना आपल्या माता-भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसलं तर काय होतं हे कळलं आहे.”
‘ऑपरेशन सिंदूर कोट्यवधी भारतीयांच्या भावनेचे प्रतीक’
आपल्या संबोधनात मोदी म्हणाले,
“ऑपरेशन सिंदूर देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनेचं प्रतीक आहे. ते न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे.
“6 आणि 7 मेच्या रात्री संपूर्ण जगानं ही प्रतिज्ञा खरी होताना पाहिली. भारतीय लष्करानं पाकिस्तानात दहशतवाद्यांची तळं, प्रशिक्षण केंद्र यावर हल्ला केला.
“भारत एवढा मोठा निर्णय घेईल याचा दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण देश एकत्र येतो, नेशन फर्स्ट ही भावना असते तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात.”

“पाकिस्तानात दहशतवादी तळांवर भारतानं क्षेपणास्त्रं आणि ड्रोन हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनांच्या इमारतींबरोबर त्यांचा मनोधैर्यही कोसळलं.
“बहावलपूर आणि मुरीदके अशी दहशतवादी तळं एकप्रकारे जागतिक दहशतवादाची विद्यापीठं होती. 9-11 चा हल्ला असो किंवा इंग्लंड, भारतातील हल्ल्यांची पाळंमुळं याच्याशी जोडलेली होती.
“दहशतवाद्यांनी भारताच्या लेकींच्या कपाळाचं कुंकू पुसलं. त्यामुळं भारताच्या या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांना संपवलं.”
‘दहशतवाद्यांच्या आकांना संपवले’
“दहशतवाद्यांचे अनेक आका गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानात खुलेआम फिरत होते. त्यांना भारताना संपवलं.
“भारताच्या या कारवाईनं पाकिस्तान प्रचंड हताश, निराश झाला. त्यातूनच त्यांनी पुन्हा एक दुस्साहस केलं. दहशतवादाविरोधात भारताला साथ देण्याऐवजी त्यांनी भारतावरच हल्ले सुरू केले.
“पाकिस्ताननं आपले मंदिरं, गुरुद्वारे, नागरिकांची घरं यावर हल्ला केला. लष्करी तळांवर हल्ला केला. पण यातही पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला.”

“पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्रं कशा प्रकारे भारतासमोर निष्प्रभ ठरली हे जगानं पाहिलं. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमनं त्यांचा आकाशातच खात्मा केला. पाकिस्तानची सीमेवर युद्धाची तयारी होती. पण भारतानं त्यांच्या छातीवर वार केला.
“भारताचे ड्रोन, क्षेपणास्त्र यांनी सटिक हल्ले करत पाकिस्तानच्या लष्कराच्या एअर फिल्डला लक्ष्य केलं.
“भारतानं पाकिस्तानचं एवढं नुकसान केलं की, त्यांचा त्यांना अंदाजच नव्हता. त्यामुळं भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान वाचण्याचे मार्ग शोधत होता.”
‘कारवाई फक्त स्थगित केली आहे’
“जगभरात तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान विनंती करत होता. त्याच नाइलाजानं 10 मेच्या दुपारी पाकिस्तानच्या लष्करानं आपल्या डीजीएमओला संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवादाच्या तळांचं मोठं नुकसान केलं होतं. दहशतवाद्यांना संपवलं होतं. पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली होती.
“त्यामुळं पाकिस्ताननं विनंती करण्यात आली. तसंच त्यांच्याकडून पुढं कोणत्याही दहशतवादी कारवाया आणि लष्करी आक्रमण होणार नाही, हे सांगितल्यानंतर भारतानंही त्यावर विचार केला.
“मी पुन्हा सांगतो की, भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरील कारवाई फक्त स्थगित केली आहे. पाकिस्तान काय भूमिका घेतो, यावर आम्ही पुढचे निर्णय घेऊ.
“भारताच्या तिन्ही सैन्यदलांसह, बीएसएफ, निमलष्करी दलं सतत अलर्ट आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादविरोधी भारताचे धोरण आहे,” असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

दहशतवादाविरोधात तीन मोठी धोरणे ठरवले असल्याचे मोदींनी सांगितले.
“ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधातील युद्धात नवीन धोरण ठरवले आहे.
पहिले – भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीनं, आमच्या अटींवर उत्तर देऊ. दहशतवाद्यांची मुळं असलेल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई करू.
“दुसरे – कोणत्याही प्रकारे न्युक्लियर ब्लॅकमेलला भारत बळी पडणार नाही. न्युक्लियर ब्लॅकमेलच्या नावाखाली वाढणाऱ्या दहशतवादी तळांवर भारत कठोर कारवाई करेल.
“तिसरी – आम्ही दहशतवादाला मदत करणारं सरकार आणि दहशतवाद्यांचे आका यांना एकच समजू.
“ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगानं, पाकिस्तानचं सत्य पाहिलं आहे. कारण मारलेल्या दहशतवाद्यांना अंतिम निरोप द्यायला पाकिस्तानी लष्कराचे मोठे अधिकारी पोहोचले. स्टेट स्पाँसर्ड टेररिझमचा हा मोठा पुरावा आहे,” मोदींनी सांगितले.
‘हे युग युद्धाचं नाही, तर दहशतवादाचंही नाही’
“आम्ही देशाच्या नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी निर्णायक पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानावर आपण कायम पाकिस्तानला धूळ चारली आहे.
“यावेळी ऑपरेशन सिंदूरने त्यात नवीन नोंद केली आहे. आपण वाळवंट आणि डोंगरी भागांत क्षमता दाखवल्या. तसंच न्यू एज वॉरमध्येही श्रेष्ठत्व सिद्ध केलं.
“या ऑपरेशनदरम्यान आमच्या मेड इन इंडियाच्या शस्त्रांची क्षमता सिद्ध झाली. आता मेड इन इंडिया डिफेन्स इक्विपमेंटची वेळ आली आहे.
“प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाविरोधात आपण सर्वांनी एकजूट राहणं, आपली एकता हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे. हे युग नक्कीच युद्धाचं नाही. पण हे युग दहशतवादाचंही नाही. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स ही चांगल्या जगाची गॅरंटी आहे.
“पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानचं सरकार ज्याप्रकारे दहशतवादाला खतपाणी देतात त्यानं एकदिवस पाकिस्तानचाच खात्मा होईल.
“पाकिस्तानला स्वतःचं रक्षण करायचं असेल तर त्यांना त्या देशातील दहशतवादाचा खात्मा करावाच लागेल. त्याशिवाय शांतीचा दुसरा मार्ग नाही.”

“भारताचं मत अगदी स्पष्ट आहे. दहशतवाद आणि चर्चा, व्यापार एकत्र चालू शकत नाही. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही.
“मी आज जागतिक समुदायालाही सांगू इच्छितो की, जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर दहशतवादावर होईल. पाकिस्तानवर चर्चा झाली तर पाक व्याप्त काश्मीरवरच ( पीओकेवर) होईल.
“आज बुद्ध पौर्णिमा आहे, भगवान बुद्धांनी आम्हाला शांतीचा मार्ग दाखवला आहे. पण शांततेचा मार्गही कठोरतेच्या मार्गावरूनच जातो.
“मानवता शांती आणि समृद्धीच्या दिशेनं जावी, प्रत्येक भारतीय शांततेनं जगू शकावा, विकसित भारत व्हावा यासाठी भारत शक्तिशाली बनणं गरजेचं आहे. त्यामुळं गरज पडल्यास या कठोर होण्याचीही गरज आहे. गेल्या काही दिवसांत भारताने हेच केलं आहे.
“मी पुन्हा एकदा भारताच्या लष्कर आणि सैन्य दलांना सॅल्यूट करतो. भारतीयांच्या दृढसंकल्पाला मी नमन करतो,” असं म्हणत मोदींनी भाषणाचा समारोप केला.
अमेरिकेची यशस्वी मध्यस्थी-ट्रम्प
दरम्यान, मोदींच्या भाषणापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात भारत पाकिस्तान संघर्षावर आणि अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीवर भाष्य केलं.
“शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षात अमेरिकेने शस्त्रसंधीसाठी यशस्वी मध्यस्थी केली. शक्यतो ही शस्त्रसंधी कायमस्वरुपी असेल. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडं मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रं असल्यानं हा संघर्ष धोकादायक वळणावर चालला होता. पण दोन्ही देशांच्या नेत्यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजून घेतल्यानं धोका टळला,” असं ट्रम्प म्हणाले.
“आमचे दोन्ही देशांबरोबर व्यापारी संबंध आहेत. त्यामुळं दोन्ही देशांनी संघर्ष थांबवला नाही, तर तुमच्याशी व्यापारी संबंध ठेवणार नाही, असं आम्ही दोन्ही देशांना सांगितलं. असं म्हटल्यानंतर दोन्ही देश तयार झाले. इतरही बरीच कारण होती, पण व्यापार हे मोठं कारण होतं. आम्ही त्यांच्यातील अण्विक युद्ध होण्यापासून वाचवलं,” असंही ट्रम्प म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC