Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील अनेक ठिकाणी हल्ले केले. दहशतवादी तळ असणारी ही ठिकाणं होती असं भारताने म्हटलं. त्यात पाकिस्तानच्या बहावलपूरमधल्या सुभान अल्लाह या मशिदीचाही समावेश होता.
बहावलपूर हा जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा अड्डा मानला जात असे.
भारत सरकारनं जैश-ए-मोहम्मद या संस्थेवर बंदी घातली आहे. या संघटनेचं मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या बहावलपूरमध्ये आहे, असा दावा भारत सरकारकडून वारंवार केला जात होता.
भारताच्या गृह मंत्रालयाने 7 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ लोकांच्या यादीत 57 वर्षीय मसूद अझहरचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
बुधवारी 7 मे रोजी भारताने हल्ला केल्यानंतर जाहीर केलेल्या एका निवेदनात आपल्या कुटुंबातले 10 लोक मारले गेले असल्याचं मसूद अझहर याने सांगितलं.
या हल्लाबद्दल माहिती देताना भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं की, “बहावलपूरमधलं सुभान अल्लाह मशीद आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर आत आहे. ते जैश-ए-मोहम्मद संघटनेचं मुख्यालय होतं. भरती, प्रशिक्षण देणं आणि विशिष्ट विचार ठासवणे (ब्रेन वॉशिंग) यासाठीचं केंद्र होतं. तिथे अनेक मोठे दहशतवादी येत असत.”
या हल्ल्यात भारताने पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतातल्या बहावलपूरमध्ये मसूद अझहरच्या इतर ठिकाणांवरही निशाणा साधला.
आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास 30 किलोमीटर आत, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या मुरीदकेमधल्याही ठिकाणांवर आणि याशिवाय सियालकोटच्या जवळ असलेल्या दोन तळांवरही हल्ला केल्याचा दावा भारत सरकारने केला आहे.
“सियालकोटमधील सरजल हे तळ आतंरराष्ट्रीय सीमेपासून 6 किलोमीटर दूर आणि सांभा-कठुआच्या समोर आहे.
तर महमूना झोया हे तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून 12 ते 18 किलोमीटर दूर होतं. हे हिजबुल मुजाहिदीन या संघटनेचं तळ होतं.
पठाणकोटमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्याची योजना इथंच आखली गेली होती,” असं सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
संरक्षण विश्लेषक राहुल बेदी सांगतात की, “पाकिस्तानचे लष्कर प्रमुख पंजाबी आहेत. पंतप्रधानही पंजाबी आहेत. बहुतेक अधिकारी पंजाबी आहेत. अशात त्यांच्याच पंजाब प्रांतावर हल्ला होणं ही साधी गोष्ट नाही.”
हल्ला आश्चर्यकारक नाही
भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर समोर आलेल्या व्हीडिओमध्ये सुभानअल्लाह या मशिदीचं भरपूर नुकसान झाल्याचं दिसत आहे.
भारताच्या टार्गेट यादीत समाविष्ट असलेलं बहावलपूर हे महत्त्वाचं स्थान मानलं जात होतं, असं भारतातले संरक्षण विश्लेषक अजय शुक्ला सांगतात.
“पाकिस्तानातील दक्षिण पंबाजमधलं ते एक महत्त्वाचं उपनगर होतं. फक्त पंजाबी अभिमानाचं प्रतीकच नाही तर, जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनेचा बालेकिल्ला म्हणूनही त्याची ओळख होती. संघटना इथे ताकद टिकवून आहे,” असं शुक्ला सांगत होते.
ते पुढं असंही म्हणाले की, सियालकोट आणि बहावलपूर पाकिस्तानच्या मुख्य भूभागात येतं. मुख्य भूभागाचा प्रदेश मानल्या जाणाऱ्या पंजाब प्रांतातलीच ही महत्त्वाची शहरं आहेत. त्यामुळं बहावलपूरवरचा हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या मुख्य भूभागावरचा हल्ला असं म्हणणंही चुकीचं ठरणार नाही.
मात्र, बहावलपूरचा हल्ला आश्चर्यकारक नव्हता, असं ते म्हणतात.
“बहावलपूरवरचा हल्ला आश्चर्यकारक नव्हता. पण तो सामान्यही नव्हता. भारतीय लष्कराच्या यादीत दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं असतील. त्यातलंच बहावलपूर हे एक असणार.
कुठे हल्ले केल्यानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सोयीसुविधांचं सर्वाधिक नुकसान होईल याचा विचार करूनच भारताने हल्ला केला असणार,” असं अजय शुक्ला सांगतात.
पाकिस्तानचे संरक्षण तज्ज्ञांच्या मते, बहावलपूर पाकिस्तानी सैन्यासाठी फारसं महत्त्वाचं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त ब्रिगेडियर महमूद शाह बीबीसीशी बोलताना म्हणाले की, “बहावलपूरमध्ये पाकिस्तानची संरक्षण व्यवस्था फारशी बळकट नाही.
लाहोर किंवा कराचीला जेवढं महत्त्वं दिलं जातं आणि तिथं जेवढी मजबूत सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते, तशी बहावलपूरमध्ये नाही. बहावलपूरवर कोणताही हल्ला झाला, की आमच्या मनात लगेच मसूद अझहरचं नाव येतं. “
ब्रिगेडियर महमूद शाह यांच्या मते, “राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तान जे काही उत्तर देईल त्यात बहावलपूरमध्ये झालेल्या हल्ल्याचं फारसं महत्त्व असेल असं मला वाटत नाही.
बहावलपूरच्या आसपास वाळवंट आहे. पाकिस्तानचं सैन्य इथं युद्धाचा अभ्यास करतं. त्याशिवाय या जागेचं खास महत्त्व नाही.”
भारताने स्वतःच्या सीमेतून साधले लक्ष्य
भारताने स्वतःच्या हवाई क्षेत्राच्या आत राहून हल्ला केल्याचा दावा केला आहे. तर, पाकिस्तानने भारताची पाच विमानं पाडल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानच्या या दाव्यावर भारतानं अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तानच्या दाव्याची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.
भारत स्वतःच्या सीमेतून बहावलपूरसारख्या ठिकाणी हल्ला करू शकतो का? हा प्रश्न आहे.
या प्रश्नावर अजय शुक्ला म्हणतात की, “सध्याच्या काळात भारताकडं अद्ययावत क्षेपणास्त्रं आणि बॉम्ब आहेत. भारत आपल्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करून सीमेच्या आत राहून असा हल्ला करू शकतो. त्यात हैराण होण्यासारखं काही नाही.”
एकीकडे पाकिस्तानी संरक्षण विश्लेषक बहावलपूरचं महत्त्व फेटाळून लावत असले, तरी भारतीय विश्लेषक ते अधोरेखित करतात.

फोटो स्रोत, Getty Images
अजय शुक्ला म्हणतात, “बहावलपूरमध्ये हल्ला होणं मोठी कारवाई आहे. आता यामुळं तणाव किती वाढतो ते पहायला हवं. आता चेंडू पाकिस्तान लष्कराकडं आहे.
त्यांना बरोबर वाटेल तसं ते करतील आणि मग भारत प्रत्युत्तराची कारवाई करेल. यामुळं परिस्थिती आणखी अवघड होणार आहे. प्रश्न हा आहे की, पाकिस्तान या परिस्थितीत तणाव आणखी वाढवण्याचा धोका पत्करेल का?”
बहावलपूरवरील हल्ल्याने तणाव वाढेल का?
आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, पाकिस्तान या हल्लांच्या प्रत्युत्तरात काही कारवाई करेल का?
पाकिस्तान उत्तर जरूर देईल, असं राहुल बेदी म्हणतात. पण त्यांचा निशाणा कशावर असेल?
“भारतात दहशतवादी तळं नाहीत. अशात दोन पर्याय उरतात. एक म्हणजे सामान्य नागरी वस्ती आणि दुसरं, हवाई दलाची तळं.”
“सामान्य नागरिकांना पाकिस्तान सोडून देईल. अशात भारताच्या पंजाबमधल्या अंबाला हवाईदल तळाला लक्ष्य केलं जाईल, अशी शक्यता आहे. यामुळं प्रकरण खूप तापेल.
भारताने केलेल्या हल्ल्यातून हा संदेश गेला आहे की, दहशतवादाविरोधी हल्ले फक्त पाकिस्तान प्रशासित काश्मीरपर्यंत मर्यादीत राहणार नाहीत.”
पाकिस्तानचे निवृत्त ब्रिगेडियर महमूद शाह यांच्या मते, पाकिस्तानने भारतीय विमानं पाडल्याचा दावा केला आहे. म्हणजेच, पाकिस्ताननं उत्तर दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारत संघर्ष किती वाढवेल यावर तणाव किती वाढेल हे ठरतं, असंही शाह म्हणाले.
“भारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रं असलेले देश आहेत. या दोन्ही देशांमधलं युद्ध जगासाठी धोकादायक ठरू शकतं.
त्यामुळंच दोन्ही देशांना युद्धापर्यंत पोहोचायचं नाही. आत्ताच्या परिस्थितीत दूरून क्षेपणास्त्र हल्ल्याची चर्चा होत आहे.”
“पण सर्फेस टू सर्फेस मिसाईलचा वापर केला जाऊ लागला तर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. दोन्ही देशांकडे अशा प्रकारची क्षेपणास्त्रं आहेत आणि त्यात अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमताही आहे,” असंही शाह सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही अजय शुक्ला सांगतात.
“पण आता हे प्रकरण किती लांबवायचं याचा निर्णय पाकिस्तानी लष्कराचा असेल,” असं ते म्हणाले.
“भारताची हवाई संरक्षण प्रणाली, रडार आणि संरक्षणात्मक प्रणाली पूर्णपणे सज्ज आहे, असा पाकिस्तानचा समज आहे.
अशा स्थितीत पाकिस्तानने हल्ला केला तर त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं आता पाकिस्तान काय पाऊल उचलतं ते पाहायला हवं.”
बहावलपूर का महत्त्वाचं आहे?
बहावलपूर, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या सतलज नदीच्या दक्षिण-पूर्व भागात वसलेलं एक शहर आहे. पाकिस्तानातलं तेरावं मोठं शहर म्हणून त्याची ओळख आहे.
बहावलपूर जिल्हा मात्र पाकिस्तानातल्या मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. हा सतलज नदीजवळच्या सुपीक जमिनीवर आहे. त्याला लागूनच चोलिस्तानचा वाळवंटही आहे.
या जिल्ह्याचा जवळपास दोन-तृतियांश भाग वाळवंटात जातो. हे वाळवंट तिथून सुरू होतं ते भारतातल्या थार वाळवंटापर्यंत संपतं.
भारत आणि पाकिस्तान फाळणीच्या आधी बहावलपूर संस्थानाचं केंद्र होतं. 1947 मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानात सामील होणारं बहावलपूर हे पहिलं संस्थान होतं.
स्वातंत्र्यानंतर लगेचच पाकिस्तान आर्थिक संकटाशी झुंज देत होता. तेव्हा बहावलपूरच्या नवाबांनी पाकिस्तानला उल्लेखनीय आर्थिक मदत केली होती.
आत्ताच्या काळात बहावलपूर मसूद अझहर याचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं. भारत सरकारनं सांगितल्याप्रमाणं सुभानअल्लाह मशीद मसूद अजहरच्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचं मुख्यालय होतं.
याच शहरात पाकिस्तानच्या लष्कराची 31वी कॉर्प (31 Corps) ची स्थापना करण्यात आली आहे आणि तिचं मुख्यालयही इथेच आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण पंजाबच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तानी लष्कराच्या या तुकडीकडे आहे. मार्च 2025 मध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी बहावलपूर तळाचा दौरा केला होता.
हे शहर चोलिस्तान वाळवंटात भारताच्या सीमेपासून जवळपास 100 किलोमीटर दूर आहे. हे शहर सिंध प्रांतासाठी एक नैसर्गिक सीमा आणि प्रवेशद्वार म्हणून काम करतं.
तसं पाहिलं तर इथलं वाळवंट नैसर्गिक अडथळा मानलं जातं. पण युद्धाची स्थिती आली तर याचंच रूपांतर युद्धभूमीत होऊ शकतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC