Source :- ZEE NEWS
Shocking Details About Pakistani Drones: भारत आणि पाकिस्तानदरम्यान मागील काही दिवसांपासून जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. पहलगाममध्ये 26 पर्यटकांची हत्या घडवून आणणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय संरक्षण दलांनी 7 मेच्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त करत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने भारतीय सीमेला लागून असलेल्या भारतातील राज्यांमधील शहरांवर ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात एकही हल्ला यशस्वी झालेला नसला तरी पाकिस्तान वापरत असलेले ड्रोन हे त्यांना त्यांचा मित्र देश असलेल्या तुर्कीएने दिले आहेत. हे ड्रोन्स आहेत तरी कसे ते पाहूयात…
हे ड्रोन्स आहेत तरी कसे? कोणी केलीये निर्मिती?
पाकिस्तान वापरत असलेले ड्रोन म्हणजे ‘सोंगर ड्रोन’ जे 2019 मध्ये तुर्कीएमधील संरक्षण कंपनी ‘असिसगार्ड’ने बनवले होते आणि 2020 मध्ये ते पूर्णपणे तुर्कीएमधील निर्मिती असलेले ड्रोन्स सेवेत आणले गेले. तुर्कीएची संरक्षण कंपनी ASISGUARD ने विकसित केलेले SONGAR हे तुर्की सशस्त्र दलांच्या (TAF) यादीत समाविष्ट होणारे पहिले राष्ट्रीय स्तरावर उत्पादित सशस्त्र ड्रोन ठरले.
उत्कृष्ट स्ट्राइक पॉवर
तुर्कीएच्या संरक्षण इतिहासामधील हा एका महत्त्वपूर्ण टप्पा मानला गेला. सोंगर यशस्वीरित्या मानवरहित, दूरस्थपणे नियंत्रित करण्यायोग्य हे ड्रोन संरक्षण दरात समाविष्ट करण्यात आले. या ड्रोन्समुळे भूदलाची ऑपरेशनल क्षमता वाढली. लष्करी तुकडीतील 4 बाय 4 गाड्यांशी या ड्रोन्सला संलग्न करता येतं. त्यामुळे हे एकत्रीकरण वाहनाला उत्कृष्ट स्ट्राइक पॉवर देतं. तसेच सुरक्षा ऑपरेशन्स दरम्यान स्वायत्तपणे धोके शोधण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता प्रदान करते.
काय वैशिष्ट्य आहे ‘सोंगर ड्रोन’चं?
‘सोंगर ड्रोन’मध्ये 140 सेमीची रोटर-टू-रोटर रुंदी आहे आणि ते 45 किलोग्रॅमच्या जास्तीत जास्त टेक-ऑफ वजन पेलवू शकतं. कोणत्याही पेलोडशिवाय, ते 35 मिनिटांपर्यंत कार्य करण्यास सक्षम आहे. पोर्टेबल मानवरहित हवाई प्रणाली (UAS) म्हणून डिझाइन केलेले, ते रिअल-टाइम व्हिडिओ प्रसारित करते. तसेच 5-किलोमीटर ऑपरेशनल त्रिज्यामध्ये प्रभावीपणे कार्य करू शकते. हे ड्रोन समुद्रसपाटीपासून सरासरी 3 हजार मीटर आणि जमिनीपासून 300 मीटर उंचीवर पोहोचण्यास सक्षम आहे.
ड्रोनमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स
‘सोंगर ड्रोन’मध्ये 10 किलोमीटरची ऑपरेशनल रेंज आहे आणि ते रिअल-टाइम इमेज ट्रान्समिशन देतं. ज्यामुळे ते विविध महत्त्वाच्या मोहिमांसाठी वापरता येतं. यामध्ये लक्ष्य क्षेत्राचे निरीक्षण, धोका हेरणे, मोहिमेनंतरचे नुकसान मूल्यांकन आणि एकल किंवा अनेक ड्रोन वापरून समन्वित हल्ल्यांची अंमलबजावणी करण्यासारख्या फिचर्सचा समावेश आहे. हे अॅम्बुश किंवा संभाव्य धोक्यांविरुद्ध हवेतून मोठ्या प्रमाणात अग्निशक्ती प्रदान करण्यासारख्यासाठी फायद्याचे ठरते. आवश्यकतेनुसार ‘सोंगर ड्रोन’ आक्रमक भूमिका घेताना अधिक वेगाने देखील काम करू शकते.
सर्वात आधी भारतच मदतीला गेलेला
2023 साली तुर्कीएला जेव्हा भीषण भूकंपाचा धक्का बसला होता त्यावेळी तुर्कीएमध्ये मदतीसाठी पोहचलेला पाहिला देश भारतच होता. भारताने ऑपरेशन दोस्तअंतर्गत तुर्कीएच्या अंकारा शहरामध्ये एनडीआरएफच्या जवानांसहीत मदतीचं साहित्य पाठवलं होतं. भारताने पडझड झालेल्या इमारतींचे ढीगारे आणि शहरांची पहाणी करण्यासाठी गरुड एरोस्पेस ड्रोन्सही तुर्कीएच्या मदतीला पाठवलेले. मात्र तुर्कीने या मदतीची जाण न राखता आता पाकिस्तानला मदत केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अनेक भारतीयांनी तुर्कीएला याच मदतीची आठवण करुन देत यापुढे तुर्कीएला कोणत्याही प्रकारची मदत भारताने करु नये अशी मागणी सोशल मीडियावरुन केल्याचं पाहायला मिळत आहे.
SOURCE : ZEE NEWS